सोमवार, १४ मे, २०१२

जैवविविधतेमुळे वाढते जमिनीची सुपीकता




पिकासोबतच जंगले, गवताळ प्रदेश यांचे नियोजन करणे महत्त्वाचे
वनस्पती आणि त्यांची जैवविविधता यांचा शेतीला काय उपयोग, असा प्रश्न काही शेतकरी उपस्थित करत असतात. त्यांच्या या खोचक प्रश्नाला  अमेरिकेतील मिनिसोटा विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या दिर्घकालिन संशोधनातून उत्तर मिळाले आहे. त्यांनी 14 वर्षे विविध ठिकाणी घेतलेल्या प्रक्षेत्रीय चाचण्यातून एखाद्या जमिनीमध्ये असलेल्या वनस्पतीच्या जैवविविधतेचा फायदा जमिनीसाठी होत असल्याचे दिसून आले आहे.  जमिनीच्या सुपीकतेबरोबरच बायोमास उत्पादनातही भर पडत असल्याचे आढळले आहे.  

एखाद्या परिसरामध्ये असलेल्या गवताळ प्रदेश, जंगले आणि पिके यांच्या विविधतेचे महत्त्व पर्यावरणासाठी अधिक असते. वनस्पतीची जैवविविधता ही पिकांच्या उत्पादनासाठीही महत्त्वाची ठरू शकते. प्रत्येक जादा वनस्पतीची प्रजात ही जमिनीच्या सुपीकतेमध्ये वाढ करते. याबाबत गेल्या 14 वर्षापासून मिनीसोटा विद्यापीठामध्ये संशोधन प्रकल्प राबवण्यात येत आहे..मिनिसोटा विद्यापीठातील संशोधक डेव्हिड तिलमन, पॉरेस्ट इसबेल, साराह हॉबी, निको आयसेनहॉवर यांच्यासह झुरिच विद्यापीठातील डॅन फ्लायन यांच्या संशोधक गटाने हे संशोधन केले असून सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

या संशोधनाविषयी माहिती देताना संशोधन प्रकल्पाचे संचालक मॅट केन यांनी सांगितले, की कमी कालावधीसाठी केलेल्या प्रयोगाचे निष्कर्ष अधिक गुंतागुंतीचे होते. त्यातून जैवविविधतेच्या पर्यावरणातील उपयुक्तेबाबत कोणताही निष्कर्ष काढता येत नव्हता. मात्र दिर्घकालिन अभ्यासानंतर जैवविविधतेचे महत्त्व समोर येत गेले. पर्यावरणाच्या आरोग्य आणि शाश्वततेबाबात प्रथमच निष्कर्ष मिळाले आहेत. जैवविविधता आणि उत्पादकता यांचा जवळचा संबंध आहे. दिर्घकालिन विचार केला असता पिकासोबत प्रदेशातील जंगले, गवताळ प्रदेश यांच्याही नियोजनाची गरज आहे.

असे झाले संशोधन
-राष्ट्रीय शास्त्र फाऊंडेशनच्या मिनीसोटा येथील 26 विविध प्रक्षेत्रावर प्रयोग करण्यात आले. या 26 पैकी विविध प्रक्षेत्रवरील परिस्थिती ही जंगले, गवताळ प्रदेश यांच्या प्रमाणानुसार भिन्न होती.

- 16 प्रकारच्या प्रजातीनी युक्त असलेल्या प्रक्षेत्राच्या प्रति वर्ष घेण्यात आलेल्या चाचण्यातून जमिनीची सुपीकता आणि बायोमास वाढल्याचे आढळले.

-दोन वर्षाच्या कमी कालावधीच्या अभ्यासामध्ये जैवविविधतेमुळे उत्पादकता वाढली असली तरी 6ते 7 प्रजाती असलेल्या प्रक्षेत्रामध्ये फारसा फरक दिसून आला नाही.

- काही प्रक्षेत्रातील जैवविविधता कमी करून तिथे पाईन वृक्षाची, मक्याची किंवा लॉनची लागवड केली असता, नैसर्गिक सुपीकता वाढीचा फायदा मिळवण्यात अपयश आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा