मंगळवार, १९ जून, २०१२

त्वचेतील प्रतिकारकतेसाठी उपयुक्त पेशीं शोधल्या


कोणत्याही रोगाचा पहिला हल्ला होतो, तो शरीराचे आवरण असलेल्या त्वचेवर. त्यावर झालेला प्रहार सहन करण्याची, त्याला प्रतिकार करण्याची क्षमता त्वचेमध्ये आहे. मात्र त्वचेच्या या प्रतिकरशक्ती नेमक्या कोणत्या प्रतिकारक पेशीमध्ये आहे, याबाबत सिंगापूर येथील सिंगापूर इम्युनॉलॉजी नेटवर्क या संस्थेतील संशोधकांनी संशोधन केले आहे. त्वचेमध्ये खोलवर व यकृतामध्ये असलेल्या लॅंगनहॅनस सेल ( एलसी )या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पेशीमध्ये ती क्षमता असल्याचे आढळले आहे.  हे संशोधन एक्सपेरिमेंटल मेडीसीन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

एलसी या पेशी यकृत आणि त्वचेच्या सर्वात वरच्या पहिल्या स्तरामध्ये आढळून येतात. या पेशींना रोगजंतूची जाणिव होताच त्या अन्य प्रतिकारक पेशींना इशारा देतात. त्याचवेळी रोगजंतूशी मुकाबला करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करतात. डॉ. फ्लेरेंट जिनहॉक्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  या पेशींचा ओळख पटवली असून त्यामुळे लसीकरण आणि विविध रोगांच्या उपचारामध्ये अनेक पर्यायी पद्धतीविषयी संशोधनास चालना मिळणार आहे. विविध प्रकारच्या अँलर्जी आणि त्वचारोगावरही औषधे शोधणे शक्य होणार आहेत.

या संशोधनाविषयी माहिती देताना जिनहॉक्स यांनी सांगितले, की प्रौढ एलसी पेशी दोन प्रकारे प्रतिकार करतात. त्यांची पहिली लाट ही त्वचेतील योल्क सॅक ( पिवळ्या बलक) मधून सुरू होते. ती पुढे यकृतामध्ये जाते. या दोन्ही ठिकाणी विकसित होणाऱ्या एलसी पेशी त्वचेच्या एकात्मतेमध्येही महत्त्वाचे कार्य करतात. तसेच रोगजंतूशी मुकाबला करण्यामध्ये उपयुक्त ठरतात.

सिंगापूर इम्युनॉलॉजी नेटवर्क संस्थेचे संचालक पावोला कॅस्टाग्नोली यांनी सांगितले, की या संशोधनामुळे प्रतिकारशक्तीच्या गुंतागुंतीवर प्रकास पडला असून प्रतिकारक प्रतिक्रिया आणि मानवी रोगामधील संबंधाविषयी माहिती मिळाली आहे. विविध प्रकारच्या रोगावर उपचार करण्यासाठी , तसेच प्रतिकारशक्ती कमजोर करणाऱ्या रोगांवर औषध शोधणे शक्य होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा