शनिवार, २६ मे, २०१२

मीठामुळे होईल गढूळ पाणी स्वच्छ

मिशीगन विद्यापीठातील संशोधन

गढूळ पाण्यातून माती व अन्य घटक दूर करण्यासाठी अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठातील संशोधकांनी सोपी, स्वस्त पद्धत शोधून काढलेली आहे. त्यामध्ये घरगुती मीठामुळे पाण्यातील तरंगते मातीचे कण एकत्र होऊन तळाशी लवकर बसत असल्याचे आढळून आले आहे. या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये गढूळ पाण्यापासून स्वच्छ पाणी मिळवणे सोपे होणार आहे. तसेच सुर्यप्रकाश निर्जंतुकिकरण पद्धतीतील अडचणी दूर होऊन निर्जंतूक पाणी उपलब्ध होणार आहे. दुषित पाण्यातून पसरणाऱ्या आजारांना दूर ठेवणे शक्य होणार आहे.


शुद्ध पाणी दुर्गम आणि ग्रामीण भागामध्ये पोचवणे हे विसनशील देशामध्ये आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. शुद्ध पाण्याच्या अभावामुळे विविध प्रकारचे रोग पसरतात. ग्रामीण भागामध्ये पावसाळ्यात विहिरीचें किवा नद्याचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. पाण्यामध्ये वाहून येत असलेल्या मातीमुळे अत्यंत गढूळ असते. आफ्रिकेच्या ग्रामीण भागामध्ये सुर्यप्रकाशांच्या साह्याने निर्जंतुकिकरण करण्याची पद्धत वापरली जाते. मात्र गढूळ पाण्याचे सुर्यप्रकाशाच्या साह्याने शुद्धीकरण करण्यातही अडचणी येतात. त्याबाबत बोलताना संशोधक जोशूआ पीअर्स यांनी सांगितले, की पाणी गढूळ असल्यास, रोगकारक जिवाणू मातीच्या कणांच्या आड दडल्याने वाचू शकतात. त्यांच्यावर सुर्यप्रकाशांतील अतिनिल किरणांचा प्रभाव पडत नाही. त्यासाठी गढूळ पाण्यातील मातीचे कण खाली बसणे आवश्यक असते. या प्रक्रियेला निवळणे असे म्हणतात. ओन्तरिओ येथील क्विन्स विद्यापीठातील विद्यार्थ्यासह संशोधन करताना पिअर्स यांनी निवळण्याच्या प्रक्रियेसाठी सोडीअम क्लोराईड ( साधे मीठ ) यांचा वापर करणे शक्य असल्याचे आढळले आहे.

मीठ सर्वसामान्यासह सर्वाकडे उपलब्ध असते. त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी त्याचा वापर अत्यंत स्वस्त आणि सोपा आहे. विशेषतः गढूळ पाण्यासाठी बेन्टोनाईट आणि मीठाचे मिश्रण वापरले असता अनेक मातीचे कण एकत्र होऊन तळाशी बसतात. त्यामुले पाणी निवळण्याची प्रक्रिया वेगाने होते. हे स्वच्छ पाणी सुर्यप्रकाशांच्या साह्याने निर्जंतुक करून वापरल्यास पाण्यातून पसरणाऱ्या आजाराना अटकाव करणे  शक्य होते.

 पीएर्स आणि डावनी हे संशोधक गढूळ पाण्यातील विविध प्रकारच्या चिकण मातीसाठी प्रयोग करत आहेत. आफ्रिकेमध्ये आढळून येणाऱ्या सर्व प्रकराच्या मातीवर होणाऱ्या मीठ आणि बेन्टोनाईटच्या मिश्रणाचे परिणाम तपासण्यात येत आहे.  हे संशोधन जर्नल ऑफ वॉटर, सॅनिटेशन अँण्ड हायजिन फॉर डेव्हलपमेंट मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.


जर्नल संदर्भ-
Brittney Dawney and Joshua M. Pearce. Optimizing the solar water disinfection (SODIS) method by decreasing turbidity with NaCl. Journal of Water, Sanitation, and Hygiene for Development, June 2012 DOI: 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा