द्राक्षातील साखरेचे प्रमाण सांगणार ब्रीक्स मास्टर
निर्यातक्षम काढणीसाठी सोपे, कमी किंमतीचे तंत्र विकसित
द्राक्षाची काढणी करताना त्यातील साखरेचे प्रमाण योग्य असणे आवश्यक असते. निर्यातीसाठी योग्य प्रमाणात पिकलेले व साखर असलेले द्राक्षाची गरज असते. पारंपरिकरित्या द्राक्षातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी रिफ्रॅक्टोमीटरचा वापर केला जातो. मात्र त्याची किंमत अधिक असून नाजूकतेमुळे शेतामध्ये वापरण्यात अनेक अडचणी येतात. तसेच द्राक्षाची गोडी त्याची चव घेऊन ठरवली जाते. मात्र या पद्धतीतही अचूकता नसते. त्यावर दक्षिण आफ्रिकेतील संशोधक जोहान व्हॅन डेर होवेन यांनी द्राक्षातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी नाविण्यपुर्ण पद्धत विकसित केली असून कमी किंमतीत साखरेची पातळी कळण्यास मदत होते.
विविध फळे आणि पदार्थातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी सर्वसामान्यपणे रिफ्रॅक्टोमीटरचा वापरे केला जातो. त्यामध्ये काचेच्या लोलकाचा वापर केलेला असल्याने अत्यंत अचूक असे उपकरण आहे. मात्र त्याची किंमत अधिक असून अत्यंत नाजूक असे हे उपकरण आहे. त्याचा शेतात वापर करण्यात अनेक अडचणी येतात.
त्यामुळे साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी तुलनेने अचूक, कमी किमतीचे आणि वापरण्यास सोपे अशा उपकरणाची आवश्यकता होती. त्यानुसार दक्षिण आफ्रिकेतील संशोधक जोहान व्हॅन डेर होवेन यांनी एक उपकरण विकसित केले असून विशिष्ठ घनतेवर आधारीत आहे. जास्त साखरेचे प्रमाण असलेल्या रसाची विशिष्ट घनता जास्त तर कमी साखरेचे प्रमाण असल्यास विशिष्ट घनता कमी असते, या साध्या तत्वाचा वापर यात केलेला आहे. हे उपकरण साखरेची पातळी दर्शवते. त्यातून द्राक्षे योग्य साखरेच्या पातळीत बसतात किंवा नाही हे काही सेकंदामध्ये कळते. त्यावरून तो घड घ्यावयाचा की नाही, याचा निर्णय घेणे सोपे होते.
ब्रीक्स मास्टर वापरण्याची पद्धत
- मोजणीचे द्रव साखरेच्या पातळीसाठी तयार केले जाते. त्या द्रवाने ब्रीक्समास्टर भरून घेऊन कमरेच्या बेल्टला घट्ट अडकवले जाते.
- ज्या द्राक्षाची साखर तपासायची असेल, ते द्राक्ष त्यात टाकले जाते. ते त्या द्रवात तंरगले, तर त्यात साखरेचे प्रमाण कमी आहे. तो द्राक्षाचा घड घेण्याची आवश्यकता नाही. जर साखरेचे प्रमाण योग्य असेल तर ते द्राक्ष बुडते. तो घड घ्यावा.
- पुढील तपासणी करण्यापुर्वी त्या भांड्याला असलेल्या छिद्रामधून ते द्राक्षे काढून घ्यावे.
- जर द्रव कमी झाला तर नव्या द्रवाच्या साह्नाने पुन्हा भांडे भरून घ्यावे.
ब्रीक्स मास्टरचे उपयोग
- वापरण्यास सोपे असून अशिक्षित मजुरही त्याचा वापर करू शकतात.
-किंमत कमी, रिफ्रॅक्टोमीटरच्या एक दशांश किमतीत उपलब्ध
-वेगवान असून सेंकदातच निष्कर्ष मिळतात.
- मोजणीसाठी वापरला जाणारा द्रवही स्वस्त आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा