देशातील पहिलेच मृदा संग्रहालय,
एकाच ठिकाणी पाहता येतील मातीचे सर्व प्रकार
केरळमध्ये लवकरच भारतातील पहिले मृदा संग्रहालय होणार असून त्यामध्ये विविध प्रकारच्या माती आणि खनिज मिश्रणाचे स्रोत यांचा समावेश असणार आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून मृदा संधारण, संवर्धण आणि पर्यावरणांच्या संरक्षणाविषयी जागृती करण्याचा प्रयत्न होणार आहे.
अमेरिकन माती वर्गीकरणानुसार, जगातील मातीचे 11 महत्त्वाचे प्रकार मानले जातात. त्यातील 9 प्रकार केरळ राज्यामध्ये आढळून येतात. राज्यातील 999 पंचायत क्षेत्रामध्ये काळी आम्लारी ध्रमी ते अति आम्लधर्मी माती शेतातून आढळते. या परोथूकोनम येथील प्रस्तावित संग्रहालयामध्ये मातीचे प्रकारानुंसार मोठ्या प्रमाणात संग्रह करण्यात येणार असून मातीच्या प्रकारानुसार त्यात घेता येण्याजोगी पिके यांचीही माहिती असणार आहे. संग्रहालायाबाबत माहिती देताना मृद सर्वेक्षण आणि संवर्धन विभागाचे संचालक डॉ. पी.एन. प्रेमचंद्रन म्हणाले की, केरळ राज्यातील मातीचा प्रकार हा भात आणि फळबाग लागवडीसाठी चांगला आहे. त्याचबरोबर पलक्कड भागातील काळी कसदार मातीमध्ये भाजीपाला लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. योग्य मातीमध्ये योग्य ते पीक घेतल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे. तसेच या संग्रहालयामध्ये मिनी थिएटर उभारण्यात येणार असून त्यामध्ये मातीचे संवर्धन व संरक्षणाविषयी लघुपटाचे दररोज आयोजन करण्यात येणार आहे. त्याचा फायदा संशोधक, विद्यार्थी, शेतकरी आणि निसर्गप्रेमी घेऊ शकतील.
कृषी विभागाच्या अभ्यासाचे निष्कर्ष-
नुकत्याच कृषी विभागाने केलेल्या अभ्यासात केरळमधील 14 जिल्ह्यातील 1 लाख दहा हजार मातीच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये 88 टक्के माती ही आम्लधर्मी आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असलेली आढळली आहे. या मातीमध्ये मॅग्नेशियम, बोरॉन, आणि कॅल्शिअम यांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. एकूण नमुन्यातील 80 टक्के नमुन्यामध्ये मॅग्नेशियम, 70 टक्के नमुन्यामध्ये बोरॉन आणि 50 टक्के नमुन्यामध्ये कॅल्शिअमची कमतरता आढळली आहे. त्यामुळे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी विभागवार योग्य सूक्ष्म अन्नद्रव्याचे मिश्रण वापरण्याची आवश्यकता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा