छोटेसे टूमदार घर हे निसर्गाच्या सान्निध्यात असावे, हे तसे शहरातील सर्वांचेच स्वप्न असते. अन्य वेळी निसर्गाला विसरणारा माणूस घर घेताना मात्र त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी हे घर किंवा ऑफिस हे शहरी सोयींनी युक्त असेल, याकडेही त्याचे लक्ष असते. स्टेशन, शाळा, कॉलेज, कामाचे ठिकाण, बाजारपेठ हे अगदी जवळ असल्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे टेकड्यावर घरे, जंगलात कुठेतरी बंगला घेतला जातो. मात्र मिलानमधील वास्तूरचनाकाराने जंगलच शहरात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. स्टेफानो बोयरी यांनी शहरातील जागेचा प्रश्नावर उभ्या जंगलाचा पर्याय विकसित केला आहे.
असे असणार हे उभे जंगल
- 65 दशलक्ष डॉलर प्रस्तावित खर्चाची बॉस्को व्हर्टिकले ही इमारत मिलान शहरामध्ये उभारण्यात येत आहे. या इमारतीमध्ये राहण्यासाठी आरामदायी घरे असणार आहेत. या घरांची बाल्कनी 900 लहान झाडे आणि विविध प्रकारची रोपे लावण्यासाठी विशेष तयार करण्यात येत आहे.
- संपुर्ण इमारतीमध्ये लावलेल्या झाडाची संख्या ही 10 हजार वर्ग मीटर जागेवर लावलेल्या झाडाइतकी असणार आहे.
- या इमारतीसाठी सध्या घराच्या बाजारात असलेल्या दरापेक्षा 5 टक्के दर अधिक असणार असल्याची माहिती बोयरी यांनी दिली आहे.
अशी आहे हरित इमारतीमागील प्रेरणा
- प्रत्येकाला निसर्गाच्या सान्निध्यात घर घेणे शक्य होऊ शकत नाही. शहरातही झाडांची संख्या वाढवण्यासाठी जागेची मुख्य अडचण आहे. जंगलात जाणे शक्य नाही, तर जंगल शहरात का आणू नये, या विचाराने वास्तूरचनाकार स्टोफानो बोयरी यांनी या इमारतीचे डिझाइन विकसित केले आहे.
- अशा इमारती शहरातील प्रदुषणाची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील. कर्बवायूचे शोषण व धुळीचे शोषण झाल्याने तापमान वाढीवर यांचा चांगला उपयोग होईल.
- घरे थंड ठेवण्यासाठी वातानुकित यंत्रांच्या वापरामध्ये बचत होईल. तसेच पावसाच्या पाण्याचा वापर करता आल्याने पाण्याच्या वापरातही बचत करता येईल.
तज्ज्ञांचे मत-
येल विद्यापीठातील पर्यावरण आणि संरचना प्रयोगशाळेचे संचालक अँलेक्झाडर फेल्सन यांनी सांगितले, की ही कल्पना सूक्ष्म पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकेल. मात्र झाडे, रोपे आणि त्यांच्या वाढीसाठी ओलसर माती यांचे वजन पेलण्यासाठी होणाऱ्या टिकाऊ बांधकामाचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे या प्रकारच्या इमारती कितपत शाश्वत ठरतील यात शंकाच आहे. त्याऐवजी छतावर हिरवळ वाढविण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
(माहिती स्रोत - ग्रीन फ्यूचर्स नियतकालिक
छायाचित्रे- डॅनियल आयडोसी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा