मंगळवार, १० जून, २०१४

औषधी वनस्पतीच्या लागवडीत होतेय वाढ


केनियात औषधी वनस्पतीच्या लागवडीत होतेय वाढ


मूल्यवर्धनाच्या साखळीचा विस्तारही वाढतोय

केनियामध्ये औषधी वनस्पतींच्या व्यापार व मागणीत सातत्याने वाढ होत असल्याने, जंगली वनस्पती उत्पादनाप्रमाणेच शेतीमध्ये औषधी वनस्पतींची लागवड वाढत आहे. औषधी वनस्पतीच्या व्यापारामुळे लागवडीसह योग्य त्या पॅकिंग व लेबलिंग पद्धतीचा वापरही ग्रामीण भागामध्ये होऊ लागल्याचे केनियामध्ये झालेल्या अभ्यासात दिसून आले आहे. या प्रक्रियेत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडत आहे.

विविध विकसनशील देशाप्रमाणेच केनियामध्ये पारंपरिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, सुमारे 80 टक्के आफ्रिकी लोक हे पारंपरिक औषधावर अवलंबून असतात. त्याचप्रमाणे पाश्चात्य देशामध्ये नैसर्गिक औषधांच्या वापरामध्येही वाढ होत आहे. त्याचा परिणाम औषधांची मागणी वाढण्यामध्ये झाला आहे. व्यापार आणि मागणी वाढल्याने औषधी वनस्पतींची शेतीमध्ये लागवड करण्याचे प्रमाणही वाढले असून, त्यातून चांगल्या दर्जाचे पॅकेजिंग, स्वच्छता यांचाही वापर वाढला आहे. आतापर्यंत जंगलातून उपलब्ध होणाऱ्या औषधींचा वापर विविध प्रकारच्या सौदर्य प्रसाधनांमध्ये होऊ लागला आहे. केनियामध्ये या साऱ्या प्रक्रियेचा जागतिक कृषीवन संस्थेच्या वतीने अभ्यास करण्यात आला. त्याबाबत माहिती देताना अभ्यासाच्या मुख्य संशोधिका जोनाथन मुरियुकी यांनी सांगितले, की औषधी वनोपजाच्या विक्रीमध्ये सातत्याने वाढ होत असून, ग्राहकांकडून अधिक चांगल्या दर्जाच्या पॅकेजिंगची मागणी होत आहे. त्यामुळे वनस्पती मिळवणारे, पिकवणारे, गोळा करणारे, त्यावर प्रक्रिया व निर्मिती करणारी एक मूल्यवर्धित साखळी तयार झाली आहे. त्यामध्ये निर्यातदारांचाही समावेश आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष फॉरेस्ट ट्रिज ऍण्ड लाइव्हलीहूड या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

अभ्यासातील निष्कर्ष ः

विक्रीच्या साखळीच्या प्रत्येक टप्प्यांचा अभ्यास करण्यात आला. लागवड आणि विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळण्यास मदत झाली आहे.

-  69 टक्के व्यापारी अद्यापही जंगली झाडापासून उपलब्ध होणाऱ्या उत्पादनाची मागणी करत आहेत. जंगली उत्पादनामध्ये शेतात उत्पादीत मालापेक्षा अधिक प्रमाणात औषधी गुणधर्म असल्याचे त्यांचे मत आहे. साधारणतः जंगली वनस्पती या अत्यंत सुपीक अशा जमिनीमध्ये वाढत असल्याचा हा परिणाम मानला जातो.  तसेच त्यामध्ये फारसा मानवी हस्तक्षेप होत नाही. 

- 49 टक्के व्यापारी औषधी वनस्पती शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. जे व्यापारी शेतीमध्ये उत्पादीत मालाची मागणी करतात. त्यांच्या मते, जंगलातून आवश्यक त्या प्रमाणात औषधी उत्पादनाची पुर्तता होत नाही. तसेच जंगलाच्या रक्षणासाठी असलेल्या अनेक नियमांचा अडसर येतो. त्याऐवजी प्रत्यक्ष शेतीमध्ये ही उत्पादने घेतल्याने एकाच वेळी अधिक प्रमाणात औषधी कच्च्यामालाची उपलब्धता होते. त्यातून व्यापारामध्येही वृद्धी होत आहे. तरीही व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये योग्य त्या पद्धतीने मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तसेच या प्रक्रियेमध्ये महिलांना अधिक संधी देण्याची गरज असल्याचे मत अभ्यासामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

- पारंपरिक पिकांच्या तुलनेत पर्याय म्हणून औषधी वनस्पती पिकाची लागवड वाढण्याची गरज आहे.
जर्नल संदर्भ ः
    Jonathan Muriuki, Steven Franzel, Jeremias Mowo, Peris Kariuki, Ramni Jamnadass. Formalisation of local herbal product markets has potential to stimulate cultivation of medicinal plants by smallholder farmers in Kenya. Forests, Trees and Livelihoods, 2012; 21 (2): 114 DOI: 10.1080/14728028.2012.721959

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा