मातीच्या बांधकामांनाही मिळू शकेल ताकद
मातीमध्ये राखेच्या विविध प्रकारासह ताकद देणाऱ्या घटकांचा वापर ठरेल फायदेशीर
चिकणमातीमध्ये फ्लाय व बॉटम ऍशसह काही ताकद देणारे घटक वापरल्यास बांधकामामध्ये या मातीयुक्त मिश्रणाचा वापर करणे शक्य असल्याचे मलेशियातील संशोधनामध्ये दिसून आले आहे. त्यामुळे मातीसारख्या पर्यावरणपूरक घटकांचा वापर केल्याने खर्चातही बचत साधणे शक्य होईल.
पेनिनस्युलर मलेशियामध्ये एकूण मातीच्या 20 टक्के माती चिकण प्रकारची आहे. त्याच पश्चिम आणि पूर्व किनारी भागामध्ये वालुकामय चिकणमाती (मरीन क्ले) सापडते. काही ठिकाणी तर अशी माती 60 मीटर खोलीपर्यंतही आढळते. चिकणमातीमध्ये पाणी टाकले असता तिचा चिखल मऊ होतो. मात्र, या मातीचा वापर बांधकामामध्ये केल्यास बांधकामाला तितकी ताकद मिळत नाही. तसेच तिला वाळल्यानंतर काही काळातच चिरा, भेगा पडतात. या मातीची क्षमता वाढविण्यासाठी मलेशियातील युनिव्हर्सिटी टेक्नोलोगी एमएआरए मध्ये प्रयोग करण्यात आले. या अभ्यासामध्ये माती, सिंमेट आणि ऍशेस सारख्या टाकाऊ घटकांचे योग्य प्रमाणात मिश्रण करण्यासाठी योग्य प्रमाण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
चिकणमातीच्या कणामध्ये एक प्रकारचे चिकटपणा असतो. त्याच प्रमाणे पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे तिचे प्रसरण आणि आकुंचन होत असते. या मातीमध्ये काही टाकाऊ मानले जाणारे घटक आणि चिकटपणा वाढवणारे घटक वापरल्यास मिश्रणाच्या गुणधर्मामध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे.
असे झाले प्रयोग...
- - या आधी झालेल्या काही अभ्यासामध्ये मातीचे स्थिरीकरण करण्यासाठी सिमेंटचा वापर फायदेशीर ठरला आहे. मात्र, सध्याही ऑर्डनरी पोर्टलॅंड सिमेंट (ओपीसी) चा वापर बांधकामासाठी केला जातो. त्याचा खर्च अधिक होतो.
- - मातीमध्ये मिसळण्यासाठी विद्यूत ऊर्जा निर्मिती केंद्रातील टाकाऊ घटक बॉटम ऍश (बीए) आणि फ्लाय ऍश (एफए)या दोन्ही प्रकाराचा वापर केला. हे दोन्ही घटक अत्यंत स्वस्त आहेत.
- - बॉटम ऍश (बीए) हे भौतिक गुणधर्माने बारीक, सच्छिंद्र, दाणेदार, भुरकट रंगाचे अजळाऊ घटक असतात. भट्टीमध्ये कोळशाच्या ज्वलनानंतर खालील भागातून मिळतात. त्याच वेळी फ्लाय ऍश हे करड्या रंगाचे आणि धुळीप्रमाणे हलके असते. सिमेंटऐवजी या घटकांचा वापर करण्यासाठी चिकटपणा वाढविण्यासाठी एका घटकांचा वापर केला.
- - या अभ्यासामध्ये चिकणमातीमध्ये 5, 10 आणि 15 टक्क्यापर्यंत वेगवेगळ्या प्रमाणात ऍश मिसळून प्रयोग करण्यात आले. माती मिश्रणाची लवचिकता, कणांची घनता आणि चिकणपणासोबतच अन्य गुणधर्मांचीही नोंद घेण्यात आली. हे ब्लॉक वेगवेगळ्या कालावधीसाठी ठेवून त्यांची ताकद मोजण्यात आली.
- - सिमेंटचा वापर कमी करतानाच मातीला अधिक स्थिरता मिळण्यासाठी याचा फायदा झाला. त्याच प्रमाणे हे मिश्रण स्वस्तामध्ये तयार करणे शक्य होते.
ग्रामीण भारतासाठीही असे संशोधन ठरेल फायद्याचे...
- - ग्रामीण भारतामध्ये अनेक ठिकाणी मातीची बांधकामे अद्याप आढळतात. मात्र, मातीच्या बांधकामाचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक फायदेही आहेत. मात्र, मातीच्या बांधकामाची ताकद कमी राहते. त्यातही प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असलेली माती सरळ बांधकामासाठी वापरता येत नाही.
- - मातीच्या बांधकामाची स्थिरता हा मुद्दाही महत्त्वाचा असून, वित्तिय संस्था अशा बांधकामांना आर्थिक पुरवठाही करत नाहीत. त्यामुळे मातीमध्ये विविध घटकाचा वापर करून, त्याच्या ताकदीची व स्थिरतेची शास्त्रीय पद्धतीने मांडणी करणे आवश्यक आहे. त्याचा लाभही ग्रामीण भागातील लोकांच्या घरांच्या बांधणीसाठी होऊ शकेल. घरांच्या बांधणीचा खर्च बऱ्याच अंशी कमी करता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा