राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढीसह रोजगार निर्मितीसाठी होणार फायदा
केरळ राज्यामध्ये गोड्या पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात असून त्याचा फायदा मत्स्यशेतीसाठी होऊ शकतो. त्याचा विचार करून केरळने मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी मत्स्य समृद्धी प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना मत्स्य उत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती, पर्यावरणपूरक मत्स्यपालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रकल्पातून राज्यामध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासह मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पाबाबत माहिती देताना केरळ राज्याचे मत्स्य उत्पादन मत्री के. बाबू यांनी सांगितले, की राज्यामध्ये पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात असल्याने मत्स्य उत्पादनासाठी संधीही मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या केरळ मध्ये 1.5 टन माशाचे उत्पादन होत असून या प्रकल्पामुळे ते नियोजनपुर्वक 2.5 टनापर्यंत वाढवण्याची योजना आहे. या प्रकल्पामध्ये कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्राच्या मदतीने राज्यातील सुमारे 12 हजार हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात आली असून मत्स्य शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोबाईल ऍक्वा क्लिनिक उभारण्यात येणार आहेत. 700 स्थानिक स्वराज्य संस्थाचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामध्ये मत्स्य शेतीसाठी आवश्यक विविध जातीचे मत्स्य बीज, कोळंबी आणि पर्ल स्पॉट यांचे मोफत वितरण करण्यात येणार असून आर्थिक अनुदानाची व्यवस्था केली आहे. उत्क़ष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी, समन्वयक आणि प्रकाशनांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा