सोमवार, २५ जून, २०१२

भाताची सुधारीत जात सांबा मसुरी जिवाणूजन्य करपासाठी प्रतिकारक


जैवतंत्रज्ञानाधारीत निवड पद्धतीने झाले प्रथमच भातजातीचे विकसन

हैदराबाद येथील भात संशोधन संचलनालय (DRR) व पेशीय आणि मुलद्रव्यीय जीवशास्त्र संस्थेने (CCMB) एकत्रितरित्या भाताची बॅक्टेरियल ब्लाइट या रोगासाठी प्रतिकारक अशी भाताची जात विकसित केली आहे. या नव्या जातीचे नाव सांबा मसुरी असे ठेवण्यात आले असून जैवतंत्रज्ञानाच्या सहकार्याने निवड पद्धतीने ती विकसित करण्यात आलेली आहे.

संपुर्ण भारतामध्ये खरीपामध्ये भाताची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र त्यावर येणाऱ्या जिवाणूजन्य करपा ( बॅक्टेरियल ब्लाईट)  या रोगामुळे भाताच्या उत्पादनात प्रचंड घट होते. या रोगावर रासायनिक फवारणीच्या माध्यमातून विश्वासार्ह उपाय नाहीत. आंध्र प्रदेशातील सांबा मसुरी (BPT5204) भाताची जात आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठाने विकसित केली असून ती आंध्र प्रदेश व शेजारच्या राज्यांमध्ये लोकप्रिय आहे.  मात्र ही जात जिवाणूजन्य करपा रोगाला लवकर बळी पडत असल्याने उत्पादनात घट येते. त्यावर उपाय शोधताना हैदराबाद येथील भात संशोधन संचलनालय (DRR) व पेशीय आणि मुलद्रव्यीय जीवशास्त्र संस्थेने (CCMB) या सांबा मसुरी भाताच्या जातीतील जैवतंत्रज्ञानाच्या साह्याने गुणधर्माची निवड करून जिवाणूजन्य करपाला प्रतिकारक जात विकसित करण्यात आली आहे. ही भारतातील पहिलीच अशा तऱ्हेने विकसित करण्यात आलेली जात असून तिचे व्यावसायिकरित्या वितरण करण्यात आले आहे. या सुधारीत जातीमध्ये जनुकिय सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे जिवाणूजन्य करपाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भागामध्ये ही जात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. विशेषतः कर्नुल जिल्ह्यातील जिवाणूजन्य करपा रोगासाठी संवेदनशील नांद्याल प्रदेशामध्ये या भातजातीच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्या य़शस्वी झाल्या आहेत.

सुधारीत सांबा मसुरीच्या प्रसारासाठी
- सुधारीत सांबा मसुरी जात लोकप्रिय करण्यासाठी भात संशोधन संचलनालय आणि सीसीएमबी ने पाचशे भात उत्पादक शेतकऱ्यांना 10 किलो बियाणे मोफत दिले आहे. या प्रकल्पासाठी ॊसीएसआयआर -800ऒ या कार्यक्रमांतर्गत आर्थिक साह्य मिळाले आहे.
- हा प्रकल्प नालगोंडा, पुर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, गुटूंर  आणि कर्नुल जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.
- भात संशोधन संचलनालयाचे प्रकल्प संचालक डॉ. बी. सी विरक्तमठ,  सीसीएमबी चे संचालक डॉ. मोहन राव यांच्यासह कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना या सुधारीत सांबा मसुरी भाताच्या लागवडीविषयी माहिती देण्यात येत आहे. जिवाणूजन्य करपा रोगासाठी संवेदनशील असलेल्या आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि छत्तिसगढ राज्यातील 1500 शेतकरी कुंटूबांना आगामी खरीपासाठी बियाणे मोफत पुरवण्यात येईल. या कार्यक्रमामुळे 2013 आणि 2014 साली खरीपामध्ये सुधारीत सांबा मसुरी जातीची लागवड वाढण्यास मदत मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा