तपकिरी वटवाघळांचा करण्यात आला दिर्घकालिन अभ्यास
----------
तपकिरी वटवाघळांच्या जन्म घेणाऱ्या पिल्लातील लिंग गुणोत्तर हे वर्षातील हंगामाच्या लांबीनुसार व त्यांच्या आगमणावरून ठरत असल्याचे अमेरिकेत झालेल्या संशोधनात पुढे आले आहे. ज्या वर्षी वसंताचे आगमन लवकर होते, त्यावेळी वटवाघळांच्या मादींनी जन्म दिलेल्या पिल्लामध्ये मादी पिल्लांची संख्या ही नरापेक्षा दुप्पट असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष प्लॉसवन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
वटवाघळे ही कीड नियंत्रणामध्ये मोलाची भुमिका निभावत असतात. गेल्या काही वर्षापासून त्यांच्यामध्ये विविध रोगांचे प्रमाण वाढले असून त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे वटवाघळांच्या संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने वटवाघळांच्या पुनरुत्पादनातील अनेक अज्ञात कडींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याअंतर्गत वटवाघळांच्या लिंग गुणोत्तराबाबत संशोधन करण्यात येत आहे.
संशोधनाबाबत माहिती देताना जैवशास्त्र विभागातील संशोधक हॉवर्ट बारक्ले यांनी सांगितले की, वसंताचे आगमण लवकर झाल्यास वटवाघळांचीमादी पिल्ले चांगल्या प्रकारे तग धरत असून एक वर्षानंतर त्यांचे पुनरुत्पादन सुरू होत असल्याने असे घडत असावे. ज्या मातांनी मादी पिल्लांना जन्म दिला आहे, त्यांचा वंश नर जन्माला घालणाऱ्या मादीपेक्षा अधिक काळ चालत असल्याने कठीण प्रसंगामध्ये नैसर्गिक निवड पद्धतीनुसार त्यांच्या शरीरांतर्गत व्यवस्था कार्यरत होऊन लिंग गुणोत्तर बदलत असावे.
जन्म घेतलेल्या मादी पिल्ले लेंगिक दृष्ट्या सक्षम होण्याचा काळ आणि वाढीसाठी उपलब्ध होणारा कालावधी यांचा परीणाम दिसून आला आहे. या संशोधनामधून लिंग गुणोत्तर हे वर्षातील हंगामानुसार आणि त्यांच्या रहिवासाच्या ठिकाणानुसार बदलत असल्याचे आढळले आहे.
असे झाले संशोधन
बारक्ले यांनी उत्तर अमेरिकेत आढळणाऱ्या मोठ्या आकाराच्या तपकिरी वटवाघळांच्या (Eptesicus fuscus) पिल्लामधील नर-मादी गुणोत्तराचा दिर्घ काळासाठी अभ्यास केला. त्यामध्ये फलन होत असताना मादी भ्रूणाची जगण्यासाठी निवड होते आणि त्याचवेळी नर भ्रूण हे प्रसुतीच्या सुरवातीच्या काळातच नष्ट होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामागे कोणती जैवरसायनिक क्रिया घडते, याविषयी अधिक संशोधन करण्याची गरज आहे. काही सस्तन प्राण्यामध्ये पिल्लातील लिंग गुणोत्तर ठरवण्याची क्षमता असल्याचे यावरून दिसून येते.
-------
फोटोओळ- तपकिरी वटवाघळांमध्ये हंगामानुसार पिल्लांचे लिंग गुणोत्तर ठरते. वसंताचे आगमन लवकर झाल्यास मादी पिल्लाची संख्या अधिक असते. ( स्रोत- केन बेन्डीकसेन)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा