शुक्रवार, १८ मे, २०१२

मक्याची वाढ रोखून उत्पादन वाढवणे होणार शक्य


मक्याच्या वाढीसाठी कारणीभूत स्टेरॉईडला रोखण्यासाठी बुरशीनाशक ठरले उपयुक्त
-------------------
मका पिकामधील स्टेरॉईड या घटकामुळे पिकाच्या बुटक्या आणि अधिक मादी रोपे असलेल्या जाती तयार होऊ शकतील, असे अमेरिकेतील पुरदेई विद्यापीठ आणि दक्षिण कोरियातील सेऊल राष्ट्रीय विद्यापीठात झालेल्या संशोधनात पुढे आले आहे. तसेच स्टेरॉईड घटकांना रोखण्याचे कार्य ही नेहमीच्या वापरात असलेल्या स्वस्थ बुरशीनाशकांच्या साह्याने करता येणे शक्य असल्याचे अधिक संशोधनात आढळून आले आहे. त्यामुळे कमीत कमी निविष्ठामध्ये अधिक उत्पादन मिळविता येणे शक्य होणार आहे.

डोक्याएवढे उंच वाढलेली मक्याची शेते आगामी काळामध्ये दृष्टीस पडणार नाहीत. मक्यांची वाढ ठरवणाऱ्या स्टेरॉई ड घटकांवर नियंत्रण ठेवण्याचे संशोधन पुरदेई विद्यापीठातील जैवरसायनिक आणि मुलद्रव्यीय जनुकशास्त्र विभागातील संशोधक बुरखार्ड शल्झ यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या आधी झालेल्या संशोधनात मका पिकातील स्टेरॉईड घटकाच्या कार्यपद्धतीविषयी काही महत्त्वाची बाबी आढळल्या होत्या. त्यामध्ये मका पिकांच्या बुटक्या आणि मादीचे गुणधर्म असलेली रोपे तयार होत अशल्याचे दिसून आले होते.  मात्र पिकामध्ये जैविक क्रिया रोखण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन (ब्रासिनाझोल) हे अत्यंत महागडे आहे. ( 25 हजार डॉलर प्रती ग्रॅम) .त्यामुळे त्याला पर्याय शोधण्याचे काम शुल्झ गेल्या काही वर्षापासून करत होते. त्यांना अधिक अभ्यासामध्ये प्रोपीकोनॅझोल या बुरशीनाशकामध्ये या स्टेरॉईड घटकांना रोखण्याचे गुणधर्म असल्याचे आढळून आले आहे. त्याची किंमतही तुलनेने कमी (10 सेंट प्रती ग्रॅम ) असल्याने प्रयोग करणे शक्य झाले आहे. मक्यामध्ये शुल्झ यांनी केलेल्या मागील संशोधनामध्ये मक्यामध्ये स्टेरॉईडचे प्रमाण कमी झाल्याने मक्यांची बुटक्या आणि  मादी रोपांची संख्या अधिक प्रमाणात मिळते. त्यामुळे अधिक कणसे उपलब्ध होऊन उत्पादनात वाढ मिळते. या संशोधनासाठी काही रसायने वापरून  मक्यातील स्टेरॉईडच्या उत्पादन प्रक्रियेत बदल घडवणाऱ्या जनुकीय सुधारणा करण्यात आल्या होत्या.

त्यांच्या नव्या संशोधनानुसार अधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या बुरशीनाशकाचाही असाच परिणाम होत असल्याचे आढळले आहे. या बाबत माहिती देताना शुल्झ यांनी सांगितले की, आतापर्यंत केवळ पैदास प्रक्रियेतून वनस्पतीच्या अंतर्गत बाबीमध्ये बदल घडवता येत असत. तसेच बदल बाह्य रसायनाच्या परीणामातून घडवता येणे शक्य असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आपण वनस्पतीच्या आयुष्यामध्ये कधीही ही प्रक्रिया करून स्टेरॉईड तयार होण्याची प्रक्रिया रोखता येईल.
सध्या या शेतकऱ्याना पिकातील नर भाग वेगळा करण्यासाठी मनुष्यबळाची गरज पडते. मात्र पिकातच मादी रोपाचे प्रमाण अधकि असल्याने मनुष्यबळ वाचणार आहे. याचा फायदा बीजउत्पादक शेतकरी व कंपन्यांना होणार आहे. या बुटक्या प्रजातीही तेवढेच उत्पादन देणार असल्याने उत्पादनामध्ये घट न होता कमी निविष्ठाचा वापर करावा लागल्याने उत्पादन खर्चामध्ये बदल होणार आहे. हे संशोधन प्लॉसवन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

गोल्फच्या मैदानासाठी संशोधन ठरले उपयुक्त
गोल्फ या खेळाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात हिरवळीच्या गवताची लागवड करण्यात येते. त्यांची वाढही वेगाने होत असल्याने एक दिवसाआड कापणी करावी लागते. त्यासाठी अधिक मनुष्यबळाची गरज असते. सध्या प्रोपेकोनॅझोल या बुरशीनाशकांचा वापर गोल्फ कोर्सच्या मैदानावरील गवताची वाढ रोखण्यासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे आठवड्यांच्या अंतराने कापणी कारावी लागत असल्याने कापणीच्या खर्चात बचत झाली आहे.


होतेय अधिक संशोधन
शुल्झ यांना मका पिकामध्ये चांगले निष्कर्ष मिळाले असल्याने ते या रसायनाचे अन्य धान्य पिकावर होणारे परिणाम तपासत आहेत. तसेच या बुरशीनाशकाचा ज्या जनुकांवर परिणाम होतो, त्याचे विश्लेषण करण्यात येत आहे. हे संशोधन शुल्झ यांच्या नेतृत्वाखाली पुरदेई विद्यापीठातील व दक्षिण कोरियातील सेऊल राष्ट्रीय विद्यापीठातील संशोधकांचा गट संयुक्तरित्या करत आहे.
-
जर्नल संदर्भ-
Thomas Hartwig, Claudia Corvalan, Norman B. Best, Joshua S. Budka, Jia-Ying Zhu, Sunghwa Choe, Burkhard Schulz. Propiconazole Is a Specific and Accessible Brassinosteroid (BR) Biosynthesis Inhibitor for Arabidopsis and Maize. PLoS ONE, 2012; 7 (5): e36625 DOI: 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा