सोमवार, २० ऑगस्ट, २०१२

बटाट्याची जनुकिय बॅंक ठरतेय संशोधनासाठी उपयुक्त
आपल्याला बॅंक म्हटले की रुपये, पैसे सुरक्षित ठेवण्याची किंवा देवाणघेवाण करण्याची जागा आठवते. मात्र शेतीमध्ये ही पिकांच्या विविध जाती, त्याच्या गुणधर्मानुसार साठविण्याची आवश्यकता असते. कारण जुन्या जातीच्या विविध गुणधर्माचा फायदा नवीन जाती विकसित करण्यासाठी होत असतो. अशीच बटाट्याच्या जगभरातील जातींचा संग्रह करणारी बॅंक पेनिनसुलर कृषि संशोधन संस्थेमध्ये तयार करण्यात आली आहे. त्याला युएस पोटॅटो जीन बॅंक असे नाव देण्यात आले आहे. या बटाट्याच्या बॅंकेचा उपयोग जैवविविधतेच्या संवर्धनासह नव्या जातीच्या विकासासाठी होत असतो. बटाट्यावर येणाऱ्या विविध रोग आणि किडीसाठी प्रतिकारक जाती विकसित करण्यासाठी अमेरिकेसह जगातील संशोधकांना या जनुकिय संग्रहाचा फायदा होत आहे.
युएस पोटॅटो जीन बॅंकेचे संचालक जॉन बाम्बोर्ग यांनी सांगितले की, गेल्या सहा दशकापासून अमेरिका आणि जगभरातील बटाट्याच्या विविध प्रजाती, त्यांचे बियाणे गोळा करण्यात येत आहे. जगातील पहिली बटाटा बॅंक विसकन्सिन येथील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी १९४८ साली विकसित केली होती.
- सध्या राष्ट्रीय वनस्पती जनुकिय संग्रहाच्या अंतर्गत विविध पिकांची जैवविविधता टिकविण्यासाठी प्रयत्न केले जातात. विविध पिकांसाठी अशा जनुकिय बॅंका विविध ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. आर्कान्सास विद्यापीठात भात,  इलिनॉइज विद्यापीठात सोयबीन आणि मका, इदाहो विद्यापीठात गहू आणि कॅलिफोर्निया विद्यापीठात टोमॅटो यांचा जनुकिय संग्रह केला आहे.
- जीन बॅकेमध्ये विविध प्रजाती मिळवणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यांचे आवश्यकतेनुसार संशोधकांना पुरवणे हे काम केले जाते. बटाट्याच्या बॅंकेमध्ये पाच हजार प्रकारचे बियाणे असून एक हजार क्लोनल जातींचाही समावेश आहे. या जातीचा उपयोग अमेरिकेतील आणि आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटांनी करून घेतला आहे. तसेच विविध खासगी कंपनीच्या संशोधन विभागांनीही याचा फायदा मिळवला आहे. अमेरिका आणि अन्य देशांतील या बॅंकेचा वापर करण्याचे प्रमाण सध्या ३ः२ असे असल्याचेही बाम्बोर्ग यांनी सांगितले.
असा होतो आहे बॅंकेचा उपयोग
- अमेरिकन कृषी संशोधन संस्थेतील संशोधिका शेली जान्स्की यांच्यासारख्या संशोधकांना कीडरोगाना प्रतिकारक जाती तसेच हवामान बदलाबाबत सहनसील जाती विकसित करण्यासाठी या जनुकिय बॅंकेचा चांगला उपयोग झाला आहे.  सध्या त्या मातीमध्ये आढळणाऱ्या व्हर्टिसिलियम विल्ट या बुरशीवर संशोधन करत आहेत. या बुरशीजन्य रोगापासून बटाटा पिकांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कीडनाशकांचा वापर केला जातो. पिक लागवडीपुर्वी मातीचे निर्जंतुकीकरणासाठीही रसायनाचा वापर अधिक प्रमाणात होतो. हा वापर कमी करणे शक्य होणार आहे. दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या जंगली बटाटा प्रजाती या व्हर्टिसिलियम विल्टला प्रतिकारक असल्याचे आढळले आहे. त्यांनी या जातीचे बियाणे पोस्टाच्या साह्याने मागवून संशोधनास सुरवात केली आहे. तसेच त्या बटाट्यातील स्टार्चच्या दर्जाविषयी अधिक अभ्यास करत असून स्टार्चचे प्रमाण वाढत्या स्थौल्यासाठी कारणीभूत असते. त्यासाठीही या जनुकिय बॅंकेचा चांगला उपयोग होत आहे.
- दक्षिण अमेरिकेतील दक्षिण पेरू आणि वायव्य बोलिव्हीया या परीसरामध्ये हजारो वर्षापासून बटाट्याची लागवड केली जात आहे. जरी प्रत्येक ठिकाणच्या बटाट्याच्या जाती वेगळ्या दिसत असल्या तरी जनुकिय विश्लेषणानंतर त्यांचे मुळ पालक एका जंगली प्रजातीत असल्याचे दिसून येते. विस्कन्सिन मॅडीसन विद्यापीठातील फळबाग तज्ज्ञ जेव्हीड स्नपर यांनी गेल्या २७ वर्षामध्ये अनेक बटाट्याच्या जाती गोळा केल्या असून अमेरिकेमध्ये आणि लॅटीन अमेरिकेमध्ये १४ ठिकाणी बटाट्याचे जातीचे संग्रह गोळा केले आहेत.  आता काही देशामध्ये अशा प्रकारे जातीचे संग्रह करण्यावर बंधने आहेत. त्यांना या संग्रहाचा उपयोग होऊ शकतो.
- १८४० ते ५० या कालावधीमध्ये बटाट्यामध्ये आढळलेला लेट ब्लाईट हा रोग आजही जगभरामध्ये बटाटा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न विविध देशातील संशोधक करत आहेत .
- बटाट्याच्या चिप्स बनविण्यामध्ये येणाऱ्या अडचणीवरही संशोधन करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने झेब्रा चिप्सचा समावेश होतो.  सध्या याचा मोक्सिकोतील बटाट्यामध्ये मोठा प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यावर उपाय शोधण्यासाठी अमेरिकेतील संशोधक सातत्याने प्रयत्न करत आहेत.
...अशी आहे जनुकिय बॅंक
- येथे बटाट्याचे बियाणे लहान अशा कागदी पिशव्यामध्ये थंड वातावरणात ठेवले आहेत.
- एका विभागामध्ये परीक्षानळ्यामध्ये बटाट्याची हिरवी रोपे आहेत. ही रोपे कृत्रिम प्रकाशावर वाढविली जातात. त्यात बटाट्याचे विविध प्रकारांचे नामनिर्देशन केलेले असते.
- येथे बटाट्याच्या जास्मिन, इरिस, रेड पोन्टीयाक, मॅजेस्टिक, गोल्डन फ्लेश आणि येमा डी हुआवो ( हा स्पॅनिश भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ अंड्याचे बलक असा होतो.) यासारख्या अनेक जाती आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा