सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

आशियाई मेंढ्यांच्या जनुकिय संशोधनातून मिळाली नवी दिशा

आशियाई मेंढ्यांच्या जनुकिय संशोधनातून मिळाली नवी दिशा

आशियाई मेंढ्यांच्या जनुकिय विश्लेषणातून मेंढ्याच्या जैवविविधतेच्या वैशिष्ठांची उकल करण्याकडे जागतिक पातळीवर संशोधकांचा एक गट लक्ष देत असून, त्यातून मांस उत्पादनासाठी उपयुक्त अशा नव्या जातींची पैदास करणे शक्य होणार आहे. या संशोधनातून उपलब्ध जनुकिय माहितीमुळे आशियाई मेंढ्याच्या प्राचीन पैदास व व्यापार प्रक्रियेच्या दुहेरी स्थलांतरीत मार्ग ही शोधण्यात यश आले आहे. हे संशोधन जर्नल मॉलेक्युलर बायोलॉजी ऍण्ड इव्हाल्युशन या संशोधनपत्रिकेमध्ये येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रकाशित होणार आहे.

सध्या मांसाच्या व लोकरीच्या किमतीमध्ये वेगाने वाढ होत असून, अन्न सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा मेंढी पालन व उत्पादनासंदर्भात अधिक सजग राहण्याची वेळ येत आहे. त्यासाठी  चीन, इराण, पाकिस्तान, इन्डोनेशिया, नेपाळ, फिनलॅंड आणि इंग्लंड येथील संशोधक एकत्र आले असून, त्यांनी जगभरातील 42 स्थानिक जातींच्या मेंढ्यांचा जनुकिय अभ्यास सुरू केला आहे. त्यासाठी अत्याधुनिक अशा जनुकिय सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानांचा वापर केला जात आहे. या अभ्यासासाठी जागतिक पातळीवरील संशोधक एकत्र येत मानवांच्या सुरवातीच्या म्हणजेच सुमारे 10 हजार वर्षापूर्वीच्या जुन्या पशुपालन फार्मपासून आताच्या स्थानिक जातीच्या मेंढ्या जनुकिय अभ्यास करत आहेत.

असे आहे संशोधन
अझरबैजान, मोलदोवा, सर्बिया, युक्रेन, रशिया, कझाकिस्तान, पोलंड, फिनलॅंड, चीन आणि इंग्लंड या सारख्या देशातील स्थानिक जातींच्या सुमारे 42 मेंढी जातींचा संपूर्ण मायटोकॉन्ड्रीयल डीएनएचे विश्लेषण केले आहे. त्यात कझाकिस्तान येथील दोन जंगली जातींचाही समावेश आहे. या माहिती साठ्यांची तुलना ही अन्य देशातील 150 जातींशी करण्यात आली आहे.
- बिजिंग (चीन) येथील पशुधन आणि चारा जनुकिय स्रोत संयुक्त प्रयोगशाळा येथील वरीष्ठ शास्त्रज्ञ जियान- लिन हान यांनी सांगितले, की आशियातील मेंढ्यामध्ये सामान्यपणे युरोपातील मेंढ्याच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात जनुकिय विविधता आढळली आहे. या विविधतेचा उपयोग करून मंगोलिया आणि पश्चिम चीन येथील मेंढ्याच्या मांस उत्पादनामध्ये वाढ करणे शक्य आहे. त्यावर सध्या लक्ष केद्रीत केले आहे.
- आशियाई मेंढ्याच्या पूर्वापार मानल्या जात असलेल्या एक स्थलांतर मार्गाऐवजी दोन मार्ग या जनुकिय संशोधनातून पुढे आले आहेत.  हान त्याविषयी माहिती देताना म्हणाले, की जगभरातील विविध ठिकाणाहून जमा केलेल्या 150 प्रजातींच्या हजारो नमुन्यांचे विश्लेषण केले असता त्यातून 8 ते 11 हजार वर्षापूर्वीच्या मेंढ्याच्या पहिल्यांदा पाळिव बनण्यापर्यंतची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानंतरच्या काळात पूर्वेकडे चीन आणि मंगोलियापर्यंत झालेला व्यापाराचा मार्ग विकसित झाला. हा आशिया आणि युरोप मधील मानवी व व्यापाराच्या स्थलांतराचा सुमारे 4 हजार मैलाचा मार्ग तयार झाला.
- हान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कळपांसह स्थलांतराचा दुसरा मार्ग शोधला असून, त्यातून उत्तर चीन आणि मंगोलियातील वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती सुमारे 5 हजार वर्षापूर्वी तयार झाल्या. त्यानंतर त्यांच्या व्यापारातून, वेगवेगळ्या संकरातून विविध जातींची निर्मिती होत गेली. उदा. चेंगीझ खान व अन्य मंगोलियन योद्ध्यांसह मेंढ्याचाही प्रसार होत गेला.
-इंग्लंड येथील नॉटिंगहॅम विद्यापीठातील पशुधन जनुकशास्त्रज्ञ ऑलिव्हर हॅनोट्टे यांनी सांगितले, की या अभ्यासामध्ये आधुनिक मेंढ्याच्या प्रजातींचे प्राचीन जनुकिय सांधे जुळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या हजारो वर्षाच्या व्यापार व पैदास प्रक्रियेतून प्रथम पश्चिम ते पूर्व आणि नंतर पूर्व ते पश्चिम अशा प्रवासाचा वेध घेण्यात आला आहे.

पैदाशीसाठी पाया ठरणार हे संशोधन ...
- आशियातील लक्षावधी पशुपालकांना फायदेशीर ठरतील अशा जातींची पैदास करण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होणार आहे. प्रामुख्याने या अभ्यासातून मांस उत्पादनासाठी उपयुक्त ठरतील अशा जाती ओळखण्यात येत आहेत. सध्या एकट्या चीनमध्ये 2011 च्या तुलनेमध्ये मांसाच्या किमतीमध्ये 40 टक्क्यापेक्षा अधिकक वाढ झाली असून, मांस उत्पादनातून सामान्य पशुपालकांच्या उत्पन्नांमध्ये चांगली भर पडू शकते.
- जागतिक पातळीवर प्रामुख्याने लोकरी उत्पादनासाठी पैदाशीवर अधिक भर देण्यात आला असला तरी 1996 पासून लोकरीच्या किमतीमध्ये सातत्याने घट येत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, न्युझीलॅंड येथे मांस उत्पादनासाठी खास नव्या जाती विकसित केल्या जात आहेत. अर्थात, तिथे कुरणे आणि अधिक महागड्या पशुखाद्याचा वापर त्यासाठी केला जातो. या जातीच्या तुलनेमध्ये चीन व मंगोलिया येथील जाती या अधिक सशक्त आणि विविध वातावरणात तग धरणाऱ्या आहेत. या जाती चाऱ्याच्या शोधामध्ये मोठे अंतर पार करू शकतात.
- सध्या चीनमध्ये स्थानिक जाती व अर्गलीसारख्या जंगली जातींच्या संकरातून पैदास करण्याचे काही प्रयोग होत आहेत. मात्र, या प्रयोगातून निर्माण होणारी पैदास ही अन्य गुणधर्माचीही असण्याचा धोका आहे.  हे धोके टाळण्यासाठी जनुकीय माहितीसाठी उपयोगी ठरणार आहे.
- चीनसह अन्य आशियाई देशामध्ये लहान पशुपालकांसाठी अन्न, उत्पन्न, कपडे आणि शेतीसाठी खत या सर्व प्रकारे त्यांचे छोटे कळप उपयोगी पडतात. त्यामुळे मेंढ्याच्या सुधारीत जाती विकसनातून त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगली भर पडण्यास मदत होणार आहे.
- केनियामध्ये आंतरराष्ट्रीय पशुधन संशोधन संस्थेच्या संशोधकांनी मसाई पशुपालकांच्या लांब लोकर असलेल्या स्थानिक जातींपासून सुधारीत जात विकसित केली जाते. ही लाल मसाई जात वातावरणाला अनुकुल असून, पूर्व आफ्रिकेतील उष्णतेचा ताण व आतड्यातील कृमींना प्रतिकारक आहेत. तसेच अन्य जातींच्या तुलनेमध्ये कमी चाऱ्यांमध्ये अधिक मांस व दूधाचे कार्यक्षम उत्पादन मिळते.

सोमवार, १४ सप्टेंबर, २०१५

रोपावस्थेतच कळणार वनस्पतीचे अनेक गुणधर्म


रोपावस्थेतच कळणार वनस्पतीचे अनेक गुणधर्म

रोपावस्थेमध्ये वनस्पतीची नेमकी उंची, पानांचा आकार या सारख्या गुणधर्मांचा अंदाज मिळविण्याची नवी पद्धती बेल्जियम येथील संशोधकांनी विकसित केली आहे. ही पद्धती पानांच्या पूर्ण वाढीनंतरच्या आकारासाठी कार्यरत जनुकांच्या आधारावर कार्य करते. या विशिष्ठ गुणधर्मासाठी कारणीभूत आरएनएचे विश्लेषण करणे शक्य असल्याने, वनस्पतीच्या पैदाशीमध्ये योग्य त्या उपाययोजना वेगाने करणे शक्य होणार आहे. परीणामी पैदास प्रक्रियेचा वेग वाढ आहे.

वनस्पतींच्या वाढीसाठी विविध टप्प्यावर वेगवेगळे जनुक गट कार्यरत होतात. त्यांच्या कार्यरत होण्याच्या क्षमतेवर वनस्पतींचा आकार ठरतो. वनस्पतींचा विकास व पिकांची वाढ यांच्यासाठी कारणीभूत असलेल्या डिएनए किंवा रेण्वीय पातळीवर प्रक्रिया अलिकडे जाणून घेतल्या जात आहेत. त्यातील डिएनएच्या सिक्वेन्सेस ( जेनेटीक मार्कर) ओळखल्याने त्या वनस्पतींच्या गुणधर्मांची नेमकी माहिती सुरवातीच्या अवस्थेतच शक्य होते. यांचा वापर करून केलेल्या पैदाशीला मार्कर असिस्टेड ब्रिडींग असे म्हणतात. वनस्पतींच्या पानांचा आकार व वाढ जाणून घेण्यासाठी बेल्जियम येथील व्हीआयबी आणि युजेन्ट या संशोधन संस्थेतील प्रो. डिर्क इंझे यांच्या नेतृत्वाखाली डिएनए पेक्षाही आरएनए वर आधारीत नवी पद्धती विकसित केली आहे. ही पद्धती कार्यक्षम आणि वेगवान आहे. पूर्वी संकराच्या पैदास प्रक्रियेतून नव्या जाती विकसित करण्यासाठी अधिक वेळ व मनुष्यबळ लागत असे. तो वाचणार आहे.

आरएनए वर आधारीत पद्धती
- वनस्पतीच्या डिएनए मध्ये आनुवंशिक गुणधर्माची माहिती असली तरी प्रत्येक पेशीमध्ये संपूर्ण माहिती असण्याची गरज नसते. थोडक्यात, फुलांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेला जनुकिय गट हा मुळाच्या पेशीमध्ये असण्याची गरज नाही. मात्र, डिएनए मधील माहिती कार्यान्वित होण्यापूर्वी त्याचे रुपांतर आरएनए रेणूमध्ये व्हावे लागते. पुढे ते प्रथिनामध्ये रुपांतरीत होतात. थोडक्यात, वनस्पतीच्या आरएनए रेणूंचा गट वाढीच्या टप्प्यामध्ये काय काम करणार आहे, याची अधिक चांगली माहिती पुरवू शकतो.
- प्रो. डिर्क इंझे यांच्या गटातील वनस्पती शास्त्रज्ञ व पिसा येथील इटालियन इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सेस येथील डॉ. जोक बाउटे यांनी मका रोपांच्या पानातील पेशींच्या विभाजनामध्ये कार्यान्वित आरएनए गटांचा अभ्यास केला. या आरएनए गटाचा संबंध बाह्य गुणधर्मांशी जोडण्यातही त्यांना यश आले. वास्तविक ही आरएनए वनस्पतीच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वेळी कार्यान्वित होत असतात. (उदा. पानांचा आकार, बायोमास उत्पादन इ.) मात्र, या पद्धतीमुळे वनस्पतीच्या वाढीच्या सुरवातीच्या टप्प्यातच त्यांचे गुणधर्म ओळखणे शक्य होणार आहे.
- या बाबतची दोन संशोधने जर्नल जिनोम बायोलॉजी मध्ये नुकतीच प्रकाशित झाली आहेत.
-----------------
कोट ः
पैदास प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यावरच वनस्पतींच्या आकारासह विविध गुणधर्माचा छडा लावणे या पद्धतीमुळे शक्य होणार आहे. त्यामुळे पैदास प्रक्रियेतील मोठा खर्च, वेळ यांची बचत होणार आहे.
- डिर्क इंझे, व्हीआयबी शास्त्रज्ञ.
--------------
छायाचित्र ः प्रयोगामध्ये वापरलेल्या वनस्पतींची रोपे.

कॉफीच्या चोथ्यात साठवा मिथेनसह अन्य वायू

कॉफीच्या चोथ्यात साठवा मिथेनसह अन्य वायू

कॉफीच्या टाकाऊ समजल्या जाणाऱ्या चोथ्यामध्ये मिथेन व कार्बन वायू साठविणे शक्य होणार असून, कॉफीच्या चोथ्यापासून शोषक तयार करण्याची नवी पद्धती दक्षिण कोरियातील संशोधकांनी विकसित केली आहे. हे संशोधन नॅनोटेक्नॉलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असणारे मिथेनसारखे वायू शोषून, त्यांची साठवण केल्याने दुहेरी फायदा होणार आहे. कारण मिथेनचा वापर इंधनासाठी होऊ शकतो. सध्या इंधनासाठी वापरल्या जाणाऱ्या खनिज इंधनापेक्षा हा वायू अधिक पर्यावरणपुरक ठरणार आहे. दक्षिण कोरिया येथील उल्सान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी येथे कॉफीच्या शोषक गुणधर्मामध्ये वाढ करण्यासाठी प्रक्रिया विकसित करण्यात आली आहे. त्यामध्ये टाकाऊ कॉफीचा चोथा हा सोडिअम हायड्रॉक्साईड मध्ये भिजवला जातो. त्यानंतर भट्टीमध्ये 700 ते 900 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत तापवले जाते. या प्रक्रियेतून एका दिवसात स्थिर कार्बन पदार्थ निर्माण होतो. त्यामध्ये कार्बन पकडण्याची क्षमता असते. या विषयी माहिती देताना संशोधक ख्रिस्टिन केम्प यांनी सांगितले, की कार्बन शोषणाऱ्या घटकांच्या निर्मितीचा कालावधी अत्यंत कमी करण्यात यश आले आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेले शोषक पदार्थ हे धातू किंवा महागड्या अशा सेंद्रिय पदार्थापासून बनवलेले आहेत. त्या तुलनेत हा पदार्थ टाकाऊ अशा घटकापासून तयार करण्यात आल्याने अत्यंत स्वस्त पडणार आहे.

हायड्रोजन साठवणीसाठीही होऊ शकतो उपयोग
कॉफी गाळामध्ये शोषण्याची क्षमता मोठी असल्याने त्यांचा वापर कार्बन शोषण्यासाठी करण्याची कल्पना त्यांना सुचली. या गाळामध्ये सोडीयम हायट्रॉक्साईड मिसळल्यानंतर त्याचे रूपांतर कार्यक्षम अशा कार्बन मध्ये झाले. त्याचा उपयोग काहीही शोषण्यासाठी करता येतो. अगदी क्रायोजेनिक तापमानामध्ये हायड्रोजन साठवणीसाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. सध्या त्यावर संशोधन सुरू आहे.

रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

होमो नालेदी ः मानववंशातील निखळलेला दुवा

मानववंशातील निखळलेला दुवा मिळाला...


आजवर अज्ञात नवी प्रजात सापडल्याचा शास्त्रज्ञांचा दावा

दक्षिण आफ्रिकेतील एका खोल गुहेमध्ये प्रचंड प्रमाणात अस्थी अवशेष मिळाले असून, ही प्राचीन मानवाची आजवर अज्ञात असलेली नवी प्रजात असल्याचा दावा संशोधकांनी "जर्नल इ लाईफ' मध्ये प्रकाशित संशोधनामध्ये केला आहे. आधुनिक माणसांच्या तुलनेत मेंदूचा लहान आकार आणि झाडावर चढण्याच्या क्रियेसाठी सक्षम असे एप माकडाप्रमाणे असलेले मजबूत खांदे ही या प्रजातीची वैशिष्ट्ये ही मानव वंशीय प्राण्यांशी मिळतीजुळती आहेत. या प्रजातीचे नाव संशोधकांनी "होमो नालेदी' असे ठेवले आहे.

 
दोन वर्षापूर्वी जोहान्सबर्गपासून वायव्येला 30 मैल अंतरावर असलेल्या रायझिंग स्टार येथील गुहेत संशोधकांना हाडांचे सुमारे 1550 नमुने सापडले. हा गेल्या अर्धशतकातील जिवाश्‍माचा सर्वांत मोठा शोध असून, ही एकूण 15 व्यक्तींची हाडे असण्याची शक्‍यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. त्यावरून "होमो नालेदी' हा दोन्ही पायांवर ताठ उभा राहून चालत असावा. त्याच्या हात आणि पायाच्या हाडांची रचना "होमो' या विकसित होत असलेल्या मानवाशी मिळतीजुळती असून, खांदे आणि कवटीची रचना मात्र आदिमानवाप्रमाणे आहे. त्याचा मेंदू लहान आहे. "होमो नालेदी'चे मूळ "होमो' कुळातच असून, सापडलेली हाडे 25 ते 28 लाख वर्षांपूर्वीची आहेत, असे संशोधकांच्या गटाचे प्रमुख ली बर्जर यांनी सांगितले.

होमो नालेदीचा रहिवास आणि मानववंश वृक्षामधील त्यांचे नक्की स्थान या विषयी आताच फारसे भाष्य करणे योग्य होणार नसल्याचे संशोधकांचे मत आहे. मात्र, होमो नालेदीच्या मेंदूचा अत्यंत लहान आकार पाहता गुहेची रचना व त्यांची मृतांना त्यात टाकण्याची किंवा विल्हेवाट लावण्याची क्रिया इतका विचार करण्याची त्यांची क्षमता असेल काय, यावर तज्ज्ञांचे मतभेद आहेत.
--------------------------------------------------

असा दिसत असावा होमो नालेदी ः


चेहऱ्याची हाडे, कवटी आणि दात यांच्या साह्याने होमो नालेदी प्रजातीचे दृश्‍य स्वरूप कसे असेल, याची मांडणी करण्यासाठी गुर्चे या कलाकाराला सुमारे 700 तास लागले. (छायाचित्र ः मार्क थिएस्सन, नॅशनल जिऑग्राफिक)
------------------------------

संशोधकाविषयी थोडेसे...


- ली बर्जर हे 1990 पासून विटवॉटर्सरॅंड विद्यापीठामध्ये मानववंशशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. ते पूर्व आफ्रिकेतील ग्रेट रिफ्ट व्हॅली परिसरामध्ये कार्यरत आहेत. 2008 मध्ये रायझिंग स्टारपासून दहा मैल अंतरावर असलेल्या मालापा या ठिकाणी त्यांना व त्यांच्या नऊ वर्षाचा मुलगा मॅथ्यू याला डोलोमाईटच्या ढिगामध्ये "होमो' प्रजातीचे अवशेष मिळाले होते.
त्यानंतर 2009 मध्ये बर्जर यांच्या गटाला एका खडकामध्ये 20 लाख वर्षांपूर्वीचे दोन पूर्ण सापळे मिळाले. असे संपूर्ण सापळे सापडणे ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यात एकाच वेळी प्राचीन वंशाचे व काही प्रमाणात आधुनिक मानवाची वैशिष्ट्ये दिसून आली होती. त्यामुळे तिला नवी प्रजात मानून बर्जर यांनी त्याचे नामकरण "ऑस्ट्रलोपिथेसिएस सेडिबा' असे केले. आणि रोझेटा स्टोन हा परिसर होमो या मूळ वंशाचे उगमस्थान असल्याचा दावा केला. मात्र, त्यांचा हा दावा संशोधकांनी नाकारला. त्यानंतर सुरवातीच्या काळातील होमो प्रजातीविषयी अनेक संशोधने प्रकाशित झाली, त्यातही बर्जर यांचे नाव अथवा संशोधनाला श्रेय देण्यात आले नाही.
- आपले संशोधन नाकारले गेल्यानंतरही बर्जर यांनी आपले मालापा येथील उत्खनन व संशोधन चालूच ठेवले. त्यानंतर गुहांचे अभ्यासक पेड्रो बोशोफ आणि भूगर्भशास्त्रज्ञ स्टीव्हन टकर यांनी बर्जर यांना रायझिंग स्टार परिसरातील गुहांबाबत माहिती दिली. आणि पुढील संशोधन आता आपल्या समोर आहे.

सापडलेल्या जिवाश्‍माप्रमाणे असा आहे मानववंशाचा इतिहास


- अर्डिपिथेकस रॅमिडस - 44 लाख वर्षापूर्वी ः 1990 मध्ये इथोपियात जीवाश्‍म सापडले. ओटीपोटाची रचना झाडावर चढणे व उभे राहून चालण्यास योग्य.
- ऑस्ट्रलोपिथेकस आर्फेन्सिस - 39 ते 29 लाख वर्षापूर्वी ः प्रसिद्ध असा लकी हा सापळा पूर्व आफ्रिकेत सापडला. त्याची रचना उभे राहून चालण्यायोग्य असली तरी काही काळ ते झाडावर घालवत असावेत.
- होमो हॅबिलिस - 28 ते 15 लाख वर्षापूर्वी ः हा मानवाच्या जवळचा नातेवाईक म्हणता येईल. मेंदूचा आकार थोडा मोठा, आधीच्या प्रजातीपेक्षा दातांचा आकार लहान. हातांची लांबी अधिक.
- होमो नालेदी - काळ अद्याप सांगता येत नाही. मात्र, संशोधकांच्या मते 30 लाख वर्षे ः लहान माणसाप्रमाणे दात, पाय, मात्र बोटांची रचना थोडीशी वेगळी. मेंदूचा आकार लहान.
- होमो इरेक्‍टस - 19 लाख वर्षांपूर्वीचा असावा. ः बहुतांश वैशिष्ट्ये मानवाप्रमाणेच असून, मेंदूचा आकार लहान व चेहरा आदिमानवाप्रमाणे.
- होमो नियान्ड्रेथॅलिन्सिस -दोन लाख ते 40 हजार वर्षे ः आपल्या प्रजातींनी आफ्रिका सोडण्यापूर्वीची वेगळी पोटजात. आधुनिक मानवाच्या तुलनेत उंचीला कमी आणि अधिक बलवान. मेंदूचा आकार थोडा मोठा.
- होमो सेपियन्स - दोन लाख ते आतापर्यंत ः साधारण 60 हजार वर्षापूर्वी यातील लहान गटाने आफ्रिका सोडली व जगामध्ये इतरत्र राहण्यास सुरवात केली. अन्य मानवी प्रजातींना हटवत किंवा काही प्रमाणात आंतरपैदाशीतून त्यांची वाढ झाली. आधुनिक मानवाची उत्पत्ती ही आफ्रिकेतील होमो हेईडेलबर्गेन्सिस पासून झाल्याचे मानले जाते.

असे झाले संशोधन...


- गुहा विषयतज्ज्ञ टकर आणि रिक हंटर यांना रायझिंग स्टार गुहेमध्ये 40 फूट खोलीपर्यंत तिरक्‍या उतरत्या अरुंद जागेतून आत आल्यानंतर 30 फूट लांबीची व काही फूट रुंदीची मोठी पोकळी आढळली. तिथे खाली जमिनीवर कुणीतरी फेकल्याप्रमाणे सगळीकडे हाडे पसरलेली होती. त्यातील एक हाड हे माणसाच्या खालील दातासह जबड्याप्रमाणे होते. ही जागा प्रवेशाद्वारापासून सुमारे 100 यार्ड इतक्‍या अंतरावर होती. ही कदाचित मृत माणसांच्या विल्हेवाटीची जागा असावी. प्रवेशद्वारातून सरळ आत मृतदेह टाकण्याची त्यांची रीत असावी.

- ही हाडे दाखवल्यानंतर बर्जर यांना त्याचे महत्त्व कळाले. ही सर्व हाडे व जीवाश्‍म बाहेर काढण्यासाठी चिंचोळ्या मार्गातून आत जाऊन काम करणाऱ्या व खोदकाम करणाऱ्या तरुण संशोधकांची आवश्‍यकता होती. त्यासाठी फेसबुकवर जाहिरात देण्यात आली. आलेल्या 60 अर्जातून सहा तरुण महिलांची निवड केली. बर्जर यांनी त्यांना "भूमिगत अंतराळवीर' असे नाव दिले.

- मारीना एलियट (सिमॉन फ्रेझर विद्यापीठातील पदवी विद्यार्थिनी) यांच्यासह सहा तरुण महिला संशोधकांनी चिंचोळ्या जागेतून आत जाऊन खोदकाम करून ही हाडे बाहेर काढली. बाहेरून ली बर्जर हे अत्याधुनिक प्रणालीद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवून सूचना देत होते.
- या कामासाठी साठ संशोधक व त्यांचे सहाय्यक कार्यरत होते. या कामासाठी नॅशनल जिऑग्राफिक कडून आर्थिक साह्य मिळाले.
त्यांनी सुमारे 400 पोत्यामध्ये सुमारे 1550 हाडे बाहेर काढली. या 1550 हाडाच्या नमुन्यामध्ये वृद्ध, मुले आणि नवजात बालकांच्याही हाडांचा समावेश आहे. त्यांचे व्यवस्थित विश्‍लेषण करण्यासाठी विविध 15 देशातून नुकतेच पी. एचडी झालेले 30 तरुण संशोधकांना आमंत्रित केले. तरीही हे काम पूर्ण करण्यासाठी सहा आठवडे लागले.
- होमो हॅबिलीस प्रजातीच्या संशोधनाला बरोबर 50 वर्षे झाल्याचा मुहूर्त साधत बर्जर यांनी हे संशोधन प्रकाशित केले.

(स्रोत ः ली बर्जर, विटस. नकाशा ः जेसन ट्रीट नॅशनल जिऑग्राफिक)
(छायाचित्र ः एलियट रॉस)

----------------------------------

काय फरक आहे होमो नालेदी व आधुनिक माणसामध्ये


- होमो नालेदी प्रजातीच्या पुरुषाच्या कवटीचे घनफळ हे 560 घन सेंटीमीटर असून, ते आधुनिक माणसाच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे. तर महिलांच्या कवटीचे घनफळ हे 465 घन सेंटीमीटर असून, ते होमो इरेक्‍टसच्या सरासरी 900 घन सेंटीमीटरपेक्षा खूप लहान आहे.

- होमो नालेदीच्या हाताच्या बोटाची हाडे काहीशी वक्र असून, ती झाडावर किंवा खडकांवर चढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मात्र, अंगठा, मनगट आणि पंजाचे हाड हे आधुनिक माणसांप्रमाणेच आहे.
- खांदे एप माकडाप्रमाणे आहेत. ओटीपोटाची हाडे काटेदार ब्लेडप्रमाणे असून, त्याचा खालील भाग हा आधुनिक मानवाप्रमाणे आहे.

- पायाची हाडे ही ऑस्ट्रलोपीथिसिन सारखी असली तरी आधुनिक मानवाच्या पायाप्रमाणे एकत्र आलेली आहेत.

- कवटीतील पोकळी (मेंदूची जागा) लहान असली तरी या प्रौढ माणसाची उंची साधारणपणे पाच फूट असून, वजन 50 किलोपर्यंत आहे, महिलांची उंची व वजन किंचित कमी असल्याचे न्यूयॉर्क राज्य विद्यापीठातील फ्रेड ग्रीने यांनी सांगितले. त्यावरून ऑस्ट्रलोपीथिसिन ते होमो या दरम्यानच्या बदलाच्या काळातील हा प्राणी असावा.
- बर्जर यांच्या मते, हा प्राणी कोणत्याही कालखंडातील असला तरी त्याचा एकूणच मानववंशशास्त्रावर मोठा परिणाम असणार आहे. अर्थात, कालखंडासंदर्भात अधिक अभ्यास करण्यात येणार आहे.
-------------------------

साम्य व फरक


सामान्यतः होमो नालेदी हा ऑस्ट्रलोपिथेसिन्सपेक्षाही होमो इरेक्‍टसच्या जास्त जवळचा आहे. (वरील छायाचित्रात डावीकडून...)
- ऑस्ट्रलोपिथेसिन्स प्रजाती ः 32 लक्ष वर्षापूर्वी ः नाव- लकी - प्रौढ महिला 3 फूट 8 इंच उंच व वजन 60 ते 65 पौंड.
- होमो इरेक्‍टस ः 16 लक्ष वर्षापूर्वी ः नाव-तुर्काना बॉय, कुमारअवस्थेतील मुलगा, उंची 5 फूट, वजन 110-115 पौंड.
- होमो नालेदी ः सध्या नेमके सांगता येत नाही ः नाव रायझिंग स्टार होमिनीन, प्रौढ, उंची 4 फूट 10 इंच, वजन 100 ते 110 पौंड
(डिजिटल आरेखन ः जॉन गुर्चे, स्रोत ः ली बर्जर)

शुक्रवार, ३ जुलै, २०१५

वनस्पतीच्या जैवविविधतेमागील रहस्यांचा शोध

वनस्पतीच्या जैवविविधतेमागील रहस्यांचा शोध
पानापासून मुळापर्यंत...

वाहिन्यांद्वारे अन्नद्रव्य आणि पाणी यांचे वहन करणाऱ्या वनस्पती किंवा झाडांचे मूळ 400 दशलक्ष वर्षापेक्षाही मागे जाते. अशा वनस्पतीमुळे पृथ्वीतलाचे स्वरुपच पालटून गेले. वनस्पतीच्या उत्क्रांतीविषयी पेकिंग विद्यापीठ, चीन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ व लिंकन विद्यापीठ, इंग्लंड येथील संशोधकांनी एकत्रितपणे केलेले महत्त्वाचे संशोधन जर्नल अर्थ सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.

आपल्या लहान आकाराच्या, साध्या रचनेच्या प्राचीन वनस्पती वारशापासून सुरूवात होऊन अधिक उंचापर्यंत अन्नद्रव्ये आणि पाणी पोचविण्याची व्यवस्था असलेले जटिल, गुंतागुंतीची रचना असलेल्या वनस्पतीमध्ये रुपांत होत गेले. त्यामुळे वनस्पतींच्या विविधतेमध्ये विपूल अशी वाढ झाली. या झाडांमुळे पर्यावरण आणि जैवभूरासायनिक साखळ्यामध्ये महत्त्वाचे उपयुक्त असे बदल होत गेले. सध्या 2.5 लाखापेक्षाही अधिक वनस्पती प्रजाती आहेत, त्यात एकपेशीय शैवालापासून सूर्यफूलापर्यंत, तर गवतापासून महाप्रचंड अशा वृक्षापर्यंत अनेक वनस्पतींचा समावेश होतो.

 वाहिन्या असलेल्या वनस्पतीच्या विकासामध्ये पानांची विशेषतः प्रकाश ग्रहण करण्याची रचनाही अत्यंत महत्त्वाची होती. पानांच्या आकारामध्ये प्रचंड विविधता आहे. ते नेमकी कसे विकसित झाले, त्यावर पर्यावरणाचे परिणाम झाले किंवा कसे  आणि पानांच्या संरचनेमध्ये काही बदल होत गेले आहेत का या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न पेकिंग विद्यापीठ, चीन येथील डॉ. झिंझूआंग क्षुई, लिंकन विद्यापीठ, इंग्लंड येथील डॉ. मार्सेल्लो रुटा आणि ब्रिस्टॉल विद्यापीठातील प्रा. माईक बेन्टन यांनी केले आहेत. दक्षिण चीन येथील उत्खननामध्ये आढळलेल्या 400 ते 252 दशलक्ष वर्षाआधीच्या 300 पेक्षा अधिक जीवाश्म प्रजातींचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये पानांच्या आकाराचा, त्यांच्या प्रमाणाचा आणि अंतर्गत शिरांच्या रचनेचा विविध पद्धतीने अभ्यास केला. त्यातून पानांची रचनेमध्ये होत गेलेले बदल उलगडण्यात, त्यांचे टप्पे ओळखण्यात त्यांना यश आले आहे.

--------------------
डॉ. झुई म्हणाले, की वनस्पती उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये (400 ते 320 दशलक्ष वर्षापूर्वी) पर्यावरणातील मोकळ्या जागा भरण्याचे काम वनस्पतींनी वेगाने केले. या काळात त्यांना स्पर्धा नव्हती. त्यामुळे त्यांची रचना साधी होती. पुढील टप्प्यामध्ये त्यामध्ये जटिलता येत गेली. वनस्पतींच्या अंतर्गत रचनेमध्ये, आकारामध्ये बदल होत गेले. त्यातून झुडपे, जमिनीलगत वाढणारी झाडे, उंच झाडे असे प्रकार विकसित होत गेले. उत्क्रांतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये (320 ते 252 दशलक्ष वर्षापूर्वी) साध्या पानांच्या रचनेत अधिक गुंतागुंत आली, ती बऱ्यापैकी स्थिर झाली. अधिक आर्द्रतापूर्ण वातावरणात वाढीसाठी वेलीसदृश्य रचना तयार झाल्या. त्यातील काहींना आधुनिक फुले असलेल्या वनस्पतीप्रमाणे रचना स्विकारल्या. या टप्प्याच्या अंतिम भागात प्रजातींच्या विविधतेमध्ये दुपटीने वाढ झाली असली तरी पानांच्या प्रकारामध्ये फारसा बदल झाला नाही.
-----
प्रा. बेन्टोन म्हणाले, की या अभ्यासातून आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत.
- दक्षिण चीनमध्ये आढळलेल्या वाहिन्या असलेल्या वनस्पतीच्या सुरवातीच्या अवशेषामध्ये धारदार, दातेरी अशा पानांची रचना दिसून येते. ही रचना युरोप आणि उत्तर अमेरिकेतील त्यांच्या जवळच्या वनस्पतींच्या तुलनेत खुपच आधी होती.
- 320 ते 300 दसक्षलक्ष या कालखंडामध्ये वनस्पतीच्या विविधतेमध्ये घट झाली असली तरी पानांच्या गुंतागुंतीमध्ये फारसा फरक पडला नव्हता.
---------------
डॉ. रुटा म्हणाले, की सर्वसाधारणपणे प्रजातींची विविधता आणि पानांची जटिलता यांची सांगड सुमारे 150 दशलक्ष वर्षामागे दक्षिण चीनमधील सुरवातीच्या वनस्पतीमध्ये सांधली गेली. सुरवातीच्या काळातील कमी स्पर्धेच्या काळात वनस्पतीच्या शरीररचनेमध्ये बदल झाले. पुढील टप्प्यात वनस्पतीच्या फुलांच्या रचनेतून त्यात प्रचंड बदल झाले. पर्यावरणातील विशिष्टतेनुसार वनस्पतीच्या प्रकारामध्येही बदल झाले. 
----------------------------------------------------
---------------------------
फोटो ओळ ः दक्षिण चीन येथील उत्खननामध्ये आढळलेले पॅलेओझोईक कालखंडाच्या अंतिम चरणातील पानांचे जीवाश्म.
------------------
संदर्भ ः     Jinzhuang Xue, Pu Huang, Marcello Ruta, Michael J. Benton, Shougang Hao, Conghui Xiong, Deming Wang, Borja Cascales-Miñana, Qi Wang, Le Liu. Stepwise evolution of Paleozoic tracheophytes from South China: Contrasting leaf disparity and taxic diversity. Earth-Science Reviews, 2015; 148: 77 DOI: 10.1016/j.earscirev.2015.05.013
000000000000000

मंगळवार, ५ मे, २०१५

एन्जोया मिरची!

सफरचंद नाही...
ही आहे एन्जोया मिरची!




सफरचंदाप्रमाणे रंग असणाऱ्या ढोबळी मिरचीची जात "व्हॅन डेन बर्ग नर्सरी' आणि "फोर एव्हरग्रीन' यांनी एकत्रितपणे तयार केली आहे. त्याची लागवड नेदरलॅंड येथील एस ग्रॅव्हनजंडे येथील ग्लासहाऊसमध्ये करण्यात आली होती. या पिकाची पहिली काढणी वेस्टलॅंड येथील महापौर स्झॅक व्हीडी टाक यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आली.
"व्हॅन डेन बर्ग नर्सरी'चे चालक व उत्पादक विलफ्रेड यांनी दोन वर्षांपूर्वी मिरचीची दोन रंगांची जात विकसित केली होती. सध्या ते फोर एव्हरग्रीन या कंपनीसोबत अधिक संशोधन करीत असून, त्यांनी ढोबळी मिरचीची अधिक आकर्षक अशी जात विकसित केली आहे. तिचे नाव एन्जोया असे ठेवले आहे. ही जात अधिक आकर्षक असल्याने विविध सॅलड व पाककृतीमध्ये सजावटीसाठी त्याची मागणी अधिक राहील, असा विश्वास विलफ्रेड यांनी व्यक्त केला.
 

सिलीकॉन मुलद्रव्य

सिलीकॉन मुलद्रव्य उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचे...

फिलीपिन्स येथे भात उत्पादनवाढीसाठी राबवला लेगाटो प्रकल्प 

सिलीकॉन या मुलद्रव्याचा भात पिकासह विविध पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ मिळत असल्याचे गेल्या काही वर्षामध्ये होत असलेल्या संशोधनामध्ये दिसून आहे. त्या संदर्भात फिलिपिन्स व व्हियतनाम येथील प्रक्षेत्रामध्ये अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये अन्नसुरक्षिततेसाठी आवश्यक अशा भात, गहू आणि बार्ली सारख्या पिकांमध्येही या मुलद्रव्याचा फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.

सिलीकॉन हे पृथ्वीतलावर ऑक्सिजननंतर दुसरे महत्त्वाचे मुलद्रव्य असूनही दीर्घकाळ पर्यावरणतज्ज्ञांनी त्याकडे दूर्लक्ष केले होते. अनेक कृषीतज्ज्ञ अद्यापही पिकासाठी आवश्यक मुलद्रव्यामध्ये त्याचा समावेशही करत नाहीत. मात्र, गेल्या काही वर्षापासून सातत्याने होत असलेल्या संशोधनातून विविध पिकांच्या वाढीसाठी सिलीकॉन अत्यंत महत्त्वाचे ठरत असल्याचे समोर येत आहे. सध्या सीलीकॉनच्या वापर व पर्यावरणातील त्यांच्या फिरत्या चक्रांसंदर्भात अभ्यास करण्यासाठी लेगाटो (LEGATO ) या आंतरशाखीय प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत व्हियतनाम येथील प्रदेशामध्ये सीलीकॉनच्या पर्यावरणातील साखळीबाबत अभ्यास करण्यात आला, तर फिलिपिन्स येथे सिलीकॉन या मुलद्रव्यांचा भात उत्पादनामध्ये विविध घटकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. सिलीकॉनमुळे पिकांची कीडरोग प्रतिकारकता आणि अजैविक ताण सहनशीलता विकसित होण्यास मदत होते. त्याचा फायदा भातासारख्या मुख्य अन्न पिकांच्या उत्पादनवाढीसाठी होऊ शकतो. त्या दृष्टीकोनातून या मुलद्रव्यांचा सखोल अभ्यास करण्यात येत आहे. फिलिपिन्स येथील लागुना प्रांतामध्ये सीलीकॉन साखळी आणि शेतामध्ये त्याचा ताळेबंद मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याविषयीचे निष्कर्ष जर्नल प्लॅंट ऍण्ड सॉईल रिपोर्टस मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

- सिंचनाच्या पाण्याद्वारे सीलीकॉन मोठ्या प्रमाणात पिकापर्यंत पोचत असतो. मात्र, पावसाच्या पाण्यामध्ये सिलीकॉनची तीव्रता ही प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या परिक्षणाच्या मर्यादेपेक्षा कमी असते. त्यामुळे पावसाचे पाणी सिलीकॉनचा महत्त्वाचा स्रोत नसल्याचे संशोधक मानतात.

- मातीच्या कणाच्या विरघळण्यातून पिकांना उपलब्ध होणारे सिलीकॉन हा एक महत्त्वाचा स्रोत ठरतो. विशेषतः वाढीच्या अवस्थेत  त्याचा फायदा होतो. लेगाटो प्रकल्पामध्ये विविध शेतकऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये विविध शेतकरी हे भाताच्या काडाचा वापर भातासह अन्य पिकामध्ये खताप्रमाणे करत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, दीर्घकालीन विचार करता भात पिकातील सिलीकॉन पुर्नवापर व साखळीमध्ये अडथळे येऊ शकतात. ज्या भागामध्ये तीव्र हवामान आणि सिलीकॉनची कमतरता आहे, अशा ठिकाणी पिकांच्या उत्पादनामध्ये अडचणी येऊ शकतात. सध्या व्हियतनाम येथे झालेल्या चाचण्यामध्ये कमतरतेच्या अडचणी दिसून येते. 

------------------------------

शनिवार, १० जानेवारी, २०१५

पोल्ट्रीपक्षी विश्लेषणातून मिळू शकेल धोकादायक विषाणूंचा अंदाज


सातत्यपूर्ण पोल्ट्रीपक्षी विश्लेषणातून मिळू शकेल धोकादायक विषाणूंचा अंदाज


पोल्ट्रीतील फ्लू विषाणूपासून एव्हीयन एन्फ्यूएंजा विषाणूपर्यंतच्या बदलाचा घेतला जनुकिय मागोवा

चीन येथील पोल्ट्री उद्योगासाठी हानीकारक ठरलेल्या विषाणूंमध्ये फ्लू विषाणूपासून एव्हीयन H7N9 एन्फ्ल्युएंजा विषाणूपर्यंत होत गेलेल्या बदलाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने केला आहे. या विषाणूमुळे 2013 मध्ये 375 पेक्षा अधिक लोक आजारी पडले होते. हे संशोधन प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस मध्ये प्रकाशित झाले आहे.

2013 पर्यंत H7N9 एव्हीयन विषाणूमुळे माणसांमध्ये दोन मोठे प्रादुर्भाव होऊन 115 मृत्यू झाल्याची नोंद आहे. हा विषाणू पोल्ट्रीतील कोबड्यांमध्ये H9N2 विषाणूची पुढील आवृत्ती होता. सर्वसामान्यपणे H9N2 या  विषाणूमुळे कोंबड्यांच्या अंडी उत्पादनामध्ये घट होत असून, अन्य रोगांच्या प्रादुर्भावासाठी कोंबड्या संवेदनशील होतात. त्याचा विपरीत परीणाम पोल्ट्री उद्योगावर होतो. मात्र, माणसासाठी धोकादायक ठरू पाहणाऱ्या H7N9 विषाणूच्या उत्क्रांतीचा अभ्यास करण्याची आवश्यकता निर्माण झाली. H9N2 या विषाणूमध्ये झालेल्या बदलांचा अभ्यास सेंट ज्युड चिल्ड्रन्स रिसर्च हॉस्पिटल आणि चीन ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने केला आहे.  या संशोधनातून पोल्ट्री फार्म परीसरामध्ये सातत्याने फ्लु विषाणूची निरीक्षणे करण्याची गरज पुढे आली आहे. त्यातून H9N2 या विषाणूतील बदल त्वरीत कळतील. मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या H7N9 विषाणूंचा इशारा मिळण्यास मदत होणार आहे.

या विषयी माहिती देताना सेंट ज्युड येथील प्रादुर्भावित रोग विभागातील संशोधक रॉबर्ट वेबस्टर यांनी सांगितले, की जनुकीय अभ्यासातून H9N2 विषाणूमध्ये गेल्या दहा वर्षाच्या काळात स्थळानुसार कसे बदल घडत गेले याचा माग घेता आला. त्यातून निर्मित H7N9 या विषाणूचा मानवी आरोग्यासाठीचा धोका 2013 च्या घटनावरून दिसून आलाच आहे. सातत्याने पोल्ट्री फार्ममध्ये केलेल्या परीक्षणातून H9N2 मधील फरक लक्षात आल्यास पुढील धोक्याचा अंदाज आधीच मिळू शकतो. नैसर्गिक प्रवृत्तीनुसार फ्लूचा विषाणू जनुकाचे म्युटेशन, एकत्रिकरण आणि बदल करीत असतो. 

असे आहे संशोधन  
- 1994  आणि 2013 मध्ये चिकन व्हायरस H9N2 मध्ये झालेल्या बदलांचा एकूण जिनोमिक सिक्वेन्सिंगद्वारे वेध घेण्यात आला.
- दरम्यानच्या काळात 2009 मध्ये H9N2 विषाणूची जनुकीय विविधता वेगाने कमी झाली.
- 2010 पासून 2013 पर्यंत H9N2 या विषाणूसाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले.
- 2013 पर्यंत H7N9 एव्हीयन विषाणूमुळे माणसांमध्ये दोन मोठे प्रादुर्भाव होऊन 115 मृत्यू झाल्याची नोंद आहे. अभ्यासामध्ये H9N2 विषाणूने प्रादुर्भावित कोंबड्या एखाद्या मिश्रण भांड्याप्रमाणे कार्यरत असल्याचे दिसून आले. प्रादुर्भावित कोंबड्यामध्ये H9N2 आणि अन्य स्थलांतरीत पक्षी, स्थानिक बदले यांच्यातील एव्हीयन विषाणू यांच्याशी संगम होतो. त्यातून H7N9 विषाणूमध्ये H9N2 मधील सहा जनुकांची भर पडते.

-------------
चीनमधील 2013 मध्ये झालेली H7N9 विषाणूची उत्क्रांती
------------------
H7N9 विषाणूतील आठ जनुके ही आशियातील स्थानिक बदके, पक्षी आणि पोल्ट्री पक्षी यांच्यात आढळणाऱ्या एव्हीयन इन्फ्लूएंजा विषाणूंशी संबंधित आहेत. नैसर्गिकरीत्या एकाच यजमानामध्ये दोन किंवा अधिक एन्फ्लूएंजा विषाणू एकत्र आल्यास त्यांच्यामध्ये जनुकांची देवाणघेवाण होते. त्यातून नवा अधिक ताकदवान विषाणू तयार होतो. अशाच प्रक्रियेतून H7N9 विषाणूंची निर्मिती झाल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
- एकाच जागेमध्ये पोल्ट्री, बदके आणि पक्षी यांचा रहिवास असल्यास विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. तसेच मांस मार्केटमध्ये एकाच जागी सर्व प्रकारचे जिवंत पक्षी ठेवले जातात. त्याचाही परीणाम होतो.
- H7N9 विषाणूतील जनुकामध्ये


- स्थानिक बदकापासून --- HA (hemagglutinin) जनुक
- जंगली पक्ष्यापासून NA (neyraminidase) जनुक.
- पोल्ट्री कोंबड्यांपासून H9N2 इन्फ्लूएंजा विषाणूतील अन्य सहा जनुके.
- ज्या ठिकाणी पक्षी एकत्र येतात, अशा ठिकाणी पोल्ट्री पक्ष्यांच्या शरीरामध्ये विषाणूंमध्ये H7N9 विषाणू उत्क्रांत होतो.
- त्याचा प्रादुर्भाव माणसांमध्ये झाल्यास प्राणघातक होऊ शकतो.
पोल्ट्रीपक्षी विश्लेषणातून मिळू शकेल धोकादायक विषाणूंचा अंदाज

शेतकऱ्यांसाठी खास फॅबलेट


शेतकऱ्यांसाठी खास फॅबलेट

हैदराबाद येथील इक्रिसॅट चे संशोधन

हैदराबाद येथील इक्रीसॅट या संस्थेने खास शेतकऱ्यांसाठी मोबाईल, टॅबलेट कॉम्पुटर संपर्क, समन्वय आणि माहिती साठ्याचे काम करणारा ग्रीन फॅबलेट विकसित केला आहे. त्यासाठी हैदराबाद येथील एनयूएनसी सिस्टिम्स या कंपनीची मदत घेण्यात आली असून, या ग्रीन फॅबलेटमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या निविष्ठा खरेदीपासून विक्रीपर्यंतच्या माहितीचा साठा उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा त्याला शेतीतील आवश्यक निर्णयासाठी होणार आहे. या उपकरणाची किंमत 299 अमेरिकी डॉलर (सुमारे 18900 रुपये) इतकी आहे.

डिजिटल तंत्रज्ञानामध्ये सातत्याने व वेगाने बदल होत आहेत. या तंत्रज्ञानाचा लाभ अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यापर्यंत पोचविण्यासाठी हैदराबाद येथील इक्रिसॅट संस्थेने विविध खासगी कंपन्यांच्या सहकार्यांने ग्रीन फॅबलेट तयार केले आहे.  या ग्रीन फॅबलेटचा कृषी उद्योजक आणि विस्तार कार्यक्रमासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. यातून विस्तार कार्यकर्ते लहान शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीपासून विविध टप्प्यावर आवश्यक ती माहिती पुरवू शकतील. त्या विषयी माहिती देताना इक्रीसॅट चे संचालक डॉ. दिलीपकुमार गुंटूकू यांनी सांगितले, की गावामध्ये माहिती साठ्याप्रमाणे हा ग्रीन फॅबलेट काम करेल. त्यातून शेतकऱ्यांना आवश्यक ती माहिती व समन्वयाचे तंत्रज्ञान उपलब्ध होऊ शकेल. त्याच प्रमाणे दुर्गम अशा ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधांचा वापर वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल. कृषी विषयामध्ये कार्यरत सर्व घटकांना एकत्रित आणण्यामध्ये हे फॅबलेट महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.

या फॅबलेटच्या निर्मितीमध्ये कार्यरत एनयूएनसी सिस्टिम्स चे वरीष्ठ संचालक संदीप डागा म्हणाले, की शेतकरी, संशोधकांमधील त्वरीत संपर्क, समन्वयातून पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. तसेच संशोधनासाठीही या माहिती साठ्याचा उपयोग होणार आहे. या साठी खास ग्रीन सीम तयार करण्यात आले आहे. त्याचा वापर मोबाईलसह फॅबलेटमध्ये करता येईल.
- फॅबलेटच्या माध्यमातून हवामान आणि कीड प्रादुर्भावाचे अंदाज मेसेजच्या माध्यमातून मोफत उपलब्ध होतील.

--------
ग्रीन सीम प्रकल्प ः
या तंत्रज्ञानाच्या चाचण्या ग्रीनसीम प्रोग्राम या नावाने सहा महिने घेण्यात आल्या. भारतातील तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या तीन राज्यातील 171 खेड्यांचा त्यात समावेश होता. या प्रकल्पामध्ये 40 हजार शेतकरी सहभागी झाले होते.  
- त्यातील एक आहेत महिला शेतकरी चंद्रकला. त्यांनी सांगितले, की गेल्या हंगामामध्ये अवकाळी पावसामुळे भुईमुगाच्या पिकाचे पुर्ण नुकसान झाले होते. मात्र, या वर्षी ग्रीन सीमच्या माध्यमातून हवामानाचे अंदाज आवाजाच्या स्वरुपात येत होते. त्यामुळे अवकाळी पावसाचा अंदाज मिळताच काढणीच्या वेळेआधीच तीन दिवस भुईमुग काढून घेतला. परीणामी पूर्ण पीक वाचले. 
- उद्योजकतेला चालना ः एका ग्रीन सीम विक्रीमागे साधारणपणे दहा रुपये व पुढील प्रत्येक रिचार्जसाठी 2.3 टक्के वाटा विक्रेत्याला मिळत असल्याने ग्रामीण भागामध्ये सीम व रिचार्ज विक्रीचा व्यवसाय अनेक तरूणांनी सुरू केला.
- ग्रीन सीमच्या निर्मितीसाठी इंडीयन फार्मर्स फर्टीलायझर कोऑपरेटिव्ह (इफको), किसान संचार लि. (IKSL) यांच्यासह एअरटेल यांची मदत घेण्यात आली. या ग्रीन सीमला भारतीय विपनन संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा फ्लेम पुरस्कार 2013 मिळाला आहे.

फॅबलेटची वैशिष्ट्ये ः
ग्रीन फॅबलेट हा ग्रीनसीमचा पुढील टप्पा असून, माहितीची देवाणघेवाण अत्यंत वेगाने होऊ शकेल.
ग्रामीण भागामध्ये वापरता येईल अशी याची रचना केली असून, त्याच्या जल प्रतिबंधक, धक्का प्रतिरोधक, धूळी, कचऱ्यापासून मुक्त, वाचता येईल अशी मोठी अक्षरे, प्रखर उन्हामध्ये वाचता येईल अशी स्क्रिन या वैशिष्ट्यामुळे त्याची उपयुक्तता वाढली आहे.

---

दीलीपकुमार गुंटूकू ग्रामीण महिलांना फॅबलेटचे प्रात्यक्षिक दाखविताना.
For more information please contact: Dileepkumar Guntuku, +91 40 30713205. G.Dileepkumar@cgiar.org or Joanna Kane-Potaka, +91 40 30713227,
j.kane-potaka@cgiar.org or Showkat Rather at +91 897 888 2187 or r.showkat@cgiar.org