उत्पादनवाढीसाठी उघडल्या प्लॅंट फॅक्टरीज
- सध्या या कारखान्यात होतेय भाजीपाल्याची निर्मिती
- चीनमध्ये २० प्लॅंट फॅक्टरीमध्ये होतात २० भाज्या. तर जपानमध्ये होतात ६० भाज्यांसह औषधी वनस्पती
वाढती लोकसंख्या आणि तेवढीच राहणारी जमिन यांचे गणित बदलत्या काळातील कृषी क्षेत्राला सोडवावे लागणार आहे. त्यात नापिकी, क्षारयुक्त, वाळवंट या सारख्या विविध कारणामुळे पडीक राहणारी जमिन, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान अन्न सुरक्षेसमोर अनेक आव्हाने उभी करत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीऐवजी वनस्पती कृत्रिमरित्या वंदिस्त जागेमध्ये एखाद्या कारखान्यासारखे पिकविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामध्ये कृत्रिमरित्या वनस्पतींची वेगाने वाढ करण्याचे नवे प्रयोग चीन, जपान आणि कोरिया या देशांमध्ये करण्यात येत आहेत. या देशांमध्ये बंदिस्त जागेमध्ये मातीऐवजी विशिष्ट द्रवात भाज्यांची लागवड केली जात असून त्यासाठी वनस्पतींना कृत्रीम प्रकाश, नियंत्रित तापमान, गरजेइतकीच आद्रता पुरवली जाते. त्यामुळे कीडनाशके, खते यांचा वापर वापर कमी होऊन अधिक पट दर्जेदार उत्पादन मिळते. त्यामुळे या प्रकारच्या शेतीला वनस्पतींचा कारखाना (प्लॅंट फॅक्टरी) असे नाव दिले गेले आहे.
सध्या हरितगृह तंत्रज्ञानामध्ये पुर्णपणे नियंत्रित किंवा अर्ध नियंत्रित पद्धतीने शेती केली जाते. प्लॅंट फॅक्टरी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असून या पद्धतीमध्ये कृत्रिम प्रकाश आणि लागवडीसाठी माध्यम म्हणून विशिष्ट द्रवांचा वापर केला जातो. हे सर्व बंदिस्त जागेमध्ये व एकावर एक अशा कप्प्यामध्ये पिकवले जात असल्याने बाह्य वातावरणातील विविध ताण कमी केले जातात. पिकांच्या गरजेनुसार योग्य वातावरण आणि अन्नद्रव्ये उपलब्ध होत असल्याने पारंपरिक शेती उत्पादनाच्या तुलनेत दुपटिपेक्षा अधिक उत्पादन मिळवणे शक्य होते. या बाबत चीन येथील कृषी शास्त्र ऍकेडमीच्या संरक्षीत कृषी आणि पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेमध्ये प्रयोग करण्यात आले आहेत. तिथे अडिच एकर क्षेत्रामध्ये प्लॅंट फॅक्टरीची उभारणी केली आहे. तेथील संचालक संशोधक यांग क्विचांग यांनी सांगितले, की वनस्पती तंत्रज्ञानात सुधारणा होत असल्याने येत्या काळात वनस्पतीची वाढ करण्यासाठी मातीची आवश्यकता राहणार नाही. तसेच कमी जागेमध्ये अधिक उत्पादन मिळविणे शक्य होणार आहे. सध्या सुपीक जमिनीमध्ये विविध कारणामुळे घट होत आहे. तसेच विविध नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे नुकसानही वाढत आहे. ते कमी करण्याच्या दृष्टीने चीन, जपान, दक्षिण कोरिया सारख्या देशांमध्ये प्लॅंट फॅक्टरीची उभारणी वेगाने होत आहे. त्यातून वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढ्या शेतीमाल उत्पादनाचे उद्दीष्ठ गाठणे शक्य होणार आहे.
सर्वाधिक नुकसान होते आपत्तीमुळे
चीन येथील आपत्ती निवारण संस्थेतील संशोधक ली मायोसांग यांनी सांगितले. की नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या उत्पादनात नुकसान होण्याचे प्रमाण अधिक आहे. सन २००३ ते २००९ या कालावधीत विविध आपत्तीमुळे ३०३.३५ दशलक्ष टन अन्नधान्यांचे नुकसान झाले. त्यातील ६० टक्के अन्नधान्याचे नुकसान दुष्काळामुळे झाले असून त्यानंतर पूर, कीडरोग ही मुख्य कारणे आहेत. त्यामुळे भविष्यातील अन्नसुरक्षेसाठी नैसर्गिक आपत्तींना दूर ठेवणाऱ्या प्लॅंट फॅक्टरीसारख्या तंत्रज्ञानाची आवश्यकता भासणार आहे. या प्लॅंट फॅक्टरी बेटावर किंवा वाळंवटात देखील उभारता येतात.
कसा आहे वनस्पतींचा कारखाना
- प्लॅंट फॅक्टरी( वनस्पतींचा कारखाना) ही संकल्पना १९७० च्या कालावधीत जपानमध्ये उगम पावली असून नियंत्रित वातावरणामध्ये, कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी तिचा वापर केला जातो. या नियंत्रित वातावरणामध्ये प्रकाश, तापमान, आद्र्रता यांचे पिकांच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात नियोजन केले जाते.
- सध्या संस्थेच्या दहा हजार वर्ग मीटर क्षेत्रामध्ये प्लॅंट फॅक्टरी उभारण्यात आली असून त्यात लेट्यूस, टोमॅटो, वांगी आणि काकड्यांचे उत्पादन घेतले जाते. त्याच्या लागवडीसाठी मातीऐवजी विशिष्ट अन्नद्रव्यांनी युक्त अशा द्रवाचा वापर केला आहे. या भाज्या मातीच्या संपर्कात येत नसल्याने मातीद्वारे पसरणाऱ्या रोगांना अटकाव होतो. तसेच भाज्या स्वच्छ व टवटवीत दिसतात.
- या प्रकारच्या शेतीमध्ये कीडनाशके आणि खताचा वापर काराव लागत नसल्याने रसायनाच्या अवशेषाशिवाय चांल्या दर्जाच्या भाज्या उपलब्ध होण्यास मदत होते. या कारखान्यातून मिळणाऱ्या भाज्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण कमी असून जीवनसत्त्वांनी परिपुर्ण आहेत. त्या अन्न सुरक्षिततेच्या मानकांच्या कसोटीवर उतरत असल्याचे यांग यांनी सांगितले.
उत्पादनात मिळतेय भरघोस वाढ
वाढत्या लोकसंख्येचा विचार चीनमध्ये पारंपारिक शेतीऐवजी या आधुनिक शेती कारखान्याकडे संशोधक मोठ्या आशेने पाहत आहेत. सध्या येथे झालेल्या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार, गव्हाचे प्रति हेक्टरी उत्पादन हे ४.६१ मे. टन इतके आहे, ते जागतिक सरासरीच्या (२.७६ मे.टन) पेक्षा कितीतरी अधिक आहे. तसेच भात आणि मक्याचे उत्पादन अनुक्रमे ६.३८ टन आणि ५.२८ टन इतके आहे. जागतिक सरासरी उत्पादन अनुक्रमे ३.३८ टन आणि ३.४१ टन इतके आहे.
- चास येथील संशोधिका टोंग युक्सीन यांनी सांगितले, की सन २०११ पर्यंत चीनच्या दहा प्रांतामध्ये २० अशा प्लॅंट फॅक्टरी उभारण्यात आल्या असून त्यात २० प्रकारच्या भाज्या घेतल्या जातात. अशाच प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये जपानमध्ये सुमारे ६० प्रजाती वाढविल्या जात असून भाज्यांसह त्यात औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. मागील वर्षी जपानमध्ये झालेल्या भुकंप आणिसुनामीमुळे झालेल्या आण्विक प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने शेती करताना प्रदूषणाचा धोका असल्याने सध्या जपानमध्ये प्लॅंट फॅक्टरींची संख्या वेगाने वाढत आहे.
- जपानमध्ये १५० अब्ज येन( १.९ अब्ज डॉलर) ची गुंतवणूक यात होत असून येत्या दोन वर्षामध्ये प्लॅंट फॅक्टरींची संख्या १५०चा टप्पा ओलांडून तिपटीवर जाणार आहे.
अधिक उत्पादन खर्च आहे चिंतेचा विषय
- या प्लॅंट फॅक्टरीसाठी लागणारी प्राथमिक गुंतवणूक अधिक असल्याने उत्पादीत मालाचा उत्पादन खर्च पारंपरिक पद्धतीने पिकवलेल्या भाज्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे. ( उदा. लेट्युस भाजीची किंमत १५ युवान (२.४ डॉलर) असून पारंपरिक भाजी ३ युवान पर्यत मिळते.) त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी संशोधन होण्याची गरज असून अधिक उत्पादनाबरोबरच अधिक लोकांना त्याचा फायदा घेता येईल. त्यासाठी शासकीय पातळीवर अनुदान देण्याविषयी मागणी संशोधकांनी शासनाकडे केली आहे. भावी काळातील अन्न सुरक्षेचा विचार केल्यास हे तंत्रज्ञान फायद्याचे ठरणार आहे.