सोमवार, ७ मे, २०१२

आता कीड व्यवस्थापनातही उपयुक्त ठरेल बारकोडींग



बार कोडींग म्हटले की आपल्याला सुपर मार्केट किंवा माॅलमध्ये विविध पॅकेटवर असणाऱ्या उभ्या कमी अधिक जाडीच्या रेषा डोळ्यासमोर येतात. मात्र अमेरिकेतील कृषी विभागातील संशोधकांनी गहू , बार्ली, बटाटे या पिकांवर येणाऱ्या किडीच्या मोजमापासाठी, निरीक्षणासाठी या डीएनए बार कोडचा वापर केला आहे. त्यामुळे किडीच्या नियंत्रण, व्यवस्थापन, व नियोजन करण्यासाठी या पद्धतीचा वापर करणे शक्य होणार आहे.

 किडीचे अनेक प्रकार हे त्यांच्यामध्ये असलेल्या साम्यामुळे ओळखताना शेतकऱ्यांना, तसेच निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीला अडचणी येतात. त्यामुळे त्यांचे नियंत्रण करण्यासाठी नियोजन करता येत नाही. यावर अमेरिकेतील कृषी विभागाच्या संशोधकांनी डिएनए बारकोडींगचा उपाय शोधला आहे. या मध्ये किडीच्या जनुकांचे सुसंगतवार विश्लेषण केले असून त्यावर आधारीत बार कोड विकसित केले आहेत. पृथ्वीवर आढळून येणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती, पिके आणि प्राण्याचे जनुकीय विश्लेषण सातत्याने केले जात असते. त्यामुळे पृथ्वीवरील जैवविविधतेची समग्र सूची विकसित करण्यात येत आहे. त्याचाच उपयोग हे बार कोड तयार करण्यासाठी करण्यात येत आहे.

कोलरॅडो पोटॅटो बीटल या बटाट्यावरील प्रमुख किडीचे बारकोडींग करण्यात आले आहे.

बेल्टव्हीले येथील हानीकारक कीड जैविक नियंत्रण आणि वर्तन प्रयोगशाळेतील कीटकशास्त्रज्ञ मॅथ्यू ग्रीनस्टोन यांनी डिएनए बारकोडींगचा वापर प्रथम कोलोरॅडो पोटॅटो बीटल या भुंग्यांच्या नियंत्रणासाठी केला आहे. ही कीड या विभागामधील बटाट्यावरील प्रमुख कीड मानली जाते. जैविक कीड नियंत्रणामध्ये विविध मित्रकीटकांचा हानीकराक किडी फस्त करण्याचा दर हा वेगळा असल्याने त्यांच्यामध्ये तुलना करण्यासाठी त्यांनी डिएनए बारकोडींग पद्धतीचा वापर केला आहे. 
ग्रीनस्टोन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बटाट्यावरील भुंग्यांच्या भक्षक किटकांच्या चार प्रजातीचा अभ्यास केला. हे चार ही प्रजातीचे कीटक गोळा करून प्रयोगशाळेमध्ये त्यांना खाद्य म्हणून बटाट्यावरील भुंगे देण्यात आले.  भक्षकांच्या पोटात गेल्यानंतरही किती काळापर्यंत त्यांची ओळख पटविता येते, याचा अभ्यास केला. मित्रकीटकांची कार्यक्षमता तपासण्यामध्ये बार कोडींगचा चांगला उपयोग होत असल्याचे त्यांच्या संशोधनात आढळले आहे.  त्यामुळे जैविक पद्धतीने कीडीच्या व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढविणे शक्य असून कीडींच्या नियंत्रणासाठी ही पद्धत उपयुक्त ठरली आहे. 

असे होते डिएनए बारकोडिंग
असे होते डिएनए बारकोडींग
या संशोधनाचे निष्कर्ष एन्टोमोलाॅजिया एक्सपेरीमेंटलीस इट अॅप्लीसिटा या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा