रविवार, ८ जुलै, २०१२

नवे गोठणविरहीत स्लिपस तंत्र विकसित


पृष्टभागावरील बर्फाचे थर जातील घसरून,

 हार्वर्ड विद्यापीठातील संशोधन


अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांनी धातूच्या पृष्ठभागावरील बर्फ किंवा दवाचे थेंब आपोआप दूर करण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यासाठी एक विशिष्ट आवरण तयार केले असून त्याची प्रक्रिया धातूच्या पृष्ठभागावर केली जाते. प्रक्रिया केलेल्या पृष्टभागावरील कण गुरूत्वाकर्षणाने दूर होतात.  या तंत्राचा वापर बर्फवृष्ठी होत असलेल्या प्रदेशात घर किंवा ग्लास हाऊसच्या छप्परासाठी करता येईल. त्यामुळे बर्फाचे किंवा दवाचे थर दूर होण्यास मदत होईल. तसेच रेफ्रिजरेशन यंत्रणा, पवनचक्क्या , विमाणे, नौका आणि बांधकाम उद्योगामध्ये या संशोधनाचे फायदे दिसून येणार आहेत. हे संशोधन एसीएस नॅनो या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

अतिथंड वातावरणात बर्फाचे थर तयार झाल्याने विविध यंत्राचे भाग हे कार्य करत नाहीत, किंवा त्यांची कार्यक्षमता कमी होते. ग्लास हाऊस किंवा घरांच्या  छप्परांचे आरेखन करताना साठणाऱ्या बर्फाच्या थराचे वजन विचारात घ्यावे लागते. त्यामुळे अधिक सशक्त छप्पराचे नियोजन करावे लागते. त्यासाठी अधिक खर्च होतो. मात्र आता हार्वर्ड विदयापीठातील पदार्थ विज्ञानातील संशोधिका जोआना आझेनबर्ग, ऍमी स्मिथ बेरिस्लॉन यांनी बर्फाला दूर ठेवणारा पृष्ठभाग विकसित केला आहे. त्यासाठी कमळाच्या पानापासून संशोधकांनी प्रेरणा घेतली आहे. त्यामुळे धातूवरील आवरणामुळे बर्फ आणि धुके पृष्ठभागावर न थांबता घसरून पडते.

...अशी आहे स्लिपस पद्धत
- अधिक आर्द्रतेमध्ये कोणत्याही पृष्ठभागावर धुके आणि दव साठल्याने प्रक्रियेचा उपयोग होत नाही.  त्यांची परीणामकारकता कमी होते. हा दोष दूर करण्यासाठी संशोधकांनी स्लिपरी लिक्विड इन्फुजड पोरस सरफेसेस (SLIPS ) ही पद्धत विकसित केली आहे. त्यामध्ये अतिसू्क्ष्म पातळीवर सपाट द्रवरूप तयार केला असून त्याखाली अतिसुक्ष्म घन पदार्थाची रचना केलेली असते. त्यामुळे बर्फ, पाण्याचे थेंब, धुके हे सहजपणे घसरून जाते.

- व्यहवारात वापरले जाणारे बहुतांश धातूवर बर्फाचे थर हे साठून राहतात. संशोधिका आयझेनबर्ग आणि तिच्या सहकाऱ्यांनी धातूवर थर देण्यासाठी तेलाचा वापर केला. हे तेलाचे थर स्थिर ठेवण्यासाठी वरून एका आवरणाचा उपयोग केला. हे आवरण गंजविरहीत आणि बिनविषारी आहे. सध्या त्यांचा वापर रेफ्रिजरेटरमधील पंख्यांसाठी केला असून अधिक काळापर्यंत डिप फ्रिझ म्हणजेच अति थंड वातावरणात त्याचा चाचण्या घेण्यात आल्या. सध्याच्या फ्रोस्ट फ्री तंत्रज्ञानाबरोबर त्याची तुलना केली असता हे अधिक काळ कार्यक्षमपणे कार्य करत असल्याचे आढळले आहे.
------------


फोटोओळ- ऍल्युमिनीयन धातूच्या पृष्ठभागावर स्लिपस पद्दतीचा वापर करून आवरण विकसित केले आहे. त्यामुळे बर्फाचे थर त्यावरून ओघळून पडतात. (स्रोत- हार्वर्ड विद्यापीठ)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा