काजव्याच्या विकरातून अतिसुक्ष्म तंत्रज्ञानाने मिळवला प्रकाश
हिरवा, नारिंगी, लाल प्रकाश मिळवण्यात आले यश
रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या काजव्याच्या माळा करण्याची कवी कल्पना प्रत्यक्षात उतरणार असून सायराकस विद्यापीठातील संशोधकांनी काजव्याच्या नैसर्गिक प्रकाशासारखाच नैसर्गिक प्रकाश मिळविण्याची अति सूक्ष्म तंत्रज्ञानावर आधारीत पद्धत विकसित केली आहे. ही पद्धत आधी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीपेक्षा 20 ते 30 टक्के अधिक कार्यक्षम आहे.काजव्याचा प्रकाश हे जैविक प्रकाशाचे उत्तम उदाहरण आहे. हा प्रकाश चमकदार आणि कार्यक्षम असतो. त्यासारखा प्रकाश मिळवण्यासाठी सायराकस विद्यापीठातील संशोधन मॅथ्यू माये आणि रिबेका अलाम यांनी अतिसुक्ष्म तंत्रज्ञानाचा (नॅनो) वापर केला असून जैविक घटक आणि अजैविक घटकांच्या मिश्रणाने एक यंत्रणा विकसित केली आहे. त्या बाबतचे त्यांचे संशोधन नॅनो लेटर्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
काजव्याच्या प्रकाशामागील तत्वाचा केला वापर
- काजव्यांच्या शरीरात ल्युसिफेरीन आणि त्यांच्याशी संबंधित ल्युसीफेरास या विकराच्या रासायनिक क्रियेतून प्रकाश तयार होतो. प्रयोगशाळेमध्ये अतिसुक्ष्म तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या दांडा विकराशी जोडलेला असतो. त्यानंतर या प्रक्रियेला इंधन म्हणून ल्युसिफेरीन या विकराचा वापर केला जातो. त्यातून तयार झालेली उर्जा नॅनोरॉडमध्ये पाठविली जाते. त्यामुळे तो रॉड चमकू लागतो. या प्रक्रियेला ॊबायोल्युमिनसेन्स रेझोनन्स एनर्जी ट्रान्सफर (BRET) असे म्हटले जाते.
- याबाबत माये यांनी सांगितले, की या यंत्रणेमध्ये विकर आणि नॅनोरॉड मधील अंतर कमी करण्यात आले असून प्रकाशाचा कार्यक्षमता वाढवली आहे. जनुकिय प्रक्रियेत विकसित झालेले ल्युसिफेरास विकर सरळ नॅनोरॉडच्या पृष्टभागावर मिळवण्याची पद्धत विकसित केली आहे. त्यासाठी कनेक्टिकट महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधक ब्रुस ब्रान्चिनी व डॅनियल फोन्टेन यांची मदत घेतली आहे.
- नॅनोरॉड विकसित करताना त्यात कॅडमिअम सल्फाईड आणि आतील भाग कॅडमिअम सेलेनाईड यांचा वापर केला आहे. प्रकासाला विविध रंग मिळविण्यासाठी त्यांची लांबी आणि व्यासामध्ये फरक केला जातो. सध्या हिरवास नारिंगी आणि लाल हे रंग मिळवले आहेत. निसर्गातः काजवे हे पिवळसर प्रकाश तयार करतात.
असा होईल संशोधनाचा फायदा
- प्रकाशाची तीव्रता ब्रेट (BRET) स्केल वर मोजली जाते. या प्रयोगात 44 ब्रेट स्केल पर्यंत प्रकाश मिळाला आहे. ही इन्फारेड प्रकाशाच्या जवळची तीव्रता आहे. मात्र इन्फ्रारेड प्रकाशाची तरंगलांबी दृश्यप्रकाशापेक्षा अधिक असते. त्यामुळे त्यांचा वापर रात्रीच्या अंधारातही पाहता येतील असे गॉगल, टेलिस्कोप, कॅमेरा आणि वैद्यकिय प्रतिमा मिळविण्यासाठी केला जातो.
- रासायनिक प्रक्रियेतून सरळ प्रकाश मिळवण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरणार आहे. सध्या अधिक स्थिर प्रकाश मिळविण्याच्या दृष्टीने संशोधन करण्यात येत असल्याचे संशोधक माये यांनी सांगितले.
-----
फोटोओळ- माये यांच्या प्रयोगशाळेत विकसित केलेल्या नॅनोरॉडच्या साह्याने काजव्याच्या विकरामधून नारिंगी प्रकाश मिळवला आहे. (स्रोत- सायराकस विद्यापीठ)
फोटोओळ- माये यांच्या प्रयोगशाळेत विकसित केलेल्या नॅनोरॉडच्या साह्याने काजव्याच्या विकरामधून नारिंगी प्रकाश मिळवला आहे. (स्रोत- सायराकस विद्यापीठ)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा