सोमवार, ७ मे, २०१२

सेर्स तंत्रज्ञानाचा वापर रोखेल विषबाधा


विषबाधेला कारणीभूत जिवाणूचा प्रादुर्भाव ओळखणे शक्य

फळे आणि भाजीपाल्यामध्ये आढळून येणाऱ्या सॅलमोनेला या जीवाणूंच्या प्रादु्र्भावामुळे विषबाधेचे प्रमाण वाढत आहे. या जिवाणूचा प्रादुर्भाव लवकर ओळखण्यासाठी अमेरिकेतील कृषी विभगाच्या संशोधकांनी प्रथमच सरफेस एनहान्सड रॅमन स्कॅटरींग (SERS) या अत्याधुनिक पद्धतीचा वापर केला आहे.  सॅलमोनेला आणि अन्य हानीकारक जिवाणूची ओळख पटवण्यासाठी ही पद्धत सहज, सोपी आणि विश्वासार्ह असल्याचे संशोधकांचे मत आहे. 
अमेरिकेतील रोग प्रतिबंधक व नियंत्रण संस्थेच्या अहवालानुसार, प्रति वर्ष सॅलमोनेला या जिवाणूमुळे होणाऱ्या विषबाधेने एक दशलक्ष लोक आजारी पडतात. त्यामुळे सॅलमोनेलाचा प्रादुर्भाव लवकरात लवकर ओळखण्याच्या दृष्टीने जगभरातील प्रयोगशाळा संशोधन करत आहेत. या जिवाणूंचा प्रादुर्भाव लवकरात लवकर ओळखण्यासाठी सेर्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये अमेरिकेतील संशोधक बोसून पार्क यांनी काही सुधारणा केल्या आहेत. सेर्स ही अत्याधुनिक पद्धत अत्यंत सोपी व विश्वासार्ह आहे. या पद्धतीमुळे अन्न प्रक्रिया उद्योग त्यांच्या प्रयोगशाळेतही या जिवाणूचा प्रादु्र्भाव ओळखणे शक्य होणार आहे.
असे आहे सेर्स तंत्रज्ञान
सेर्स विश्लेषणासाठी पदार्थ हा स्टेनलेस स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवण्यात येतो. या प्लेटचा मऊपणा कमी करण्यासाठी त्याच्या पृष्ठभागावर चांदीच्या अतिसुक्ष्म कणांचे गोलाकार थर देण्यात आले. या प्रकारचे पृष्ठभाग प्रकाशाच्या परावर्तनासाठी उपयुक्त ठरतात. या पृष्ठभागावर ठेवलेले पदार्थाची छाननी रॅमन स्पेक्ट्रोमीटरच्या लेसर झोताने केली जाते. पदार्थावर आपटून माघारी स्पेक्ट्रोमीटरमध्ये येणाऱ्या झोताला रॅमन स्पेक्ट्रल सिग्नेचर किंवा सिग्नल असे म्हटले जाते. सॅलमोनेला यांच्या सह अन्य सुक्ष्म जीवांचाही विसिष्ट असा सिग्नल उपलब्ध होतो.   कमी प्रमाणात असलेल्या किंवा प्रादु्रभावाच्या सुरवातीच्या अवस्थेतही सुक्ष्म जीवांचा प्रादुर्भाव ओळखता येणे  शक्य असल्याचे या संदर्भात झालेल्या प्रयोगात आढळून आलेले आहे.
 या संशोधनाचे निष्कर्ष अॅग्रीकल्चरल रिसर्च मॅगेझीन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
----

फोटोओळ- सेर्स या पद्धतीमध्ये चांदीच्या अतिसु्क्षम कणांच्या थरामुळे सॅलमोनेला सारख्या जीवाणूंची ओळख सहजतेने होण्यास मदत झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा