सोमवार, ७ मे, २०१२

सेर्स तंत्रज्ञानाचा वापर रोखेल विषबाधा


विषबाधेला कारणीभूत जिवाणूचा प्रादुर्भाव ओळखणे शक्य

फळे आणि भाजीपाल्यामध्ये आढळून येणाऱ्या सॅलमोनेला या जीवाणूंच्या प्रादु्र्भावामुळे विषबाधेचे प्रमाण वाढत आहे. या जिवाणूचा प्रादुर्भाव लवकर ओळखण्यासाठी अमेरिकेतील कृषी विभगाच्या संशोधकांनी प्रथमच सरफेस एनहान्सड रॅमन स्कॅटरींग (SERS) या अत्याधुनिक पद्धतीचा वापर केला आहे.  सॅलमोनेला आणि अन्य हानीकारक जिवाणूची ओळख पटवण्यासाठी ही पद्धत सहज, सोपी आणि विश्वासार्ह असल्याचे संशोधकांचे मत आहे. 
अमेरिकेतील रोग प्रतिबंधक व नियंत्रण संस्थेच्या अहवालानुसार, प्रति वर्ष सॅलमोनेला या जिवाणूमुळे होणाऱ्या विषबाधेने एक दशलक्ष लोक आजारी पडतात. त्यामुळे सॅलमोनेलाचा प्रादुर्भाव लवकरात लवकर ओळखण्याच्या दृष्टीने जगभरातील प्रयोगशाळा संशोधन करत आहेत. या जिवाणूंचा प्रादुर्भाव लवकरात लवकर ओळखण्यासाठी सेर्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये अमेरिकेतील संशोधक बोसून पार्क यांनी काही सुधारणा केल्या आहेत. सेर्स ही अत्याधुनिक पद्धत अत्यंत सोपी व विश्वासार्ह आहे. या पद्धतीमुळे अन्न प्रक्रिया उद्योग त्यांच्या प्रयोगशाळेतही या जिवाणूचा प्रादु्र्भाव ओळखणे शक्य होणार आहे.
असे आहे सेर्स तंत्रज्ञान
सेर्स विश्लेषणासाठी पदार्थ हा स्टेनलेस स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवण्यात येतो. या प्लेटचा मऊपणा कमी करण्यासाठी त्याच्या पृष्ठभागावर चांदीच्या अतिसुक्ष्म कणांचे गोलाकार थर देण्यात आले. या प्रकारचे पृष्ठभाग प्रकाशाच्या परावर्तनासाठी उपयुक्त ठरतात. या पृष्ठभागावर ठेवलेले पदार्थाची छाननी रॅमन स्पेक्ट्रोमीटरच्या लेसर झोताने केली जाते. पदार्थावर आपटून माघारी स्पेक्ट्रोमीटरमध्ये येणाऱ्या झोताला रॅमन स्पेक्ट्रल सिग्नेचर किंवा सिग्नल असे म्हटले जाते. सॅलमोनेला यांच्या सह अन्य सुक्ष्म जीवांचाही विसिष्ट असा सिग्नल उपलब्ध होतो.   कमी प्रमाणात असलेल्या किंवा प्रादु्रभावाच्या सुरवातीच्या अवस्थेतही सुक्ष्म जीवांचा प्रादुर्भाव ओळखता येणे  शक्य असल्याचे या संदर्भात झालेल्या प्रयोगात आढळून आलेले आहे.
 या संशोधनाचे निष्कर्ष अॅग्रीकल्चरल रिसर्च मॅगेझीन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
----

फोटोओळ- सेर्स या पद्धतीमध्ये चांदीच्या अतिसु्क्षम कणांच्या थरामुळे सॅलमोनेला सारख्या जीवाणूंची ओळख सहजतेने होण्यास मदत झाली आहे.

कॅनसह प्या सूप



खाण्यायोग्य पॅकेंजिग झाले विकसित,
हार्वर्ड विद्यापीठाचे संशोधन
-----
सध्या अन्न पदार्थाच्या पॅकेजिंगसाठी प्लॅस्टीकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुऴे प्लॅस्टीकच्या प्रदूषणात वाढ होत आहे. मात्र आता खाता येईल, अशा प्रकारचे पॅकेंजिंग हारवर्ड विद्यापीठातील संशोधकानी विकसित केले आहे.  त्याचे नाव विकिसेल्स असे ठेवण्यात आले असून अन्न पदार्थांसाठी पॅकेजिंग आणि वाहतूकीसाठी प्लॅस्टीकचा वापर कमी करणे शक्य होणार आहे. येत्या वर्षाअखेरीपर्यंत लिंबाचा रस आता आपल्याला लिंबाच्या, पंपकिनचे सूप स्पिनॅचच्या किंवा वितळलेले चाॅकलेट चेरीचपासून विकसित केलेल्या पॅकेजिंगमध्ये उपलब्ध होऊ शकतील.
 प्लॅस्टीक आणि अन्य पॅकेंजिग मटेरियलमुळे पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी विघटन होऊ शकतील, किंवा खाता येतील अशा प्रकारची पॅकेजिंग तयार करण्यासाठी हाॅरव्ड विद्यापीठातील संशोधक डेव्हिड एडवर्ड यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या गटाने संशोधन केले आहे. त्यामुळे सफरचंदाला बाहेरून पातळ असा संरक्षक थर दिलेला असणार आहे. त्यामुळे फळांचे संरक्षण होण्यास मदत मिळणार आहे. म्हणजेच एखादा खाद्यपदार्थ खाता खाता त्याच्याबरोबर त्याचे पॅकेजिंग किंवा त्याचा कॅनही आपण खाऊ शकणार आहोत. याबाबत माहिती देताना डेव्हिड एडवर्ड यांनी सांगितले, की खाण्यायोग्य पदार्थाचे इलेक्ट्रोस्टॅटिक बलाच्या साह्याने भारीत कण पदार्थांच्या भोवती तयार करण्यात येतील. घन, द्रव या दोन्ही प्रकारच्या पदार्थांसाठी पॅकेजिंग वापरता येतील. हे पदार्थापासून वेगळे करता येतील किंवा त्यांच्यासह पदार्थ खाता येईल.

भविष्यातील पॅकेजिंगसाठी संशोधन व प्रसार
- पदार्थाची चव आणि खाण्याच्या अनुभवामध्ये बदल होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. पॅरीस येथील फुड लॅबमध्ये यावर संशोधन करण्यात येत आहे.
-सध्या कमी कालावधीसाठी ही पॅकेजिंग विकसित करण्यात आली असली तरी मध्यम आणि दिर्घ काळासाठी साठवण करण्यायोग्य पॅकेजिंग विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.  तसेच सध्या दिवसाच्या वातारणामध्ये आणि फ्रिझमध्ये दिर्घ काळ साठवण शक्य आहे. मात्र त्यामध्येही काही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे एडवर्ड यांनी सांगितले.
- सध्या या पॅकेंजिगमधील खाद्यपदार्थाची विक्री पॅरीस येथील इन्व्हेन्शन बार येथे करण्यात येत आहे.
-या प्रकारच्या पॅकेजिंगचा प्रसार करण्यासाठी फ्रेंच डिझायनर फ्रान्कोइस अॅझमबोर्ग यांच्यासह या पॅकेंजिगचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

आता कीड व्यवस्थापनातही उपयुक्त ठरेल बारकोडींग



बार कोडींग म्हटले की आपल्याला सुपर मार्केट किंवा माॅलमध्ये विविध पॅकेटवर असणाऱ्या उभ्या कमी अधिक जाडीच्या रेषा डोळ्यासमोर येतात. मात्र अमेरिकेतील कृषी विभागातील संशोधकांनी गहू , बार्ली, बटाटे या पिकांवर येणाऱ्या किडीच्या मोजमापासाठी, निरीक्षणासाठी या डीएनए बार कोडचा वापर केला आहे. त्यामुळे किडीच्या नियंत्रण, व्यवस्थापन, व नियोजन करण्यासाठी या पद्धतीचा वापर करणे शक्य होणार आहे.

 किडीचे अनेक प्रकार हे त्यांच्यामध्ये असलेल्या साम्यामुळे ओळखताना शेतकऱ्यांना, तसेच निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीला अडचणी येतात. त्यामुळे त्यांचे नियंत्रण करण्यासाठी नियोजन करता येत नाही. यावर अमेरिकेतील कृषी विभागाच्या संशोधकांनी डिएनए बारकोडींगचा उपाय शोधला आहे. या मध्ये किडीच्या जनुकांचे सुसंगतवार विश्लेषण केले असून त्यावर आधारीत बार कोड विकसित केले आहेत. पृथ्वीवर आढळून येणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती, पिके आणि प्राण्याचे जनुकीय विश्लेषण सातत्याने केले जात असते. त्यामुळे पृथ्वीवरील जैवविविधतेची समग्र सूची विकसित करण्यात येत आहे. त्याचाच उपयोग हे बार कोड तयार करण्यासाठी करण्यात येत आहे.

कोलरॅडो पोटॅटो बीटल या बटाट्यावरील प्रमुख किडीचे बारकोडींग करण्यात आले आहे.

बेल्टव्हीले येथील हानीकारक कीड जैविक नियंत्रण आणि वर्तन प्रयोगशाळेतील कीटकशास्त्रज्ञ मॅथ्यू ग्रीनस्टोन यांनी डिएनए बारकोडींगचा वापर प्रथम कोलोरॅडो पोटॅटो बीटल या भुंग्यांच्या नियंत्रणासाठी केला आहे. ही कीड या विभागामधील बटाट्यावरील प्रमुख कीड मानली जाते. जैविक कीड नियंत्रणामध्ये विविध मित्रकीटकांचा हानीकराक किडी फस्त करण्याचा दर हा वेगळा असल्याने त्यांच्यामध्ये तुलना करण्यासाठी त्यांनी डिएनए बारकोडींग पद्धतीचा वापर केला आहे. 
ग्रीनस्टोन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बटाट्यावरील भुंग्यांच्या भक्षक किटकांच्या चार प्रजातीचा अभ्यास केला. हे चार ही प्रजातीचे कीटक गोळा करून प्रयोगशाळेमध्ये त्यांना खाद्य म्हणून बटाट्यावरील भुंगे देण्यात आले.  भक्षकांच्या पोटात गेल्यानंतरही किती काळापर्यंत त्यांची ओळख पटविता येते, याचा अभ्यास केला. मित्रकीटकांची कार्यक्षमता तपासण्यामध्ये बार कोडींगचा चांगला उपयोग होत असल्याचे त्यांच्या संशोधनात आढळले आहे.  त्यामुळे जैविक पद्धतीने कीडीच्या व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढविणे शक्य असून कीडींच्या नियंत्रणासाठी ही पद्धत उपयुक्त ठरली आहे. 

असे होते डिएनए बारकोडिंग
असे होते डिएनए बारकोडींग
या संशोधनाचे निष्कर्ष एन्टोमोलाॅजिया एक्सपेरीमेंटलीस इट अॅप्लीसिटा या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

लसूण रोखेल जिवाणूजन्य विषबाधा



लसणातील सल्फाईड घटकामध्ये जिवाणूजन्य रोगाना रोखण्याची क्षमता आहे.

चिकनच्या मांसातील कॉप्लीबॅक्टर जेजूनी जिवाणूमुळे डायरिया, पोटाचे विकार आणि ताप दिसून येतो.
लोकप्रिय प्रतिजैविकापेक्षा लसूण 100 पट अधिक कार्यक्षम

वॉशिग्टन राज्य विद्यापीठाच्या संशोधकांना लसणातील घटक हे लोकप्रिय असलेल्या दोन प्रतिजैविकापेक्षा 100 पट अधिक कार्यक्षम असल्याचे आढळून आले आहे. पोटाच्या विकारासाठी कॉम्पलोबॅक्टर हा जीवाणू कारणीभूत मानला जातो. त्याच्यावरील उपचारासाठी लसणातील घटकांचा वापर करणे शक्य आहे. हे संशोधन अन्न आणि मांसावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल ऑफ अॅण्टीमायक्रोबीयल किमयोथेरपी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

अन्नातून होणाऱ्या विषबाधेसाठी कॉम्पलोबॅक्टर जेजूनी (Campylobacter jejuni) हा जिवाणू कारणीभूत असतो. त्याला रोखण्यासाठी गेल्या 25 वर्षापासून संशोधन करणारे मायकेल कोन्केल यांनी सांगितले, की पर्यावरणामध्ये व अन्नामध्ये आढळणाऱ्या या रोगकारक जिवाणूमुळे रोगाचे प्रमाण वाढत आहे. सुमारे 2.4 दशलक्ष अमेरिकन लोकांच्या अनारोग्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या जिवाणूंना रोखण्यामध्ये लसणातील डायअॅलील सल्फाईड महत्त्वाची भुमिका निभावणार आहे.

असे आहे संशोधन
कॉम्पलोबॅक्टर जेजूनी हा जिवाणू स्वतःभोवती पातळ अशा जैविक फिल्म तयार करत असल्याने अन्य प्रतिजैविकांसाठी 1000 पट अधिक प्रतिकारक्षम आहे. मात्र लसणातील सल्फाईड हे घटक हे आवरण भेदून त्यांचा नाश करत असल्याचे झिओनान लू, मायकेल कोन्केल आणि अन्य संशोधकांच्या गटाने केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. अन्नातील विषबाधेसाठी कारणीभूत ठरणाऱ्या लिस्टेरिया मोनोसायटोजिन आणि ई. कोलाय सारख्या अन्य सुक्ष्म जीवांच्या बाबतीतही लसणातील सल्फाईड घटक अधिक चांगल्या प्रकारे कार्य करत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगातून सुरक्षित अन्न तयार करण्यासाठी, त्यांची साठवण करण्यासाठी लसणाच्या या गुणधर्माचा फायदा होणार आहे.
-----
जर्नल संदर्भ-
 Xiaonan Lu, Derrick R. Samuelson, Barbara A. Rasco, and Michael E. Konkel. Antimicrobial effect of diallyl sulphide on Campylobacter jejuni biofilms. J. Antimicrob. Chemother., May 1, 2012

गुरुवार, ३ मे, २०१२

कलिंगडाच्या रसामुळे होतील स्नायूंच्या वेदना कमी



कलिंगडाच्या सालामध्ये असलेल्या अमिनो आम्लाचा वापर करून कलिंगडाच्या रसाची पोषकता वाढवण्यात स्पेनमधील संशोधकांना यश आले आहे. या कलिंगडाच्या रसाचा उपयोग स्नायूतील वेदना कमी करण्यासाठी होऊ शकत असल्याचे संशोधनात आढळले आहे.

प्रक्रिया उद्योगामध्ये कलिंगडाच्या गर आणि रस काढून घेतल्यानंतर साली टाकून दिल्या जातात. सालीमध्ये अमिनो आम्ले असतात, ही पोषक द्रव्ये वाया जातात. या पोषक द्रव्याचा रसासोबत वापर करून स्पेन येथील कार्टाजिना पाॅलिटेक्निक विद्यापीठातील संशोधकांनी कलिंगडाच्या रसामध्ये अमिनो आम्लाचे प्रमाण वाढवले आहे. त्याचा उपयोग स्नायूमधील वेदना कमी करण्यासाठी होऊ शकतो. विशेषतः खेळाडूंना खेळताना स्नायूनध्ये मोठ्या प्रमाणात जखमा होतात. या जखमामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे. संस्थेतील पॅट्रीसिया मार्था टाराझोना यांनी त्यांच्या पीएचडीसाठी हे संशोधन केले आहे.


कलिंगडाच्या रसामध्ये एएसएल सीट्रूलिन सारखी अमिनो आम्ले असतात. त्यांचा वापर स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी , त्यांना विश्रांती देण्यासाठी वापर केला जातो.याबाबत माहिती देताना टाराझोना यांनी सांगितले, की प्रयोगामध्ये हि अमिनो आम्ले औषधापेक्षा फळांच्या रसामधून पेशीमध्ये चांगल्या प्रकारे शोषली जातात.

बदलत्या तापमानात बदलला चिमण्यांचा स्थलांतर मार्ग

सोनेरी डोक्याची चिमणी मादी.  प्रजननासाठी पुर्वीपेक्षा दुप्पट अंतर कापून दक्षिणेकडे स्थलांतर करत असल्याचे आढळले आहे.

गोल्डन क्राऊन स्पॅरोचा नर



 खाद्य मिळवणे, प्रजनन यासारख्या विविध कारणासाठी पक्षी स्थलांतर करतात. विविध पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास सातत्याने पक्षीतज्ज्ञ करत असतात. कॅलिफोर्नियातील सोनेरी डोक्याच्या चिमण्या वसंतामध्ये प्रजननासाठी स्थलांतर करतात. त्यांच्या शरीरावर टॅगींग करून त्यांच्या प्रवासाच्या मार्गाचा अभ्यास प्रथमच पीआरबीओ संवर्धन केंद्राने केला आहे. बदलत्या हवामानामध्ये त्यांच्या स्थलांतराच्या मार्गामध्ये होत असलेल्या बदलाचा अभ्यास या निमित्ताने करण्यात आलाल. सुरेल गाण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या चिमण्या वसंतामध्ये  पुर्वी या चिमण्या उत्तरेकडे प्रवास करत असत. मात्र या अभ्यासात दक्षिणेतील अलास्काच्या समुद्रकिनाऱ्यांच्या भागामध्ये प्रजननासाठी स्थलांतर करत असल्याचे आढळले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष प्लॉसवन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

जागतिक तापमान वाढीमुळे पशुपक्ष्यांवर विपरीत परीणाम होत आहेत. त्यांच्या प्रजनन आणि अन्य वर्तनामध्येही फरक होत आहेत. सोनेरी डोक्याच्या चिमण्या या वसंतामध्ये प्रजननासाठी उत्तरेकडे स्थलांतर करत असत. त्याबाबत अभ्यास करण्यासाठी पीआर बीओच्या संशोधकांनी चिमण्यांना टॅंगीग केले होते. संशोधिका डायना हंपल यांनी सांगितले, की हिवाळ्यामध्ये सुमारे 30 ग्रॅम वजनाच्या या चिमण्या 1600 ते 2400 मैलाचे अंतर कापून अलास्काच्या किनाऱ्यावर पोचतात. तिथे सुमारे 750 मैलांच्या परीघामध्ये त्यांचे वास्तव्य असते.   उत्तरेकडील स्थलांतरासाठी सरासरी 29 दिवस लागत असत, तर या दक्षिणेकडील प्रवासासाठी त्यांना दुप्पट म्हणजेच 53 दिवसापर्यंत कालावधी लागतो. प्रजननासाठी योग्य तापमान मिळविण्यासाठी सोनेरी डोक्याच्या चिमण्यांना अधिक प्रवास करत दुप्पट अंतर पार करावे लागत असल्याचे आढळले आहे.
स्थलांतराचा नकाशा

 

बुधवार, २ मे, २०१२

अल निनो वाढीचा आंध्रच्या उत्पादकतेवर होतो परीणाम


भारतीय मौसमी पावसाच्या प्रमाणावर अल निनो या घटकाचा परीणाम होत असतो. त्यामुळे आंध्र प्रदेशातील पावसाचे प्रमाण कमी होऊन शेतीच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परीणाम होतो. या परीणामाचा अभ्यास हैद्राबाद येथील केंद्रिय कोरडवाहू कृषी संशोधन संस्थेच्या (Crida) संशोधकांनी केला आहे. या संशोधकांच्या गटामध्ये व्ही. यू. एम. राव, ए. व्ही.एम. सुब्बाराव, बी. बापूजी राव, बी. व्ही. रामण्णा राव, सी. सर्वणी आणि बी. वेंकटस्वरलू यांचा समावेश होता. त्यांनी केलेल्या संशोधनामध्ये भारतातील अल निनो आणि नैऋत्य मोसमी पावसाचे संबंध हे एकमेंकाच्या विरोधी असल्याचे आढळले आहे.


असे आहे संशोधन
 - आंध्र प्रदेशाच्या रायल सीमा भागामध्ये अल निनोचा प्रभाव हा तेलंगणांच्या किनाऱ्याच्या भागापेक्षा अधिक प्रमाणात दिसून येतो. अनंतपूर आणि कुरनुल या जिल्ह्यामध्ये सरासरी नैऋत्य मोसमी पावसाच्या 20 टक्के अधिक विपरित परीणाम दिसून येतो. त्यामुळे भात, भूइमुग, बाजरी व दाळींच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते.
-ज्या वर्षी अल निनोचा प्रभाव कमी असतो, त्यावेळी नैऋत्य मोसमी पाऊस हा सरासरीएवढा होतो. आंध्रच्या किनाऱ्यांच्या भागामध्ये ईशान्य मोसमी पावसाचे प्रमाण त्यामुळे वाढते.
- ज्या वर्षी अल निनोच्या प्रभाव अधिक असतो, त्यावेळी राज्याच्या उत्पादनामध्ये घट येते. ही घट काही जिल्ह्यामध्ये 10 टक्क्यापेक्षा अधिक नोंदवली गेली आहे. खरीपात भुईमुगामध्ये 10 टक्के, भातामध्ये 12 टक्के एवढी घट होते. तर भात वगळता अन्य पिकांची उत्पादन आणि उत्पादकतेतील एकूण घट ही 25 टक्क्यापेक्षा अधिक भरते.

अल निनोबाबत अधिक माहिती
अल निनो आणि ल निना हे दोन्ही दक्षिण पॅसिफिक सागरातील पृठभागावरील तापमानापेक्षा अधिक किंवा कमी तापमानाचे प्रवाह आहेत. त्यांचे मोठे परिणाम हवामानावर दिसून येतात. अल निनोच्या गरम प्रवाहामुळे अन्नद्रव्ययुक्त खोल पाणी पृष्टभागावर येत नाही, त्यामुळे माशांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात परीणाम होतो. तसेच किनाऱ्यांच्या प्रदेशामध्ये पडणाऱ्या पावसावरही याचे परीणाम होतात.