लसणातील सल्फाईड घटकामध्ये जिवाणूजन्य रोगाना रोखण्याची क्षमता आहे. |
चिकनच्या मांसातील कॉप्लीबॅक्टर जेजूनी जिवाणूमुळे डायरिया, पोटाचे विकार आणि ताप दिसून येतो. |
वॉशिग्टन राज्य विद्यापीठाच्या संशोधकांना लसणातील घटक हे लोकप्रिय असलेल्या दोन प्रतिजैविकापेक्षा 100 पट अधिक कार्यक्षम असल्याचे आढळून आले आहे. पोटाच्या विकारासाठी कॉम्पलोबॅक्टर हा जीवाणू कारणीभूत मानला जातो. त्याच्यावरील उपचारासाठी लसणातील घटकांचा वापर करणे शक्य आहे. हे संशोधन अन्न आणि मांसावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल ऑफ अॅण्टीमायक्रोबीयल किमयोथेरपी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
अन्नातून होणाऱ्या विषबाधेसाठी कॉम्पलोबॅक्टर जेजूनी (Campylobacter jejuni) हा जिवाणू कारणीभूत असतो. त्याला रोखण्यासाठी गेल्या 25 वर्षापासून संशोधन करणारे मायकेल कोन्केल यांनी सांगितले, की पर्यावरणामध्ये व अन्नामध्ये आढळणाऱ्या या रोगकारक जिवाणूमुळे रोगाचे प्रमाण वाढत आहे. सुमारे 2.4 दशलक्ष अमेरिकन लोकांच्या अनारोग्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या जिवाणूंना रोखण्यामध्ये लसणातील डायअॅलील सल्फाईड महत्त्वाची भुमिका निभावणार आहे.
असे आहे संशोधन
कॉम्पलोबॅक्टर जेजूनी हा जिवाणू स्वतःभोवती पातळ अशा जैविक फिल्म तयार करत असल्याने अन्य प्रतिजैविकांसाठी 1000 पट अधिक प्रतिकारक्षम आहे. मात्र लसणातील सल्फाईड हे घटक हे आवरण भेदून त्यांचा नाश करत असल्याचे झिओनान लू, मायकेल कोन्केल आणि अन्य संशोधकांच्या गटाने केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. अन्नातील विषबाधेसाठी कारणीभूत ठरणाऱ्या लिस्टेरिया मोनोसायटोजिन आणि ई. कोलाय सारख्या अन्य सुक्ष्म जीवांच्या बाबतीतही लसणातील सल्फाईड घटक अधिक चांगल्या प्रकारे कार्य करत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगातून सुरक्षित अन्न तयार करण्यासाठी, त्यांची साठवण करण्यासाठी लसणाच्या या गुणधर्माचा फायदा होणार आहे.
-----
जर्नल संदर्भ-
Xiaonan Lu, Derrick R. Samuelson, Barbara A. Rasco, and Michael E. Konkel. Antimicrobial effect of diallyl sulphide on Campylobacter jejuni biofilms. J. Antimicrob. Chemother., May 1, 2012
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा