रविवार, १७ जून, २०१२

धातूपेक्षा टिकाऊ पर्यावरणपूरक प्लॅस्टिक विकसित


इस्राइल येथील तेल अविव विद्यापीठातील संशोधन

दरवर्षी पावसाळा आला की प्लॅस्टिकच्या प्रदुषणाचा प्रश्न समोर येतो.  न विघटन होणाऱ्या प्लॅस्टिकमुळे माती, पाणी यांचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. त्याला विघटन होऊ शकणाऱ्या प्लॅस्टिकचा पर्याय शोधण्यासाठी संशोधक सातत्याने प्रयत्न करत आहेत. इस्राइलमधील तेव अविव विद्यापीठातील संशोधकांनी पर्यावरण पूरक आणि अधिक टिकाऊ प्लॅस्टिक विकसित केले आहे. या प्लॅस्टिकमुळे स्टिल किंवा इतर धातूऐवजी या प्लॅस्टिकचा वापर करणे शक्य होणार आहे. हे संशोधन अँन्जेवान्टे केमी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

प्लॅस्टिकच्या वापरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. 2020 सालापर्यंत  200 दशलक्ष टन प्लॅस्टिक प्रति वर्ष वापरले जाणार आहे. यामधील पारंपरिक, साध्या प्लॅस्टिकमुळे पर्यावरणामध्ये प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. दैनदिन वापरामध्ये प्लॅस्टिचा वापर वाढत असतानाच ते पर्यावरणपूरक असेल, टिकाऊ असेल या विषयी करण्यात आलेले हे संसोधन महत्त्वाचे ठरणार आहे. तेल अविव विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील संशोधक मोशे कोल यांनी अधिक ताकदीचे, टिकाऊ प्लॅस्टिक पॉलिप्रोपेलिन विकसित केले आहे. वाहन उद्योगासह अन्य व्यवसायामध्ये विविध भाग बनवण्यासाठी त्याचा वापर करता येणार असल्याचे संशोधकांचे मत आहे. त्यामुळे वाहने अधिक हलकी आणि कमी वजनाची होणार असून इंधनामध्ये बचत होईल. तसेच धातूपेक्षा कमी किंमतीमध्ये उपलब्ध झाल्याने स्वस्तामध्ये वाहने व अन्य घटक उपलब्ध होतील.


प्लॅस्टिकच्या गुणधर्मासाठी संप्रेरक महत्त्वाचे
हे प्लॅस्टिक विकसित करण्याच्या प्रक्रियेमध्ये पारंपरिक प्लॅस्टिक बनविण्याच्या प्रक्रियेपेक्षा कमी ऊर्जा लागते. प्लॅस्टिकच्या विकसनामध्ये पॉलिमर या घटकांची विशिष्ट साखळी असते. त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या संप्रेरकांवर त्याची ताकद, टिकाऊपणा आणि अन्य गुणधर्म ठरत असतात. कॉन्स्टटिन प्रेस, अँड कोहेन, उस्राईल गोल्टबर्ज, मोशे कोल आणि सहकाऱ्यांनी सॅलनिन टिटानियम संयुगाचा संप्रेरक म्हणून वापर केला आहे. चांगल्या दर्जाच्या संप्रेरकांमुळे प्लॅस्टिकचा वितळण्याच्या तापमानामध्ये वाढ करणे शक्य आहे. तसेच त्याची ताकद आणि टिकाऊपणा वाढत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

संशोधनाचे फायदे
- आजवर पर्यावरणपूरक प्लॅस्टिक हे टिकाऊपणा कमी पडत असल्याचे चित्र समोर येत होते, त्याला या संशोधनामुळे छेद जाणार आहे. अनेक उपकरणामध्ये धातूऐवजी या पर्यावरणपूरक प्लॅस्टिकचा वापर करणे शक्य आहे.

- प्लॅस्टिक विकसनाच्या प्रक्रियेसाठी कमी ऊर्जा लागते.

- हे प्लॅस्टिकचा विषारीपणा ही कमी आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या वहनासाठी पाईप निर्मिती करता येणार आहे. प्रक्रिया उद्योगामध्ये स्टिलच्या पाईपचा वापर कमी होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा