सोमवार, १४ जुलै, २०१४

बोरॉन सहनशीलता नियंत्रित करणारे जनुक ओळखले


गहू पिकातील बोरॉन अधिकतेची लक्षणे



 बोरॉन या घटकांच्या अधिकतेमुळे गव्हाचे उत्पादन कमी होत असते.
यावर गहू पिकातील बोरॉनच्या सहनशीलतेला नियंत्रित करणाऱ्या जनुकांचा शोध घेण्यात ऑस्ट्रेलियामधील ऍडलेड विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे.

जागतिक पातळीवर जमिनीमध्ये बोरॉनचे प्रमाण वाढत असल्याने त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी 
ऑस्र्टेलियन संशोधकांनी गहू पिकातील बोरॉनच्या सहनशीलतेसाठी कारणीभूत जनुक ओळखले आहे. हे संशोधन नेचर या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. या संशोधनामुळे बोरॉनसाठी अधिक सहनशील जाती विकसित करण्यामध्ये पैदासकारांना मदत होणार आहे.

ऍडलेड विद्यापीठातील कृषी, अन्न आणि वाइन प्रशालेतील ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर प्लॅंट फंक्शनल जिनोमिक्स  येथील संशोधकांनी सांगितले, की ज्या मातीमध्ये बोरॉनची अधिकता असते, त्या ठिकाणी पिकांचे उत्पादनामध्ये घट येते. त्यावर केवळ जनुकिय सुधारणा हाच एक उपाय फायदेशीर ठरू शकतो.

डॉ. टीम सट्टॉन पुढे म्हणाले , की जगभरातील सुमारे 35 टक्के लोकसंख्या ही गहू पिकावर अवलंबून आहे. दुष्काळ, क्षारता, आणि मातीतील मुलद्रव्यांची अधिकता ही उत्पादकता कमी होण्याची मुख्य कारणे आहेत. दक्षिण अमेरिकेमध्ये धान्यांच्या शेतीखालील सुमारे 30 टक्के जमिनीमध्ये बोरॉनचे प्रमाण अधिक आहे. जिरायती धान्य उत्पादक पट्ट्यामध्ये जगभरामध्ये हीच समस्या सतावत आहे.
- गहू पिकांच्या संवेदनशील जातींची मुळे बोरॉन अधिक असलेल्या मातीमध्ये चांगल्या प्रकारे वाढू शकत नाहीत. केवळ काही बोरॉन सहनशील जातींची मुळे बऱ्यापैकी वाढू शकतात.



जर्नल संदर्भ ः
    Margaret Pallotta, Thorsten Schnurbusch, Julie Hayes, Alison Hay, Ute Baumann, Jeff Paull, Peter Langridge, Tim Sutton. Molecular basis of adaptation to high soil boron in wheat landraces and elite cultivars. Nature, 2014; DOI: 10.1038/nature13538

मातीच्या बांधकामांनाही मिळू शकेल ताकद

 

मातीच्या बांधकामांनाही मिळू शकेल ताकद


मातीमध्ये राखेच्या विविध प्रकारासह ताकद देणाऱ्या घटकांचा वापर ठरेल फायदेशीर


 चिकणमातीमध्ये फ्लाय व बॉटम ऍशसह काही ताकद देणारे घटक वापरल्यास बांधकामामध्ये या मातीयुक्त मिश्रणाचा वापर करणे शक्य असल्याचे मलेशियातील संशोधनामध्ये दिसून आले आहे. त्यामुळे मातीसारख्या पर्यावरणपूरक घटकांचा वापर केल्याने खर्चातही बचत साधणे शक्य होईल.
पेनिनस्युलर मलेशियामध्ये एकूण मातीच्या 20 टक्के माती चिकण प्रकारची आहे. त्याच पश्चिम आणि पूर्व किनारी भागामध्ये वालुकामय चिकणमाती (मरीन क्ले) सापडते. काही ठिकाणी तर अशी माती 60 मीटर खोलीपर्यंतही आढळते. चिकणमातीमध्ये पाणी टाकले असता तिचा चिखल मऊ होतो. मात्र, या मातीचा वापर बांधकामामध्ये केल्यास बांधकामाला तितकी ताकद मिळत नाही. तसेच तिला वाळल्यानंतर काही काळातच चिरा, भेगा पडतात. या मातीची क्षमता वाढविण्यासाठी मलेशियातील युनिव्हर्सिटी टेक्नोलोगी एमएआरए मध्ये प्रयोग करण्यात आले. या अभ्यासामध्ये माती, सिंमेट आणि ऍशेस सारख्या टाकाऊ घटकांचे योग्य प्रमाणात मिश्रण करण्यासाठी योग्य प्रमाण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
चिकणमातीच्या कणामध्ये एक प्रकारचे चिकटपणा असतो. त्याच प्रमाणे पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे तिचे प्रसरण आणि आकुंचन होत असते. या मातीमध्ये काही टाकाऊ मानले जाणारे घटक आणि चिकटपणा वाढवणारे घटक वापरल्यास मिश्रणाच्या गुणधर्मामध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे.

 असे झाले प्रयोग...

  • - या आधी झालेल्या काही अभ्यासामध्ये मातीचे स्थिरीकरण करण्यासाठी सिमेंटचा वापर फायदेशीर ठरला आहे. मात्र, सध्याही ऑर्डनरी पोर्टलॅंड सिमेंट (ओपीसी) चा वापर बांधकामासाठी केला जातो. त्याचा खर्च अधिक होतो.
  • - मातीमध्ये मिसळण्यासाठी विद्यूत ऊर्जा निर्मिती केंद्रातील टाकाऊ घटक बॉटम ऍश (बीए) आणि फ्लाय ऍश (एफए)या दोन्ही प्रकाराचा वापर केला. हे दोन्ही घटक अत्यंत स्वस्त आहेत. 
  • - बॉटम ऍश (बीए) हे भौतिक गुणधर्माने बारीक, सच्छिंद्र, दाणेदार, भुरकट रंगाचे अजळाऊ घटक असतात. भट्टीमध्ये कोळशाच्या ज्वलनानंतर खालील भागातून मिळतात. त्याच वेळी फ्लाय ऍश हे करड्या रंगाचे आणि धुळीप्रमाणे हलके असते.  सिमेंटऐवजी या घटकांचा वापर करण्यासाठी चिकटपणा वाढविण्यासाठी एका घटकांचा वापर केला.
  • - या अभ्यासामध्ये चिकणमातीमध्ये 5, 10 आणि 15 टक्क्यापर्यंत वेगवेगळ्या प्रमाणात ऍश मिसळून प्रयोग करण्यात आले. माती मिश्रणाची लवचिकता, कणांची घनता आणि चिकणपणासोबतच अन्य गुणधर्मांचीही नोंद घेण्यात आली. हे ब्लॉक वेगवेगळ्या कालावधीसाठी ठेवून त्यांची ताकद मोजण्यात आली.
  • - सिमेंटचा वापर कमी करतानाच मातीला अधिक स्थिरता मिळण्यासाठी याचा फायदा झाला. त्याच प्रमाणे हे मिश्रण स्वस्तामध्ये तयार करणे शक्य होते. 

 

ग्रामीण भारतासाठीही असे संशोधन ठरेल फायद्याचे...

  1. - ग्रामीण भारतामध्ये अनेक ठिकाणी मातीची बांधकामे अद्याप आढळतात. मात्र, मातीच्या बांधकामाचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक फायदेही आहेत. मात्र, मातीच्या बांधकामाची ताकद कमी राहते. त्यातही प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असलेली माती सरळ बांधकामासाठी वापरता येत नाही.
  2. - मातीच्या बांधकामाची स्थिरता हा मुद्दाही महत्त्वाचा असून, वित्तिय संस्था अशा बांधकामांना आर्थिक पुरवठाही करत नाहीत. त्यामुळे मातीमध्ये विविध घटकाचा वापर करून, त्याच्या ताकदीची व स्थिरतेची शास्त्रीय पद्धतीने मांडणी करणे आवश्यक आहे. त्याचा लाभही ग्रामीण भागातील लोकांच्या घरांच्या बांधणीसाठी होऊ शकेल. घरांच्या बांधणीचा खर्च बऱ्याच अंशी कमी करता येईल. 

जागतिक पातळीवरील दहा हानीकारक परजिवी जाहीर



मांस, शेतीमालातून होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केले जाताहेत प्रयत्न

अन्नातून विविध परजिवीचा प्रादुर्भाव होत असून,  दरवर्षी अन्न पदार्थातून विषबाधा होण्यामुळे लक्षावधी लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. जागतिक पातळीवर धोकादायक ठरणाऱ्या मुख्य दहा परजिवींची यादी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेने (WHO) नुकतीच जाहीर केली आहे.

जागतिक पातळीवर सामाजिक आणि आर्थिक बाबतीत या परजिवीमुळे मोठे नुकसान होते. असे असले तरी या परजिवीच्या प्रादुर्भाव, मानवी शरीरामध्ये नेमका कसा प्रवेश होतो, त्यांची लागण कशी होते, या विषयी नेमकी माहिती उपलब्ध नाही. या समस्येवर मात करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून अन्न आणि कृषी संघटनेने अधिक धोकादायक अशा पहिल्या दहा परजिवींवर लक्ष केद्रित केले आहे. अन्नामध्ये बाधा करणाऱ्या परजिवींची निवड करण्यासाठी अनेक निकष लावले आहेत.

असे आहेत धोकादायक दहा परजिवी...

 

- शास्त्रीय नाव---मराठीतील नाव--- कुठे आढळतात
- तायनिया सोलियम (Taenia solium)---(वराहातील पट्टकृमी)---वराहाच्या मांसामध्ये
- इचिनोकोक्कस ग्रॅन्युलोसस (Echinococcus granulosus)---कुत्र्यातील पट्टकृमी---ताज्या मांसामध्ये.
- इचिनोकोक्कस मल्टीलोक्युलॅरीस (Echinococcus multilocularis)---पट्टकृमीचा एक प्रकार---ताज्या मांसामध्ये.
- टॅक्सोप्लाझ्मा गोन्डिई (Toxoplasma gondii)---आदीजीव---वराह, गाय आणि कोंबडीचे मांस (रेड मीट)
- क्रिप्टोस्पोरीडीअम स्पे. (Cryptosporidium spp)--- आदीजीव---ताज्या खाद्य पदार्थात, फळाचे रस, दूध.
- इन्टामोइबा हिस्टोलियटीका (Entamoeba histolytica )---आदीजीव---ताज्या खाद्यपदार्थात.
-ट्रिचिनेल्ला स्पायरॅलिस (Trichinella spiralis )---वराहातील कृमी---वराहाच्या मांसामध्ये.
- ओपिस्थोर्चिडीई (Opisthorchiidae)---पट्टकृमीच्या कुळातील---गोड्या पाण्यातील मासे.
- अस्कारीस  स्पे. (Ascaris spp )---लहान आतड्यातील गोलकृमी---ताज्या खाद्यपदार्थामध्ये.
- ट्रायपॅनोसोमा क्रुझी (Trypanosoma cruzi)---आदीजीव---फळांच्या रसामध्ये.

----

परजिवींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न झाले सुरू

- अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी जागतिक पातळीवर अन्नाचे निकष ठरवणाऱ्या संस्था, जागतिक अन्न व कृषी संघटनेसाठी कार्यरत कोडेक्स ऍलिमेन्टासिस कमिशन यांनी ही यादी बनवली आहे.
- या जागतिक संस्था सार्वजनिक आरोग्य व व्यापाराच्या दृष्टीने परजिवींच्या नेमक्या प्रभावाची माहिती गोळा करीत आहेत. त्यामध्ये 22 देश आणि एक स्थानिय आंतरराष्ट्रीय संस्थेने माहिती गोळा करण्यामध्ये चांगला प्रतिसाद दिला आहे.
- जमा होत असलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी 21 तज्ज्ञांचा गट कार्यरत आहे.
- सध्या 93 परजिवींची प्राथमिक यादी तयार झाली असून, त्यातील जागतिक पातळीवरील प्रादुर्भाव, विस्तार, आर्थिक हानी करण्याची परजिवींची क्षमता या निकषावर 24 अधिक हानीकारक परजिवी वेगळे केले आहेत. 

गांभीर्य वाढेल...
सध्या जागतिक 10 मुख्य परजिवींची यादी ही सर्व देशातील प्रमुख 10 परजिवींची यादी असेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक देशामध्ये अत्यंत अचूक माहिती मिळवावी लागणार असल्याचे एफएओ च्या अन्न सुरक्षा आणि दर्जा विषयक मुख्य रेनाटा क्लार्क यांनी सांगितले.

शेतकरी काय करू शकतात...


सध्या या परजिवीकडे फारशा गांभिर्याने पाहिले जात नाही. मात्र, या यादीमुळे प्रत्येक देशामध्ये या विषयांचा धोरणकर्ते, माध्यमे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये गांभिर्याने विचार सुरू होईल.
परजिवींच्या प्रादुर्भावाचा धोका कमी करण्यासाठी...
- शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा वापर करताना पूर्ण कुजलेल्या खताचा वापर करणे आवश्यक आहे.
- जनावरांच्या विष्ठा आणि न कुजलेल्या घटकांचा शेतीमध्ये वापर टाळणे.
- पिण्याच्या पाण्याचा दर्जा व स्वच्छता सांभाळणे. त्याच प्रमाणे भाजीपाला सिंचनासाठी व धुण्यासाठी चांगल्या पाण्याचा वापर करणे.
- ग्राहकांनी मांस आणि त्या संबंधित पदार्थ व्यवस्थित शिजवून खाणे.

संयुक्त राष्ट्रसंघाचा पुढील टप्पा ः

  1. - कोडेक्स कमिटी ऑन फूड हायजीन आता या परजिवींना नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना तयार करत आहे.
  2. - जागतिक अन्न व्यापारासाठी प्रमाणकांची निर्मिती केली जात असून, परजिवींचा अन्न साखळीतील प्रवेश रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

सेंद्रिय उत्पादनासाठी केले उसापासून पॅकेजिंग




सर्व प्रकारच्या उत्पादन विक्रिसाठी पॅकेजिंग ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. पॅकेजिंगमधून त्या उत्पादनाच्या वैशिष्ट्याला उठाव आणण्याचे काम केले जाते. सेंद्रिय उत्पादनासाठी नैसर्गिक व सेंद्रिय पॅकेजिग आवश्यक मानले जाते. तसा आग्रहही आता जगरूक ग्राहक आणि सुपर मार्केट धरत आहेत. नेदरलॅंड येथील सेंद्रिय उत्पादक कंपनीने आपल्या पुरवठादारासह उसाच्या टाकाऊ घटकापासून पॅकेजिंग विकसित केले आहे.

नेचर ऍण्ड मोअर ही कंपनी सेंद्रिय भाजीपाला आणि फळांच्या उत्पादन आणि विक्रिमध्ये प्रसिद्ध आहे. सेंद्रिय शेतीमालाच्या विक्रीसाठी सेंद्रिय पद्धतीच्या पॅकेजिंगसाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यांनी फळांच्या पॅकेजिंगसाठी उसाच्या टाकाऊ घटकापासून बनविलेल्या कार्डबोर्डचा वापर केला आहे. या विषयी माहिती देताना कंपनीचे पॅकेजिंग तज्ज्ञ पॉल हेन्ड्रिक्स यांनी सांगितले, की गेल्या दोन वर्षापासून नवीन प्रकारचे पॅकेजिंग विकसित करण्यासाठी पुरवठादारांसह प्रयत्न केले आहेत. त्यातून उसाच्या टाकाऊ घटकांचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात पॅकेजिंगनिर्मिती करण्यात येत आहे. या पॅकेजिंगचा उपयोग सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या वेली टोमॅटो, पीअर विक्रीसाठी केला जातो.

सुपर मार्केटही वळताहेत प्लॅस्टिक मुक्त पॅकेजिंगकडे

विघटन होणारे, पुनर्वापर करणे शक्य असलेल्या प्लॅस्टिकमुक्त व पर्यावरणपुरक पॅकेजिंगच्या वापराकडे सुपर मार्केट वळत आहेत. नेचर ऍण्ड मोअर च्या सेंद्रिय उत्पादनांचा प्रमुख खरेदीदार असलेल्या फ्रेंच चेन चारेफोर या सुपर मार्केट व्यवस्थापिका ज्युली मेहमोन म्हणाल्या, की आम्ही आमच्या पुरवठादाराकडून पॅकेजिंगसह अनेक बाबीमध्ये पुनर्वापरायोग्य अशा घटकांच्या वापराला प्रोत्साहन देत असतो. त्यातून कचरा विल्हेवाटीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. तसेच उसासारख्या घटकापासून पॅकेजिंग ही चांगली कल्पना आहे. त्याचा वापर अन्य पुरवठादारही करतील, अशी आशा आहे.
----

हे फायदे आहेत

  1. -  प्लॅस्टिकचा वापर टाळला आहे.
  2. - टाकाऊ घटकांचा पुरेपूर वापर
  3. - कागदाच्या निर्मितीसाठी झाडांची तोड करावी लागणार नाही.
  4. - सध्या कंपनी जुन्या पद्धतीच्या ट्रे, टॅग आणि लेबल, स्टिकर यामध्येही बदल करीत आहे. उसापासून पॅकेजिंग हे स्वच्छ, नेसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादनासाठी योग्य आहे. तसेच वापरानंतर विल्हेवाट लावण्यामध्येही सोपे आहे. अगदी ते जाळले तरी पर्यावरणामध्ये प्लॅस्टिकप्रमाणे विषारी वायू निर्माण होत नाहीत.  
---

अधिक माहितीसाठी :

Michael Wilde
Eosta
Tel : +31-(0)180-635563
Email: michael@eosta.com
www.eosta.com
www.natureandmore.com

जलस्रोतांतील प्रदुषण ओळखण्यासाठी नवी पद्धती विकसित

 वाहत्या पाण्यासोबत जलस्रोतामध्ये पोचलेल्या मलमूत्राद्वारे विविध प्रकारच्या रोगकारक सूक्ष्मजीवाचा प्रसार होतो. (स्रोत ःऍडम पारूच, बायोफोर्स्क)
- जनावरे, मानवी मलमुत्राचे नेमके प्रदूषण येते ओळखता

मल, मुत्रामुळे जलस्रोतामध्ये होणाऱ्या प्रदूषणाचा वेध घेण्यासाठी नॉर्वेतील संशोधकांनी सूक्ष्मजीव आणि रेण्वीय जीवशास्त्रीय तंत्रज्ञानाचा उपयोग करून काही पद्धती विकसित केल्या आहेत. त्यामुळे जनावरे आणि माणसांच्या मल-मुत्राच्या प्रदुषणाची ओळख पटण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण भागामध्ये जनावरांच्या आणि माणसांच्या मलमुत्रामुळे जलस्रोतांचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. त्यातून विविध रोगांचा प्रसार होतो. पाण्यातील प्रदुषण ओळखण्यासाठी एकत्रित अशा सुक्ष्मजीव आणि रेण्वीय जीवशास्त्रीय तंत्रज्ञानावर आधारीत पद्धती नॉर्वेतील बायोफोर्स्क या कृषी आणि पर्यावरण संशोधन संस्थेतील संशोधकांनी विकसित केली आहे. त्यामुळे पाण्यातील प्रदुषण नेमके कोणत्या कारणामुळे झाले, याची माहिती उपलब्ध होईल. पर्यायाने त्यावर उपाययोजना करणे शक्य होईल.

इ. कोलाय ठरतो निदर्शक
- विष्ठेद्वारे होणाऱ्या प्रदुषणाचा इ. कोलाय हा जिवाणू निदर्शक मानला जातो. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मलमुत्रयुक्त सांडपाणी आणि शेतीतून निचरा होणाऱ्या पाण्यातूनही या इ. कोलायचा प्रसार होतो. विशेषतः अधिक पावसानंतर ही समस्या अधिक जाणवते.
- बहुतांश इ. कोलाय जिवाणूंच्या प्रजाती या हानीकारक नाहीत. मात्र, त्यातील एसटीईसी (शिगा टॉक्सीन प्रोड्युसिंग इ.कोलाय) या सारख्या काही गटाचे जिवाणू प्राण्यापासून माणसांमध्ये विषबाधा घडवून आणू शकतात. पिण्याच्या पाण्यामध्ये या प्रकारचे जिवाणू असता कामा नये.

दोन टप्प्यातील प्रदूषण ओळख पद्धती
- बायोफोर्स्क येथील ऍडम पारूच यांनी पाण्यातील इ. कोलाय जिवाणूंचा रेण्वीय पातळीवर शोध घेण्याची पद्धत तयार केली. पहिल्या टप्प्यामध्ये पाण्यामध्ये मलमूत्र प्रदुषक घटकांचा समावेश आहे की नाही, हे ओळखले जाते. त्यासाठी पाण्याच्या नमुन्यातील इ. कोलायची ओळख आणि संख्या मोजली जाते.
- दुसऱ्या टप्प्यामध्ये मलमुत्र घटक आढळलेल्या नमुन्याचे जनुकिय मार्करच्या साह्याने नेमके मानवी, गाई आणि घोडे किंवा अन्य जनावरांचे मल असल्याचे ओळखले जाते. त्यांची संख्या मोजली जाते.
- बायोफोर्स्क येथील रेण्वीय जीवशास्त्रज्ञ लिला पारूच यांच्यासह नॉर्वेतील विविध जलस्रोतांतील पाण्याच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
-----


------

जनुकिय सुधारित केळीच्या माणसांवर चाचण्या सुरू

जीएम केळीच्या लोवा विद्यापीठामध्ये माणसांवर चाचण्या सुरू आहेत.


ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथील क्वीन्सलॅंड तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधक जेम्स डेल यांच्या नेतृत्वाखाली अधिक प्रमाणात बीटा कॅरेटिन असलेल्या जनुकिय सुधारित केळी विकसित केली आहेत. त्याच्या चाचण्या अमेरिकेतील लोवा राज्य विद्यापीठामध्ये स्वयंसेवकांवर घेण्यात येत आहेत. या केळी विकसित करण्यासाठी बिल आणि मेलिंडा गेटस फौंडेशनकडून आर्थिक साह्य करण्यात आले होते.

ऑस्ट्रेलियामध्ये प्रयोगशाळेत केळीच्या जनुकामध्ये एक जनुक वाढविण्यात आले असून, त्याची लागवड ईशान्य किनारावर्ती भागामध्ये केली होती. या केळीची काढणी करून फळे गोठवली असून, लोवा येथे अमेरिकेतील कृषी विभागाच्या विशेष पूर्वपरवानगीने पाठवली आहेत. जनुकिय सुधारीत केळीमध्ये अधिक प्रमाणात असलेल्या बीटा कॅरेटिन या पोषक घटकाचे मानवी शरीरामध्ये अ जीवनसत्त्वामध्ये रुपांतर होते. लोवा राज्य विद्यापीठामध्ये संशोधिका वेंडी व्हाईट या चाचण्या स्वयंसेवकांवर घेत असून, शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जात आहे. रोज केळी खायची आणि तपासणीसाठी रक्त द्यायचे, या कामासाठी स्वयंसेवकांना मोबदला देण्यात येत आहे. या अभ्यासाचे निष्कर्षही लवकरच संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. 
अमेरिकी कृषी विभागामधील अन्न पोषकता विषयातील तज्ज्ञ मायकेल ग्रुसॅक म्हणाले, की अधिक पोषकता मूल्य असलेल्या कोणत्याही पिकांची निर्मिती ही फायदेशीर असली, तरी त्याचे नेमके मोजमाप करणे अवघड असते. अर्थात, अधिक प्रमाणात अ जीवनसत्त्व आणि लोह लोकांसाठी आवश्यक असून, कमतरता असलेल्या लोकांसाठी हे चांगले अन्न ठरेल.

अडचणीतून फायद्याकडे...
  • - सर्व चाचण्या योग्य पद्धतीने पार पडल्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होणार आहे. केळीतील बीटा कॅरेटिन आफ्रिकेतील अ जीवनसत्त्वाची कमतरता असलेल्या लोकांसाठी फायद्याची ठरणार आहेत. विशेषतः युगांडामध्ये केळी हे अधिक प्रमाणात खाल्ली जातात. मात्र, सामान्यतः आफ्रिकेमध्ये केळी ही वाफवलेली किंवा तळलेल्या स्वरुपामध्ये खाल्ली जातात. या साऱ्या प्रक्रियेमध्ये केळीतील पोषक घटकांवरही परिणाम होतात. त्यामुळे केळीचा मार्ग अधिक खडतर असल्याचे मानले जाते. मात्र, ज्या ठिकाणी केळी कच्च्या स्वरुपामध्ये खाल्ली जातात, तिथे या केळींचा अधिक फायदा होऊ शकेल.  
  • - अर्थात, या प्रक्रियेमध्येही अनेक अडचणी आहेत. जनुकिय सुधारित असल्याने विविध देशांचे धोरण, शेतकरी व ग्राहकांमध्ये या केळींची ग्राह्यता या सारख्या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

टोमॅटोची जात सुचविणार ऑनलाइन टूल!


लागवडीसाठी टोमॅटोची जात सुचविणार ऑनलाइन टूल!

पोर्तुगालमधील डी रूईटर या टोमॅटो बियाणे उत्पादक कंपनीने शेतकऱ्यांच्या नेमक्या गरजा जाणून त्याला योग्य त्या जातीच्या लागवडीचा सल्ला देण्यासाठी एक ऑनलाइन टोमॅटो टूल तयार केले आहे. त्याचे नाव ‘वुई लव टोमॅटोज्’ असे आहे.
http://www.welovetomatoes.eu/tool.html/route/teler/reset/1

लागवडीच्या मोसमामध्ये एखाद्या पिकाचे नियोजन करायचे, मग बाजारात जायचे आणि दुकानदाराकडे उपलब्ध असलेल्या किंवा तो सांगत असलेल्या जातीचे बियाणे आणून त्याची लागवड करायची, ही बहुसंख्य शेतकऱ्यांची पद्धत. त्यामध्ये भर पडते, ती गावातील अन्य शेतकऱ्यांनी दिलेल्या तथाकथित सल्ल्यांची. तो किती शास्त्रीय असेल, हाही प्रश्नच असतो. अशा वेळी बाजारात उपलब्ध असलेल्या कंपन्याही शेतकऱ्याला त्याची नेमकी गरज जाणून बियाण्याची विक्री करतात का, तर नाही. निदान भारतात तरी अनेक कंपन्या शेतकऱ्यांची गरज काय आहे, त्याच्याकडे कोणत्या परिस्थितीमध्ये, हंगामामध्ये लागवड केली जाणार आहे, उत्पादन बाजारात कोणत्या काळात येणे त्याला अपेक्षित आहे, त्याचा कोणता आकार अपेक्षित आहे, या विषयी जाणून घेताना दिसत नाहीत. मात्र पोर्तुगाल येथील डी रूईटर या कंपनीने शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि निर्णय प्रक्रिया सोपी करण्यासाठी ऑनलाइन टूलची निर्मिती केली आहे.

डी रूईटर ही एक मोठी टोमॅटो बियाणे उत्पादक कंपनी असून, त्यांच्या बाजारामध्ये टोमॅटोच्या साठ जाती उपलब्ध आहेत. या साठ जातींपैकी नेमकी कोणती जात आपल्या शेतासाठी, प्रकाश पद्धती आणि विक्रीसाठी योग्य ठरणार या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वुई लव टोमॅटोज हे एक ऑनलाइन टोमॅटो टूल मदत करते. हे साधन शेतकऱ्यांच्या नेमक्या गरजा जाणून त्याला योग्य त्या जातीच्या लागवडीचा सल्ला देते. त्यासाठी शेतकऱ्यांना केवळ आठ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्याला योग्य तो आकार, हंगाम, उत्पादन येण्याचा नेमका काळ साधणे शक्य होते. टोमॅटो जातीचे गुणधर्म, वैशिष्टे कळण्यास मदत होते. निर्णय प्रक्रिया सुलभ होते.

टोमॅटो ग्राहकांनाही होते मदत...

तसेच या साधनामध्ये टोमॅटो ग्राहकांसाठीसुद्धा एक प्रश्नमालिका आहे. त्यातून ग्राहक घावूक, किरकोळ, हॉटेल किंवा कोणत्या प्रकारचा असो, त्याची गरज जाणून योग्य ते टोमॅटो सुचवले जातात.
- शेफसाठी कोणत्या पदार्थासाठी कोणता टोमॅटो वापरल्यास तो पदार्थ अधिक खुलू शकेल, हे स्पष्ट होते.
- केवळ तीस सेकंदांमध्ये आपण टोमॅटोची योग्य ती जात निवडू शकतो.
- हे साधन डच आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध करण्यात आले असून, आयपॅड लॅपटॉप आणि डेस्कटॉप अशा सर्व प्रकारच्या संगणकावर वापरता येते.

बंबल बी च्या खाद्यसवयींवर कीडनाशकांमुळे होतो परिणाम


बंबल बी((Bombus terrestris) प्रजातीच्या कामकरी मधमाशीवर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग लावण्यात आले होते. (स्रोत ः रिचर्ड गील)

नियोनिकोटीनॉईड कीडनाशकांचा बंबल बी या मधमाशांवर होणाऱ्या परिणामांचा नेमका अभ्यास कॅनडा येथील गुयेल्फ विद्यापीठ व लंडन येथील इंपीरीअल कॉलेजमधील संशोधकांच्या गटाने केला आहे. कामकरी माशांच्या मध आणि पराग मिळविण्याच्या प्रक्रियेवरच परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  हे संशोधन ब्रिटीश इकॉलॉजिकल सोसायटीच्या जर्नल फंक्शनल इकॉलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

बंबल बी या मधमाशा पराग आणि मध गोळा करत विविध फुलापर्यंत जात असतात. अधिक मध उपलब्ध होण्यासाठी फुलांची निवड व जवळचा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, शेतीमध्ये नियोनिकोटीनॉईड कीडनाशकांचा वापरामुळे मधमाश्यांच्या वर्तणूकीवर होत असल्याचे पुढे आले आहे. विशेषतः बंबल बीच्या पर्यावरणातील विविध घटकांचा विचार करण्याच्या व शिकण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.

असा झाला प्रयोग

  • - गुयेल्फ विद्यापीठातील संशोधक निगेल रैनी आणि इंपीरीअल कॉलेज, लंडन येथील रिचर्ड गील यांनी बंबल बी या माशाच्या पाठीवर रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅग लावून, त्यांच्या वर्तणूकीचा अभ्यास केला आहे. या अभ्यासामध्ये नियोनिकोटीनॉईड कीडनाशकांच्या संपर्कात मधमाशा आल्याने निर्माण होणाऱ्या समस्यांवर लक्ष केद्रित केले होते. अधिक काळासाठी या किडनाशकांच्या संपर्कात राहिल्यास बंबल बीच्या वर्तणूकिवर विशेषतः पराग गोळा करणे आणि फुलांची निवड करणे यावर परिणाम होतो.
  • - प्रयोगामध्ये नियोनिकोटीनॉईड कीडनाशकांद्वारे प्रक्रिया केलेल्या व न केलेल्या वसाहतीमधील मधमाशांच्या मध शोधण्यासाठी बाहेर पडल्यापासून माघारी परतेपर्यंतचा मागोवा घेण्यात आला. त्यामध्ये प्रक्रिया न केलेल्या वसाहतीतील माशा पराग गोळा करण्यामध्ये अधिक यशस्वी ठरत असल्याचे दिसून आले आहे.
  • - प्रक्रिया केलेल्या वसाहतीतील मधमाशांना फारच कमी मध उपलब्ध होत असल्याने अधिक फेऱ्या माराव्या लागतात.
  • - या अभ्यासामध्ये संशोधकांनी इमिडाक्लोप्रीड आणि लॅम्बडा सायहॅलोथ्रीन या दोन कीडनाशकांच्या परिणामांचा अभ्यास केला आहे. (सध्या या कीडनाशकांवर युरोपियन महासंघाने बंदी घातली आहे.)
  • - हा प्रयोग चाळीस वसाहतीवर चार आठवड्यासाठी केला.

बंबल बीच्या वसाहती ठरतात कीडनाशकांसाठी अधिक संवेदनशील ः

  1. - जागतिक कीडनाशकांच्या बाजारपेठेमध्ये नियोनिकोटीनॉईड प्रकारच्या किडनाशकांचा वाटा 30 टक्के आहे.
  2. - बीजप्रक्रियेमध्ये ही कीडनाशके वापरल्याने पिकांच्या आंतरभागामध्ये (मध आणि परागमध्येही) असतात.
  3. - मध आणि पराग हेच अन्न असलेल्या मधमाश्यावर या विषारी घटकांचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे मधमाशांच्या वसाहती नष्ट होत आहे.
  4. - जागतिक पातळीवर विचार केल्यास बंबल बी सह विविध किटकांद्वारे परागीकरण होणाऱ्या पिकांच्या उतपादनामध्येही घट होत आहे.
  5. - मधमाशांच्या वसाहतीमध्ये साधारणतः 10 हजार कामकरी माश्या असतात, तर बंबल बीच्या वसाहतीमध्ये केवळ काहीशे कामकरी माश्या असतात. त्यामुळे बंबल बी च्या वसाहती या कीडनाशकांसाठी अधिक संवेदनशील असल्याचे रैनी यांनी सांगितले.
  6. - सध्या केवळ मधमाशांपुरताच विचार करून युरोपियन महासंघाने बंदी घातली आहे. त्याध्ये बंबल बी आणि सॉलिटरी बी यांचाही समावेश करण्याची आवश्यकता या संशोधनामुळे पुढे आली आहे.


जर्नल संदर्भ ः
    Richard J. Gill, Nigel E. Raine. Chronic impairment of bumblebee natural foraging behaviour induced by sublethal pesticide exposure. Functional Ecology, 2014; DOI: 10.1111/1365-2435.12292
----------------------------------------