सोमवार, १४ जुलै, २०१४

टोमॅटोची जात सुचविणार ऑनलाइन टूल!


लागवडीसाठी टोमॅटोची जात सुचविणार ऑनलाइन टूल!

पोर्तुगालमधील डी रूईटर या टोमॅटो बियाणे उत्पादक कंपनीने शेतकऱ्यांच्या नेमक्या गरजा जाणून त्याला योग्य त्या जातीच्या लागवडीचा सल्ला देण्यासाठी एक ऑनलाइन टोमॅटो टूल तयार केले आहे. त्याचे नाव ‘वुई लव टोमॅटोज्’ असे आहे.
http://www.welovetomatoes.eu/tool.html/route/teler/reset/1

लागवडीच्या मोसमामध्ये एखाद्या पिकाचे नियोजन करायचे, मग बाजारात जायचे आणि दुकानदाराकडे उपलब्ध असलेल्या किंवा तो सांगत असलेल्या जातीचे बियाणे आणून त्याची लागवड करायची, ही बहुसंख्य शेतकऱ्यांची पद्धत. त्यामध्ये भर पडते, ती गावातील अन्य शेतकऱ्यांनी दिलेल्या तथाकथित सल्ल्यांची. तो किती शास्त्रीय असेल, हाही प्रश्नच असतो. अशा वेळी बाजारात उपलब्ध असलेल्या कंपन्याही शेतकऱ्याला त्याची नेमकी गरज जाणून बियाण्याची विक्री करतात का, तर नाही. निदान भारतात तरी अनेक कंपन्या शेतकऱ्यांची गरज काय आहे, त्याच्याकडे कोणत्या परिस्थितीमध्ये, हंगामामध्ये लागवड केली जाणार आहे, उत्पादन बाजारात कोणत्या काळात येणे त्याला अपेक्षित आहे, त्याचा कोणता आकार अपेक्षित आहे, या विषयी जाणून घेताना दिसत नाहीत. मात्र पोर्तुगाल येथील डी रूईटर या कंपनीने शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि निर्णय प्रक्रिया सोपी करण्यासाठी ऑनलाइन टूलची निर्मिती केली आहे.

डी रूईटर ही एक मोठी टोमॅटो बियाणे उत्पादक कंपनी असून, त्यांच्या बाजारामध्ये टोमॅटोच्या साठ जाती उपलब्ध आहेत. या साठ जातींपैकी नेमकी कोणती जात आपल्या शेतासाठी, प्रकाश पद्धती आणि विक्रीसाठी योग्य ठरणार या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वुई लव टोमॅटोज हे एक ऑनलाइन टोमॅटो टूल मदत करते. हे साधन शेतकऱ्यांच्या नेमक्या गरजा जाणून त्याला योग्य त्या जातीच्या लागवडीचा सल्ला देते. त्यासाठी शेतकऱ्यांना केवळ आठ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्याला योग्य तो आकार, हंगाम, उत्पादन येण्याचा नेमका काळ साधणे शक्य होते. टोमॅटो जातीचे गुणधर्म, वैशिष्टे कळण्यास मदत होते. निर्णय प्रक्रिया सुलभ होते.

टोमॅटो ग्राहकांनाही होते मदत...

तसेच या साधनामध्ये टोमॅटो ग्राहकांसाठीसुद्धा एक प्रश्नमालिका आहे. त्यातून ग्राहक घावूक, किरकोळ, हॉटेल किंवा कोणत्या प्रकारचा असो, त्याची गरज जाणून योग्य ते टोमॅटो सुचवले जातात.
- शेफसाठी कोणत्या पदार्थासाठी कोणता टोमॅटो वापरल्यास तो पदार्थ अधिक खुलू शकेल, हे स्पष्ट होते.
- केवळ तीस सेकंदांमध्ये आपण टोमॅटोची योग्य ती जात निवडू शकतो.
- हे साधन डच आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध करण्यात आले असून, आयपॅड लॅपटॉप आणि डेस्कटॉप अशा सर्व प्रकारच्या संगणकावर वापरता येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा