सोमवार, ९ जुलै, २०१२

वयस्कर मधमाशा करतात तारूण्याकडे प्रवास


नर्सिंग करणाऱ्या वयस्कर मधमाशाच्या प्रथिनांत होतात बदल ,
मेंदूची कार्यक्षमता वाढून नव्या गोष्टी शिकू शकतात
-------


माणसांच्या वयस्कर व्यक्तीच्या मेंदूची कार्यक्षमता वाढत्या वयाबरोबर कमी होत जाते. हे सर्व सजीवामध्येही कमी अधिक प्रमाणात सत्य आहे. मात्र त्याच्या नेमकी उलटी स्थिती मधमाशांमध्ये आढळली आहे. म्हाताऱ्या किंवा अधिक वयाच्या मधमाशा पुन्हा कार्यरत होऊन तरूण मधमाशांचे काम करू लागताच त्यांच्या मेंदूचे वाढलेले वय पुन्हा तारूण्याकडे प्रवास करू लागते, असे अरिझोना राज्य विद्यापीठ व नॉर्वे जीवनशास्त्र विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. वार्धक्यातील डिमेंशिया सारख्या रोगावर उपचार शोधण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होऊ शकतो. भविष्यामध्ये या प्रक्रियेमागील तत्व उलगडण्यात यश आल्यास वार्धक्याशी संबंधित अनेक रोगांचा इलाज करणे शक्य होणार आहे. या संशोधनाचे निष्कर्ष एक्सपेरिमेंटल जेरॉन्टोलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

 सोने आणि अमरत्व मिळविण्यासाठी किमयागारांनी केलेल्या प्रयत्नांनी शास्त्राच्या विकासात मोलाची भर घातली आहे. तारूण्य मिळविण्यासाठी माणूस सातत्याने संशोधन करत आहे. अगदी भारतीय पुराणशास्त्रामध्येही स्वतःच्या मुलाकडून त्याचे तारूण्य मागणाऱ्या ययाती या वृद्ध पित्याची कथा प्रसिद्ध आहे. माणसामध्ये मेंदूच्या प्रक्रिया ही वाढत्या वयासोबत काही पेशी, प्रक्रिया नष्ट होत जातात.  त्यात पुन्हा नव्या पेशी तयार होत नाहीत . मात्र अमेरिकेतील अरिझोन राज्य विद्यापीठ आणि नॉर्वेयन जीवनशास्त्र विद्यापीठातील संशोधकांनी ग्रो ऍमडॅम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनात वसाहतीमध्ये वयस्कर असलेल्या मधमाशावर काही कारणामुळे जर वसाहतीच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या तर त्यांच्या मेंदूमध्ये मुलद्रव्यीय पातळीवर बदल घडून येत असल्याचे आढळले आहे. त्या बाबत माहिती देताना संशोधक ऍमडॅम म्हणाले की,  वसाहतीमध्ये मधमाशांच्या अळी अवस्थेची काळजी घेण्यासाठी, त्यांना खाद्य पुरवण्यासाठी थांबलेल्या वयस्कर मधमाशाचे मेंदूची कार्यक्षमता निरीक्षण काळामध्ये तशीच राहिल्याचे दिसून आले आहे. मात्र जेव्हा त्या मधमाशा अन्य कामासाठी बाहेर पडतात, त्यावेळी त्यांच्या मेंदूचे वय पुन्हा वाढायला लागते. त्यानंतर केवळ दोन आठवड्यातच या मधमाशांचे पंख गळून गेले, शरीरावरील केस कमी झाले, आणि मेंदूची कार्यक्षमता कमी झाल्याचे दिसून आले. त्याच्या नवी गोष्ट शिकण्याच्या क्षमतेची चाचणी यामध्ये घेण्यात आली होती. म्हणजेच मधमाशामध्ये मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये लवचिकता असल्याचे दिसून आले.

...असे झाले प्रयोग


मधमाशांच्या अळ्यांची आणि लहान मधमाशांची काळजी घेण्यासाठी असलेल्या तरूण मधमाशा वसाहतीतून काढून घेण्यात आल्या. वसाहतीमध्ये राणी माशी आणि लहान मधमाशा ठेवण्यात आल्या. जेव्हा अन्न आणण्यासाठीबाहेर पडलेल्या वयस्कर मधमाशा परत आल्यानंतर त्यांच्यातील काही जणांनी अळ्या आणि लहान मधमाशांची काळजी घेण्यासाठी वसाहतीमध्ये थांबल्या. काही पुन्हा अन्न गोळा करण्यासाठी बाहेर पडल्या. त्यानंतर 10 दिवसांनी संशोधकांना लहान मधमाशांची काळजी घेणाऱ्या वयस्कर मधमाशांच्या मेंदूच्या नवीन गोष्टी शिकण्याच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्याचे आढळले. मेंदूतील प्रथिनामध्ये झालेले बदलही टिपण्यात यश आले आहे. अन्य मधमाशांशी तुलना केली असता, या मधमाशांच्या मेंदूमध्ये पीआरएक्स6 व चापेरॉन या प्रथिनांत बदल झालेले दिसले.

मानवातील मेंदूशी संबंधित रोगामध्ये संशोधन ठरेल उपयुक्त


- पीआरएक्स6 हे प्रथिन मानवामध्येही आढळून येते. हे प्रथिन अल्झायमर रोगासह अन्य डिमेंशिया रोगापासून वाचवण्याचे काम करते. तसेच चापेरॉन हे प्रथिन मेंदूतील पेशींच्या ऱ्हासापासून वाचवण्याचे काम करते. विशेषतः अतिताणामुळे मेंदूच्या पेशीवर पडणाऱ्या परीणामापासून वाचवण्याचे काम करतात.
- गेल्या तीस वर्षापासून मानवामध्ये मेंदूशी संबंधित रोगासाठी उपचार शोधण्यासाठी वैद्यकिय संशोधक प्रयत्न करत आहेत. या संशोधनाबाबत संशोधक ऍमडॅम म्हणाले की, सामाजिक परीस्थितीमध्ये बाह्य तणावाशी माणूस कोणत्या प्रकारे तोंड देतो, यावर मेंदूच्या कार्यपद्धती ठरत असते. मधमाशा आणि माणूस यांच्या मेंदूतील काही प्रथिने सारखी असून त्यांच्यामुळे विशिष्ट सामाजिक परीस्थितीत द्यावयाच्या प्रतिक्रिया ठरवल्या जातात. मधमाशामध्ये आढळून आलेले बदल हे उंदीर व अन्य सस्तन प्राण्यामध्ये अधिक अभ्यास करून तपासण्याची गरजही ऍमडॅम यांनी व्यक्त केली. त्यांच्यामध्ये हे शक्य झाल्यास माणसामध्ये या संशोधनाचा उपयोग होऊ शकेल.
-----------

 अन्न गोळा करण्याच्या कामाची सुरवात मधमाशा 3 ते 4 आठवड्याच्या असल्यापासून होते. त्यानंतर त्याचे वय वाडताना त्यांचे पंख आणि केस गळून जातात. नवीन काही शिकण्याची त्यांची क्षमता कमी होत जाते. छायाचित्र वयस्कर मधमाशा पराग आणि मध गोळा करताना.(स्रोत-क्रिस्तोफर बॅंग)

जर्नल संदर्भ- Nicholas Baker, Florian Wolschin, Gro V. Amdam. Age-related learning deficits can be reversible in honeybees Apis mellifera. Experimental Gerontology, 2012;

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा