सोमवार, २५ जून, २०१२

माशाना आकर्षित करण्यासाठी प्रकाशाचा पॅटर्न विकसित


ऊर्जेच्या बचतीबरोबरच अधिक मासे सापडतील मच्छिमारांना

तैवान येथील राष्ट्रीय चेंग कुंग विद्यापीठातील संशोधकांनी माशांना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा प्रकाशाचा पॅटर्न विकसित केला आहे. त्याचा वापर मासेमारीच्या वेळी केल्यास मासे प्रकाशाकडे आकर्षित होतील आणि त्यांना जाळ्यामध्ये पकडणे सोपे जाणार आहे. तसेच एलईडी दिव्यांचा वापर केल्याने ऊर्जेमध्ये बचत होणार आहे.
रात्रीच्या वेळी मासेमारी करताना बोटीवर असलेल्या प्रकाशामुळे अनेक मासे हे दूर जात असल्याने मासेमारी करण्यात अडथळे येतात. त्यावर तैवान येथील मिंग चुंग फांग आण शेंग चीह शेण यांनी संशोधन केले असून माशांच्या आकर्षित करणारा प्रकाशाचा पॅटर्न विकित केला आहे. त्यासाठी एलईडी  प्रकारच्या उच्च दर्जाच्या प्रकाशांच्या दिव्यामध्ये वापर केला आहे. त्यामुळे वीजेची बचत होणार आहे.

असे आहेत या पॅटर्नचे फायदे
 - या माशांना आकर्षित करणाऱ्या प्रकाशाचे पाण्याखाली वितरण किंवा प्रसारणाचे प्रारूप आणि ऊर्जा वापराचे मोजमाप करण्यात आले आहे. या उपकरणाचा वापर करताना माशांच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला असून त्यांची रचना योग्य त्या कोनामध्ये केली जाते. त्यामुळे या प्रकाशांच्या टप्प्यामध्ये मासे आकर्षित होतात. अधिक मासे कमी खर्चामध्ये पकडणे शक्य होते. तसेच या एलईडी दिव्यांचा वापर केल्याने बोटीच्या इंधन वापरामध्ये 15 ते 20 टक्के घट होते.
- सध्या वापरात असलेल्या मासेमारीच्या दिव्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिनील किरणे बाहेर पडतात. त्याचा मच्छीमारांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. हे या एलईडी दिव्यामुळे टाळता येणे शक्य आहे.

भाताची सुधारीत जात सांबा मसुरी जिवाणूजन्य करपासाठी प्रतिकारक


जैवतंत्रज्ञानाधारीत निवड पद्धतीने झाले प्रथमच भातजातीचे विकसन

हैदराबाद येथील भात संशोधन संचलनालय (DRR) व पेशीय आणि मुलद्रव्यीय जीवशास्त्र संस्थेने (CCMB) एकत्रितरित्या भाताची बॅक्टेरियल ब्लाइट या रोगासाठी प्रतिकारक अशी भाताची जात विकसित केली आहे. या नव्या जातीचे नाव सांबा मसुरी असे ठेवण्यात आले असून जैवतंत्रज्ञानाच्या सहकार्याने निवड पद्धतीने ती विकसित करण्यात आलेली आहे.

संपुर्ण भारतामध्ये खरीपामध्ये भाताची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र त्यावर येणाऱ्या जिवाणूजन्य करपा ( बॅक्टेरियल ब्लाईट)  या रोगामुळे भाताच्या उत्पादनात प्रचंड घट होते. या रोगावर रासायनिक फवारणीच्या माध्यमातून विश्वासार्ह उपाय नाहीत. आंध्र प्रदेशातील सांबा मसुरी (BPT5204) भाताची जात आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठाने विकसित केली असून ती आंध्र प्रदेश व शेजारच्या राज्यांमध्ये लोकप्रिय आहे.  मात्र ही जात जिवाणूजन्य करपा रोगाला लवकर बळी पडत असल्याने उत्पादनात घट येते. त्यावर उपाय शोधताना हैदराबाद येथील भात संशोधन संचलनालय (DRR) व पेशीय आणि मुलद्रव्यीय जीवशास्त्र संस्थेने (CCMB) या सांबा मसुरी भाताच्या जातीतील जैवतंत्रज्ञानाच्या साह्याने गुणधर्माची निवड करून जिवाणूजन्य करपाला प्रतिकारक जात विकसित करण्यात आली आहे. ही भारतातील पहिलीच अशा तऱ्हेने विकसित करण्यात आलेली जात असून तिचे व्यावसायिकरित्या वितरण करण्यात आले आहे. या सुधारीत जातीमध्ये जनुकिय सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे जिवाणूजन्य करपाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भागामध्ये ही जात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. विशेषतः कर्नुल जिल्ह्यातील जिवाणूजन्य करपा रोगासाठी संवेदनशील नांद्याल प्रदेशामध्ये या भातजातीच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्या य़शस्वी झाल्या आहेत.

सुधारीत सांबा मसुरीच्या प्रसारासाठी
- सुधारीत सांबा मसुरी जात लोकप्रिय करण्यासाठी भात संशोधन संचलनालय आणि सीसीएमबी ने पाचशे भात उत्पादक शेतकऱ्यांना 10 किलो बियाणे मोफत दिले आहे. या प्रकल्पासाठी ॊसीएसआयआर -800ऒ या कार्यक्रमांतर्गत आर्थिक साह्य मिळाले आहे.
- हा प्रकल्प नालगोंडा, पुर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, गुटूंर  आणि कर्नुल जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.
- भात संशोधन संचलनालयाचे प्रकल्प संचालक डॉ. बी. सी विरक्तमठ,  सीसीएमबी चे संचालक डॉ. मोहन राव यांच्यासह कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना या सुधारीत सांबा मसुरी भाताच्या लागवडीविषयी माहिती देण्यात येत आहे. जिवाणूजन्य करपा रोगासाठी संवेदनशील असलेल्या आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि छत्तिसगढ राज्यातील 1500 शेतकरी कुंटूबांना आगामी खरीपासाठी बियाणे मोफत पुरवण्यात येईल. या कार्यक्रमामुळे 2013 आणि 2014 साली खरीपामध्ये सुधारीत सांबा मसुरी जातीची लागवड वाढण्यास मदत मिळणार आहे.

टोमॅटोचा जनुकिय नकाशा उलगडला


जागतिक पातळीवरील संशोधकांच्या गटाने केलेल्या संशोधनात पहिल्यांदाच टोमॅटोचा  (Solanum lycopersicum ) जनुकिय नकाशा उलगडण्यात यश आले आहे. त्यातील सर्व खाचा खोचा माहिती झाल्याने भविष्यामध्ये टोमॅटो पिकाची उत्पादन वाढ,पोषकता वाढ , रोगासाठी प्रतिकारकता वाढवणे याबरोबरच विविध चवीचे आणि रंगाचे टोमॅटो उपलब्ध होण्यासाठी हे संशोधन मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरणार आहे. आगामी विविध संशोधनासाठी या संशोधनाचा फायदा होणार आहे.  Solanum lycopersicum या जातीच्या टोमॅटोबरबोरच जंगली जातीच्या टोमॅटोचेही जनुकिय विश्लेषण करण्यात आले असून ते दोन्ही नेचर या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. हे संशोधन आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने केला अशून त्यात अर्जेटिना, बेल्जिअम,चीन, फ्रान्स, जर्मनी, इस्राईल, इटली, जपान, नेदरलॅंड साऊथ कोरिया, स्पेन, इंग्लंड अमेरिका आणि भारत या देशातीलल संशोधकाचा समावेश होता. या संशोधनात दिल्ली येथील राष्ट्रीय वनस्पती जनुक संशोधन संस्थेतील संशोधक सरीता भुट्टी, पारूल चौधरी आणि देबाशिष चट्टोपाध्याय यांचाही समावेश होता.

विशेषतः हेन्झ 1706 या टोमॅटोचे जनुकिय विश्लेषण करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोल्ड स्परींग हार्बर लॅबोरेटरीमध्ये जंगली टोमॅटो (Solanum pimpinellifolium) चा जनुकिय नकाशा विकसित केला आहे.

टोमॅटोची जनुकिय माहिती
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटोमध्ये 12 गुणसूत्रामध्ये सुमारे 35 हजार जनुके असतात. टोमॅटोच्या चव, रंग, नैसर्गिक रोग प्रतिकारकता , त्यातील पोषक घटक या सारख्या विविध गुणधर्मासाठी ही जनुके कारणीभूत असतात. या सर्व जनुकांची एकत्रीत संरचना मिळविण्यात संशोधकांना यश आले आहे.
त्यांची सुंसगतवार रचना, गुणसुत्रातील त्यांचे स्थान याविषयी नेचर या संशोधनपत्रिकेमध्ये देण्यात आली आहे.

जनुकिय नकाशामुळे काय होईल
-टोमॅटोच्या अंतरंगात डोकावण्याची संधी या संशोधनामुळे मिळाली असून टोमॅटो पिकामध्ये उत्पादन वाढीबरोबरच गरजेनुसार योग्य ते गुणधर्माचे टोमॅटो विकसित करणे सोपे होणार आहे.
- सध्या जरी या दोन जातीचा जनुकिय नकाशा उपलब्ध असला तरी भविष्यामध्ये गरजेनुसार अन्य टोमॅटो जातीचेही विश्लेषण करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे पैदासकार गरजेनुसार योग्य  प्रकारच्या जाती विकसित करू शकणार आहेत. पहिल्या जनुकिय नकासा विकसित करण्यासाठी आलेल्या लाखो डॉलर खर्चाच्या खुप कमी खर्चामध्ये (सुमारे 10 हजार डॉलर) पुढील जातीचे जनुकिय नकाश तयार करता येतील.
- टोमॅटोच्या या संशोधनाचा उपयोग स्ट्रॉबेरी, सफरचंद, कलिंगडे, केळी आणि अन्य फळांमध्येही होऊ शकतो. कारण या साऱ्या फलातील फळे पिकण्याच्या अवस्थेसाठी कारणीभूत असणाऱी जनुके व त्यांची कार्यपद्धती सारखीच आहे. त्यामुळे या फळांच्या विकसणासाठी टोमॅटोच्या जनुकिय नकाशाचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यांच्या संशोधनासाठी होणाऱ्या खर्चामध्ये बचत करणे शक्य होईल.
- टोमॅटो हे महत्त्वाचे भाजीपाला पिक आहे. त्याची बाजारपेठ ही एकट्या अमेरिकेत सुमारे 2 अब्ज डॉलरची आहे. प्रति वर्ष अमेरिकन माणूस सरासरी 72 पौंड टोमॅटो आहारात वापरतो.

ऊसातील फुटवे काढण्यासाठी केन सिडलींग प्रुनर विकसित


तमिळनाडू कृषी विद्यापीठातील संशोधन

फळबागेमध्ये चांगल्या उत्पादनासाठी योग्य वेळी छाटणी करण्याची आवश्यकता असते. तसेच कपाशी, एरंडी, तीळ यां सारख्या पिकामध्येही  जास्त फांद्या येण्यासाठी शेंडा खुडण्याची प्रक्रिया केली जाते. त्याचप्रमाणे ऊसामध्ये जेठा फुटवा शेतकरी काढतात, त्यामुळे ऊसाचे  अन्य फुटवे चांगले वाढून उत्पादनात वाढ होते. मात्र मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांना हे काम करण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यावर यांत्रीकीकरणाचा पर्याय शोधण्यात आला असून ॊकेन सिडलींग प्रूनर या नावाचे यंत्र तमिळनाडू कृषी विद्यापीठातील प्लॅनिंग अँड मॉनिटरिंग विभागाने विकसित केले आहे. या यंत्रामुळे ऊसातील जेठा देठ खुडण्याच्या काम वेगाने आणि कमी मजूरामध्ये करता येऊ शकेल.

ऊसाचा मुख्य फुटवा काढण्यासाठी सध्या शेतकरी कोयता किंवा विळ्याचा वापर करतात. मात्र त्यासाठी खाली बसून काम करावे लागत अशल्याने अधिक वेळ लागतो. तसेच मजूरांची संख्या ही अधिक लागते. धारदार अवजारामुळे तसेच ऊसाच्या पात्यांच्या धारेमुळे मजुरांच्या हाताला इजा होण्याची शक्यता अधिक असते. या प्रश्नावर संशोधन करून तमिळनाडू कृषी विद्यापीठातील  कोईमतूर येथील प्लॅनिंग अँड मॉनिटरिंग विभागाने एक साधन विकसित केले आहे.

 असे आहे यंत्र
- केन सिडंलींग प्रुनर या नावाने ओळखल्या जाणारे हे यंत्र लांब दांडा आणि खालील बाजूला अंतर्गत भागामध्ये धारदार चाकू आहेत. जो फुटवा कापायचा आहे, तो दोन चाकूच्या मध्ये धरून त्याचा दांड्यावरील खटका दाबला अशता तो फुटवा कापला जातो.
- तसेच धारदार चाकूपासून व ऊसाच्या पात्यापासून हात दूर राहत असल्याने उजा होण्याचा धोका कमी होतो.
- दोन इंच जाडीच्या पाईपच्या दांड्यामुळे छाटणी करण्याचे काम उभ्याने करता येते. कामाचा वेग वाढतो.
 अन्य फळ पिकासाठी होऊ शकतो फायदा
कोईमतूर येथील प्लॅनिंग अँड मॉनिटरिंग विभागाते संचालक डॉ. जी. कथीरेसन यांनी सांगितले, की शेतकऱ्यांच्या छाटणीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार असून हे यंत्र वापरण्यास सोपे आहे. तसेच या साधनाच्या दांड्याची लांबी कमी जास्त करून त्याचा वापर पपई,शेवग्याच्या शेंगा, पेरू आणि अन्य या सारख्या फळांच्या काढणीसाठीही वापरता येऊ शकते.

कांद्याच्या रसापासून मिळविली वीज


प्रति दिन 600 किलोवॉट वीज
कॅलिफोर्नियातील खासगी उद्योगाने उभारली वीज साठवणीसाठी यंत्रणा

भाज्या व फळांच्या प्रक्रिया उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात टाकाऊ घटक वेगळे केले जातात. त्यामध्ये फळांच्या साली, टरपले आणि भाज्यांची देठे  यांचा समावेश असतो. कॅलिफोर्नियातील गील्स या प्रक्रिया उद्योगामध्ये कांद्यावर प्रक्रिया केली जाते. तिथे हजारो टन टाकाऊ भाग प्रति दिन वेगळे केले जातात. त्यांच्या विघटनातून मिथेन वायू तयार होत असल्याने प्रदुषणाचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. मात्र गिल्स यांनी या टाकाऊ घटकापासून अपारंपरिक ऊर्जा उपलब्धीसाठी हवारहीत विघटनाचा पर्या वापरला आहे. त्यासाठी कांद्यांच्या टाकाऊ घटकांचे रसामध्ये रुपांतर करून  त्यामध्ये जिवाणूंची वाढ करण्यात आली आहे. हे जिवाणू हवारहीत चेंबरमध्ये मिथेन वायूची निर्मिती करतात. या मिथेन वायूपासून फ्युएल सेलच्या माध्यमातून वीज निर्माण केली जाते. या प्रकल्पामधून साधारणपणे 600 किलोवॉट वीज उपलब्ध होऊ शकते.
या अपारंपरिक ऊर्जेमुळे वीजेसाठी होणाऱ्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज साठवण्यासाठी गिल्स यांनी टेनिस कोर्टच्या आकाराची मोठी बॅटरी वापरली असून जादा होणारी 600 किलोवॉट वीज साठवण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी उर्जा विकसीत होण्याच्या वेगामध्ये घट होत असताना या वीजेचा वापर करणे शक्य होणार आहे. 

केरळ राबवणार मत्स्य समृद्धी प्रकल्प



 राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढीसह रोजगार निर्मितीसाठी होणार फायदा

केरळ राज्यामध्ये गोड्या पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात असून त्याचा फायदा मत्स्यशेतीसाठी होऊ शकतो. त्याचा विचार करून केरळने मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी मत्स्य समृद्धी प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना मत्स्य उत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती, पर्यावरणपूरक मत्स्यपालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रकल्पातून राज्यामध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासह मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पाबाबत माहिती देताना केरळ राज्याचे मत्स्य उत्पादन मत्री के. बाबू यांनी  सांगितले, की राज्यामध्ये पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात असल्याने मत्स्य उत्पादनासाठी संधीही मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या केरळ मध्ये 1.5 टन माशाचे उत्पादन होत असून या प्रकल्पामुळे ते नियोजनपुर्वक 2.5 टनापर्यंत वाढवण्याची योजना आहे. या प्रकल्पामध्ये कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्राच्या मदतीने राज्यातील सुमारे 12 हजार हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात आली असून मत्स्य शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोबाईल ऍक्वा क्लिनिक उभारण्यात येणार आहेत. 700 स्थानिक स्वराज्य संस्थाचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यात येणार आहे.
 या प्रकल्पामध्ये मत्स्य शेतीसाठी आवश्यक विविध जातीचे मत्स्य बीज, कोळंबी आणि पर्ल स्पॉट यांचे मोफत वितरण करण्यात येणार असून आर्थिक अनुदानाची व्यवस्था केली आहे. उत्क़ष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी, समन्वयक आणि प्रकाशनांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.

मंगळवार, १९ जून, २०१२

त्वचेतील प्रतिकारकतेसाठी उपयुक्त पेशीं शोधल्या


कोणत्याही रोगाचा पहिला हल्ला होतो, तो शरीराचे आवरण असलेल्या त्वचेवर. त्यावर झालेला प्रहार सहन करण्याची, त्याला प्रतिकार करण्याची क्षमता त्वचेमध्ये आहे. मात्र त्वचेच्या या प्रतिकरशक्ती नेमक्या कोणत्या प्रतिकारक पेशीमध्ये आहे, याबाबत सिंगापूर येथील सिंगापूर इम्युनॉलॉजी नेटवर्क या संस्थेतील संशोधकांनी संशोधन केले आहे. त्वचेमध्ये खोलवर व यकृतामध्ये असलेल्या लॅंगनहॅनस सेल ( एलसी )या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पेशीमध्ये ती क्षमता असल्याचे आढळले आहे.  हे संशोधन एक्सपेरिमेंटल मेडीसीन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

एलसी या पेशी यकृत आणि त्वचेच्या सर्वात वरच्या पहिल्या स्तरामध्ये आढळून येतात. या पेशींना रोगजंतूची जाणिव होताच त्या अन्य प्रतिकारक पेशींना इशारा देतात. त्याचवेळी रोगजंतूशी मुकाबला करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करतात. डॉ. फ्लेरेंट जिनहॉक्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  या पेशींचा ओळख पटवली असून त्यामुळे लसीकरण आणि विविध रोगांच्या उपचारामध्ये अनेक पर्यायी पद्धतीविषयी संशोधनास चालना मिळणार आहे. विविध प्रकारच्या अँलर्जी आणि त्वचारोगावरही औषधे शोधणे शक्य होणार आहेत.

या संशोधनाविषयी माहिती देताना जिनहॉक्स यांनी सांगितले, की प्रौढ एलसी पेशी दोन प्रकारे प्रतिकार करतात. त्यांची पहिली लाट ही त्वचेतील योल्क सॅक ( पिवळ्या बलक) मधून सुरू होते. ती पुढे यकृतामध्ये जाते. या दोन्ही ठिकाणी विकसित होणाऱ्या एलसी पेशी त्वचेच्या एकात्मतेमध्येही महत्त्वाचे कार्य करतात. तसेच रोगजंतूशी मुकाबला करण्यामध्ये उपयुक्त ठरतात.

सिंगापूर इम्युनॉलॉजी नेटवर्क संस्थेचे संचालक पावोला कॅस्टाग्नोली यांनी सांगितले, की या संशोधनामुळे प्रतिकारशक्तीच्या गुंतागुंतीवर प्रकास पडला असून प्रतिकारक प्रतिक्रिया आणि मानवी रोगामधील संबंधाविषयी माहिती मिळाली आहे. विविध प्रकारच्या रोगावर उपचार करण्यासाठी , तसेच प्रतिकारशक्ती कमजोर करणाऱ्या रोगांवर औषध शोधणे शक्य होणार आहे.

रविवार, १७ जून, २०१२

धातूपेक्षा टिकाऊ पर्यावरणपूरक प्लॅस्टिक विकसित


इस्राइल येथील तेल अविव विद्यापीठातील संशोधन

दरवर्षी पावसाळा आला की प्लॅस्टिकच्या प्रदुषणाचा प्रश्न समोर येतो.  न विघटन होणाऱ्या प्लॅस्टिकमुळे माती, पाणी यांचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. त्याला विघटन होऊ शकणाऱ्या प्लॅस्टिकचा पर्याय शोधण्यासाठी संशोधक सातत्याने प्रयत्न करत आहेत. इस्राइलमधील तेव अविव विद्यापीठातील संशोधकांनी पर्यावरण पूरक आणि अधिक टिकाऊ प्लॅस्टिक विकसित केले आहे. या प्लॅस्टिकमुळे स्टिल किंवा इतर धातूऐवजी या प्लॅस्टिकचा वापर करणे शक्य होणार आहे. हे संशोधन अँन्जेवान्टे केमी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

प्लॅस्टिकच्या वापरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. 2020 सालापर्यंत  200 दशलक्ष टन प्लॅस्टिक प्रति वर्ष वापरले जाणार आहे. यामधील पारंपरिक, साध्या प्लॅस्टिकमुळे पर्यावरणामध्ये प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. दैनदिन वापरामध्ये प्लॅस्टिचा वापर वाढत असतानाच ते पर्यावरणपूरक असेल, टिकाऊ असेल या विषयी करण्यात आलेले हे संसोधन महत्त्वाचे ठरणार आहे. तेल अविव विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील संशोधक मोशे कोल यांनी अधिक ताकदीचे, टिकाऊ प्लॅस्टिक पॉलिप्रोपेलिन विकसित केले आहे. वाहन उद्योगासह अन्य व्यवसायामध्ये विविध भाग बनवण्यासाठी त्याचा वापर करता येणार असल्याचे संशोधकांचे मत आहे. त्यामुळे वाहने अधिक हलकी आणि कमी वजनाची होणार असून इंधनामध्ये बचत होईल. तसेच धातूपेक्षा कमी किंमतीमध्ये उपलब्ध झाल्याने स्वस्तामध्ये वाहने व अन्य घटक उपलब्ध होतील.


प्लॅस्टिकच्या गुणधर्मासाठी संप्रेरक महत्त्वाचे
हे प्लॅस्टिक विकसित करण्याच्या प्रक्रियेमध्ये पारंपरिक प्लॅस्टिक बनविण्याच्या प्रक्रियेपेक्षा कमी ऊर्जा लागते. प्लॅस्टिकच्या विकसनामध्ये पॉलिमर या घटकांची विशिष्ट साखळी असते. त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या संप्रेरकांवर त्याची ताकद, टिकाऊपणा आणि अन्य गुणधर्म ठरत असतात. कॉन्स्टटिन प्रेस, अँड कोहेन, उस्राईल गोल्टबर्ज, मोशे कोल आणि सहकाऱ्यांनी सॅलनिन टिटानियम संयुगाचा संप्रेरक म्हणून वापर केला आहे. चांगल्या दर्जाच्या संप्रेरकांमुळे प्लॅस्टिकचा वितळण्याच्या तापमानामध्ये वाढ करणे शक्य आहे. तसेच त्याची ताकद आणि टिकाऊपणा वाढत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

संशोधनाचे फायदे
- आजवर पर्यावरणपूरक प्लॅस्टिक हे टिकाऊपणा कमी पडत असल्याचे चित्र समोर येत होते, त्याला या संशोधनामुळे छेद जाणार आहे. अनेक उपकरणामध्ये धातूऐवजी या पर्यावरणपूरक प्लॅस्टिकचा वापर करणे शक्य आहे.

- प्लॅस्टिक विकसनाच्या प्रक्रियेसाठी कमी ऊर्जा लागते.

- हे प्लॅस्टिकचा विषारीपणा ही कमी आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या वहनासाठी पाईप निर्मिती करता येणार आहे. प्रक्रिया उद्योगामध्ये स्टिलच्या पाईपचा वापर कमी होणार आहे.

जंगल आले शहरात ...


छोटेसे टूमदार घर हे निसर्गाच्या सान्निध्यात असावे, हे तसे शहरातील सर्वांचेच स्वप्न असते. अन्य वेळी निसर्गाला विसरणारा माणूस घर घेताना मात्र त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी हे घर किंवा ऑफिस हे शहरी सोयींनी युक्त असेल, याकडेही त्याचे लक्ष असते. स्टेशन, शाळा, कॉलेज, कामाचे ठिकाण, बाजारपेठ हे अगदी जवळ असल्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे टेकड्यावर घरे, जंगलात कुठेतरी बंगला घेतला जातो. मात्र मिलानमधील वास्तूरचनाकाराने जंगलच शहरात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. स्टेफानो बोयरी यांनी शहरातील जागेचा प्रश्नावर उभ्या जंगलाचा पर्याय विकसित केला आहे.


असे असणार हे उभे जंगल
- 65 दशलक्ष डॉलर प्रस्तावित खर्चाची बॉस्को व्हर्टिकले ही इमारत मिलान शहरामध्ये उभारण्यात येत आहे. या इमारतीमध्ये राहण्यासाठी आरामदायी घरे असणार आहेत. या घरांची बाल्कनी 900 लहान झाडे आणि विविध प्रकारची रोपे लावण्यासाठी विशेष तयार करण्यात येत आहे.
- संपुर्ण इमारतीमध्ये लावलेल्या झाडाची संख्या ही 10 हजार वर्ग मीटर जागेवर लावलेल्या झाडाइतकी असणार आहे.
- या इमारतीसाठी सध्या घराच्या बाजारात असलेल्या दरापेक्षा 5 टक्के दर अधिक असणार असल्याची माहिती बोयरी यांनी दिली आहे.


अशी आहे हरित इमारतीमागील प्रेरणा
- प्रत्येकाला निसर्गाच्या सान्निध्यात घर घेणे शक्य होऊ शकत नाही. शहरातही झाडांची संख्या वाढवण्यासाठी जागेची मुख्य अडचण आहे. जंगलात जाणे शक्य नाही, तर जंगल शहरात का आणू नये, या विचाराने वास्तूरचनाकार स्टोफानो बोयरी यांनी या इमारतीचे डिझाइन विकसित केले आहे.
- अशा इमारती शहरातील प्रदुषणाची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील. कर्बवायूचे शोषण व धुळीचे शोषण झाल्याने तापमान वाढीवर यांचा चांगला उपयोग होईल.
- घरे थंड ठेवण्यासाठी वातानुकित यंत्रांच्या वापरामध्ये बचत होईल. तसेच पावसाच्या पाण्याचा वापर करता आल्याने पाण्याच्या वापरातही बचत करता येईल.

तज्ज्ञांचे मत-
येल विद्यापीठातील पर्यावरण आणि संरचना प्रयोगशाळेचे संचालक अँलेक्झाडर फेल्सन यांनी सांगितले, की ही कल्पना सूक्ष्म पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकेल. मात्र झाडे, रोपे आणि त्यांच्या वाढीसाठी ओलसर माती यांचे वजन पेलण्यासाठी होणाऱ्या टिकाऊ बांधकामाचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे या प्रकारच्या इमारती कितपत शाश्वत ठरतील यात शंकाच आहे. त्याऐवजी छतावर हिरवळ वाढविण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.


(माहिती स्रोत - ग्रीन फ्यूचर्स नियतकालिक
छायाचित्रे- डॅनियल आयडोसी)

सोमवार, ११ जून, २०१२

धुम्रपानाची सवय सोडवण्यासाठी ताजी फळे, भाज्या उपयुक्त


कच्ची फळे आणि भाजीपाल्याचा आहारात योग्य प्रमाणात वापर केल्यास धुम्रपानाची सवय सोडवणे शक्य असल्याचे संशोधन अमेरिकेतील बुफॅलो विद्यापीठातील संशोधकांनी केले आहे. त्यांनी धुम्रपानाचे व्यसन असलेल्या सुमारे 1000 लोकांच्या सवयींचा अभ्यास केला आहे.

कच्च्या भाज्याचे सेवन आणि धुम्रपान यांच्यातील संबंधाचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष आशादायक आहेत. संशोधकांनी 14 महिने केलेल्या अभ्यासामध्ये ज्या लोकांच्या आहारात फळे आणि भाजीपाला योग्य प्रमाणात असतो, ते तंबाकू आणि सिगारेटपासून अधिक काळपर्यंत दूर राहू शकतात. तसेच अधिक प्रमाणात कच्च्या भाज्या, फळे खाणाऱ्या लोकांना धुम्रपानाची सवयीपासून सुटका करून घेणे शक्य असल्याचे आढळले आहे.

 त्याबाबत माहिती देताना सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख गॅरी जिव्हानो म्हणाले, की निकोटिनवरील विसंबण्याचे प्रमाण आणि ताज्या भाजीपाला व फळे यांच्या सेवनातील नक्की संबंधाविषयी अद्याप माहिती मिळाली नसली तरी ज्या लोकांच्या आहारात ताज्या भाज्या व फळे यांचा समावेश असतो, ते धुम्रपानाच्या व्यसनापासून दूर राहत असल्याचे निदर्शनास आले आहे.  काही आहारासोबतच कॅफिन असलेल्या द्रव्य आणि मद्यासोबत धुम्रपानाचे प्रमाण वाढत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यामुळे आहारातून कच्च्या भाज्या व फळे यांचे योग्य प्रमाण असल्यास हा धुम्रपानाचे प्रमाण कमी राहत असल्याचेही आढळून आले आहे.

या अभ्यासाचे मुख्य संशोधक जेफ्री हायबॅक यांनी सांगितले, की आहारातील भाज्याचे सेवनाचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळे असले तरी धुम्रपानाची सवय सोडू इच्छिणाऱ्या लोकासाठी हे संशोधन आशादायक ठरणार आहे. त्याचे निश्चित प्रमाण ठरवण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

केरळमध्ये होणार मातीचे संग्रहालय


देशातील पहिलेच मृदा संग्रहालय,
एकाच ठिकाणी पाहता येतील मातीचे सर्व प्रकार

केरळमध्ये लवकरच भारतातील पहिले मृदा संग्रहालय होणार असून त्यामध्ये विविध प्रकारच्या माती आणि खनिज मिश्रणाचे स्रोत यांचा समावेश असणार आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून मृदा संधारण, संवर्धण आणि पर्यावरणांच्या संरक्षणाविषयी जागृती करण्याचा प्रयत्न होणार आहे.

अमेरिकन माती वर्गीकरणानुसार, जगातील मातीचे 11 महत्त्वाचे प्रकार मानले जातात. त्यातील 9 प्रकार केरळ राज्यामध्ये आढळून येतात. राज्यातील 999 पंचायत क्षेत्रामध्ये काळी आम्लारी ध्रमी ते अति आम्लधर्मी माती शेतातून आढळते. या परोथूकोनम येथील प्रस्तावित संग्रहालयामध्ये मातीचे प्रकारानुंसार मोठ्या प्रमाणात संग्रह करण्यात येणार असून मातीच्या प्रकारानुसार त्यात घेता येण्याजोगी पिके यांचीही माहिती असणार आहे. संग्रहालायाबाबत माहिती देताना मृद सर्वेक्षण आणि संवर्धन विभागाचे संचालक डॉ. पी.एन. प्रेमचंद्रन म्हणाले की, केरळ राज्यातील मातीचा प्रकार हा भात आणि फळबाग लागवडीसाठी चांगला आहे. त्याचबरोबर पलक्कड भागातील काळी कसदार मातीमध्ये भाजीपाला लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. योग्य मातीमध्ये योग्य ते पीक घेतल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे. तसेच या संग्रहालयामध्ये मिनी थिएटर उभारण्यात येणार असून त्यामध्ये मातीचे संवर्धन व संरक्षणाविषयी लघुपटाचे दररोज आयोजन करण्यात येणार आहे. त्याचा फायदा संशोधक, विद्यार्थी, शेतकरी आणि निसर्गप्रेमी घेऊ शकतील.

कृषी विभागाच्या अभ्यासाचे निष्कर्ष-
नुकत्याच कृषी विभागाने केलेल्या अभ्यासात केरळमधील 14 जिल्ह्यातील 1 लाख दहा हजार मातीच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये 88 टक्के माती ही आम्लधर्मी आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असलेली आढळली आहे. या मातीमध्ये मॅग्नेशियम, बोरॉन, आणि कॅल्शिअम यांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. एकूण नमुन्यातील 80 टक्के नमुन्यामध्ये मॅग्नेशियम, 70 टक्के नमुन्यामध्ये बोरॉन आणि 50 टक्के नमुन्यामध्ये कॅल्शिअमची कमतरता आढळली आहे. त्यामुळे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी विभागवार योग्य सूक्ष्म अन्नद्रव्याचे मिश्रण वापरण्याची आवश्यकता आहे. 

रविवार, १० जून, २०१२

पाण्यातही होऊ शकेल सौर ऊर्जेचा वापर


- पाण्याखाली गॅलिअम इंडियम फॉस्फाईड सेल ठरतात पारंपरिक सिलिकॉन सेलपेक्षा उपयुक्त
- अमेरिकेतील नेव्हल रिसर्च लॅबोरेटरी चे संशोधन


अमेरिकेतील नेव्हल रिसर्च लॅबोरेटरी मधील संशोधकांनी पाण्यामध्ये कार्य करू शकतील, अशा उच्च दर्जाचे फोटोव्होल्टाईक सेल विकसित केले असून पाण्याखाली 9 मीटर अंतरापर्यंत त्यांचा वापर करता येणार आहे. त्यामुळे पाण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सेन्सर यंत्रणा कार्यरत ठेवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करणे आता शक्य होणार आहे.

पाण्याच्या खाली स्वयंचलित यंत्रणा आणि सेन्सरचा वापर नौसेनेला सातत्याने करावा लागतो. त्यासाठी निरंतर ऊर्जा देण्याची आवश्यकता असते. त्यासाठी नौसेनेचे संशोधक अधिक काळ चालू शकेल, अशा ऊर्जेच्या शोधात असतात. सध्या या यंत्रणासाठी विविध प्रकारच्या बॅटरीज किंवा पाण्यावरील सौर पॅनेलचा वापर केला जातो. पाण्यामध्ये सौर किरणे सरळपणे प्रवेश करू शकत नसल्याने पाण्यामध्ये फोटोव्होल्टाईक सेलद्वारा सौर ऊर्जा उपलब्ध होण्यात अडचणी येतात.

असे आहेत सौर सेल
या बाबत माहिती देताना एनआरएल चे प्रमुख फिलिप जेनकिनस यांनी सांगितले, की पाण्याखाली पर्यावरण आणि परिस्थितीचा सातत्याने आढावा घेण्यासाठी स्वयंचलित यंत्रणांचा वापर वाढत आहे. पाण्यामध्ये सुर्यप्रकाश जात असला तरी त्यातील फोटॉनचे रुपांतर विद्यूत ऊर्जेमध्ये करण्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या. मात्र पाण्याखाली सौर प्रकाशाची तीव्रता कमी होते. त्याचा स्पेक्ट्रल कंटेट कमी होत असला तरी सौर सेल आणि सौर प्रकाशाची तंरगलांबी जुळल्यास अधिक उर्जा ग्रहण करणे शक्य होते. त्यातून अधिक विद्यूत ऊर्जा निर्माण होणे शक्य आहे. पुर्वी सौर सेलसाठी वापरात असलेल्या सिलीकॉन आणि अॅमॉर्फस सिलीकॉन पेक्षा गॅलिअम इंडियम फॉस्फाईड ( GaInP) सेल पाण्याखालील वापरासाठी अधिक योग्य ठरतात. या GaInP सेलची तंरगलांबी 400 ते 700 नॅनोमीटरच्या (दृष्य प्रकाश ) दरम्यान असते. कमी प्रकाशातही अधिक कार्यक्षमपणे ते कार्य करू शकतात.

- सुर्यप्रकाशाच्या किरणातील निळ्या हिरव्या रंगाचा प्रभाव पाण्यामध्ये वाढतो. त्या रंगांशी जुळणारे GaInP सेल हे पारंपरिक सिलिकॉन सेल पेक्षा  अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात.

 असे आहेत निष्कर्ष
- प्राथमिक निष्कर्षानुसार, पाण्याखाली 9.1 मीटर खोलीवर प्रति वर्ग मीटर सौर सेलमधून 7 वॉट वीज उपलब्ध होते.
- पारंपरिक सौर सेलच्या तुलनेत अधिक सौर ऊर्जा मिळवता येणार आहे. त्यामुळे विविध सेन्सर यंत्रणा पाण्याखाली चालवणे शक्य होणार आहे.

अधिक क्षेत्राची प्रतिमा दाखवणारे आरसे विकसित


-वाहन चालकांसाठी ठरतील उपयुक्त,
-अधिक स्पष्टता मिळण्यासाठी वापरली गणितीय पद्धती

गाडी किंवा दुचाकीचे बाजूचे आरसे रस्त्याची मागील बाजू दाखवित असल्याने रस्त्यावरील अनेक अपघात टाळणे शक्य होते. गाडी चालवताना मानवी दृष्टीची मर्यादा ओलांडण्यासाठी या आरशांची चांगली मदत होते. या आरशाची क्षमता वाढवण्यासाठी ड्रेक्सल विद्यापीठातील गणितज्ञ डॉ. आर. अँड्र्यू हिक्स यांनी संशोधन केले आहे. आरशामध्ये योग्य तितकी वक्रता दिल्याने अधिक स्पष्ट आणि जास्त क्षेत्र दिसू शकणार आहे. या आरशांचा वापर गाडीच्या बाजुच्या आरशामध्ये केल्यास अधिक क्षेत्र पाहता आल्याने चालकाला गाडी चालवणे , वळवणे आणि रिव्हर्स घेणे सुलभ होणार आहे. या संशोधनाचे अमेरिकन पेटंट ड्रेक्सल विद्यापीठाला 15 मे 2012 रोजी बहाल करण्यात आले.

सध्या वापरात असलेल्या आरशातून चालकाला मागील वस्तूंच्या अंतराचे अचुक ज्ञान होते. मात्र फारच कमी क्षेत्र त्यात दिसते. त्यामुळे या आरशामध्ये न येऊ शकलेल्या भागाचे ज्ञान चालकाला होऊ शकत नाही. त्या क्षेत्राला इंग्रजीमध्ये ब्लाईंड स्पॉट असे म्हटले जाते. हे क्षेत्र कमी करण्यासाठी बर्हिवक्र आरसे वापरले जातात. मात्र बर्हिवक्र आरशामुळे दृष्याची स्पष्टता कमी होऊन प्रतिमा छोटी व दूर अंतरावर असल्याचे भासते.

हिक्स यांच्या आरशांचे वैशिष्ट
- सध्याच्या वापरातील आरशामध्ये दृष्य टिपण्याची क्षमता ही 15 ते 17 अंशापर्यंत असते तर हिक्स यांच्या आरश्याची तीच क्षमता 45 अंशापर्यंत आहे.
- साध्या बर्हिवक्र आरशामध्ये प्रतिमा लहान आणि दूर अंतरावर असल्याचे भासते. तसेच सरळ रेषा त्यात दिसू शकत नाहीत. हिक्स यांनी गणिती पद्धतीचा वापर केला असून आरशातून प्रकाश आपटताना कोन नियंत्रित होतात.
- त्याबाबत बोलताना संशोधक डॉ. हिक्स यांनी सांगितले, की डिस्को बॉलप्रमाणे अनेक लहान आरशाचा वापर विविध कोनामध्ये करून आरशाचा पृष्टभाग विकसित करण्यात येतो. या आरशांची रचना गणिती पद्धतीने अधिक क्षेत्राच्या प्रतिमा दिसेल अशी केली जाते. त्यामुळे प्रतिमेची स्पष्टात नष्ट न होता चांगली प्रतिमा मिळते.
- आरसा विकसित करण्याच्या अँक्टिव्हेट युआरएलई पद्धतीविषयी हिक्स यांनी प्रथम 2008 साली ऑप्टिक्स लेटर्स या संशोधनपत्रिकेमध्ये माहिती मांडली हो्ती.

अमेरिकन वाहन कायद्याचा अडसर
अमेरिकेतली वाहन कायद्यानुसार ड्रायव्हरच्या बाजूच्या आरसा हा सपाट असला पाहिजे, मात्र प्रवाशांच्या बाजूचा आरसा वक्र असला तरी चालतो. त्यावरही प्रतिमा ही लहान व दर दिसत असल्याचा इशारा छापण्याची आवश्यकता असते. त्यामुळे लगेच जरी या आरशांचा वापर केला जाऊ शकत नसला तरी भविष्यामध्ये हा नियम बदलण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे.

फोटोओळ- चालकाच्या बाजूच्या आरशाच्या तुलनेत डॉ. हिक्स यांच्या यांच्या आरशामध्ये अधिक क्षेत्र नजरेखाली येते. (स्रोत- ड्रेक्सल विद्यापीठ)


जर्नल संदर्भ- R. Andrew Hicks. Controlling a ray bundle with a free-form reflector. Optics Letters, 2008; 33 (15): 1672 DOI: 10.1364/OL.33.001672