गुरुवार, १७ मे, २०१२

चुंबकिय जीवाणू ठरतील जैविक संगणकाचे आधार



मानवी सर्जरीमध्येही जीवाणूंचा होईल उपयोग

संगणकांच्या हार्ड ड्राईव्ह मध्ये ज्या प्रकारे चुंबकिय क्षेत्र तयार होते, तसेच चुंबकिय क्षेत्र काही जिवाणू लोखंडामध्ये शिरल्यानंतर स्वतःमध्ये तयार करतात. त्यांचा उपयोग भविष्यामध्ये वेगवान जैविक संगणक तयार करण्यासाठी होऊ शकतो, असे इंग्लंडमधील लिडस विद्यापीठ आणि जपानमधील टोकियो कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधनात पुढे आले आहे.  सध्या या दोन्ही विद्यापीठामध्ये लोखंड खाऊ शकतील अशा सुक्ष्म जीवावर संशोधन करण्यात येत आहे. 

जसे तंत्रज्ञान विकसित होत जाते, तसा उपकरणांचा आकार कमी होत जातो. संगणकांच्या घटकांचा आकारही कमी कमी होत गेला आहे. मात्र नॅनो तंत्रज्ञानामध्ये इलेक्ट्रॉनिक्स घटक विकसित करण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. त्यामुळे संशोधक पुन्हा निसर्गाकडे वळत आहेत. नैसर्गिक सूक्ष्म जीवांचा वापर करून वेगवान व अत्यंत कमी आकाराचे संगणक विकसित करणे शक्य असल्याचे दिसून आले आहे.

असे आहे संशोधन
- या संशोधनासाठी मॅग्नेटोस्पीरीलियम मॅग्नेटिकम (Magnetospirilllum magneticum) या जिवाणूंचा वापर करण्यात आला आहे. हे जिवाणू डबके, तळे या सारख्या पाण्याच्या परिसरामध्ये, ऑक्सिजन कमी असलेल्या ठिकाणी जमिनीच्या खाली आढळतात. ते पाण्यामध्ये वावरत असताना पृथ्वीच्या चुंबकिय क्षेत्राच्या रेषेमध्ये पोहत असतात. होकायंत्राच्या सुईच्या दिशेत अधिक ऑक्सिजन मिळविण्याचा प्रयत्न करतात.

- जेव्हा या जिवाणूंना लोखंडामध्ये घुसवण्यात आल्यानंतर त्यांच्या शरीरातील प्रथिनांची प्रतिक्रिया ही लहान व कमी ताकदीच्या चुंबकासारखी झाली. पृथ्वीच्या चुंबकिय मुलद्रव्यासारखीच त्यांची अवस्था झाली. या जिवाणूंना एकत्र करून आकार देण्यासह त्यांची जागा ठरवण्यासाठी अभ्यास करण्यात आला. कारण हे अतिसुक्ष्म असे चुंबकच असल्याने त्यांची वाढ करणे, त्यांच्या अधिक प्रती तयार करणे आणि त्यांचा वापर जिवाणूंच्या शरीराबाहेर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  या वाढत्या चुंबकांचा वापर भविष्यामध्ये हार्ड ड्राईव्ह विकसित करण्यासाठी होणार आहे.

- हे संशोधन स्मॉल या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

संशोधनाचे फायदे
- लिडस विद्यापीठातील संशोधिका डॉ. साराह स्टॅनिलॅंड यांनी सांगितले, की सध्या प्रचलित संगणकामध्ये लहान घटक विकसित करताना इलेक्ट्रॉनिकच्या लघुत्तम सिमेपर्यंत माणूस पोचला आहे. यापेक्षा लहान प्रमाणात घटक विकसित करण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. मात्र निसर्गानेच या प्रश्नाचे उत्तर य जिवाणूंच्या माध्यमातून दिले आहे.

-  जिवाणूंच्या वापरातून केवळ सूक्ष्म चुंबकच न बनवता त्यातून जिवंत अशा इलेक्ट्रीकल वायर तयार करता येऊ शकतील.

- टोकियो कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधक डॉ. मासायोशी टनाका यांनी सांगितले, की या जिवाणूंद्वारे मानवातील लिपिड मुलद्रव्यांच्या पेशीच्या संपर्क यंत्रणेसारख्या अतिसूक्ष्म नलिका प्रयोगशाळेमध्ये तयार करता येतील. या नलिकाचा वापर संगणकामध्ये करणे शक्य होणार आहे.  तसेच मानवी सर्जरीमध्ये या नलिकाचा वापर चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा