मंगळवार, ३१ जुलै, २०१२

हुशार अंडे...

रोज गल पक्ष्याचे अंडे असते हुशार


अंड्यातील भ्रुणही घेतात बाह्य परिस्थितीचा अंदाज


पक्ष्यांचे नियोजन दिवस आणि त्यांच्या लांबीवर अवलंबून असते. पक्ष्यांचे त्याचा अचूक अंदाज असतो. मात्र आता उत्तर डाकोटा राज्य विद्यापीठातील संशोधकांना काही पक्ष्यांची पिल्ले अगदी अंड्यात असल्यापासून दिवस आणि त्यांची लांबी यांचा अचूक अंदाज घेत असल्याचे दिसून आले आहे. हे पिल्लू अंड्यात असल्यापासूनच शरीराच्या अंतर्गत असलेले घड्याळ बाह्य वातावरणानुसार बदलून घेते. हे संशोधन फंक्शनल इकॉलॉजी या ब्रिटिश संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
फ्रॅंकलीनस गल (रोज गल) हा पक्षी दक्षिण अमेरिकेतील किनापट्टीवरून उत्तरी अमेरिकेच्या गवताळ प्रदेशापर्यंत प्रचंड अंतराचे स्थलांतर करतो. त्यासाठी त्याला अचूक वेळेच्या अंदाजाची आवश्यकता असते. हा पक्षी तपकिरी पंख आणि गुलाबी पोटामुळे अत्यंत सुंदर दिसतो. तो गवतावर तंरगत्या स्वरुपाचे घरटे करून त्यामध्ये हिरवे आणि काळे ठिपके असलेली गडद रंगाची साधारणपणे तीन अंडी देतो. या अंड्यातील पिल्लूही वसंताचे दिवस ओळखू शकते. या बाबत संशोधक डॉ. क्लार्क यांनी सांगितले, की आईकडून अंडी घालताना मिळालेली अन्नद्रव्ये ही दिवसाच्या आकारमानावर ठरतात. अंड्यातील तयार होत असलेले भ्रुण या लक्षणांची सांगड घालून बाह्य वातावरणाचा अंदाज घेते.


डॉ. क्लार्क आणि डॉ. रिड यांनी केलेल्या निरीक्षणानुसार,
-घरटे करण्याच्या सुरवातीच्या कालावधीत घातली गेलेली अंडी उबण्यासाठी अधिक काळ घेतात व अशा अंड्यातून बाहेर पडणारी पिल्ले घरटे करण्याच्या शेवटच्या कालावधीत घातलेल्या अंड्यातील पिल्लापेक्षा अधिक सशक्त असतात. 
-शेवटी घातलेली अंडी लवकर उबून त्यातून लहान पिल्ले बाहेर येतात. ही पिल्ले सवकर वाढून स्वतंत्र होतात. लवकर उडायला शिकून दक्षिण अमेरिकेकडे स्थलांतरासाठी तयार होतात. त्यावरून हे पक्षी अंड्यात असतानापासून बाह्य वातावरणातील फरकांचा अंदाज घेत असल्याचे दिसून येते. हे पिल्लू प्रकाशाचा कालावधी आणि प्रजननाच्या वेळचे वातावरण यांच्या एकत्रित माहितीचा वापर करते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा