झोपेतही शिकतो माणूस!
इस्राईलमधील संशोधन,
गंध, ध्वनी संवेदनाद्वारे अनेक घटक शिकता येतात
आपल्यापैकी बहुतेक जणांना शाळेत डुलकी मारल्याबद्दल, झोपल्याबद्दल शिक्षकांचा मार मिळालेला आहे. मात्र झोपेतही काही गोष्टी शिकता येत असल्याचे इस्राइलमधील वाईझमन संस्था आणि तेलअविव महाविद्यालयामध्ये झालेल्या संशोधनात आढळले आहे. त्यामुळे आजचे विद्यार्थी शिक्षकांना आम्ही झोपेतही शिकू शकतो असे ठणकाऊ शकतील, यात शंका नाही. या संशोधनाचा उपयोग माणसाच्या झोपेत चालण्याच्या सवयीला काही प्रमाणात आळा घालण्यासाठी करणे शक्य आहे. तसेच कोमावरही काही प्रमाणात उपचार करणे शक्य होणार आहे. हे संशोधन `नेचर न्युरोसायन्स' या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
मानवी शरीराला विश्रांतीसाठी खरेतर झोप येत असते. झोपेमध्ये शरीराच्या अनेक क्रिया या संथ लयीत चालू असतात. विशेषत नव्या गोष्टी शिकण्यासाठी मेंदू ताजातवाणा होण्यासाठी झोपेची आवश्यकता असते. नवे शिकणे, स्मरणशक्ती याबाबत झोपेनंतर ताज्या झालेल्या पहाटेच्या वेळ ही अभ्यासासाठी अधिक उपयुक्त मानली जाते. मात्र झोपेतही माणसांच्या संवेदना जाग्या असतात, तो काही नव्या गोष्टीही शिकू शकतो का या प्रश्नाचा अभ्यास इस्राइलमधील वाईझमन संस्थेतील संशोधक नोयाम सोबेल आणि त्याचा विद्यार्थी अनत अर्झी यांनी केला आहे. त्यासाठी त्यांना न्युरोबायोलॉजी विभाग, लोवेनस्टेन इस्पितळ आणि तेलअविव महाविद्यालय यांची मदत झाली. झोपेतील मेंदूची कार्यक्षमता तपासण्याच्या प्रयोगासाठी विशिष्ट संगीत लहरी सोबत गंधाचा वापर त्यांनी केला. विशिष्ट संगीताचा संबंध त्यांनी विशिष्ट गंधाशी जोडला. या पद्धतीचे अनेक फायदे झाले. गंधामुळे झोपमोड होण्याची भिती कमी झाली. गंधानुसार मेंदूच्या प्रक्रिया व प्रतिक्रिया सुरू होतात. तसेच गंधाचे काही अंशी मोजमाप करणे शक्य असते. झोपेतही जागेपणासारख्याच प्रतिक्रिया वासाबाबत दिल्या जात असल्याचे संशोधकांना आढळले आहे. सुगंधी आणि प्रसन्न करणाऱ्या वासासाठी माणूस अधिक खोलवर श्वास घेतो. तर दुर्गंधीच्या वेळी काही क्षणासाठी श्वास रोखला जातो. झोपलेल्या व्यक्तीच्या श्वासाच्या बदलावर लक्ष केंद्रित केले. वरवर पाहता ही गोष्ट अत्यंत सोपी वाटली तरी त्यामागे मेंदूच्या हिप्पोकॅम्पस या केंद्रातील पेशीच्या कार्यात वेगाने वाढ होत असलेली दिसून येते. मेंदूचा हा भाग स्मरणशक्ती संबंधित कामे करतो.
प्रयोगासाठी हवी होती खरी झोप
झोपेत शिकण्याचे प्रयोग करण्यामध्ये अनेक अडचणी होत्या. त्यातील महत्त्वाची म्हणजेच ज्याला आपण झोपलेला मानतो आहोत तो खरोखरच झोपलेला आहे, याची खात्री होणे. शिकवण्यासाठी विशिष्ट आवाजात शिकवण्याची आवश्यकता असते. अशा आवाजामुळे झोपलेल्या व्यक्तीची झोपमोड होऊ शकते. झोपमोड होईल अशा साधनाचा वापर करता येत नव्हता. डोळे बंद असल्याने रंग आणि प्रकाशाशी संबंधीत संवेदनावर मर्यादा असतात. प्रयोगादरम्यान किंचितही जाग आल्यास ती निरीक्षणे नोदंवण्यात आली नाहीत.
प्रयोग आणि त्याचे निष्कर्ष ः
- गंधाचे त्याच्या प्रसन्नपणानुसार विविध भाग करून त्याची मोजपट्टी तयार केली. झोपलेल्या स्वयंसेवकाच्या खोलीमध्ये विशिष्ट गंधासोबत संगीताची धून वाजविली. त्यानंतर गंधामध्ये प्रसन्नपणाच्या मोजपट्टीवरील विरूद्ध टोकाचा गंध सोडण्यात आला. रात्रीमध्ये या प्रमाणे संगीत आणि गंधामध्ये विविध बदल करून निरीक्षणे घेण्यात आली. दुसऱ्या दिवशी केवळ त्या धून त्यांच्या समोर त्यांच्या नकळत वाजवण्यात आल्या. त्यांच्या श्वासाच्या गतीची निरीक्षणे घेण्यात आली. त्यांचे विश्लेषण केल्यानंतर संशोधकांना प्रसन्नपणाच्या वेळी रात्री वाजवलेली धून वाजताच कोणताही गंध नसताना ती व्यक्ती अधिक खोलवर श्वास घेत असल्याचे आढळले आहे. तसेच दुर्गंधीसी निगडीत धून वाजली असता काही काळ श्वास रोखून सावकाश थोडा थोडा श्वास घेत असल्याचे दिसून आले आहे.
- दुसऱ्या प्रयोगामध्ये झोपेच्या कोणत्या टप्प्यावर शिकण्याची प्रक्रिया होते, याबाबत अभ्यास करण्यात आला. निद्रेच्या विशिष्ठ लयीमध्ये डोळ्यांची जलद हालचाल (रॅपीड आय मुव्हमेंट REM ) आणि डोळ्याची शांत हालचाल (नॉन रॅपीड आय मुव्हमेंट) असे दोन महत्त्वाचे टप्पे असतात. त्यातील डोळ्याची जलद हालचाल होण्याच्या निद्रा टप्प्यामध्ये शिकण्याच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळतो. डोळ्याची शांत हालचालीच्या निद्रा टप्प्यामध्ये बाह्य वातावरणाकडे दुर्लक्ष केली जाते. हा झोपेचा टप्पा स्मरणशक्तीसाठी चांगला असल्याचे मानले जाते. या टप्प्यातील स्वप्ने विसरली जात असली तरी झोपेतील मेंदूच्या शिकण्याच्या प्रक्रियेत हा टप्पाही महत्त्वाचा ठरतो. झोपेतही काही गोष्टी शिकता येत असल्याचे दिसून आले असले तरी सध्या कोणत्या गोष्टी झोपेत षिकता येतील यावर अधिक संशोधन करण्यात येत आहे.
- सोबेल यांच्या प्रयोगशाळेमध्ये मेंदूत होणाऱ्या गंधाच्या जाणिवेबाबतही अभ्यास करण्यात येत असून संशोधक अनत अर्झी हे झोप आणि कोमा यातील बदलासंदर्भात अधिक संशोधन करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा