शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१३

अभियंता दिन विशेष

सिंचन आणि निचरा प्रणालीचा उदगाते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या



आज अभियंता दिन

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ 15 सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी बेंगलोर शहरापासून 40 किलोमीटर अंतरावरील (आता कर्नाटक राज्यातील) मुद्देनाहल्ली येथे झाला.
- बेंगलोर येथील मध्य कॉलेजमधून 1881 मध्ये कला शाखेची पदवी घेतल्यानंतर पुणे येथील अभियांत्रिकीची पदवी घेतली.
- शिक्षण पूर्ण होताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई येथील कार्यालयात काही काळ नोकरी केल्यानंतर भारतीय सिंचन आयोगामध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले.-
- विश्वेश्वरय्या यांनी पूर नियंत्रणासाठी स्वयंचलित जल नियंत्रण करणारे दरवाजांचे आरेखन केले. त्यासाठी त्यांनी पेटंट घेतले. ही पद्धती त्यांनी पुणे शहराजवळील खडकवासला धरणासाठी 1903 मध्ये बसवली. त्यामुळे धरणांचे नुकसान न होता पाण्याचे नियोजन करणे सोपे झाले.
- नंतर ही पद्धती ग्वाल्हेर येथील टिग्रा धरण, म्हैसूर येथील कृष्णराज सागर येथे बसविण्यात आली.
- 1906 -07 मध्ये भारत सरकारने त्यांनी आफ्रिकेतील इडन येथे पाण्याचा पुरवठा आणि निचरा प्रणालीचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठविले.
- त्यानंतर हैदराबाद शहराला पूरापासून वाचविण्यासाठी पूर नियंत्रण प्रणाली विकसित केल्याने त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली.
- आशियातील सर्वात मोठा जलाशय असलेल्या म्हैसूर येथील कृष्ण राजसागर या धरणाच्या निर्मितीच्या वेळी मुख्य अभियंता म्हणून त्यांनी काम पाहिले.
- भारतातील अभियंते, विद्वान असलेल्या विश्वेश्वरय्या यांनी 1912 ते 1918 या काळात म्हैसूर या संस्थानामध्ये दिवाण म्हणूनही काम पाहिले होते. या कालावधीमध्ये त्यांनी म्हैसूर प्रांतामध्ये साबणाचा कारखाना, म्हैसूर आयर्न ऍण्ड स्टिल वर्कस, श्री जयचामाराजेन्द्र पॉटेक्निक इन्स्टिट्यूट , बेंगलोर कृषि विद्यापीठ आणि स्टेट बॅंक ऑफ म्हैसूर यांची स्थापना करून संस्थानाचे नाव देशविदेशापर्यंत पोचवले.
- ब्रिटिश साम्राज्यातील कमांडर हा मानाचा सन्मान त्यांच्या समाजाच्या विकासासाठी केलेल्या कामामुळे प्रदान करण्यात आला होता. त्यामुळे सर एमव्ही या नावानेही लोकप्रिय होते.
- भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1955 मध्ये सर एमव्ही यांना भारतरत्न हा सर्वाधिक मानाचा पुरस्कार प्रदान केला गेला.
- सर एम व्ही यांचे निधन 14 एप्रिल 1962 मध्ये बेंगलोर येथे झाले. 

रविवार, ८ सप्टेंबर, २०१३

गहू पिकातील काढणीपू्र्व अंकूरणाला रोखणारे जनुक शोधण्यात यश

गहू पिकातील काढणीपू्र्व अंकूरणाला रोखणारे जनुक शोधण्यात यश

कान्सास राज्य विद्यापीठ आणि अमेरिकी कृषी संशोधन संस्थेचे संशोधन

गहू पिकातील काढणीपूर्व अंकूरण रोखण्याचे काम करणाऱ्या जनुकांचा शोध घेऊन, त्याचे प्रतिरुप (क्लोन) तयार करण्यात अमेरिकेतील कान्सास राज्य विद्यापीठ आणि अमेरिकी कृषी संशोधन सेवा विभागाच्या संशोधकांना यश आले आहे. त्यामुळे गहू उत्पादक शेतकरी आणि गहू प्रक्रिया उद्योगाचे प्रति वर्ष होणारे सुमारे एक अब्जपेक्षा अधिक नुकसान कमी होऊ शकेल.  हे संशोधन जेनेटिक्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

 गहू पिकातील काढणीपूर्व अंकूरणामुळे गहू पिकामध्ये विशेषतः पांढऱ्या गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. (स्रोत ः कान्सास राज्य विद्यापीठ सेवा)


गहू पिकामध्ये काढणीपूर्व अवस्थेमध्ये पाऊस झाल्यास अंकूर फुटण्याची समस्या दिसून येते. त्यामुले पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या समस्येबाबत माहिती देताना अमेरिकेतील कान्सास राज्य विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि गहू जनुकिय स्रोत संस्थेचे संचालक बिक्रम गील म्हणाले, की काढणीपूर्व अंकुरण ही गहू पिकातील अत्यंत दुरुस्त करण्यास अवघड असा गुणधर्म आहे. गहू पिकाच्या पैदास कार्यक्रमातून असा गुणधर्म नसलेल्या नव्या गहू पिकांच्या जाती विकसित करण्यामध्ये अडचणी येतात.  हा प्रश्न समोर ठेवून कान्सास राज्य विद्यापीठ आणि अमेरिकी कृषी संशोधन सेवा विभागातील संशोधकांनी एकत्रित संशोधन केले आहे. त्यासाठी जनुकिय मार्कर पद्धतीचा वापर करून गहू पिकातील काढणीपूर्व अंकूरण रोखण्याचे काम करणाऱ्या जनुकांचा शोध घेतला आहे. तसेच त्याचे प्रतिरुप (क्लोन) तयार करण्यात आले आहे.

बिक्रम गील यांच्या सोबत अमेरिकी कृषी संशोधन विभागातील हिवाळ्यातील गहू पीक जनुकिय संशोधन केंद्राचे गुहायू बाय आणि हॅरॉल्ड ट्रिक, शुबिंग लियू, सुनिश सेहगल, जियारूई ली, मेंग लिन, मेंग लिन या सहकाऱ्यांनी एकत्रित संशोधन केले आहे. काढणीपू्र्व अंकुरणाला रोखणाऱ्या घटकांचे गुणधर्म आणि प्रतिरुप तयार करण्यात या सर्वाची भुमिका महत्त्वाची आहे.

असा होईल या संशोधनाचा फायदा

- ग्राहक लाल गव्हापेक्षा पांढऱ्या रंगाच्या गव्हाला त्याच्या चवीसाठी आणि पीठ किंवा आटा तयार करणारे प्रक्रिया उद्योग अधिक पीठ मिळत असल्याने पसंती देतात. गेल्या 30 वर्षापासून कान्सास प्रांतातील गहू उत्पादनाला मोठी मागणी असते. मात्र, हा पांढरा गहू काढणीपूर्व अंकूरणाला अधिक संवेदनशील आहे. काढणीच्या आधी झालेल्या पावसामुळे अंकुरण झाल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यातून हा उद्योग अद्याप सावरलेला नाही. दरवर्षी एक अब्ज डॉलरचे नुकसान या समस्येमुळे होते.
- या संशोधनातून ओळखण्यात आलेल्या जनुकामुळे गहू पिकांच्या प्रतिकारक जाती विकसित करणे, ओळखणे शक्य होणार आहे. गहू पिकाचे अत्यंत लहान नमुने घेऊन प्रयोगशाळेमध्ये काढणीपूर्व अंकूरणाला प्रतिरोध करणारे जनुक कार्यक्षम आहे, किंवा नाही याचा अंदाज मिळवता येणे शक्य आहे.

जर्नल संदर्भ ः
Liu, Shubing, Sunish K Sehgal, Jiarui Li, Meng Lin, Harold N Trick, Jianming Yu, Bikram S Gill, and Guihua Bai. Cloning and characterization of a critical regulator for pre-harvest sprouting in wheat. Genetics, September 2013



शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

प्रकाशाला साठवणारा स्पंज विकसित

प्रकाशाला साठवणारा स्पंज विकसित

- अर्धनैसर्गिक, अर्धकृत्रिम रचनेची दोन प्रारुपे केली तयार
- वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधन

प्रकाशाचे ग्रहण करण्याची क्षमता वनस्पतीमध्ये असते. वनस्पतीतील नैसर्गिक घटक सूर्यप्रकाशाचे ग्रहण करून त्याचे रुपांतर अन्नद्रव्यामध्ये करतात. त्याच प्रमाणे सुर्यप्रकाशाच्या ऊर्जेचा वापर विविध कारणांसाठी केला जातो. संशोधकांनी प्रयोगशाळेमध्ये अर्धनैसर्गिक आणि अर्धकृत्रिम अशी प्रथिन आणि त्यातील घटकांची गोलाकार रिंग विकसित केली आहे. ही रिंग कोणत्याही नैसर्गिक घटकांपेक्षा अधिक सूर्यप्रकाश ग्रहण करू शकत असल्याचे दिसून आले आहे. हि क्रिया एखाद्या स्पंजासारखी असल्याने त्याला सन स्पंज असे संबोधले आहे.

ऊर्जेच्या साठवण आणि प्रसारणासाठी सातत्याने संशोधन केले जाते. त्यासाठी वनस्पती आणि जिवाणूंच्या सूर्यप्रकाशाच्या ग्रहण पद्धतीचा गेल्या अनेक वर्षापासून अभ्यास केला जात आहे. त्याच मालिकेमध्ये सूर्यप्रकाशाचे ग्रहण करून साठवण करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये अर्धनैसर्गिक आणि अर्ध कृत्रिम स्वरुपाची दोन प्रारुपे वॉसिंग्टन विद्यापीठातील फोटोसिंथेटिक ऍण्टेना रिसर्च सेंटर ( पीएआरसी) येथील संशोधकांनी विकसित केली आहेत. ही प्रारुपे कोणत्याही नैसर्गिक घटकांपेक्षा अधिक ऊर्जा ग्रहण करत असून, त्याचा वापर ऊर्जा निर्मिती आणि कृत्रिम प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये गती मिळविण्यासाठी होईल.
हा प्रकल्प फोटोसिंथेटिक ऍण्टेना रिसर्च सेंटर ( पीएआरसी) या वॉशिंग्टन विद्यापीठातील विभागाने अमेरिकी ऊर्जा विभागाच्या सहकार्याने राबविला होता.

असा आहे हा सन स्पंज
-रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री या संस्थेच्या केमिकल सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये संशोधकांनी सूर्यप्रकाश ग्रहण करणाऱ्या ऍण्टेनाच्या दोन प्रारूपांची रचना विशद केली आहे. या रचना त्यांनी टेस्टबेडवर तयार केल्या आहेत. त्यातील एकाचे नाव ओरेगॉन ग्रीन आणि ऱ्होडेमाईन रेड असून त्यात कृत्रिम घटकांचा समावेश आहे. दुसऱ्या प्रारुपामध्ये जिवाणूंच्या क्लोरोफिल घटकांचा सूर्यप्रकाशातील अवरक्त किरणांच्या शोषणासाठी वापर केला आहे.
- या रचनेसाठी प्रेरणा ठरलेल्या जांभळ्या रंगाच्या जिवाणूंच्या काही घटकांचाही रचनेमध्ये समावेश केला आहे.
या दोन्ही रचना जांभळ्या रंगाच्या जिवाणूंच्या ऍण्टेनापेक्षा अधिक सू्र्यप्रकाशाचे ग्रहण करू शकतात.
- आकृतीमध्ये एखाद्या गोलाकार आकाराच्या रिबनसारखी रचना दिसून येते. ही रचना अत्यंत काळजीपूर्वक प्रथिनांपासून तयार करण्यात आली असून, त्यामध्ये काही कृत्रिम आणि काही नैसर्गिक घटकांचे यथायोग्य मिश्रण केले आहे. ही रचना सूर्यप्रकाश शोषून घेते.
-  वनस्पती किंवा प्रकाशाचा ऊर्जा मिळविण्यासाठी वापर करीत असलेल्या जिवाणूप्रमाणे ही रचना आहे. वस्तुतः प्रकाश ग्रहणासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे. त्यामध्ये सू्र्याची ऊर्जा ग्रहण करून, त्याचे इतर ठिकाणी पाठविणे शक्य आहे.
- या रचनेमध्ये वापरलेल्या मुलद्रव्यांच्या संख्या आणि जातीनुसार सूर्यप्रकाशाची किती ऊर्जा पकडली जाणार हे निश्चित होते.
- प्रयोगशाळेमध्ये बनविण्यात आलेली ही रचना केवळ 11 चे 16 अब्जांश मीटर (नॅनोमीटर) आकाराची आहे. कमी आकारातही ऊर्जा ग्रहण करण्याची तिची क्षमता प्रचंड आहे.

इन्फो 1
अशी असते प्रकाश ग्रहणाची नैसर्गिक रचना

- हरितद्रव्यामुळे वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग प्राप्त होतो. किंवा शास्त्रीय भाषेमध्ये असेही म्हणता येईल की वनस्पती सूर्यप्रकाशातील जांभळा आणि लाल रंगाचा भाग ग्रहण करून, हिरवा रंग परावर्तित करत असल्याने आपल्याला त्या हिरव्या दिसतात.
- प्रकाश संश्लेषण करणाऱ्या जिवाणूच्या बाबतीतही हिच क्रिया घडते. निसर्गामध्ये प्रकाशाच्या ग्रहणासाठी जिवाणू विविध पिगमेंट, मुलद्रव्यांचा वापर करतात. सूर्यप्रकाशातील विशिष्ट तरंगलांबीची किरणे शोषण्यासाठी त्यांचे रंग योग्य प्रमाणात गडद असतात.
- संशोधक हंटर यांनी सांगितले, की वनस्पतीतील नैसर्गिक घटक त्यांच्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशातील अनेक रंगाचे घटक ग्रहण करत नाहीत. ते परावर्तित करतात. त्यामुळे कार्यक्षमपणे प्रकाश ग्रहण करण्यासाठी सूर्यप्रकाशातील सर्व रंगाना शोषून घेणारे कृत्रिम घटक शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.  

इन्फो 2
अशी आहे नव्या प्रारुपाची रचना
- कृत्रिम घटकांच्या निर्मितीसाठी संशोधक जोनाथन लिंडसे यांचे सहकार्य घेण्यात आले. नैसर्गिक प्रकाश ग्रहणाच्या प्रक्रियेतील दोष दूर करून, अधिक प्रकारच्या तरंगलांबीचे पिगमेंटस ग्रहण करण्यासाठी रचना तयार करण्यात आली. या रचनेमध्ये कृत्रिम घटकांचा वापर केला. त्या बाबत माहिती देताना लिंडसे यांनी सांगितले, की प्रकाश ग्रहण करणाऱ्या विविध घटकांच्या मोठ्या माहितीसाठ्यातून योग्य रचना असलेल्या घटकांची निवड करणे खुप अवघड होते. कारण प्रत्येक घटकांच्या वापरासोबत अनेक शक्यतांचा उगम होत होता. प्रथिनांच्या रचनेमध्ये एकापेक्षा अधिक कृत्रिम घटक किंवा नैसर्गिक घटकांचा समावेश केला आहे. प्रथिनामध्ये कोणत्या क्षमतेपर्यंत अन्य पिगमेंटचा वापर करणे शक्य आहे, याचा अंदाज घेण्याचे आमचे ध्येय होते.
- एकापेक्षा अधिक पिगमेंट वापरण्यामुळे कार्यक्षमता वाढत नसून, त्यांच्यामधील एकमेंकाशी असलेला समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यातूनच जी ऊर्जा या घटकावर पडते, तिचे ग्रहण एका किंवा एकापेक्षा अधिक पिगमेंटद्वारे होते. हे एका संघाच्या यशाप्रमाणे असल्याचे सांगून संशोधक हंटर यांनी एका धबधब्याचे उदाहरण दिले. ऊर्जा एखाद्या धबधब्याप्रमाणे कोसळते. त्यातील सर्वात वरील क्षेत्रातील पिगमेंटवर ऊर्जेचा प्रवाह अधिक आडळतो. त्यातील काही भाग ग्रहण केला जातो. उर्वरीत आणखी खाली किंवा उडून बाजूच्या पिगमेंटवर पडतो. त्यानंतर तो अन्य ठिकाणी वाहत जातो. प्रत्येक ठिकाणी असलेली ऊर्जा ही वेगळी असते. आणि तिचे शोषण करण्याची आवश्यकता असते.

इन्फो 3
स्वयंपुर्णतेसाठी अर्धनैसर्गिक, अर्धकृत्रिम रचना ठरते फायदेशीर
प्रकाश ग्रहण करणाऱ्या ऍण्टेनाच्या निर्मितीसाठी कृत्रिम घटकांचा अधिक प्रमाणात वापर केल्यास या रचनांवर अधिक व सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज पडते. मात्र, या रचनेसाठी जांभळ्या रंगाच्या नैसर्गिक प्रकाश ग्रहण करणाऱ्या जिवाणूंतील घटकांचा समावेश केल्याने ही रचना स्वयंपू्र्ण होण्यात मदत झाली. ही रचना स्वतःला योग्य प्रकारे घडवू शकते. ही रचना निर्मिती करण्यामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून प्रकाश संश्लेषण क्रियेचा अभ्यास करणारे संशोधक पॉल लोच आणि पामेला पार्कस- लोच यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

जर्नल संदर्भ ः
Michelle A. Harris, Pamela S. Parkes-Loach, Joseph W. Springer, Jianbing Jiang, Elizabeth C. Martin, Pu Qian, Jieying Jiao, Dariusz M. Niedzwiedzki, Christine Kirmaier, John D. Olsen, David F. Bocian, Dewey Holten, C. Neil Hunter, Jonathan S. Lindsey, Paul A. Loach. Integration of multiple chromophores with native photosynthetic antennas to enhance solar energy capture and delivery. Chemical Science, 2013; DOI: 10.1039/C3SC51518D

----------------------------------------
फोटोओळ ः प्रकाशाच्या ग्रहणासाठी नैसर्गिक आणि कृत्रिम घटकांचा वापर करून प्रयोगशाळेमध्ये स्पंजासारखी रचना तयार केली आहे. त्यामुळे ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड बदल होण्याची शक्यता आहे. (स्रोत ः हंटर, पीएआरसी)

मोबाईलची बॅटरी संपली, काळजी नको



मोबाईलची बॅटरी संपली, काळजी नको
ऊर्जेशिवायही साधता येईल संपर्क

टिव्ही सिग्नलची ऊर्जा आणि संपर्क माध्यम म्हणून करता येईल वापर

 अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील अभियंत्यानी नवी वायररहित संपर्क प्रणाली विकसित केली असून, त्यामध्ये दोन उपकरणे कोणत्याही बॅटरी किंवा ऊर्जेवर न अवलंबता एकमेकांशी संपर्क करू शकतील. त्यातून दोन वस्तूंचे इंटरनेट या संकल्पनेच्या दिशेने हे पुढचे पाऊल मानले जात आहे. या तंत्रज्ञानाला संशोधकांनी ऍम्बियंट बॅकस्कॅटर असे नाव दिले आहे.
सामान्यापासून हाय प्रोफाईल लोकांपर्यंत मोबाईल हे आता संपर्काचे साधन झाले आहेत. मात्र, मोबाईलची बॅटरी संपणे ही एक मोठी समस्या झाली आहे. बॅटरी संपल्यानंतर मोबाईलचा काहीही उपयोग राहत नाही. या समस्येवर उपाय शोधताना अमेरिकेतील वॉशिग्टंन विद्यापीठातील संगणक शास्त्र आणि विद्यूत अभियांत्रिकीच्या संशोधकांनी आपल्या आसपास असलेल्या टिव्ही किंवा रेडिओ सिग्नलचा वापर ऊर्जेचा स्रोत आणि संपर्कासाठीचे माध्यम म्हणून करण्याचे तंत्रज्ञान शोधले आहे. कोणत्याही बॅटरीशिवाय दोन उपकरणे एकमेंकाशी संपर्क करू शकतील. या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देताना वॉशिग्टंन विद्यापीठातील संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक शाम गोल्लाकोटा यांनी सांगितले, की आपल्या सभोवती पसरलेल्या वायरलेस सिग्नलचा उपयोग ऊर्जेचा स्रोत आणि संपर्काचे माध्यम म्हणून केला जातो. या तंत्रज्ञानाचा वापर अंगावर घेऊन फिरता येणारी संगणकिय उपकरणे, स्मार्ट घरे आणि संवेदकांचे शाश्वत जाळे तयार करण्यासाठी होऊ शकतो. या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी मानवी लक्ष ठेवण्याची आवश्यकता नाही.
या संशोधनाचे निष्कर्ष 13 ऑगस्ट रोजी हॉंगकॉंग येथे झालेल्या असोशियशन ऑफ कॉम्प्युटिंग मशिनरी च्या परिषदेमध्ये सादर करण्यात आले. या संशोधनाला परिषदेमध्ये सर्वोत्कृष्ठ संशोधनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  या संशोधनामध्ये संगणक शास्त्र व अभियांत्रिकीचे डेव्हिड वेदरॉल, व्हिन्सेट लियू यांच्यासह विद्यूत अभियांत्रिकीचे ऍरॉन पार्कस आणि वाम्सी टाल्ला या संशोधनाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या संशोधनासाठी गुगल फॅकल्टी रिसर्च ऍवॉर्ड मधून आणि राष्ट्रीय शास्त्र फाऊंडेशन या संस्थेतर्फे अनुदान देण्यात आले.

काय आहे हे तंत्रज्ञान
या तंत्रज्ञानामध्ये आपल्या आजूबाजूला सातत्याने असलेल्या टि. व्ही किंवा मोबाईलच्या लहरीचा उपयोग करून घेण्यात आला आहे. दोन प्रसारीत असलेल्या सिग्नलच्या परावर्तनातून दोन उपकरणामध्ये संपर्क होऊ शकतो. त्यासाठी संशोधकांनी बॅटरी नसलेल्या दोन उपकरणामध्ये लहान आकाराचे ऍण्टेने बसविले. एका उपकरणातून टिव्हीचे सिग्नल परावर्तित केले जातात, दुसऱ्या या सारख्याच उपकरणातून हे सिग्नल ग्रहण केले जातात. या तंत्रज्ञानासाठी कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेची आवश्यकता नसते.
हवेच्या पातळ थरातून या तंत्रज्ञानातून उपकरणे नेटवर्क स्थापित करू शकतात. हे सिग्नल परावर्तित होऊन मोर्स कोड सारखी संपर्काची निर्मिती करू शकत असल्याचे संशोधिका जोशुआ स्मिथ यांनी सांगितले.

चाचण्या आणि त्याचे निष्कर्ष ः
संशोधकांनी ऍम्बियंट बॅकस्कॅटर तंत्राची चाचणी क्रेडिट कार्ड आकाराच्या प्रारुपामध्ये केली. त्यावेळी त्या दोन उपकरणामध्ये काही फूटांचे अंतर ठेवले होते. त्यावर लावलेल्या ऍण्टेनामध्ये सिग्नल ग्रहण केले जात असताना कळण्यासाठी एलईडी दिव्यांची रचना केली होती.
- सियाटल भागामध्ये या उपकरणाच्या गटांच्या विविध ठिकाणी चाचण्या घेण्यात आल्या. ही ठिकाणे टिव्ही टॉवरपासून अर्धा ते 6.5 मैल अंतराच्या परिघात होती. एक उपकरण टिव्ही टॉवरच्या परिघाबाहेर असतानाही संपर्क होऊ शकतो.
- सध्या असलेल्या प्रारुपामध्ये एक किलोबीट प्रति सेकंद सिग्नलमध्ये बाह्य वातावरणासाठी  2.5 फूट अंतरापर्यंत, तर घराच्या आतमध्ये 1.5 फूट अंतरापर्यंत योग्य प्रकारे संपर्क होऊ शकतो.  त्यातून सध्या संवेदकाचे निरीक्षण, शब्दातील मजकूर आणि माहिती पाठविणे शक्य होते.

संशोधनाचे फायदे
- हे स्मार्ट संवेदक कोणत्याही उपकरणामध्ये बसविता येऊ शकतात.
- हे संवेदक पूलांमध्ये वापरल्यास कॉंक्रिट आणि स्टिलच्या स्थितीचा अंदाज सातत्याने देऊ शकतील. कॉंक्रिटमध्ये अगदी केसाएवढीही भेग पडल्यास त्याची माहिती त्वरीत पोचवतील.
- संपर्कासाठी वापर करताना उपकरणाद्वारे शब्दातील मजकूर किंवा इमेल बॅटरीशिवाय पाठवू शकतील.
- मोबाईलची बॅटरी संपल्यानंतरही या तंत्राचा वापर करून मेसेज पाठविणे शक्य होईल.
- या तंत्राचा वापर इंटरनेटसारखे नेटवर्क स्थापित करण्यासाठी संशोधक प्रयत्नशील आहेत.

छायाचित्रे ः
1-ऍम्बियंट बॅकस्कॅटर तंत्रज्ञानाने रेडिओ सिग्नल द्वारे एकमेकाशी संपर्क होऊ शकेल. या बॅटरीची आवश्यकता नाही.
2 - कोणत्याही वस्तूमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य असून, काऊच आपल्या चाव्या कुठे राहिल्या, हे देखील ओळखू शकेल.
3- वायरलेस सिग्नलद्वारे एका क्रेडिट कार्डमधून दुसऱ्या कार्डडमध्ये पैशांची देवाणघेवाण कशा प्रकारे होईल, हे दाखविताना संशोधक.  (छायाचित्रे स्रोत ः वॉशिग्टंन विद्यापीठ )


वनस्पती तेलातील घटक वाढवितात डोळ्यांच्या नसांची कार्यक्षमता

वनस्पती तेलातील घटक वाढवितात डोळ्यांच्या नसांची कार्यक्षमता

वार्ध्यक्यतील दृष्टीदोष रोखण्यासाठी उपयुक्त संशोधन

वाढत्या वयामध्ये विशेषतः वृद्धत्वामध्ये डोळ्यांतील नसा कमजोर होऊन दृष्टी अधू होत जाते. या नसा ( रेटिनल पिगमेंट इपिथेलियम) पेशी कमजोर होण्यापासून वाचविण्यासाठी शेरब्रुक विद्यापीठामध्ये संशोधन करण्यात आले असून, वनस्पती तेलात पेशींच्या प्रतलामध्ये जैवरासायनिक आणि भौतिक बदल घडविण्याची क्षमता दिसून आली आहे.  या बदलामुळे रेटिनोपॅथी तयार होण्याची प्रक्रिया सावकाश होते किंवा रोखली जात असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन जर्नल ऑफ फिजिओलॉजी आणि फार्माकोलॉजी या कॅनडीयन संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
 विकसनशील देशामध्ये वृद्धत्वामध्ये अंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या वयामध्ये दृष्टीदोषांचे प्रमाणही वाढत असून, त्यामध्ये डोळ्यांची नसांची लवचिकता कमी होणे, हे प्रमुख कारण दिसून आले आहे. या समस्येवर शेरब्रुक येथील गेरियाट्रिक्स संस्थेमधील आरोग्य आणि सामाजिक सेवा केंद्रामध्ये संशोधन करण्यात येत आहे. वनस्पती तेलामध्ये डोळ्यातील नसांची लवचिकता वाढविण्याची क्षमता दिसून आली आहे. या संशोधनाबाबत माहिती देताना संशोधक अब्दुल खलील यांनी सांगितले, की प्रतलाच्या लवचिकता कमी झाल्याने त्याचा परिणाम प्रतलासोबतच अन्य जैव मुलद्रव्यावर होतो. त्यामुळे प्रतलाची लवचिकता वाढविल्यास प्रकाशाचे परावर्तन डोळ्यातील बाहुल्यातून योग्य प्रकारे होऊ शकते. त्यासाठी रेटीना पेशींमध्ये समाविष्ट होऊ शकेल, अशा प्रकारच्या वनस्पती तेलातील मेदाम्लाचा शोध घेण्यात आला आहे. या मेदाम्लामुळे प्रतलाच्या लवचिकता वाढण्यास मदत होते.

असेही होतील या संशोधनाचे फायदे
- संशोधकांनी केलेल्या अभ्यासात ओमेगा 3 मेदाम्लांनी युक्त आहार, तसेच बदाम तेलाचा आहारातील वापराने रेटिनोपॅथीचा धोका कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
- तसेच डोळ्यामध्ये वापरावयाच्या औषधामध्ये उदासीन प्रकारच्या विशिष्ट तेलांचा वापर केला जातो. त्याऐवजी डोळ्यांसाठी उपयुक्त अशा वनस्पती तेलातील घटकांचा वापर करणे शक्य होईल. त्याचा लाभ डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी होऊ शकेल.

जर्नल संदर्भ ः
Toihiri Said, Jennifer Tremblay-Mercier, Hicham Berrougui, Patrice Rat, Abdelouahed Khalil. Effects of vegetable oils on biochemical and biophysical properties of membrane retinal pigment epithelium cells. Canadian Journal of Physiology and Pharmacology, 2013; : 1 DOI: 10.1139/cjpp-2013-0036


सिंचनाच्या सोयी करतानाच डासांच्या नियंत्रणासाठी शाश्वत उपाययोजना आवश्यक

सिंचनाच्या सोयी करतानाच डासांच्या नियंत्रणासाठी शाश्वत उपाययोजना आवश्यक

- गुजरात येथील कोरडवाहू भागामध्ये वाढलेल्या सिंचन सोयींनी मलेरियाच्या वाढलेल्या धोक्याचा झाला अभ्यास
- आंतरराष्ट्रीय संशोधकांचा संशोधनात सहभाग

शेतीसाठी सिंचनाची सोय करण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करत असतात. एखाद्या अवर्षणग्रस्त भागामध्ये सिंचनाची सोय केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात चांगली वाढ होत असली तरी त्या भागामध्ये मलेरिया या रोगाच्या प्रादुर्भावाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे गुजरातसह वायव्य भारतामध्ये मिशीगन विद्यापीठाच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने केलेल्या अभ्यासात ही बाब पुढे आली आहे. सातत्यपुर्ण आणि महागड्या कीडनाशकांचा वापर करूनही हा धोका एक दशकापेक्षाही अधिक काळ (पुर्वापार समजाच्या कितीतरीपट अधिक काळ) राहत असल्याचेही दिसून आले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष प्रोसिडिंग्स ऑप दी नॅशनल ऍकडमी ऑफ सायन्सेस मध्ये प्रकाशित करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने गुजरात येथे कोरडवाहू भागामध्ये सिंचनाच्या मोठ्या सोयी उपलब्ध झाल्यानंतरच्या परिस्थितीचा अभ्यास केला आहे. या ठिकाणी सुमारे 47 दशलक्ष एकर क्षेत्रासाठी सिंचनाची सोय उपलब्ध झाली असून, त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. या ठिकाणी पाणी साठून राहण्याचे प्रमाण वाढल्याने डासांच्या पैदासीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. या अभ्यास प्रकल्पामध्ये कार्यरत असलेले विद्यार्थी ऍण्ड्रेस बेईझा यांनी सांगितले की, पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या भागापेक्षा कोरडवाहू भागामध्ये सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्यानंतर मलेरियाचा प्रसार अधिक वेगाने होत असल्याचे दिसून आले आहे. ज्या ठिकणी पावसाचे प्रमाण अधिक असते, तिथे डासांचे प्रमाणही कमी असते.

असा झाला अभ्यास
- इतिहासातील अशा परिस्थितीचा अभ्यास केला असता, सिंचनामुळे अन्नाची उपलब्धता वाढली तरी या भागात रोगांचे प्रमाण वाढल्याचेही दिसून आले आहे. याच मुद्द्याला धरून अभ्यास करण्यात आला.
 - या अभ्यासामध्ये 1997 पासून ग्रामीण भागामध्ये प्रयोगशाळेमध्ये सिद्ध झालेल्या मलेरिया रुग्णांची माहिती घेतली.
- त्याच वेळी त्या भागातील बागायती शेती आणि कोरडवाहू शेती यांच्या प्रमाणांचे उपग्रहिय छायाचित्रांचा अभ्यास केला. त्यातून मलेरियाच्या रूग्णांच्या संख्येत होत गेलेल्या वाढीचा प्रत्यय येतो.
- अर्थात यामध्ये उच्च प्रादुर्भावग्रस्त भागामध्ये शिक्षणाचे प्रमाण व पिण्याच्या स्वच्छ पाण्याच्या स्रोतांचे प्रमाणही कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणातील फरकांचा अभ्यास जुन्या व नव्या बागायती भागामध्ये करण्याची आवश्यकता आहे. त्यातून संपुर्ण परिस्थितीविषयी जाणून घेणे शक्य होणार असल्याचे संशोधकांचे मत आहे.
-सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षितता प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ही बाब गंभीर असून, मलेरियासारख्या प्राणघातक रोगांचा प्रसार थांबविण्यासाठी सिंचनाची सोय उपलब्ध करत असतानाच दूरदृष्टीने योग्य त्या उपाययोजना आखण्याची गरज आहे.
- या संशोधनामध्ये लंडन स्कुल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन ऍण्ड हायजीन चे मेन्नो जान बोऊमा, राष्ट्रीय मलेरिया संस्थेचे रमेश धिमान आणि राजपाल यादव, मिशीगन विद्यापीठातील एडवर्ड बास्करव्हिले, कोलंबिया विद्यापीठातील पियेत्रो सिक्काटो या संशोधकांचा समावेश होता.
------------------------------
इन्फो 1
उपाययोजना हव्यात शाश्वत
- मलेरियाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ,  बागायती शेती, आणि सामाजिक आर्थिक माहिती यांचा अभ्यास केला असता, गेल्या दशकामध्ये मलेरियाच्या रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. या दहा वर्षापेक्षा अधिक कालावधीत डासांच्या नियंत्रणासाठीही मोठ्या प्रमाणात उपाययोजना करूनही ही वाढ दिसून येत असल्याचे रोझमेरी ग्रॅट कॉलेज येथील प्राध्यापक पास्कल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की रोगाच्या नियंत्रणासाठी शाश्वत अशा उपाययोजना त्वरीत करण्याची गरज आहे. त्याचसोबत कालव्याचे वेळोवेळी योग्य प्रकारे निचरा करणे आवश्यक आहे.  या बाबी स्थानिक पातळीवरही कमी खर्चामध्ये आणि कार्यक्षमपणे राबविणे शक्य होऊ शकतात.
- सिंचनाच्या पद्धती बदलणे, कालव्यातील पाण्याचा निचरा यासारख्या बाबी सर्व क्षेत्रामध्ये अधिक काळासाठी राबवणे हे तसे आव्हान आहे.
-----
इन्फो 2
मलेरियाविषयी...
मलेरीया हा रोग प्लाजमोडीयम या परजिवीमुळे होतो. या परजिवीचा प्रसार प्रादुर्भावग्रस्त ऍनाफेलिस स्टिफनी या डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होतो. चाव्याच्या वेळी रक्तामध्ये मिसळलेले प्लाजमोडीयम परजिवी यकृतामध्ये आपली वाढ करतात. त्याचा रक्तपेशीमध्ये प्रादुर्भाव वाढत जातो.
----------------------
फोटोओळी ः मलेरिया रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरणारी ऍनाफेलिस स्टिफनी या प्रजातीची डास मादी.

डॉल्फिनची सामाजिक स्मरणशक्ती असते जीवनभराची

डॉल्फिनची सामाजिक स्मरणशक्ती असते जीवनभराची

वीस वर्षापेक्षा अधिक काल लक्षात ठेवतात सहकाऱ्यांचा आवाज

माणसाशिवाय अन्य कोणत्याही प्राण्यापेक्षा सर्वाधिक सामाजिक स्मरणशक्ती ही डॉल्फिन माशांमध्ये असल्याचे अमेरिकेमध्ये झालेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे. शिकागो विद्यापीठातील जॅसोन ब्रुक यांनी ब्रुकफिल्ड प्राणीसंग्रहालयातील डॉल्फिन माशांवर संशोधन केले आहे. या डॉल्फिन माशांनी वीस वर्षापूर्वी ऐकलेल्या आपल्या जुन्या तलावातील अन्य डॉल्फिन सहचऱ्याचा आवाजही ओळखला आहे. ही स्मरणशक्ती चिंपाझी, हत्ती यासारख्या अन्य प्राण्यांपेक्षा कितीतरी अधिक असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन प्रोसिंडिंग्ज ऑफ दी रॉयल सोयाटी लंडन बी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

माणसामध्ये एकमेकांचे चेहरे ओळखण्याची पद्धतीपेक्षाही डॉल्फिन अधिक काळासाठी सामाजिक ओळख पटवण्याची पद्धती अनोखी आहे. अर्थात मानवी चेहऱ्यामध्ये वयोपरत्वे मोठे बदल होत असल्याने ओळखणे अवघड होत जाते. मात्र त्या तुलनेत डॉल्फिनच्या शिट्टीमध्ये फारसा फरक पडत नाही. या संशोधनाबाबत माहिती देताना जॅसोन ब्रुक यांनी सांगितले, की माणसामध्ये ज्या प्रमाणे सामाजिक स्मरणशक्ती अधिक तीव्र असते, त्या प्रमाणे अन्य प्राण्यातील सामाजिक स्मरणशक्तीसंदर्भात तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यासाठी शिकागो विद्यापीठामध्ये तुलनात्मक मानवी विकास या विषयावर प्रकल्प राबवला जात आहे.

असा करण्यात आला अभ्यास
- सहा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या 53 विविध बॉटलनेक डॉल्फिनच्या स्मरणशक्तीचा ब्रुक यांनी अभ्यास केला आहे. या सहा ठिकाणी असलेल्या डॉल्फिन पैदास केंद्रातून डॉल्फिन जन्मलेले व आता विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या माशांची माहिती गोळा करण्यात आली. असा अभ्यास प्रत्यक्ष समुद्रामध्ये करणे अशक्य असल्याचे ब्रुक यांनी सांगितले.
-
गेल्या काही वर्षामध्ये झालेल्या अभ्यासामध्ये प्रत्येक डॉल्फिन आपली ओलख असलेली शिट्टी विकसित करत असल्याचे दिसून आले आहे. स्कॉटलंड येथील सेंट ऍण्ड्रूज विद्यापीठातील संशोधक विन्सेन्ट जॅनिक आणि स्टिफनी एल. किंग यांनी नोंदवल्या प्रमाणे , जंगली बॉटलनेक डॉल्फिन ही ओळख असलेली शिट्टी वाजवायला शिकतात. एकमेकांच्या शिट्टीला प्रतिसाद द्यायलाही शिकतात.
- ब्रुक यांनी या शिट्टीच्या ध्वनीमुद्रणाची प्रती गोळा केल्या. त्यांचा वापर आज एकत्र नसलेल्या माशांसमोर वाजवल्या. हा आवाजाला डॉल्फिन मासे कसा प्रतिसाद देतात, याचा अभ्यास केला.

- ज्या माशांशी कोणताही संपर्क आलेला नाही, अशा माशांच्या शिट्टीला डॉल्फिन मासे कोणताही प्रतिसाद देत नाहीत. मात्र, त्यांच्या संपर्कात असलेल्या माशांची शिट्टी ऐकताच त्या आवाजाकडे त्वरीत पोहत आले. संपर्काचा कालावधी हा अगदी वीस वर्षाइतकाही आढळून आला आहे.
- वय, लिंग या घटकांचा प्रतिसादावरील परिणामाचा अभ्यास करण्यात आला.

----------
ओळख जीवनभराची...
ब्रुकफिल्ड प्राणी संग्रहालयातील ऍली या मादी डॉल्फिनच्या शिट्टींचे ध्वनिमुद्रण बर्मुडा येथील बेली या मादी डॉल्फिनच्या समोर वाजविण्यात आला. या दोन्ही माद्या ऍली दोन वर्षे वयाची आणि बेली चार वर्षे वयाची असताना काही काळ एकत्र होत्या. त्यानंतर 20 वर्षे आणि सहा महिने त्यांच्यामध्ये कोणताही संपर्क नव्हता. तरीही बेलींने ऍलीचे ओळख असलेली शिट्टी सहजतेने ओळखली.
- समुद्रामध्ये राहत असलेल्या बॉटलनेक डॉल्फिनचे सरासरी वय हे वीस वर्षाचे आहे. जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत हे मासे जगू शकतात.
- थोडक्यात या माशांची सामाजिक स्मरणशक्ती ही जीवनभरासाठी असल्याचे मानण्यास हरकत नाही.

----------------
अधिक अभ्यासाला आहे वाव
- इतक्या प्रदीर्घ सामाजिक स्मरणशक्ती डॉल्फिनला का आवश्यक असते, या मागील कारणांचा विचार केला असता आकाराने मोठ्या असलेल्या समुद्रामध्ये एक गट दुसऱ्या गटाच्या संपर्कात सातत्याने येतात. त्यांच्यातील संबंधाची ओळख त्वरीत पटण्याची आवश्यकता माशांना अधिक भासत असावी, असा एक अंदाज आहे. तरी प्रत्यक्ष कारणांचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.
- या आवाजातून डॉल्फिनच्या मेंदूमध्ये त्यांची प्रतिमा तयार होते का, याचाही अभ्यास करता येऊ शकतो.
- अन्य प्राण्यामध्ये हत्ती आपल्या आईला 20 वर्षानंतरही ओळखत असल्याचे मानले जात होते. मात्र, कुळाशी संबंधित नसलेल्या अन्य हत्तीचा आवाज इतक्या दीर्घकाळ ते ओळखू शकत नसल्याचे दिसून आले. अर्थात त्यासाठी अधिक विस्तृत अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे ब्रुक यांनी स्पष्ट केले.