सोमवार, १४ जुलै, २०१४

जनुकिय सुधारित केळीच्या माणसांवर चाचण्या सुरू

जीएम केळीच्या लोवा विद्यापीठामध्ये माणसांवर चाचण्या सुरू आहेत.


ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथील क्वीन्सलॅंड तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधक जेम्स डेल यांच्या नेतृत्वाखाली अधिक प्रमाणात बीटा कॅरेटिन असलेल्या जनुकिय सुधारित केळी विकसित केली आहेत. त्याच्या चाचण्या अमेरिकेतील लोवा राज्य विद्यापीठामध्ये स्वयंसेवकांवर घेण्यात येत आहेत. या केळी विकसित करण्यासाठी बिल आणि मेलिंडा गेटस फौंडेशनकडून आर्थिक साह्य करण्यात आले होते.

ऑस्ट्रेलियामध्ये प्रयोगशाळेत केळीच्या जनुकामध्ये एक जनुक वाढविण्यात आले असून, त्याची लागवड ईशान्य किनारावर्ती भागामध्ये केली होती. या केळीची काढणी करून फळे गोठवली असून, लोवा येथे अमेरिकेतील कृषी विभागाच्या विशेष पूर्वपरवानगीने पाठवली आहेत. जनुकिय सुधारीत केळीमध्ये अधिक प्रमाणात असलेल्या बीटा कॅरेटिन या पोषक घटकाचे मानवी शरीरामध्ये अ जीवनसत्त्वामध्ये रुपांतर होते. लोवा राज्य विद्यापीठामध्ये संशोधिका वेंडी व्हाईट या चाचण्या स्वयंसेवकांवर घेत असून, शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जात आहे. रोज केळी खायची आणि तपासणीसाठी रक्त द्यायचे, या कामासाठी स्वयंसेवकांना मोबदला देण्यात येत आहे. या अभ्यासाचे निष्कर्षही लवकरच संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. 
अमेरिकी कृषी विभागामधील अन्न पोषकता विषयातील तज्ज्ञ मायकेल ग्रुसॅक म्हणाले, की अधिक पोषकता मूल्य असलेल्या कोणत्याही पिकांची निर्मिती ही फायदेशीर असली, तरी त्याचे नेमके मोजमाप करणे अवघड असते. अर्थात, अधिक प्रमाणात अ जीवनसत्त्व आणि लोह लोकांसाठी आवश्यक असून, कमतरता असलेल्या लोकांसाठी हे चांगले अन्न ठरेल.

अडचणीतून फायद्याकडे...
  • - सर्व चाचण्या योग्य पद्धतीने पार पडल्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होणार आहे. केळीतील बीटा कॅरेटिन आफ्रिकेतील अ जीवनसत्त्वाची कमतरता असलेल्या लोकांसाठी फायद्याची ठरणार आहेत. विशेषतः युगांडामध्ये केळी हे अधिक प्रमाणात खाल्ली जातात. मात्र, सामान्यतः आफ्रिकेमध्ये केळी ही वाफवलेली किंवा तळलेल्या स्वरुपामध्ये खाल्ली जातात. या साऱ्या प्रक्रियेमध्ये केळीतील पोषक घटकांवरही परिणाम होतात. त्यामुळे केळीचा मार्ग अधिक खडतर असल्याचे मानले जाते. मात्र, ज्या ठिकाणी केळी कच्च्या स्वरुपामध्ये खाल्ली जातात, तिथे या केळींचा अधिक फायदा होऊ शकेल.  
  • - अर्थात, या प्रक्रियेमध्येही अनेक अडचणी आहेत. जनुकिय सुधारित असल्याने विविध देशांचे धोरण, शेतकरी व ग्राहकांमध्ये या केळींची ग्राह्यता या सारख्या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा