सोमवार, २२ जुलै, २०१३

भात तुसापासून अतिसूक्ष्म सिलीकॉन मिळवणे शक्य

भात तुसापासून अतिसूक्ष्म सिलीकॉन मिळवणे शक्य

- सोपी, स्वस्त आणि ऊर्जा कार्यक्षम पद्धती विकसित
- भाताचे तूसही देईल शेतकऱ्यांना आर्थिक फायदा

भाताच्या तुसापासून सिलीकॉन वेगळे करण्याची सोपी व्यावसायिक पद्धती स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकानी शोधली आहे. ही पद्धती अधिक उत्पादनक्षम असून कमी ऊर्जा लागत असल्याने खर्चातही बचत करणारी आहे. या पद्धतीने मिळालेल्या सिलीकॉनच्या अतिसूक्ष्म कणांचा वापर बॅटरीच्या ऍनोडसाठी करणे शक्य आहे. त्यामुळे भाताच्या तुसापासून शेतकऱ्यांनाही आर्थिक उत्पन्न मिळू शकेल.  हे संशोधन सायंटिफिक रिपोर्ट या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

भाताच्या काढणीनंतर तांदूळ वेगळे केल्यानंतर भाताचे तूस मोठ्या प्रमाणात शिल्लक राहते. प्रति वर्ष जागतिक पातळीवर 120 दशलक्ष टन इतके भाताचे तूस भात उत्पादनातून उपपदार्थ म्हणून उपलब्ध होते. मात्र त्याला बाजारात दर नसल्याने शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक यी क्यू यांनी सिलीकॉन भाताच्या तुसापासून मिळवण्यासाठी सोपी आणि कमी खर्चाची पद्धती विकसित केली आहे. लिथीयम आयन बॅटरीमध्ये सिलीकॉनचा वापर केला जातो. इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी बॅटरींची वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे बॅटरीच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे बॅटरी उद्योजकांकडून भाताच्या तुसापासून सिलीकॉन निर्मिती सुरू झाल्यास शेतकऱ्यांना तुसापासूनही आर्थिक फायदा होऊ शकतो.
या पद्धतीबाबत संशोधनपत्रिकेमध्ये दिलेल्या माहिती नुसार, सिलीकॉनच्या अतिसूक्ष्म कणांचे अनेक औद्योगिक उपयोग आहेत. सिलीकॉन सूक्ष्म कण मिळविण्याच्या सध्याच्या पद्धती या महाग आणि अधिक ऊर्जा लागणाऱ्या आहेत. मात्र या नव्या संशोधनामुळे तूसापासून अतिसूक्ष्म कणांची रचना असलेल्या सिलीकॉन मिळवण्याची अधिक उत्पादनक्षम आणि खर्च कमी असलेली पद्धत समोर आली आहे. तसेच या मिळवलेल्या सिलीकॉनचा वापर सरळ उच्च उर्जा क्षमतेच्या लिथीयम आयन बॅटरींसाठी करता येऊ शकतो.

- सिलीकॉनच्या या ऍनोडची कार्यक्षमता ग्राफाईटच्या ऍनोडपेक्षा सात पट अधिक असून अधिक काळ टिकू शकतो.
पॅसिफिक ईशान्य राष्ट्रीय प्रयोगशाळेतील वरीष्ठ संशोधिका जी झियावो यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी ही पद्धती आश्वासक वाटत असली तरी अधिक संशोधनाच्या साह्याने परिपूर्ण करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.

ग्राफिक साठी माहिती ः
अतिसूक्ष्म सिलीकॉन कणांच्या निर्मितीची स्वस्त आणि ऊर्जा कार्यक्षम व्यावसायिक उत्पादन पद्धती
- सध्याच्या उत्पादन पद्धतीशी तुलना ( लाल रंगाच्या बाणांनी दर्शवलेली पद्धती नवीन आहे.)
- उत्पादन प्रक्रिया अशी असते.
भाताचे कच्चे तुस (सामान्य तापमान) -- त्यावर हायड्रोक्लोरिक आम्लाची 100 अंश सेल्सिअस तापमानाला प्रक्रिया---लिचड तूस--700 अंश सेल्सियस तापमानाची हवा--अतिसूक्ष्म सिलीकॉन ऑक्साईड -- मॅग्नशिअमची 650 अंश सेल्सिअस तापमानाला प्रक्रिया-- मॅग्नेशिअम ऑक्साईड अधिक अतिसूक्ष्म सिलीकॉन कण --- त्यावर हायड्रोक्लोरिक आम्लाची सामान्य तापमानाला प्रक्रियी -- मॅग्नेशिअम क्लोराईड अधिक अतिसूक्ष्म सिलीकॉन कण

पशुपालनातही जैवतंत्रज्ञान ठरते फायद्याचे

पशुपालनातही जैवतंत्रज्ञान ठरते फायद्याचे

कमी खाद्यात अधिक उत्पादन मिळवितानाच पर्यावरणासाठी ही ठरेल उपयुक्त

पशुपालनामध्ये जनावरांच्या आरोग्यासोबतच अधिक उत्पादन मिळणे आवश्यक आहे. त्याचसोबत पर्यावरणात हरितगृह वायूच्या उत्सर्जन कमी करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरू शकत असल्याचे कॅलिफोर्निया विद्यापीठातील तज्ज्ञांचे मत आहे.  हे संशोधन ऍनिमल फ्रंटिअर मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

शेतीसाठी जमिनीचा वापर वाढत आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नाचा पुरवठा करण्यासाठी सातत्याने नव्या तंत्रांचा वापर केला जातो. मात्र वाढत्या कृषी क्षेत्रासोबतच पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे वातावरणाचे प्रदुषण कमी ठेवत अन्न सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्याचे आव्हान संशोधकांसमोर आहे. त्याच बरोबर पशुपालनातूनही हानीकारक वायू बाहेर पडत असतात. त्या बाबत कॅलिफोर्निया विद्यापीठातील पी.एचडीचे विद्यार्थी क्लेटन न्युमिइर यांनी संशोधन केले आहे. जैवतंत्रज्ञानाचा वापर पशुपालनात केल्याने फायद्यामध्ये वाढ होत असल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत. पशुपालनामध्ये कमी खाद्यामध्ये अधिक दुग्ध उत्पादन, त्याच वेळी पर्यावरणातील हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होते.

असे झाले संशोधन- गायींचे वेगवेगळे गट करून त्यांच्यावर जैवतंत्रज्ञानाच्या प्रक्रियांचा वापर केला. एक गटामध्ये कोणत्याही जैवतंत्रज्ञानाचा वापर केला नाही. ज्या गटामध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर केलेला नव्हता, त्यापेक्षा गायींची वाढ चांगली झाल्याचे दिसून आले. त्याचेवेळी या गायींमुळे होणाऱ्या वायूंच्या प्रदुषणाचे मापन करण्यात आले. हा प्रयोग चार वेळा करून अचुकता मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
- संशोधकांनी दुग्ध जैवतंत्रज्ञानातील आरबीएसटी या तंत्राचीही चाचणी घेतली. ही गायीच्या संजीवकांची कृत्रीम नक्कल असून त्याचा माणसांवर कोणताही परिणाम होत नाही. हे संजीवक दुग्ध उत्पादनवाढीसाटी मोठ्या प्रमाणात वापरले जाते.  चाचणीमध्ये हे संजीवक वापरलेल्या गायींचे दुग्ध उत्पादन अधिक मिळाले, तसेच हरितगृह वायूंच्या प्रमाणात घट झाली.

शंका असल्या तरी वापर टाळता येणार नाही
-  खाद्य उत्पादनामध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. अनेक लोक यांच्या विरोधात आहेत. मात्र या तंत्रज्ञानाचे फायदे पाहता अधिक उत्पादनासाठी त्यांचा वापर टाळणे शक्य नसल्याचे न्युमिइर यांनी सांगितले.
- नॅशनल कॅलमन चे डॉ. किम स्टॉकहाऊस म्हणाले की, पशुपालनातील हरितगृह वायूचे प्रमाण कमी करण्यासाठी जैवतंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकते. या तंत्रज्ञानामुळे जनावरांची कार्यक्षमता, पीक उत्पादन आणि शेण आणि खत व्यवस्थापनामध्ये सुधारणा होते. त्याचसोबत बायोगॅस जमा करून त्याचा वापर वाढल्यास पर्यावरणातील प्रदुषणाचे प्रमाण कमी होईल. त्यातून ऊर्जा निर्माण होईल.

 संदर्भ ः
C. J. Neumeier, F. M. Mitloehner. Cattle biotechnologies reduce environmental impact and help feed a growing planet. Animal Frontiers, 2013; 3 (3): 36 DOI: 10.2527/af.2013-0022

वनस्पतीच्या अतिधोक्याच्या संदेशामुळे अळ्या होतात आकर्षित

वनस्पतीच्या अतिधोक्याच्या संदेशामुळे अळ्या होतात आकर्षित

वनस्पती देत असलेल्या आमंत्रणामुळे अळींच्या शत्रूंसोबतच अळ्यांनाही कळते शाश्वत अन्नाचे ठिकाण

वनस्पतीवर अळींचा हल्ला झाल्यानंतर अळींच्या शत्रूंना आमंत्रित करण्यासाठी एक प्रकारचा गंध (संदेश) वनस्पती सोडतात. वास्तविक हा संदेश वनस्पतीवर हल्ला करणाऱ्या किडींच्या शत्रूंसाठी ( वास्पसाठी ) असला तरी अळ्याही त्यामुळे अधिक प्रमाणात आकर्षित होत असल्याचे मका या पिकावर स्वित्झर्लंड येथे झालेल्या संशोधनात दिसून आले आहे. हे संशोधन फ्रंटिअर्स इन प्लांट सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
स्वित्झर्लंड देशामध्ये मका पिकावर स्पोडोप्टेरा लिट्टोरॅलीस या पतंगाच्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अळीने पाने कुरतडल्यानंतर वनस्पती हायड्रोकार्बन ( हवेत पसरणारे सेंद्रिय घटक ) सोडतात. या घटकाचा वास हा ताज्या कापलेल्या गवताप्रमाणे असतो. या वासामुळे वास्पसारख्या किडीवर अंडी घालणाऱ्या मित्रकीटक आकर्षित होतात. एका अर्थाने शत्रूच्या शत्रूला आमंत्रण दिले जाते. त्याचवेळी या वासामुळे अन्य पाने कुरडणाऱ्या अन्य किडी दूर राहतात.  या बाबत माहिती देताना स्वित्झर्लंड येथील न्युचाटेल विद्यापीठातील रासायनिक पर्यावरणातील मुलभूत आणि उपयोजित संशोधन प्रयोगशाळेतील संशोधक टेड तुर्लिंग यांनी सांगितले, की ज्या वनस्पती सहजातियांचा वावर आहे, अशा वनस्पतींचा वापर प्रौढ पतंग आणि फुलपाखरे करण्याचे टाळतात. त्यामुळे त्यांच्या सहजातियांनी घातलेल्या अंड्याचे, त्यातून निघालेल्या अळ्यांचे पालनपोषण चांगल्या प्रकारे होते. तसेच अन्य किटकभक्षकांपासूनचा धोकाही कमी होतो. मात्र, आमच्या संशोधनामध्ये स्पोडोप्टेका लिट्टोरॅलीस या प्रजातीच्या अळ्या मका पिकांच्या या वासाकडे अधिक प्रमाणात आकर्षित होत असल्याचे दिसून आले आहे.

अधिक संशोधन
प्रयोगशाळेमध्ये या वासाची नक्कल कृत्रीम रसायनांच्या साह्याने केली असता, असेच निष्कर्ष मिळाले. पुढील प्रयोगामध्ये स्पोडोप्टेका लिट्टोरॅलीसच्या अळ्यांना कोणत्या प्रकारचे गंध आवडतात, याचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी अळ्यांना चार नळ्या एका मध्य भांड्याशी जोडलेल्या उपकरणात (त्याला इंग्रजीत ऑलफॅक्टोमीटर असे म्हणतात.) ठेवण्यात आले. या प्रत्येक नळीतून हवेच्या साह्याने वेगळा वास प्रवाहित करण्यात आला. त्यातील त्यांच्या स्वजातियांनी आक्रमण केलेल्या मका पिकांच्या वासाकडे दुपटीपेक्षा अधिक अळ्या आकर्षित झाल्या. त्यातही ज्या मक्यावर नुकताच किंवा ताजा हल्ला झालेला आहे, अशा मका पिकाकडे त्यांचा ओढा अधिक होता.

असे का होत असावे
- आधीच प्रादुर्भाव असलेल्या वनस्पतीकडे आकर्षित होण्यामध्ये या अळ्यांचा काय फायदा असेल, या बाबत विश्लेषण करताना संशोधक तुरलिंग म्हणाले की, जेव्हा अळी पानावर खाली पडते, तेव्हा तिला अन्य किटकभक्षी व तसेच मातीतील रोगकारक बुरशींपासून धोका असतो. उपासमारीची भिती असते. त्यामुले जमिनीवर पडलेली अळी जवळच्या किंवा आधीपासून खात असलेल्या वनस्पतीकडेच धाव घेते.
-  हा एक मुद्दा असून, दुसऱ्या प्रयोगात हायड्रोकार्बनच्या तीव्र गंधामध्ये अळ्या अधिक हालचाल करत असून कमी खात असल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी ताज्या हल्ल्याच्या ठिकाणी असलेली कमी स्पर्धा आणि अन्य किटकभक्षकांपासून कमी धोक्यामुळे त्याची निवड करत असाव्यात.
- या वासामुळे अन्न असल्याची खात्रीमुळेही काही प्रमाणात असलेली स्पर्धा मान्य करत या अळ्या आकर्षित होत असाव्यात.
- प्रौढ पतंग हे अधिक अंतर जाऊ शकत असल्याने थोडा अधिक धोका स्विकारत अन्न शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते ज्या मका पिकावर अळ्या आहेत, त्यांना टाळत असल्याचे दिसून आले आहे.

जर्नल संदर्भ ः
Georg E. von Mérey, Nathalie Veyrat, Marco D'Alessandro, Ted C. J. Turlings. Herbivore-induced maize leaf volatiles affect attraction and feeding behavior of Spodoptera littoralis caterpillars. Frontiers in Plant Science, 2013; 4 DOI: 10.3389/fpls.2013.00209
--------------------------------------------------------
फोटो ः अळीच्या वर्तनाचा मागोवा घेण्यासाठी वापरण्यात आलेले उपकरण (ऑलफॅक्टोमीटर )


सीआयपी विकसित करणार दुष्काळासाठी सहनशील बटाटा जाती

सीआयपी विकसित करणार दुष्काळासाठी सहनशील बटाटा जाती

मध्य आशियासाठी संशोधन ठरणार महत्त्वपूर्ण

आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र (सीआयपी) आणि त्यांच्या उझबेकिस्तान येथील सहयोगी संस्था यांनी दुष्काळासाठी सहनशील, अधिक तापमानात व उन्हाळ्याच्या अधिक दिवसामध्ये तग धरणाऱ्या बटाट्यांच्या जाती विकसित करण्यासाठी संशोधन सुरू केले आहे त्यासाठी या संस्थेने नव्या पैदास लाईन्स च्या बटाट्यांचे क्लोन निवडले आहेत. त्याचा लाभ मध्य आशियातील देशातील शेतकऱ्यांना होणार आहे.

संशोधनाची दिशा...
- सीआयपीमधील संशोधक सध्या 64 प्रगत अशा क्लोनच्या चाचण्या करत आहेत. त्यांच्या चाचण्या सामान्य परिस्थिती , पाण्याची कमतरता असताना व तीव्र दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये घेण्यात येत आहेत.
- दुष्काळासाठी सहनशील अशी जनुकेआणि विषाणू प्रतिकारकता, अधिक उत्पादन, साठवणक्षमता यासारख्या अन्य गुणधर्मांसाठी आवश्यक जनुकाचा अंतर्भाव करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
- तसेच या चाचण्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घेण्यात येत आहे. शेतकरी कोणत्या जातींना प्राधान्य देतात, याकडेही लक्ष दिले जात आहे.
- सीआयपी संस्थेने या आधी विकसीत केलेल्या जाती मध्य आशियातील उन्हाळ्यामध्ये चांगले उत्पादन देत नसल्याचे दिसून आले आहे. मात्र काही विषाणू प्रतिकारक जनुकांमध्ये उच्च तापमानाला आणि दुष्काळामध्ये तग धरण्याची क्षमता असल्याचे दिसून आले आहे. त्यावर आधारीत संशोधन सध्या सुरू आहे.

पीक फेरबदल केवळ मातीच्याच नव्हे, तर सुक्ष्म जीवांच्याही फायद्याचे

पीक फेरबदल केवळ मातीच्याच नव्हे, तर सुक्ष्म जीवांच्याही फायद्याचे

पीकपालटाने सुक्ष्म जिवांच्या विविधतेत होते वाढ, उत्पादनवाढीसाठी होतो लाभ

प्राचीन काळापासून पिकामध्ये बदल करण्याची पद्धती राबवली जाते. त्याचा लाभ पिकामध्ये संतुलित अन्नद्रव्य आणि रोगांच्या प्रसारासा अटकाव करण्यासाठी होतो. मातीच्या सुपीकतेत वाढ करण्यासाठी मातील जिवाणू, बुरशी आणि प्रोटोझोया या घटकांचा चांगला उपयोग होत असल्याचे जॉन इनस सेंटर येथे झालेल्या अभ्यासात पुढे आहे. पिकातील फेरबदलामुळे सुक्ष्म जिवांच्या विविधतेत भर पडत असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन नेचर च्या आयएसएमई या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
मातीच्या सुपिकतेसाठी शेतकरी पिकामध्ये फेरबदल करत असतो. ही परंपरा अगदी प्राचीन आहे. मात्र त्यामागील कारणे ही आपण समजतो तसे केवळ मातीशी संबंधीत नाहीत, तर ती आहेत सूक्ष्म जिवांच्या सृष्टीशी. विविध पिकांच्या सान्निध्यात विविध प्रकारेचे सुक्ष्म जीव मातीमध्ये राहतात. त्यांचा एकमेंकाना अनेकवेळा लाभ होतो, काही वेळेला तोटेही होतात. मात्र हे एकप्रकारचे सहजीवन असते. याबाबत जॉन इनस सेंटर येथे विविध प्रयोग करण्यात आले. नॉरविच जवळील शेतामध्ये गहू, ओट आणि कडधान्य या पिकांची लागवड करून त्यातील मातीचे नमुने गोळा करण्यात आले. त्याबाबत संशोधक फिलिप पुले यांनी सांगितले, की पिकामध्ये बदल केल्यानंतर मातीतील सूक्ष्म जीवांमध्येही मोठे बदल होतात. तसेच पिकांना अन्नद्रव्य, वाढीमध्ये योग्य तिथे नियंत्रण आणि किडीरोगापासून संरक्षण यासोबतच उत्पादनात वाढ हे फायदे होतात.

असे केले प्रयोग
- पुर्वी जनुकांच्या अभ्यासाचून हे विश्लेषण केले जात असे. मात्र त्यामध्ये एकाच गटाच्या जिवाणूंचा अभ्यास होत असे. मातीतील प्रत्येक बाबींचे एकत्रित विश्लेषण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. प्रति ग्रॅम मातीमद्ये सुमारे 50 हजार प्रजातींचे जिवाणू आढळतात. त्यामुळे हे काम अवघड आहे.
- त्यात काही जिवाणूंच्या कार्यरत जनुकांचे प्रमाण तुलनेने कमी असते. मात्र कार्यरत असलेल्या जिवाणू, बुरशी, प्रोटोझोया आणि अन्य सूक्ष्म जिवांचा एकाच वेळी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केले. हे संशोधन पूर्व अंगोलिया विद्यापीठ आणि दी जिनोमिक ऍनालिसिस सेंटर यांनी एकत्रितरीत्या केलेले आहे. जॉन इनस सेंटर येथील पी.एचडीचे विद्यार्थी टॉम टर्नर म्हणाले की, आरएनए च्या सुसंगतवार अभ्यासातून मातीतील कार्यरत सूक्ष्मजीवांचे एकत्रित चित्र मिळविण्यात आले आहे. हे जीव मातीमध्ये नक्की काय करतात, पिकांना कशाप्रकारे मदत करतात, या विषयी माहिती उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांना या माहितीचा उत्पादनवाढीसाठी फायदा होणार आहे. सातत्याने एकाच प्रकारचे पीक घेतल्याने मातीतील सूक्ष्म जिवांची एकाच दिशेने वाढ होते. पिकबदलातून मातीचे आरोग्य सुधारणे शक्य आहे.
- ऍव्हेनासिन हा घटक बुरशींना रोखण्यासाठी पिकांच्या मुळांकडून सोडला जातो. संशोधकांनी असा घटक न सोडणाऱ्या ओट जातीची वाढ करून पाहिली. तेव्हा मातीमध्ये बुरशींच्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र, मातीमध्ये प्रोटोझोयासारख्या eukaryotes ची अधिक प्रमाणात विविधता दिसून आली.

थोडक्यात निष्कर्ष...
शेतामध्ये गहू पिकानंतर घेतलेल्या मातीतच्या नमुन्यामध्ये फारसा फरक पडला नव्हता, तर मातीमध्ये मुख्यत्वे करून जिवाणूंची संख्या अधिक होती. मात्र ओट आणि वाटाण्याच्या लागवडीनंतर घेतलेल्या मातीच्या नमुन्यामध्ये प्रोटोझोया आणि सुत्रकृमीचे प्रमाण अधिक आढळले. तर वाटाणा घेतलेल्या मातीमध्ये बुरशींचे प्रमाण अधिक होते.
मुळाशेजारील माती ही गहू पिकामध्ये लागवडीपुर्वी आणि नंतर सारखी होती, तर वाटाणा आणि ओट मध्ये सूक्ष्म जीवांची मोठी विविधता आढळली.
- पृथ्वीवरील सजीवांचे prokaryotes ( जिवाणू या गटात येतात.) व eukaryotes ( या गटामद्ये बुरशी, वनस्पती, प्राणी आणि मानव वगैरै बाबी येतात.) दोन मुख्य गटात वर्गीकरण केले जाते.
- केवळ चार आठवडे वाढीनंतर गहू पीक असलेल्या मातीमध्ये तीन टक्के eukaryotes आढळले आहेत. तर ओट आणि वाटाणा घेतलेल्या जमिनीमध्ये eukaryotes चे प्रमाण 12 ते 15 टक्केवर गेले.  ज्या ठिकाणी हा बदल अधिक काळासाठी होता. तिथे हे बदल स्पष्टपणे दिसून आले.

संशोधनाचे फायदे
- मातीतील सूक्ष्म जिवांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतील, अशा पिकांच्या विविध जाती शोधण्यासाठी या संशोधनाचा फायदा होणार आहे. मातीमधील जिवाणूंच्या वाढती संख्या शेतकरी, पैदासकार आणि संशोधक यांच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.
- जॉन इनस सेंटरमध्ये वाटाणासारखे नत्राचे स्थिरीकरण करणाऱ्या तृणधान्य पिकांच्या सुधारीत जाती विकसित करण्यासाठी संशोधन करण्यात येत आहे. पिकांच्या जनुकामध्ये अत्यंत सूक्ष्मबदल केल्यास त्याचे परिणाम अत्यंत गुंतागुंतीचे आणि मातीतील सूक्ष्म जिवांच्या संख्ये परिणाम करणारे असू शकतात.

जर्नल संदर्भ ः
Thomas R Turner, Karunakaran Ramakrishnan, John Walshaw, Darren Heavens, Mark Alston, David Swarbreck, Anne Osbourn, Alastair Grant, Philip S Poole. Comparative metatranscriptomics reveals kingdom level changes in the rhizosphere microbiome of plants. The ISME Journal, 2013; DOI: 10.1038/ismej.2013.119

-------

लहान काकडी दिसते कलिंगडासारखी

लहान काकडी दिसते कलिंगडासारखी

कलिंगड म्हटले की मोठ्या गोलाकार आकाराची फळे आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र चीनमध्ये बोरांच्या आकाराची मात्र कलिंगडासारखी दिसणारी काकडीची लागवड वाढत आहे. या जातीला पेपक्विनो मेलन असे नाव देण्यात आले आहे. सध्या या जातीची लागवड शांघाय येथील जिनशान या ठिकाणी यशस्वीरीत्या करण्यात आली आहे.
पेपक्विनो मेलन ही जात दक्षिण अमेरिकेतील प्राचीन जातीपासून मिळविण्यात आली आहे. मुलतः पेपक्विनो ही काकडीच्या वर्गातील असून लहान काकडी म्हटले जाते.  त्याचा लांबी 3 सेंटीमीटर असून त्याच्या सालीचा रंग हा कलिंगडासारखा असतो. त्यामुळे त्याला पेपक्विनो मेलन या नावानेही ओळखले जाते.   ही पेपक्विनो मेलन बाजारामध्ये एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये उपलब्ध होते. त्याची साधारण किंमत 160 युआन (अंदाजे 1550 रुपये) प्रति किलो असते.

वनस्पतीच्या वाढीसाठी महत्त्वाचे गुणधर्म ओळखण्यात यश


वनस्पतीच्या वाढीसाठी महत्त्वाचे गुणधर्म ओळखण्यात यश

स्वित्झर्लंड येथील 90 वनस्पतींचा झाला एकत्रित वाढीचा अभ्यास

काही वनस्पती या अन्य वनस्पतीच्या तुलनेत अधिक यशस्वी होतात. काही वनस्पतींची वाढ कमी असून अत्यंत दुर्मिळ या सदरामध्ये त्यांची गणना होते. तर काही वनस्पती अत्यंत वेगाने वाढून अन्य वनस्पती आणि सजीवासाठी धोकादायक ठरतात.संशोधकांनी, पर्यावरणतज्ज्ञांनी या बाबीसाठी बियांचे त्वरीत अंकूरण, वेगवान वाढ, स्पर्धाक्षम वाढीमुळे अशा विविध गुणधर्माना कारणीभूत ठरवले आहे. मात्र स्वित्झर्लंडमधील बेर्न विद्यापीठातील संशोधकांनी वनस्पतीच्या एकत्रित वाढीसाठी आणि नवीन जागी वाढ होण्यासाठी पर्यावरणातील आणि प्रजातीतील महत्त्वाचे गुणधर्म ओळखले आहेत. त्यांच्या मते, पहिल्या टप्प्यात अंकूरण आणि अंकुरणानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात वनस्पतींची कीडींना, रोगांना प्रतिकारक करण्याची क्षमता हा महत्त्वाचा गुणधर्म ठरतो. हे संशोधन प्रोसिंडीग्ज ऑफ दी नॅशनल ऍकडमी ऑफ सायन्सेस मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

हे असे का होत असावे
काही वनस्पती अत्यंत कमी प्रमाणात उगवतात, काहींची वाढ वेगाने होते, काही वनस्पती कीडरोगांना किंवा त्यांच्यावर जगणाऱ्या सजिवांना रोखतात या साऱ्या गोष्टीसाठी काही मुलभूत गुणधर्म कारणीभूत असतात. त्याविषयी संशोधकांमध्ये मतभेद आहे. नेमके कोणते मुलभूत घटक किंवा गुणधर्म वनस्पतींना वाढीसाठी उपयुक्त ठरतात, यांचा अभ्यास बेर्न येथील वनस्पतीशास्त्र संस्था आणि कॉन्स्टान्झ विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.
- संशोधकांनी 90 पेक्षा अधिक स्थानिक आणि परदेशी जातीच्या वनस्पतीच्या लागवडीचा एक एकत्रित प्रकल्प राबविला होता. त्यामध्ये वनस्पतीच्या विविध जातींची विविध घनतेमध्ये 16 गवताळ प्रदेशात लागवड करण्यात आली.
- मातीमध्ये कमी प्रमाणात बदल करत बियाणांचे कमी जास्त प्रमाण ठेवले. त्यानंतरच्या वनस्पतीच्या वाढीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले.
- त्यानंतर प्रत्येक वनस्पतीच्या बियाणांचा दर आणि अंकुरणाचा दर, वाढीचा दर, स्पर्धात्मक क्षमता आणि किडीरोगासाठीची प्रतिकारकता यांचा अभ्यास करण्यासाठी हरितगृहामध्ये काही चाचण्या घेण्यात आल्या.

असे आहेत संशोधनाचे निष्कर्ष
संशोधनाच्या निष्कर्षाबाबत माहिती देताना संशोधक मार्कस फिशर यांनी सांगितले, की वनस्पतीवर जगणाऱ्या किटक आणि अन्य वनस्पतींशी होणारी स्पर्धा हे वनस्पतीच्या वाढीसाठी फारच कमी प्रमाणात मोजण्यात आलेले घटक आहेत. हरितगृहातील आणि प्रक्षेत्रावरील वनस्पतीच्या वाढीच्या निष्कर्षांचे एकत्रित करत त्यांचे महत्त्वाचे गुणधर्म ओळखण्यात आले आहेत. त्यात किटकापासून योग्य प्रमाणात संरक्षण करू शकणाऱ्या वनस्पती यशस्वी ठरल्याचे दिसून येते.
- प्रयोगाच्या सुरवातीला अधिक बिया देण्याची क्षमता असलेल्या वनस्पतींची गवताळ प्रदेशात वेगाने वाढल्या. अधिक बिया रुजल्याने यशाचे प्रमाणही अधिक होते. पुढे अधिक अभ्यास करताना या घटकाचे महत्त्व बदलले.
- ऍन केम्पेल म्हणाले, की वनस्पती- वनस्पती किंवा वनस्पती- वनस्पतीवर जगणारे सजीव यांच्यातील अंतर्गत संबंध हा मुख्य गुणधर्म म्हणून पुढे आला. प्रदीर्घ काळाचा विचार केला असता कीटकापासून स्वतःचा बचाव करू शकणाऱ्या वनस्पती अधिक यशस्वी ठरल्या.
- वाढीसाठी अयोग्य वातावरणात वनस्पतींची वाढ होण्यासाठी काही जैविक बदल होण्याची गरज असते. हा पहिला टप्पा आहे. एकदा वनस्पतींच्या बिया रुजल्या की त्यांना भविष्या त्यांच्यावर होणाऱ्या कीटकांच्या, रोगांच्या किंवा अन्य स्पर्धकांच्या हल्ल्याला तोंड देण्याची तयारी करावी लागते. हा वनस्पतीच्या वाढीचा दुसरा टप्पा अधिक महत्त्वाचा आहे.

या संशोधनाचे फायदे
- भविष्यात हानीकारक ठरू शकणाऱ्या वनस्पतींची लवकर ओळख पटविणे शक्य होईल.
- पीक म्हणून एखादी वनस्पती लागवडीसाठी घेताना काही चाळण्या लावण्याची आवश्यकता असून, अशा चाळण्या निर्माण करणे या संशोधनामुळे शक्य होईल.
- वाढीसाठी आवश्यक गुणधर्मांची ओळख पटल्याने नामशेष होणाऱ्या वनस्पतींच्या वाढीसाठी प्रयत्न करता येतील.

जर्नल संदर्भ ः
A. Kempel, T. Chrobock, M. Fischer, R. P. Rohr, M. van Kleunen. Determinants of plant establishment success in a multispecies introduction experiment with native and alien species. Proceedings of the National Academy of Sciences, 2013; DOI: 10.1073/pnas.1300481110

--------------------------------------
फोटो ः प्रयोगामध्ये विविध वनस्पतीच्या वाढीच्या गुणधर्माचा अभ्यास करण्यात आला. (स्रोत ः ऍन केम्पेल)

अतितीव्र वातावरणात जगण्याच्या गुरूकिल्लीचा शोध पक्ष्यांच्या जनुकांत

अतितीव्र वातावरणात जगण्याच्या गुरूकिल्लीचा शोध पक्ष्यांच्या जनुकांत

अतितीव्र वातावरणात राहणाऱ्या ग्राऊंट टिट पक्ष्यांचा जनुकिय अभ्यासातून उलगडली अनेक रहस्ये

जगातील सर्वात चिवट किंवा तीव्र पर्यावरणात राहणारा पक्षी म्हणून तिबेट येथील बर्फाच्छादीत पर्वतीय प्रदेशात आढळणारा ग्राऊंड टिट (Parus humilis) हा पक्षी ओळखला जातो. या आकाराने लहान पण चिवट अशा पक्ष्यांचा जनुकिय अभ्यास ग्रिफिथ विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. या पक्ष्यांच्या चिवटपणामागील जनुकिय रहस्यांचा शोध घेण्यात संशोधकांना यश आले आहे. हे संशोधन नेचर कम्युनिकेशन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

ग्रिफिथ विद्यापीठातील डेव्हीड लॅबेर्ट आणि डॉ. शंकर सुब्रमनियम यांनी ग्राऊंड टिट या पक्ष्यांचा अभ्यास केला आहे. डॉ. शंकर सुब्रमनियम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी ऑक्सीजनमध्ये, अत्यूच्च उंचीवरील रहिवासासाठी या पक्ष्यांनी उत्क्रांतीदरम्यान बदल करून घेतले आहेत. मात्र या जनुकिय बदलाविषयी माहिती उपलब्ध नव्हती. आमच्या अभ्यासामध्ये ग्राऊंड टिट पक्ष्यांमधील जनुकिय सुधारणा ओळखण्यात आल्या आहेत.

काय आहेत या पक्ष्याची वैशिष्ट्ये
- ग्राऊंड टिट हे पक्षी 3300 ते 5400 मीटर उंचीवरील झाडामध्ये राहतात. तिबेटीयन पर्वताळ प्रदेशतील गवताळ भागामध्ये त्यांचा रहिवास असतो.
- हे पक्षी अंडी घालण्यासाठी मातीमध्ये खड्डे किंवा बिळे करून घरटी बनवितात.
-  मातकट किंवा फिकट तपकिरी रंगाचा हा पक्षी त्याच्या लांब आणि सरळ चोच, लांब पाय, अन्य टिटपक्ष्यापेक्षा शरीराचा मोठा आकार यामुळे पक्ष्यामध्ये वेगळा ओळखता येतो.

जनुकिय अभ्यासातील महत्त्वाच्या बाबी
- जनुकिय संशोधनातून मिळालेल्या माहितीनुसार,  आजवर या पक्ष्याला कावळ्याच्या जातीमध्ये मोजला जात असे. त्यामुळे सर्वात लहान कावळा असे म्हटले जाई, मात्र त्यापेक्षा सर्वात मोठा टिट पक्षी म्हणून त्याची ओळख रास्त ठरणार आहे. अन्य टिट पक्ष्यांपासून साधारणपणे 7.7 आणि 9.9 दशलक्ष वर्षापूर्वी ग्राऊंड टिट वेगळा होत गेला आहे.
- अतितीव्र वातावरणामध्ये रहिवासाच्या दृष्टीने या पक्ष्यांच्या शरीरात झालेल्या बदलांचे जनुकिय पातळीवरील उलगडा करण्यात आला आहे.
- तिबेटीय आणि ऍंडेज सारख्या पर्वतांच्या परिसरात वावरण्यासाठी हायपोक्सिया प्रतिक्रिया आणि हाडांची रचना तयार होण्यासाठी आवश्यक बदल जनुकांत झाले आहेत.
-  अतिथंडीमध्ये तग धरण्यासाठी मेदाम्लांच्या चयापचयासाठी कारणीभूत असलेल्या जनुक अधिक कार्यरत होत असल्याचे दिसून आले.
- त्यासोबत या वातावऱणासाठी सुसह्य बदलासाठी काही जनुक नष्ट झाले असून त्यामुळेही विषाणू आणि जिवाणूंविरोधी प्रतिकारकता विकसित झाली आहे.
- या भागामध्ये गंधांचे प्रमाण कमी असल्याने गंध मिळविण्याची क्षमता कमी झाली आहे.

संशोधनाचे फायदे
- काही जनुकांच्या नष्ट होण्यामुळे किंवा अकार्यक्षम होण्यामुळे अतितीव्र वातावरणामध्ये जगणे सुसह्य होते. या पक्ष्यांच्या जवळच्या कुळातील व कमी उंचीवर आढळणाऱ्या पक्ष्यांच्या जनुकांचा अभ्यास केल्यास तुलनात्मक फायदे मिळवणे शक्य आहे.
- काही पाळीव पक्ष्यांशी या पक्ष्यांचे काही प्रमाणात जनुकिय साम्य असून, अतितीव्र वातावरणामध्ये हे पक्षी तग धरण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरू शकते.

महाराष्ट्रातील टोपीवाला...
महाराष्ट्रातही टिट पक्ष्यांची एक प्रजाती हिमालयातून साधारणतः मॉन्सुनच्या कालावधीमध्ये स्थलांतर करून येते. तिला येथे टोपीवाला या नावाने ओळखले जात असल्याचे पक्षी तज्ज्ञ महेश गायकवाड यांनी सांगितले.


जर्नल संदर्भ ः
Yanhua Qu, Hongwei Zhao, Naijian Han, Guangyu Zhou, Gang Song, Bin Gao, Shilin Tian, Jinbo Zhang, Ruiying Zhang, Xuehong Meng, Yuan Zhang, Yong Zhang, Xiaojia Zhu, Wenjuan Wang, David Lambert, Per G. P. Ericson, Sankar Subramanian, Carol Yeung, Hongmei Zhu, Zhi Jiang, Ruiqiang Li, Fumin Lei. Ground tit genome reveals avian adaptation to living at high altitudes in the Tibetan plateau. Nature Communications, 2013; 4 DOI: 10.1038/ncomms3071

एरंडीतील दुष्काळ प्रतिकारकतेसाठी कारणीभूत जनुक ओळखले

एरंडीतील दुष्काळ प्रतिकारकतेसाठी कारणीभूत जनुक ओळखले
- दुष्काळ प्रतिकारक एरंडी वाण विकसित करणे होईल शक्य

एरंडी हे जैवइंधनासाठी महत्त्वाचे पीक मानले जाते. या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी दुष्काळ प्रतिकारकता हा गुणधर्म मोलाचा ठरणार आहे. एरंडीमधील दुष्काळ प्रतिकारकतेचा अंतर्भाव करण्यासाठी संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय गटाने एक पाऊल पुढे टाकले आहे. एरंडीमधील दुष्काळाच्या प्रतिकारकतेसाठी कारणीभूत संभाव्य जनुक शोधण्यात यश आले असून या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल ऑफ प्लॅंट फिजिओलॉजी मध्ये 15 जुलै रोजी प्रकाशित करण्यात आले आहे.

भारतासह दक्षिण आशिया आणि आफ्रिका या देशातील अनेक ठिकाणी एरंडीची लागवड वाढत आहे. लागवड वाढविण्यासाठी नव्या जाती पैदास केल्या जात आहेत. मात्र जैवइंधनाच्या अधिक उपलब्धतेसाठी ही लागवड अधिक प्रमाणात वाढण्याची आवश्यकता आहे. एरंडीच्या बियामध्ये तेलाचे अधिक प्रमाण असते. मात्र या झुडूपवर्गीय वनस्पतीपासून बियांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी या झाडांची काळजीही घ्यावी लागते. त्या बाबत माहिती देताना पेनसिल्हानिया राज्य विद्यापीठातील मुलद्रव्यीय जनुकशास्त्र विभागातील प्रा. जॉन इ. कार्लसन यांनी सांगितले, की कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन मिळविण्यासाठी एरंडीच्या पिकामध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता आहे. दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये तग धरण्याची एरंडीची क्षमता वाढविण्यासाठी जनुकिय माहिती उपयुक्त ठरू शकते.

JcPIP जनुकांचे कार्य ः
- संशोधकांनी अर्बिडॉप्सीस या वनस्पतीच्या धर्तीवर दुष्काळात तग धरण्यासाठी जेसीपीआयपी1 ( JcPIP1) हे जनुक ओळखले आहे. तसेच सिशुहान विद्यापीठातील संशोधनामध्ये JcPIP2 हे संभाव्य जनुकही 2007 मध्ये ओळखण्यात आले.
- JcPIP हे जनुक वनस्पतीमध्ये पाण्याचे वहन आणि संतुलनासाठी कार्यरत असते. अर्थात पाण्याच्या ताणाच्या काळात त्यांची प्रतिक्रिया नेमकी कशी असते, हे अस्पष्ट होते.
- संशोधकांनी JcPIP1 आणि JcPIP2 ही जनुके ताणाच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या वेळी कार्यरत होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांचे कार्य आणि प्रतिक्रिया यातील भुमिकेचा अंदाज बांधता येतो.

प्रयोग आणि त्याचे निष्कर्ष ः
- जनुकांच्या कार्याविषयी करण्यात आलेल्या प्रयोगामध्ये, एरंडीचे पारंपरिक नमुने --अधिक क्षारयुक्त माती आणि पाण्याच्या कमतरतेमध्ये वाढविण्यात आले. अधिक क्षाराच्या मातीमध्ये वाढलेली झाडे पाण्याच्या ताणाच्या तुलनेत कमी वेगाने सुधारत असल्याचे दिसून आले.
- तंबाकुतील मोझॅक विषाणूच्या साह्याने एरंडीतील JcPIP 2 किंवा JcPIP1 ही जनुके तात्पुरती अकार्यक्षम केली. त्यानंतर पुन्हा सहा दिवसाचा पाण्याचा ताण देण्यात आला. ताणाच्या कालावधीमध्ये झाडाची भौतिक गुणधर्म, मुळांची झालेली हानी, पानांची वाढ व अन्य बाबींचा अभ्यास करण्यात आला.
- ज्या झाडातील JcPIP1 हे जनुक अकार्यक्षम केले होते, ती झाडे क्षारामुळे झालेल्या हानीतून सुधारण्याचा वेग कमी होता.वनस्पतीच्या भागाचे ताणाच्या व सुधारणेच्या काळात विश्लेषण केले असता JcPIP2 हे जनुक ताणाच्या सुरवातीच्या टप्प्यात , तर JcPIP1 हे ताणानंतर सुधारणेच्या टप्प्यावर कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. त्यावरून JcPIP1 हे जनुक ताणानंतर सुधारणेच्या वेळी, तर JcPIP2 हे ताण निर्माण होत असताना मह्त्वाची भुमिका निभावत असल्याचे दिसून आले.
- या दोन्ही जनुकांचे वनस्पतीच्या अन्य कार्यावरील परिणाम अज्ञात असून पुर्ण दुष्काळ प्रतिकार यंत्रणेतील या जनुकांची भुमिका अधिक अभ्यासातून उलगडू शकेल.

कोट ः
पर्यावरणातील ताणाला सामोरे जाताना वनस्पतीमध्ये गुंतागुंतीच्या जनुकिय आणि जैवरासायनिक क्रिया घडतात. त्या क्रियेत अनेक जनुके विविध मार्गाने कार्यरत होतात. त्यातून अतितीव्र परिस्थितीमध्ये तग धरणे आणि प्रतिकारकता विकसित करत भविष्यातील ताणासाठी सहनशीलता विकसित होते.
- प्रा. जॉन इ.कार्लसन, संशोधक, मुलद्रव्यीय जनुकशास्त्र विभाग.

आगामी संशोधनाची दिशा
संशोधकांच्या गट आता JcPIP जनुके मुलद्रव्यीय पातळीवर कशा प्रकारे कार्य करतात, याचा परिपुर्ण आराखडा मिळण्यासाठी संशोधन करणार आहे. या गटामध्ये कोरियातील चोन्नाम राष्ट्रीय विद्यापीठातील सुंग जू आह्म, हा योंग जनगत, कोपनहेगन विद्यापीठातील वनस्पती जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान विभागातील सेयांग वूक यांग आणि कोरीयातील वोंकवॅंग विद्यापीठातील यांग ग्यू कू हे संशोधक या जनुकांसंदर्भात संशोधन करीत आहेत.
या संशोधनासाठी कोरीया ग्रामीण विकास, राष्ट्रीय संशोधन फाऊंडेशन आणि कोरीयातील शिक्षण, शास्त्र आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने अर्थसाह्य केले होते.

जर्नल संदर्भ ः
Ha-Young Jang, Seong-Wook Yang, John E. Carlson, Yang-Gyu Ku, Sung-Ju Ahn. Two aquaporins of Jatropha are regulated differentially during drought stress and subsequent recovery. Journal of Plant Physiology, 2013; 170 (11): 1028 DOI: 10.1016/j.jplph.2013.03.001

माल विक्रीसाठी आता दुकाने नाही, लॉकर उघडा

माल विक्रीसाठी आता दुकाने नाही, लॉकर उघडा

मागणीनुसार माल पोचविण्याची स्वयंचलित व तापमान नियंत्रित लॉकर प्रणाली सुरू होतेय इंग्लंडमध्ये
कमात कमी खर्चामध्ये ग्राहकांपर्यंत माल पोचविण्यासाठी इंग्लंड येथील वेटरोज या सुपरमार्केट कंपनीने स्वयंचलित व तापमान नियंत्रित लॉकर प्रणाली उभारली आहे. या पद्धतीने विक्रीच्या सध्या चाचण्या घेतल्या जात असून, शहरातील प्रत्येक रस्त्यावर अशी लॉकर प्रणाली उभारून ग्राहकांना योग्य दर्जाचा माल पोचविण्यात येणार आहे.
शहरांमध्ये आता मोठमोठे मॉल आपल्याकडेही आले आहेत. त्यामधून भाज्या, फळे, धान्य किंवा गोठवलेले अन्नपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र प्रत्येक वेळी मॉलमध्ये किंवा दुकानामध्ये जाण्यासाठी आपल्याकडे वेळ असेलच असे नाही. इंटरनेटवरून या पदार्थांची मागणी करता येत असली तरी हे पदार्थ आपल्यापर्यंत पोचेपर्यंत त्याचा दर्जा टिकविण्यासाठी शीतसाखळीची आवश्यकता असते. त्यासाठी अधिक खर्च होतो. हा खर्च शेवटी ग्राहकांकडूनच वसूल केला जातो. त्यावर इंग्लंड येथील वेटरोज या कंपनीने उपाय शोधला असून, त्यांनी शहरामध्ये विविध ठिकाणी संपुर्णपणे स्वयंचलित असे तापमान नियंत्रित लॉकर्स उभारले आहेत. हे लॉकर्स स्वयंचलित आणि पुर्णपणे तापमान नियंत्रित असून पदार्थांच्या गरजेनुसार त्याचे तापमान ठेवले जाते. त्यामुळे योग्य तापमानाचा पदार्थ कमी किंमतीमध्ये योग्य ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध होऊ शकतो. सध्या या पद्धतीच्या चाचण्या ब्रेकनेल येथील कंपनीच्या मुख्यालयाच्या परिसरामध्ये घेतल्या जात आहेत.

कशी आहे ही लॉकर पद्धती
- इंटरनेटद्वारे कंपनीच्या वेबसाईटवर पदार्थांची किंवा मालाची मागणी केल्यानंतर मागणी केलेल्या ठिकाणाच्या जवळच्या लॉकरमध्ये माल ठेवला जातो. त्याचा एक एसएमएस मोबाईलवर पाठविला जातो. त्यामध्ये लॉकरचा क्रमांक आणि एक पिन क्रमांक दिलेला असतो. तिथे जाऊन दिलेल्या क्रमांकावरील लॉकरमधून मागणी केलेला माल घेता येतो. कंपनीच्या दृष्टीने कमीत कमी खर्चामध्ये, मनुष्यबळ विरहित कामकाज होते, त्याचवेळी ग्राहकांसाठी योग्य शीतसाखळीच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचामाल पोचण्याची हमी या लॉकर पद्धतीतून मिळते.
- ग्राहकांच्या मागणीनुसार पदार्थ चिल्ड, गोठवलेले किंवा सामान्य तापमानाचे उपलब्ध होऊ शकतात.
- 50 डॉलरपेक्षा अधिक किंमतीच्या मालाची नोंदणी केल्यास ही सेवा मोफत पुरवली जाते.
-  आज 11. 45 पर्यंत केलेली मागणी दुसऱ्या दिवशी सकाळी पुर्ण केली जाते.
- सध्या 150 शाखांच्या माध्यमातून वेटरोज ही कंपनी ग्राहकांना सेवा देत आहे.

कोट ः
विविध पद्धतींचा अवलंब करत ग्राहकांसाठी चांगल्या दर्जाचा माल पोचविण्यासाठी कंपनी प्रयत्न करत असून, त्याच मालिकेतील हा प्रयत्न आहे. प्रत्येकांला दुकानापर्यंत येणे शक्य नसले तरी त्यांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर ही लॉकर प्रणाली उभारणी करणे आम्हाला शक्य होणार आहे. कारण यासाठी जागा अत्यंत कमी लागत असून मनुष्यबळाची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी शॉप उघडण्यापेक्षा हे सोपे आणि सुटसुटीत ठरू शकते.
- रॉबिन फिलिप्स, संचालक, वेटरोज.


मत्स्यपालनासह टोमॅटो शेती ठरू शकते फायदेशीर

मत्स्यपालनासह टोमॅटो शेती ठरू शकते फायदेशीर

शाश्वत, कार्यक्षम पाणी वापराची जर्मनीतील संशोधकांनी बसवली साखळी

जर्मनीतील संशोधकांनी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान आणि मत्स्यशेती यांचा मेळ घालत एकत्रित प्रकल्प उभारला आहे. हरितगृहामध्ये टोमॅटोसोबतच तिलापिया माशांची वाढ करत एकमेकांना पुरक पाण्याचा वापर करण्याची पद्धती विकसित केली आहे. त्यामुळे कमीत कमी पाण्यामध्ये टोमॅटोची शेती आणि मत्स्यपालन करणे शक्य होते. मत्स्यपालनासाठी वापरलेल्या पाण्यावर जिवाणूंची प्रक्रिया करत नायट्रेटयुक्त पाणी मिळवले जाते. हे नायट्रेटयुक्त पाणी टोमॅटोसाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानातून उपयोगात आणले जाते. त्यामुळे पिकांची चांगली वाढ होण्यास मदत होते. शेतीसोबतच मत्स्यउत्पादनातून अधिक उत्पन्नही मिळते.

टोमॅटोचे हरितगृह आणि मत्स्यपालन या दोन्ही बाबी शेतकऱ्यांसाठी नव्या नाहीत. मात्र जर्मनीमध्ये या दोन्ही घटकांची सांगड घालून शाश्वत पद्धतीने पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याचे तंत्र अवलंबले आहे. या पद्धतीमुळे दोन्ही घटकातून अधिक  उत्पादन मिळवणे शक्य आहे. जर्मनीतील इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर इकॉलॉजी ऍण्ड इनलॅंड फिशरीज येथील जीवशास्त्रज्ञ हेन्ड्रिक मोनसीस यांनी पाण्याच्या टाक्या टोमॅटोच्या हरितगृहामध्ये ठेवल्या असून त्यामध्ये तिलापिया माशांची वाढ केली जाते. प्रत्येक टाकीमध्ये योग्य प्रमाणात मासे ठेवण्यात येतात. मासे आणि टोमॅटो या दोहोसाठी योग्य ठरेल असे तापमान (27 अंश सेल्सिअसपर्यंत) ठेवले जाते. माशांचे खताचे पाणी पिकासाठी वापरले जाते.

टोमॅटोची लागवड
टोमॅटोची लागवड मातीऐवजी मिनरल वूल या माध्यमात केली आहे. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या वापरामुळे टोमॅटोच्या पिकासाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे सोपे जाते. तसेच माशांची विष्ठा व खतयुक्त पाणी योग्य प्रक्रियेनंतर पिकांना पुरवणे सोपे जाते. या पाण्यातून पिकांना नत्र उपलब्ध होते. उत्पादनामध्ये वाढ मिळते.
-----------------------

कार्यक्षम आणि शाश्वत पाणी वापराची साखळी
- मासे ज्या पाण्यात वाढतात, तिथे अमोनियाचे प्रमाण वाढते. अतिप्रमाणात अमोनिया झाल्यास तिलापिया माशांसाठी ते विषारी ठरते. मात्र या पाण्यात विरघळलेला अमोनिया हे पिकासाठी खत असते. या पाण्यातून अमोनियायुक्त पाणी वेगळे केले जाते.  ही प्रक्रिया हरितगृहामध्ये स्वयंचलितपणे केली जाते.
- हे घाण पाणी पांढऱ्या प्लॅस्टीकच्या पाईप्समधून पुढे नेले जाते. पहिल्या टप्प्यामध्ये त्यातील माशांचे टाकाऊ पदार्थ गाळून वेगळे करतात. यासाठी पाण्याच्या टाकीमध्ये छोटे प्लॅस्टिकचे सच्छिद्र घटक तरंगते ठेवलेले असतात. त्यामध्ये नायट्रोसोमोनस आणि नायट्रोबॅक्टर या जिवाणूंचा समावेश असतो. हे जिवाणू या पाण्यातील घटकापासून अमोनियम नायट्रेट आणि नायट्रेट बनवितात. हे खत आहे.
- हे खतयुक्त पाणी टोमॅटो पिकांच्या कुंड्यामध्ये नळ्याद्वारे नेले जाते. पाण्यातील नत्र पिकाद्वारे शोषले जाते. उर्वरीत पाणी पिकाच्या पानाद्वारे हवेत सोडले जाते. हवेतील बाष्प (पाणी) हरितगृहात अडवून त्याला थंड केले जाते. त्यासाठी शीतकरण सापळे बसवले आहेत. हे पाणी पुन्हा मिळवून माशांच्या टाक्यात सोडले जाते. अशा प्रकारे शाश्वत मासे आणि टोमॅटो पिकांची साखळी पूर्ण होते.
- पिकांना शुद्ध पाण्याची गरज नसते. माशांना आवश्यक शुद्ध पाणी पिकाद्वारे पुरवले जाते.
- पारंपरिक मत्स्यपालन आणि पिकासाठी लागणाऱ्या पाण्याच्या तुलनेत या पद्धतीत प्रति दिन केवळ 10 टक्के पाणी लागत असल्याचे वेर्नेर क्लाओज यांनी सांगितले.
- या हरिसगृहासाठी लागणारी ऊर्जा सौर ऊर्जेद्वारे मिळवली जाते.

-----------------------------------------------------------------------
असे होतात फायदे
- टोमॅटो आणि मत्स्यपालन एकत्रित असल्याने व्यवस्थापनाच्या खर्चात मोठी बचत होते.
- या दोन्ही बाबी एकमेंकाना पुरक असल्याने टोमॅटोच्या व माशांच्या उत्पादनामध्ये वाढ मिळते.
- नत्रयुक्त खतावरील खर्चामध्ये बचत.
- मत्स्य पालनासाठी पारंपरिक मत्स्यपालनाच्या तुलनेत केवळ 10 टक्के पाणी लागते.
- या दोन्ही घटकांच्या उत्पादन प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या टाकाऊ घटकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आहे. कर्बउत्सर्जन कमी असल्याने पर्यावरणासाठी फायदेशीर.
---------------------
फोटोओळी ः बर्लिन येथील केंद्रातील माशांच्या टाकी.

स्वस्त, सोपी स्वयंचलित अन्नद्रव्य व सिंचनाची प्रणाली विकसित

स्वस्त, सोपी स्वयंचलित अन्नद्रव्य व सिंचनाची प्रणाली विकसित

प्रणाली विविध भाषेत वापरणे शक्य

जगभरामध्ये हरितगृहाचा प्रवास संपुर्णपणे स्वयंचलित होण्याकडे सुरू आहे. मोठ्या कंपन्या आणि मोठी हरितगृहे या स्वयंचलितपणासाठी आवश्यक यंत्रणेचा भांडवली खर्च उचलू शकतात. लहान शेतकऱ्यांना हा खर्च पेलवत नाही. या यंत्रणा चालविण्यासाठी विशेष कौशल्य असण्याची आवश्यकता वाटते. त्यामुळे इच्छा असूनही फवारणी, खते देणे किंवा अन्य स्वयंचलित यंत्रणांचा वापर करता येत नाही. मात्र नेदरलॅंड येथील कंपनीने लहान शेतकऱ्यांना परवडेल आणि वापरण्यासाठी सोपे इंटरफेस असलेली स्वयंचलित सिंचन व अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. त्याला त्यांनी नाव दिले आहे फर्टिमिक्स गो.

सध्या बाजारामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या  अनेक स्वयंचिलत यंत्रणा उपलब्ध आहेत. मात्र त्या वापरण्यासाठी काही किमान बाबी किंवा कौशल्यांची आवश्यकता असते. आशिया आणि आफ्रिकेतील कमी शिक्षीत लोकांसाठी या यंत्रणा किचकट ठरतात. त्यामुळे अनेक वेळा आर्थिकदृष्ट्या शक्य असूनही वापर टाळला जातो. या शेतकऱ्यांच्या अडचणीचा विचार करून हॉर्टी मॅक्स या कंपनीने कमी खर्चातील आणि वापरण्यास सोपे असलेली सिंचन प्रणाली विकसित केली आहे. त्या बाबत माहिती देताना कंपनीचे अर्जेन जनमात यांनी सांगितले, की बटन दाबा आणि चालू करा, अशी अत्यंत सोपी स्वयंचलित खते पिकापर्यंत पोचविण्याची प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्युतवाहकता आणि सामू मोजणारे संवेदक असलेली ही एक प्रमाणित खत मिश्रण टाकी आहे. त्यासोबत दहा घनमीटर क्षमतेचा पंप असून त्यावर चालणारे 32 व्हाल्व्ह आहेत. या सोबत आम्लांचा (ऍसीड) चे डोसिंग करणारा पंप आणि प्रकाशाच्या नियंत्रणासाठी अधिकचे पर्याय या यंत्रणेवर बसविता येतात. या प्रणालीद्वारे एकापेक्षा अधिक फर्टिगेशन युनिट चालवायेच असतील, तर कंट्रोलर एवेजी हॉर्टी मॅक्सी सीएक्स 500 सारख्या संगणकाचा वापर करावा लागतो.

विविध भाषामध्ये वापरता येते प्रणाली
- थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, चीन आणि भारतीय भाषांमध्ये स्वयंचलित प्रणालीच्या सुचना वापरता येतात.
- प्रति व्हॉल्व उचलले जाणारे पाणी स्वयंचलित प्रणालीद्वारे ठरवता येते. तसेच पाण्याचा इसी व पीएच ही ठरवता येतो.
- हरितगृहामध्ये योग्य प्रमाणात योग्य दर्जाचे पाणी पोचण्यासाठी अतिरिक्त इसी व पीएच चे संवेदक लावणे शक्य आहे.  
- ही प्रणाली ऑगस्ट महिन्यामध्ये आशियातील बाजारात आणण्यात येणार असून, बॅकॉंक येथे झालेल्या हॉर्टी फेअरमध्ये लोकांनी या उत्पादनाविषयी उत्सुकता दाखवल्याचे जनमात यांनी सांगितले.


पावडरी मिल्ड्यू पुनरूत्पादनाचा दुसरा पर्यायही ठेवतात खुला

पावडरी मिल्ड्यू पुनरूत्पादनाचा दुसरा पर्यायही ठेवतात खुला

अलैंगिक पद्धती अधिक फायदेशीर असली तरी भविष्यातील बदलांसाठी बुरशी राहतात सज्ज

भूरी (पावडरी मिल्ड्यू) ही बुरशी जनुकिय दृष्ट्या आपल्या यजमान पिकांशी अत्यंत घट्टपणे जोडलेली असते. पुराव्यांचा विचार केल्यास लैगिंक पुनरुत्पादन आणि जनुकिय घटकांचे नवीन मिश्रण हे बुरशींसाठी तोट्यांचे ठरते. त्यामुळे ही बुरशी प्रामुख्याने अलैगिंक पद्धतीने पुनरुत्पादन करत असली तरी स्वित्झर्लंड येथील झुरीच विद्यापीठ आणि जर्मनी येथील मॅक्स प्लॅंक पीक पैदास संशोधन संस्थेतील संशोधकांना पावडरी मिल्ड्यू या बुरशीं लैगिंक पुनरूत्पादनाचा दुसरा पर्यायही खुला ठेवत असल्याचे दिसून आले आहे.

गहू आणि बार्ली पिकावरील पावडरी मिल्ड्यूचा झाला अभ्यास
पावसाळ्याच्या वातावरणामध्ये भुरी (पावडरी मिल्ड्यू) रोगाचा प्रादुर्भाव अनेक पिकावर दिसून येतो. त्यामुळे दरवर्षी गहू आणि बार्लीसारख्या पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. झुरीच विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रज्ञ बीट केलर आणि थॉमस विकर आणि त्यांच्या गटाने स्वित्झर्लंड, इंग्लंड, आणि इस्राइल येथील गहू पिकावर आढळणाऱ्या पावडरी मिल्ड्यूच्या विविध प्रजातीच्या जनुकिय घटकांचे विश्लेषण केले आहे. तसेच बार्ली पिकावरील मिल्ड्यूच्या जनुकिय घटकांचे विश्लेषण मॅक्स प्लॅंक पीक पैदास संशोधन संस्थेतील पॉल शुल्झ लेफर्ट यांच्या गटाने केले आहे. ही संशोधने अनुक्रमे नेचर जेनेटिक्स आणि प्रोसिंडीग्स ऑफ द नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्स ( पीएनएएस) या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आली आहेत.
या संशोधनामध्ये यजमान आणि रोग यांच्यातील सहउत्क्रांतीचा इतिहास उलगडण्यात आला आहे. तसेच अलैगिंकरीत्या पुनरूत्पादनामध्ये मिल्ड्यूला अनपेक्षीत यश मिळाले आहे. या संशोधनातील माहितीमुले गह आणि बार्ली पिकांच्या इतिहासासह त्यांचे मिल्ड्यूशी असलेले संबंधाबाबत नवीन माहिती उपलब्ध झाली आहे. अलैंगिकरीत्या तयार झालेली वाढ ही अधिक यशस्वी असते.

बुरशींसाठी अलैंगिक पुनरूत्पादन अधिक फायदेशीर...तरिही
- सर्व बुरशींप्रमाणे पावडरी मिल्ड्यू ही दोन प्रकारे पुनरूत्पादन करू शकते. लैगिंक पद्दतीमध्ये जुनकिय घटकांचे नवीन मिश्रण तयार होते, तर अलैंगिक पद्धतीत माता आणि त्याचे पिलू एक समान जनुकांचे असतात या दोन्ही पद्दतीचे यशअपयश एकसारखेच असल्याचे आता संशोधक मान्य करतात. दर शतकागणिक मिल्ड्यू बुरशी ही अलैंगिक आणि लैंगिक पद्धतीने पुनरूत्पादन करत असल्याचे संशोधन विकर यांनी सांगितले.
- यजमान पिकांवर प्रादुर्भाव करण्यासाठी मिल्ड्यू बुरशींना पिकांची प्रतिकारक यंत्रणा यशस्वीपणे भेदावी लागते. त्यानंतर परजिवी यजमानाकडून ग्राह्य होतो. .
- परजिवी आणि यजमान अवस्थेमध्ये दरवेळी नवे जनुकांचे मिश्रण यजमानांकडून ग्राह्य होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्या तुलनेत अलैंगिक पद्धतीने एक समान जनुकिय गुणधर्माची पिल्ले त्याच यजमानावर वाढण्यामध्ये अधिक यशस्वी ठरतात.
- शुल्झ -लेफर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, गहू, बार्ली मिल्ड्यूची अलैंगिक पद्धतीने तयार झालेली पिल्ले ही लैगिंक पद्धतीने जन्मलेल्या पिल्लापेक्षा अधिक यशस्वी ठरतात. ही पद्धती अनेक बुरशींसाठी यशस्वी प्रारूप आहे.

युद्धासाठी राखून ठेवली जातात शस्त्रे
- 10 हजारवर्ष पूर्वीपासून गव्हाच्या प्राचीन जातीवर परजिवी पद्धतीने वाढते. या पिकामध्ये प्रदीर्घ काळापर्यंत मिल्ड्यूला दूर ठेवण्यासाठी फारसे जनुकीय बदल झाले नाहीत. मात्र पिकामध्ये कधीही असे बदल होऊ शकतात. त्या वेळी बुरशींना पूनरूत्पादनासाठी लैंगिक पद्धती अधिक उपयुक्त ठरू शकते. युद्धामध्ये दोन्ही बाजूंकडून आपले शस्त्रे योग्य वेळ येताच वापरण्यासाठी राखून ठेवलेली असतात. पीक आणि बुरशीं यांच्यामधील या एकप्रकारच्या युद्धामध्येही पावडरी मिल्ड्यू आपला दुसरा पर्याय राखून ठेवत असल्याचे दिसून आले आहे. त्या बाबत विकर यांनी सांगितले, की भविष्यात गहू पिकामध्ये मिल्ड्यूसाठी प्रतिकारक यंत्रणा विकसित झाली, तर या बुरशीलाही आपल्यामध्ये जनुकिय बदल करणे आवश्यक होईल. त्यावेळी लैंगिक पद्धतीने पुनरूत्पादनाने होणारी जनुकांची मिश्रणे फायद्याची ठरतील.
- गेल्या काही दशलक्ष वर्षामध्ये अनेक वेळा मिल्ड्यूच्या विविध जातीमध्ये लैंगिक पद्धतीने जनुकांचे वहन आणि मिश्रणे झाल्याचे पुरावे दिसून येतात. त्यातून नव्या जाती विकसित होऊन गहू पिकावर हल्ला करतात.
- या प्रकारच्या मिल्ड्यूंच्या नवीन जातींच्या वहनासाठी प्राचीन काळात होणारा धान्यांचा व्यापारही काही प्रमाणात कारणीभूत असावा, असे संशोधकांचे मत आहे.


 
फोटो ः लहान गहू रोपांवर झालेला भूरी रोगाचा प्रादुर्भाव (स्रोत ः झुरीच विद्यापीठ )

जर्नल संदर्भ ः
1) Thomas Wicker, Simone Oberhaensli, Francis Parlange, Jan P Buchmann, Margarita Shatalina, Stefan Roffler, Roi Ben-David, Jaroslav Doležel, Hana Šimková, Paul Schulze-Lefert, Pietro D Spanu, Rémy Bruggmann, Joelle Amselem, Hadi Quesneville, Emiel Ver Loren van Themaat, Timothy Paape, Kentaro K Shimizu, Beat Keller. The wheat powdery mildew genome shows the unique evolution of an obligate biotroph. Nature Genetics, 2013; DOI: 10.1038/ng.2704
2) S. Hacquard, B. Kracher, T. Maekawa, S. Vernaldi, P. Schulze-Lefert, E. Ver Loren van Themaat. Mosaic genome structure of the barley powdery mildew pathogen and conservation of transcriptional programs in divergent hosts. Proceedings of the National Academy of Sciences, 2013; 110 (24): E2219 DOI: 10.1073/pnas.1306807110

साध्या भाषेतही लिहीता येतील संगणक प्रणाली

साध्या भाषेतही लिहीता येतील संगणक प्रणाली

साध्या भाषेचे संगणकांच्या कोडमध्ये रुपांतर करणारी दोन संशोधने प्रकाशित

संगणकाच्या विविध प्रणाली बनविण्यासाठी संगणकांच्या विशिष्ट कोडयुक्त भाषांचा वापर केला जातो. या भाषा खास शिकाव्या लागतात. त्यामुळे आपल्या गरजेनुसार एखादे सॉफ्टवेअर (संगणकिय प्रणाली) तयार करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागत असे. हे अत्यंत खर्चिक काम असल्याने अनेक कल्पना मागे पडत. मात्र आता साध्या भाषेतही संगणकांच्या प्रणाली लिहिणे शक्य होणार आहे. एमआयटी येथील संगणकशास्त्र आणि कृत्रिम बुद्धीमत्ता प्रयोगशाळेतील संशोधकांनी साध्या भाषेचे रुपांतर संगणकाच्या भाषेत करणारी दोन संशोधने नुकतीच प्रकाशित केली आहेत.

संगणक प्रणाली विकसित करणाऱ्या लोकांनाही याचा चांगला फायदा होणार आहे. कारण संगणकांच्या विविध कोड असलेल्या भाषा असून, एका प्रकारामध्ये केलेले काम दुसऱ्या प्रकारातून दुरस्त ही करता येत नसे. ते आता सहजपणे दुरुस्त करणे, बदल करणे शक्य होणार आहे. अर्थात संगणकिय प्रणाली विकसनातील प्रत्येक काम या पद्धतीने करता येणार नसले तरी छोट्या कामासाठी ही पद्धती अधिक उपयुक्त ठरणार असल्याचे संशोधिका रेगिना बारझिले यांनी सांगितले.  ही सुरवात मानली तर भविष्यात साध्या भाषेचे रुपांतर संगणकांच्या भाषेत सहजतेने करता येऊ शकेल.

ही संशोधने उत्तर अमेरिकेमध्ये जून महिन्यात झालेल्या संगणकिय भाषा संघटनेच्या परिषदेमध्ये सादर करण्यात आली.
- बारझिले आणि त्यांचा विद्यार्थी नेट कुशमन यांनी इंटरनेटवर काही उदाहरणे घेऊन साध्या भाषेचे रुपांतर संगणकिय भाषेमध्ये करण्यासाठी संशोधन केले आहे. त्यांनी काही चिन्हाच्या साह्याने प्रमाणित संगणकांच्या डेस्कटॉपवर असलेल्या शोध प्रक्रियांना पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
- दुसऱ्या संशोधनामध्ये बारझिले आणि त्यांचा दुसरा विद्यार्थी तावो लेई यांनी विद्यूत अभियांत्रिकी आणि संगणक शास्त्र विभागाचे मार्टिन रिनार्ड व त्यांचे विद्यार्थी फॅन लॉंग यांच्या सहकार्य़ांने विविध प्रकारच्या फाईल फॉरमॅटमधील माहितीच्या साठा स्वयंचलितपणे समजून घेण्यासाठी एक संगणकिय पद्धती विकसित केली आहे.

------------------------------------------
नेट कुशमन यांनी सांगितले, की

वेतानंतरचा दाह गायींच्या दुध निर्मिती प्रक्रियेत ठरतो महत्त्वाचा


वेतानंतरचा दाह गायींच्या दुध निर्मिती प्रक्रियेत ठरतो महत्त्वाचा

सूज, दाह किंवा वेदना म्हणटले की आपल्या मनात एक नकारात्मक भावना येते. मात्र कान्सास राज्य विद्यापीठातील संशोधकांना दुधाळ गाईंच्या पहिल्या वेतानंतर नैसर्गिकरीत्या होणारी वेदना किंवा दाह आश्चर्यकारकपणे उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. ही वेदना उशीरा झालेली प्रसुती आणि दुध येण्याचा कालावधीमधील अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रियेसाठी कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे.

गाईच्या वेतानंतर पहिल्या काही दिवसामध्ये आणि दुध येण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या टप्प्यावर दुधाळ गायींना काही प्रमाणात दाह होतो. तसेच याच टप्प्यावर अन्य काही विकृती, केटॉसिस आणि अधिक मेदयुक्त यकृतासारख्या काही रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
मात्र या दाहाची नेमकी भुमिका काय हे शोधण्याच्या उद्देशाने कान्सास, आयोवा आणि मिसिगन राज्य विद्यापीठातील संशोधकांसह संशोधन सुरू केले.
संशोधनाबाबत माहिती देताना प्राणी शास्त्र आणि औद्योगिक विभागातील संशोधक बॅरी ब्रॅडफोर्ड म्हणाले, की या अभ्यासामुळे वेदनाचा मार्ग तात्पुरत्या उन्सुलीन प्रतिरोधाला प्रोत्साहन देत असल्याचे समजले. त्यामुळे ग्लुकोजची साठवणूक दुध ग्रंथीमध्ये होते. मात्र वेदनेमुळे तयार होणारा इन्सुलीन प्रतिरोध काही वेळेला स्विकारार्ह असून रोगामुळे होणारी वेदनेपेक्षा चांगला असतो. अर्थात या अभ्यासामुळे वेदना आणि शरीरातील प्रक्रिया यांच्यातील संबंधांचा उलगडा होण्यास मदत होईल. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत वेदनेची भुमिकाही स्पष्ट होऊ शकेल. अर्थात ही प्रक्रिया गाईंच्या इच्छेनुसार होत नाही. शरीराच्या गरजेनुसार हे बदल होतात. उत्क्रांतीमध्ये प्रतिकारक यंत्रणेतील वेदना आणि दाह यांचे स्थान आणि शरीरातील अन्य प्रक्रियांचा यांच्या संबंधी अधिक अभ्यास होण्याची आवश्यकता आहे.
हे संशोधन अमेरिकन जर्नल ऑफ फिजियालॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

गृहितक आणि अभ्यासाचे निष्कर्ष
दाह कमी केल्यास काही चयापचयाच्या रोगांना प्रतिबंध कऱणे शक्य होईल या गृहितकानुसार अभ्यास करण्यात आला. त्यासाठी दाह कमी करणाऱ्या औषधांचा वेतानंतर पहिल्या सात दिवसामध्ये वापर केल्यास यकृताची मेदयुक्त सूज आणि दुध बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक ग्लुकोजचा पुरवठा वाढेल असा अंदाज होता.  हे औषध जनावरांना त्यांच्या पिण्याच्या पाण्यातून देण्यात आले. मात्र अपेक्षित निष्कर्ष मिळाले नाहीत. उलट कमी प्रमाणात होणारा दाह हा गायांच्या दुध देण्याच्या टप्प्यावरील महत्त्वाचा व आवश्यक भाग असल्याचे दिसून आले.
- यकृताचा दाह कमी करण्यासाठी दाह कमी करणारी औषधे दिल्यानंतर यकृतातील मेदाचे प्रमाण दुध देण्याच्या पहिला आठवड्यात वाढले.
- दाह कमी करणारे उपचारामुळे प्रौढ गाईंमधील ग्लाझ्मा ग्लुकोजचा घट्टपणा लक्षणीयरीत्या कमी झाला.
- या दोन्ही प्रक्रिया लवकर दुध देणाऱ्या गाईंमधील चयापचयाच्या रोगासाठी कारणीभूत असल्याचे दिसून आले.



कोट ः
वेतानंतर होणारा काही प्रमाणातील दाह हा शरीरासाठी एक प्रकारे गीअरसारखे कमा करतो. या प्रक्रियेमुळे शरीर दुध निर्मिती आणि प्रतिकारतेसाठी वेगाने कामाला लागते. त्यामुळे या दाहाला रोगाचे लक्षण मानण्याची आवश्यकता नाही. उलट हे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे.
- बेरी ब्रॅडफोर्ड, संशोधक, कान्सास राज्य विद्यापीठ

जर्नल संदर्भ ः
Jaymelynn K Farney, Laman K Mamedova, Johann F Coetzee, Butch Kukanich, Lorraine M Sordillo, Sara K Stoakes, J. Ernest Minton, Larry C. Hollis, And Barry Joseph Bradford. Anti-inflammatory salicylate treatment alters the metabolic adaptations to lactation in dairy cattle. American Journal of Physiology: Regulatory, Integrative and Comparative Physiology, 2013 DOI: 10.%u200B1152/%u200Bajpregu.%u200B00152.%u200B201

ओरेगॉनमध्ये आढळली नवी जंगली स्ट्रॉबेरी जात

ओरेगॉनमध्ये आढळली नवी जंगली स्ट्रॉबेरी जात

स्ट्रॉबेरीची नवी जंगली जात ओरगॉन येथील वाल्डो तलावाच्या परिसरामध्ये आढळली आहे. या जंगली जातीमध्ये नवीन जनुकिय माहितीचा साठा असल्याने वनस्पती संशोधनासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे अमेरिकी कृषी विभागाच्या संशोधकांनी सांगितले. तसेच  आणि विविध रोगासाठी प्रतिकारक व नवीन स्वादाच्या नव्या जाती व्यावसायिकरीत्या विकसित करण्यासाठी ही जनुके महत्त्वाची ठरतील.
कोरव्हॅलिस येथील नॅशनल क्लोनस जर्म प्लाम्झ रिपॉझिटरी आणि कृषी संशोधन संस्थेतील संशोधिका किम हमर यांना ओरेगॉन येथे कॅसकेड डोंगरांच्या परिसरामध्ये वनस्पतींचे नमुने गोळा करताना स्ट्रॉबेरीची नवी जात सापडली आहे. त्यांनी या जातीला प्रागारिया कॅसकॅडेन्सिस (Fragaria cascadensis) असे नाव दिले आहे.
ही जात कोरव्हॅलिस येथील नॅशनल क्लोनस जर्म प्लाम्झ रिपॉझिटरी च्या जिवंत संग्रहामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या ठिकाणी फळे आणि विविध पिकांच्या जनुकिय स्रोतांचा  संग्रह केला आहे. या जाती बाबत माहिती देताना हमर यांनी सांगितले, की या जाती क्रोमोसोम्समध्ये जनुकांचे प्रमाण अधिक असल्याने संकरासाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. अन्य F. vescana आणि जंगली रसियन जात F. iturpensis  प्रमाणे या जातीचाही संकर फायदेशीर ठरू शकतो. रोग प्रतिकारकता, स्वादामध्ये सुधारणा आणि अन्य गुणधर्मामध्ये बदल घडवता येतील. हा नव्या स्ट्रॉबेरी जातीचा शोध जर्नल ऑफ बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ टेक्सास मध्ये नोंदवला गेला आहे. या संशोधनाविषयी अधिक माहिती ऍग्रीकल्चल रिसर्च मॅगेझीन च्या जुलैच्य अंकामध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

नवी जातीची वैशिष्ट्ये
- झुडूप वर्गीय वनस्पती असून फुलांचा रंग पांढरा आणि पानांचा रंग हिरवा आहे.
- पानांच्या वरच्या बाजूला लव असून या परिसरातील अन्य स्ट्रॉबेरी जातीमध्ये अशी लव पानावर आढळत नाही.
- स्वल्पविरामाच्या आकाराचची लहान तपकिरी फळे येतात.
- या जातीमध्ये क्रोमोसोम्सचे 10 सेट असून व्यावसायिक जातीमध्ये फक्त आठ सेट आढळतात.

कोठे आढळते ही जात
- ही स्ट्रॉबेरीची जात ओरेगॉन कॅसकेडच्या परिसरामध्ये उत्तरेच्या कोलंबिया नदीपासूनदक्षिणेतील क्रेटर तलावापर्यंत पसरलेली आढळून येते. साधारण 3 हजार फूट उंचीवर दिसून येते. हा सारा परिसर वार्षिक 12 ते 15 इंच सरासरी पर्जन्यांचा आहे. मात्र दक्षिणेतील काही भागामध्ये वार्षिक सहा इंचाचा पाऊस असूनही ही जात आढळून येते.

फोटो ः स्ट्रॉबेरीची नवी जात (Fragaria cascadensis). या जातीच्या फुलदांड्याची लांबी वेगवेगळी असल्याचे दिसून आले आहे.

आता रक्तवाहिन्या ठरतील परवलीचा शब्द

आता रक्तवाहिन्या ठरतील परवलीचा शब्द

उच्च सुरक्षेसाठी अंगठ्याचा ठसा, डोळ्यांची बाहुली किंवा पासवर्ड सारेच पडणार मागे

 पुर्वी आपली ओळख म्हणून सही किंवा अंगठ्याचा ठसा उपयुक्त होता. आता डिजीटल युगामध्ये आपल्या माहितीची सुरक्षा करण्यासाठी पासवर्ड किंवा परवलीचा शब्द वापरला जातो. त्याहीपुढे जात बायोमेट्रीक ओळख म्हणून हाताची बोटे आणि डोळ्यांतील बाहुलीचे मापन केले जाऊ लागले. मात्र येत्या काही दिवसात या साऱ्या कल्पना मागे पडण्याची शक्यता आहे. आपल्या चेहऱ्याच्या त्वचेखालील रक्तवाहिन्यांचा नकाशा स्कॅनिंगद्वारे टिपला जाणार असून, त्याचा वापर चेहऱ्याची ओळख म्हणून वापरण्याची कल्पना पुढे येत आहे. रक्त वाहिन्यांच्या नकाशाची नक्कल कोणत्याही परिस्थितीत करता येणार नसल्याचा दावा कोलकत्ता येथील जादवपूर विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने केला आहे. त्यांनी आपले हे इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॉम्प्यूटेशनल इंटेलिजन्स स्टडीज च्या अंकात प्रकाशित होणाऱ्या लेखात केला आहे.

कोलकत्ता येथील जादवपूर विद्यापीठातील अयन सील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चेहऱ्यांच्या त्वचेखालील रक्तवाहिन्यांच्या अवरक्त किरणांच्या साह्याने स्कॅनिंग केले आहे. या स्कॅनिंग द्वारे  अत्यंत सूक्ष्म अशा रक्तवाहिन्यांचा 97 टक्क्यांपर्यंत अचूक नकाशा मिळवणे शक्य आहे. त्याचे संगणकिय गणिती प्रक्रियेने विश्लेषण केले असून या थर्मोग्राम स्कॅनचा वापर उच्च सुरक्षा अपेक्षित असलेल्या ठिकाणी करणे शक्य आहे.

सध्या वापरल्या जाणाऱ्या सुरक्षा पद्धतीमध्ये नक्कल करणे शक्य असते. हाताचे ठसे, डोळ्यांची बाहुली यामध्ये खोटे ठसे किंवा लेन्सच्या वापरातून सुरक्षा भेदणे शक्य असते. मात्र चेहऱ्याच्या त्वचेआतील रक्तवाहिन्यांची नक्कल कोणत्याही प्रकारे करता येणार नसल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

Journal Reference:
Ayan Seal, Suranjan Ganguly, Debotosh Bhattacharjee, Mita Nasipuri, Dipak Kr. Basu. Automated thermal face recognition based on minutiae extraction. International Journal of Computational Intelligence Studies, 2013

---

रडण्याची भाषा उलगडणारे साधन विकसित

रडण्याची भाषा उलगडणारे साधन विकसित

नवजात बालकांच्या रडण्याचे विश्लेषण करणे होणार सोपे,
मेंदू आधारीत विकाराचा अंदाज येणार लवकर

अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठ आणि रोड्स आयसलॅंड येथील महिला व बालरूग्ण हॉस्पीटल येथील संशोधकांनी नवजात बालकांच्या रडण्याचे विश्लेषण करण्यासाठी नवे साधन विकसित केले आहे. या साधनामुळे मेंदूविषयक विकाराचा अंदाज लवकर मिळणार असून, बालकांच्या आरोग्याबाबत किंवा त्यांच्या वाढीबाबतच्या समस्यावर उपचार करणे सुलभ होणार आहे. हे संशोधन जर्नल ऑफ स्पीच, लॅंग्वेज ऍण्ड हिअरींग रिसर्च मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

लहान बालकांसाठी केवळ रडणे हीच भाषा असते. भूक लागली, काही त्रास झाला किंवा कोणतीही बाब सांगण्यासाठी बालके रडतात. या रडण्यामध्ये अत्यंत सूक्ष्म असा फरक असतो. मानवी कानांना हा फरक बऱ्याच वेळा लक्षात येतोच, असे नाही. त्यामुळे बाळाचे प्रत्येक रडणे त्यांच्या मात्यापित्याला काळजीत टाकत असते. तसेच बालक जे काही रडण्यातून सांगू पाहत आहे, ते समजू न शकल्यास आरोग्याबाबत समस्या वाढून त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होऊ शकतो.
त्यामुळे बालकांच्या रडण्याचे योग्य प्रकारे विश्लेषण करण्यासाठी ब्राऊन विद्यापीठातील संशोधकांनी प्रयत्न सुरू केले. त्यांनी संगणकाधारीत रडण्याच्या आवाजाचे विश्लेषण करणारे साधन तयार केले आहे. या बाबत माहिती देताना ब्राऊन विद्यापीठातील मानसशास्त्र आणि मानवी वर्तन विषयक संशोधक स्टिफन शेइनकॉफ यांनी सांगितले, की प्रसुतीच्या वेळी झालेली अंतर्गत इजा यामुळे बालकाच्या मेंदूमध्ये काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. जन्मानंतरचे बाळाचे रडण्याचे विश्लेषण करणे शक्य झाल्यास मेंदू आणि चेतापेशींशी संबंधित गुंतागुंतीचा त्वरीत वेध घेणे शक्य होईल. जन्मानंतरच्या रडण्यामधील अत्यंत सूक्ष्म असे बदल टिपून त्याचे विश्लेषण करण्यासाठी गेली दोन वर्षे प्रयत्न करण्यात आले आहे.
--------------------
असे काम करते हे साधन
पहिला टप्पा ः- जन्मानंतरचे बालकांचे रडणे रेकॉर्ड केले जाते. या रेकॉर्डचे 12.5 मिलीसेंकदाच्या तुकड्यामध्ये (फ्रेम्स) विभाजन केले जाते. या प्रत्येक तुकड्याचे वारंवारीता. आवाज, आवाजाची प्रत अशा अनेक गुणधर्माच्या कसोट्या लावल्या जातात.
दुसरा टप्पा ः- पहिल्या टप्प्यातील माहितीच्या आधारे दुसऱ्या टप्प्यामध्ये आवश्यक ते आवाजाचे नमुने वगळून अन्य भागावर लक्ष केंद्रित केले जाते. रडण्यातील अडथळ्याबाबत किंवा मध्ये थांबण्याबाबत विचार केला जातो. या आवाजातील वेळ मोजला जातो. आवाजाची पातळी आणि एकूण वेळेसाठी आवाजाच्या पातळीमध्ये होणारे बदल यांचा अन्य बदलासोबत मेळ घालत त्याचा सरासरी काढली जाते.
तिसरा टप्पा ः बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेल्या 80 विविध घटकांसाठी आवाजाचे विश्लेषण केले जाते. प्रत्येक घटक आरोग्याशी जोडून ताडून पाहण्यात येतो.
-----------------------
कोट ः
बाळाचे रडणे जाणून घेऊन त्या आवाजाचे विश्लेषण आणि त्याचा आरोग्याशी असलेला संबंध जाणून घेण्यासाठी उपयुक्त साधन विकसित करण्यावर आमचा भर होता. रडण्याच्या आवाजाचे सिग्नल आपल्याला जे काही सांगू पाहत आहेत, त्यांना ओळखणारे साधन तयार केले आहे.

-हार्वे सिल्व्हरमॅन, प्राध्यापक व संचालक, मानव- यंत्र पद्धती अभियांत्रिकी प्रयोगशाळा, ब्राऊन विद्यापीठ.
-----------------------
मेंदूशी संबंधीत विकाराचा अंदाज येणार लवकर
 शेइनकॉफ हे विकृती निर्माण होण्याच्या प्रक्रियेवर विशेष अभ्यास करत आहे. बालकांमध्ये निर्माण होणाऱ्या ऑटिझमसारख्या विकृतीचा अंदाज घेण्यासाठी या साधनाचा वापर करीत आहेत. ते म्हणाले, की ऑटीझम विकृती असलेल्या प्रौढामध्ये आवाज हा वेगळा किंवा सामान्य नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बालकांचा आवाजावरून या विकृतीची ओळख पटविणे शक्य होईल. अर्थात हे अवघड असले तरी अशक्य नाही.
-----------------------
इथे रडण्याचाही होतो अभ्यास
- गेल्या अनेक वर्षापासून लिस्टर हे बालकांच्या रडण्याचा अभ्यास करत आहे. लिस्टर यांनी या आधी बालकांच्या रडण्यावर कुपोषण, औषधांचे व अन्य धोक्यांचे होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला आहे. असे अनेक संशोधन पेपर त्यांनी प्रकाशित केले आहेत. आवाजाचे विश्लेषण करणारे साधन निर्मितीसाठी हा अनुभव कामी आला
- लिस्टर यांनी सांगितले, की 1960 मध्ये या संशोधनाची मुळे रूजली आहेत. क्राय ड्यू चॅट सिंड्रोम ( मांजराचे रडणे) ही विकृती जनुकिय कारणामुळे येते. ज्या बालकांचे रडणे अतिदीर्घ व उच्च स्वरात असते, त्यामुळे कोणत्याही यंत्राशिवाय हे वेगळेपण लक्षात येते.
- रडणे ही मेंदूशी जोडलेली एक खिडकी असल्याची कल्पना करण्यात आली. जर बालकाच्या मेंदूमध्ये काही गुंतागुंत असेल, तर आवाजावर नियंत्रण ठेवण्यामध्ये अत्यंत सूक्ष्म असे बदल होणे अपेक्षित असते. आवाजाच्या पातळीमध्ये व अन्य घटकामध्ये बदल हे थोडक्यात आरोग्याशी जोडलेले असतात.

जर्नल संदर्भ ः
B. Reggiannini, X. Li, H. F. Silverman, S. J. Sheinkopf, B. M. Lester. A Flexible Analysis Tool for the Quantitative Acoustic Assessment of Infant Cry. Journal of Speech, Language, and Hearing Research, 2013; DOI: 10.1044/1092-4388(2013/11-0298)

फोटोओळ ः नवजात बालक रडण्यातून अनेक गोष्टी सांगत असते, मात्र आता विकसित झालेल्या साधनामुळे या रडण्यातून आरोग्याविषयीही माहिती मिळू शकेल. (स्रोत ः माईक कोहिया, ब्राऊन विद्यापीठ)

स्थानिक शेतकऱ्यांचे मार्केट ठरतेय आर्थिक कणा


 स्थानिक शेतकऱ्यांचे मार्केट ठरतेय आर्थिक कणा

ब्रिटीश कोलंबिया येथील शेतकरी मार्केटचा झाला आर्थिक अभ्यास

कॅनडा देशातील ब्रिटीश कोलंबियाच्या उत्तर भागामध्ये शेतकऱ्यांचे मार्केट ही संकल्पना चांगल्या प्रकारे रुजली असून संपुर्ण ब्रिटीश कोलंबियमध्ये अशा बाजाराच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. दरवर्षी या बाजारात 170 दशलक्ष डॉलरची उलाढाल होत असून स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये मोलाची भर पडत असल्याचे ब्रिटिश कोलंबिया शेतकऱ्यांचे मार्केट असोशिएशन आणि उत्तर ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातील संशोधक डॉ. डेव्हिड कॉन्नेल यांनी केलेल्या सामाजिक आणि आर्थिक फायद्यांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होत असून, ग्राहकांना ताजे व शुद्ध उत्पादने मिळण्याची खात्री होत आहे.
या बाबत माहिती देताना शेतकरी संस्थेचे अध्यक्ष जॉन बेला यांनी सांगितले, की ग्राहकांनाही शेतकऱ्यांच्या बाजारातून ताजा व स्थानिक शेतीमाल मिळण्याची खात्री असल्याने 2006 पासून सुरू असलेल्या बाजारापेठेची वाढ वेगाने होत आहे. 2006 मधील उत्पादनाच्या विक्रिच्या तुलनेत 2012 मध्ये बाजारपेठ 147 टक्क्यांनी वाढलेले आहे.

डॉ. डेव्हिड कॉन्नेल यांनी सांगितले, की या आधी 2006 मध्ये आम्हीच केलेल्या अभ्यासाच्या आधारावर हा समान अभ्यास करण्यात आला. स्थानिक अन्न पद्धतीची लोकप्रियता वाढतानाच नव्या शेतकऱ्यांसाठी मागणी वाढविण्याची गरज आहे. त्यातून स्थानिक शेतीमालासाठी शेज जमिनीची उपलब्धता वाढेल.  या पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित करते.
------------------------
ग्राहकांचा वाढता प्रतिसाद
- शेतकऱ्यांच्या बाजारात 62 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- या अभ्यासात 33 शेतकरी मार्केटमधील महिन्यातून किमान दोन ते तीन वेळा भेट देणाऱ्या सुमारे 9800 ग्राहकांचा अभ्यासात समावेश होता.
- या खात्रीशीर ग्राहकांच्या जोरावर बाजाराला स्थैर्य शेतकरी आणि विक्रेत्याना मिळते.
- तसेच सुमारे 20 टक्के नव्याने भेट देणाऱ्या ग्राहकांमुळे ग्राहकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
----------------------------
कोट ः
हे शेतकऱ्याचे मार्केट ब्रिटीश कोलंबियातील कृषी क्षेत्राचा आरसा बनत आहे. त्यामध्ये संख्येने आणि गुणवत्तेने वाढ होत आहे. या लोकांनी शेती व्यवसायात किती वाड केली, यापेक्षा त्यांनी शहरे, शेजारील स्थानिक पातळीवर केलेले योगदान महत्त्वाचे आहे.
-एलिझाबेथ क्वेन्न, कार्यकारी संचालिका, ब्रिटिश कोलंबिया शेतकऱ्यांचे मार्केट असोशिएशन
-----------------------
या बाजारातील मालाला प्राधान्य देण्याची पाच महत्त्वाची कारणे (ग्राहकांनी दिलेल्या रेटिंगनुसार)
- पोषक अन्नद्रव्ययुक्त शेतीमाल
- ब्रिटीश कोलंबियामध्ये पिकवलेला माल
- हंगामी मालाची उपलब्धता
- स्थानिक रीत्या पिकवलेला माल
- शेती उत्पादनामध्ये प्राण्याचे योगदान
------------------
ग्राफ तयार करण्यासाठी
शेतकरी बाजारात होत गेलेली वाढ
आर्थिक मुद्दे --2006--2012--वाढ (टक्केमध्ये)
1. बाजारात माल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या --98--159--62.24
2. ग्राहकांनी खर्च केलेली सरासरी रक्कम-- 23.41डॉलर--28.81 डॉलर--23.07
3. एकूण प्रत्यक्ष विक्री--46.02 दशलक्ष डॉलर--113.69 दशलक्ष डॉलर--147.16
4. एकूण प्रत्यक्ष आर्थिक फायदा--69.00 दशलक्ष डॉलर--170.54 दशलक्ष डॉलर-- 147.16
-------------------------------------------------------------------
ग्राहकांच्या शेतकरी मार्केटला होणाऱ्या भेटी
वाय अक्षावर--ग्राहकांची संख्या (टक्केमध्ये)
एक्स अक्षावर--प्रथम येणारे 19 --कधीतरी येणारे (वर्षातून एकदा) 6--वर्षातून 2-3 वेळा येणारे ग्राहक 12 --महिन्यातून एकदा येणारे ग्राहक 11--महिन्यातून 2-3 वेळा येणारे 20--प्रत्येक आठवड्याला येणारे 31

साधारणतः निम्मे ग्राहक हे महिन्यातून दोन ते तीन वेळा शेतकरी बाजारला भेट देतात.
----------------------------------------------------
अन्य बाजारपेठेवर होणारा परिणाम
- 54.7 टक्के - शेतकरी मार्केटशेजारी अन्य दुकानातून खरेदी करत असल्याचे इतक्या लोकांनी सांगितले.
- 60 टक्के -शेजारील अन्य उद्योगांचा शेतकरी मार्केटवर चांगला परिणाम होत असल्याचे सांगितले.
- 80 टक्के - लोकांनी सांगितले, की त्या भागाला भेट देण्याचे मुख्य कारण शेतकरी मार्केट हे असते.
------
शेतकरी मार्केटचे खात्रीशीर, दीर्घकालीन ग्राहक
मुद्दा--ग्राहकांची संख्या (टक्के)
1. दहा वर्षापेक्षा अधिक काळापासून भेट देणारे--21.9
2. 2003 ते 2007 या कालावधीत--21.2
3. 2008 ते 09 या कालावधीत-16.7
4. 2010- 8.5
5. 2011-9.1
6. 2012- 22.7

शेतीमाल टिकविण्यासाठी फोटोकॅटलिसिस पद्धती अधिक उपयुक्त

शेतीमाल टिकविण्यासाठी फोटोकॅटलिसिस पद्धती अधिक उपयुक्त

साठवणीतील फळे व भाज्या टिकविण्यासाठी इथीलीन वायू तयार होणे रोखण्यासाठी फोटोकॅटलिसिस ही पद्धती अधिक उपयुक्त ठरत असल्याचे फ्रान्स येथील स्ट्रासबोर्ग विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या तुलनात्मक अभ्यासातून दिसून आले आहे.
भाज्या, फळांच्या पिकण्यासाठी कारणीभूत ठरणारा इथीलीन वायू मुळे वेगाने भाज्या व फळे पिकतात. त्यामुले लक्षावधी रुपयांचे नुकसान होते. त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे तयार झालेला शेतीमाल खाण्यासाठी वापरता येत नाही. फ्रान्स येथील स्ट्रासबोर्ग विद्यापीठातील रसायन आणि ऊर्जा प्रक्रिया संस्थेतील संशोधक निकोलस केलर  आणि त्यांचे सहकारी मारी नोल्ले ड्यूकॅम्प, दीदीयर रॉब्रट आणि वेलेरी केलर यांनी या बाबत संशोधन केले आहे.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, काढणीनंतरही भाज्या किंवा फळे यांचे श्वसन सुरू असते. त्यांच्यामध्ये उथिलीन वायू तयार होतो. व हवेत सोडला जातो. हा वायू पिकण्याच्या किवा फुलांच्या बाबतीत फुलण्यासाठी उपयुक्त ठरतो. कच्ची फळे पिकवण्यासाठी आपण बऱ्याचवेळा फळे बंदिस्त जागेत किंवा हवाबंद ठिकाणी ठेवतो. मात्र हाच वायू फळे आणि भाज्या अधिक प्रमाणात पिकवून नासाडीला कारणीभूत ठरतो. विशेषतः साठवणीमध्ये किंवा प्रवासातील कंटेनरमध्ये इथीलीन वायूमुळे फळे, भाज्या अनावश्यकपणे पिकून खराब होतात. त्यामुळे इथीलीन वायूचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी सातत्याने संशोधन केले जाते. त्याच्या विविध पद्धतीही उपलब्ध आहेत. मात्र या पद्धतीपैकी चांगली व योग्य पद्धत शोधण्यासाठी केलर यांनी 300 पेक्षा अधिक संशोधनाचा पडताळा घेतला. तसेच त्यांचा तुलनात्मक अभ्यास केला. या अभ्यासाचे निष्कर्ष एसीएस जर्नल केमिकल रिव्ह्यूज मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

निष्कर्ष
- फोटोकॅटॅलिसीस ही पद्धती अधिक कार्यक्षम असल्याचे 300 पेक्षा अधिक संशोधनाच्या तुलनात्मक अभ्यासातून दिसून आले आहे. या पद्धतीमध्ये प्रकाश आणि उत्प्रेरकाचा एकत्रित वापर केला जातो. इथीलीन वायूचे रूपांतर कार्बन डाय- ऑक्साईड आणि पाण्यामध्ये केले जाते.
- या अभ्यासानुसार, फोटोकॅटॅलिसिस तंत्रज्ञानातून शेतीमालाची साठवणूक आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरते. सध्या वापरल्या जाणाऱ्या पद्धतीऐवजी फोटोकॅटॅलिसिस तंत्र अधिक उपयुक्त ठरू शकते.

खरबूज पिकल्याचे निदर्शक आहे बदलणारा रंग

खरबूज पिकल्याचे निदर्शक आहे बदलणारा रंग

योग्य रितीने पिकल्यावरच फळांचा रंग बदलणारी खरबूजाची नवी जात विकसित

एखादे फळ पिकल्याचे त्यांच्या रंगात होणाऱ्या बदलामुळे कळते. मात्र अनेक फळांच्या बाबतीत खाण्यासाठी योग्य फळ पिकले की नाही, याचा अंदाज येत नाही. फळांचा रंग बदललेला असूनही आतून फळ पिकलेले नसते. असाच प्रकार खरबूजाच्या बाबतीत अनेक वेळा घडतो. त्यावर युरोपमधील एका बियाणे उत्पादक कंपनीने नवी खरबूजाची जात विकसित केली असून, आतून फळ व्यवस्थितरीत्या पिकल्यानंतर त्याचा रंग बदलतो. त्यामुळे योग्य रीतीने पिकलेले फळ खाण्यास उपलब्ध होते.
या बाबत माहिती देताना कंपनीचे क्लाऊड गुरीयन यांनी सांगितले, की अनेक फळ ग्राहकांची फळांच्या पिकण्यासंदर्भात  अडचणी होत्या. त्या दूर करण्यात कंपनीला यश आले असून किरेने ही खरबुजाची जात आतून फळ पिकल्यानंतर हिरव्या रंगापासून पिवळ्या रंगामध्ये परिवर्तित होते. त्यामुळे बाजारात फळ पाठवितानाही योग्य वेळ निवडता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होते. या जातीमुळे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांनाही फळाची योग्य अवस्था कळणार नाही. सध्या या फळांचे उत्पादन स्पेनमध्ये घेतले जात असून इंग्लंड, नेदरलॅंड, आणि जर्मनीमध्येही लागवड वाढत आहे.

किरेने जातीची वैशिष्ट्ये
- या फळांचा रंग आतून व्यवस्थितरीत्या पिकल्याशिवाय बदलत नाही.
- या फळामध्ये शर्करेचे प्रमाण अधिक असून गोडी चांगली आहे.
- फळांचा गर हिरवट रंगाचा असून, बियांचे प्रमाण कमी आहे.
- फळाची टिकवणक्षमताही चांगली (10 ते 12 दिवसाची) आहे.

आरोग्यपूर्ण आहाराचे महत्त्व शिशूंना समजते गोष्टीरूपात

आरोग्यपूर्ण आहाराचे महत्त्व शिशूंना समजते गोष्टीरूपात

संकल्पना स्पष्ट झाल्याने आहारात आपोआप वाढते आरोग्यपूर्ण पदार्थांचे प्रमाण

स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात शिशूवयात पोषकता, पचन आणि अन्नद्रव्यांच्या विविधतचे महत्त्व संकल्पनात्मक गोष्टीतून स्पष्ट झाल्यास आरोग्यपूर्ण आहार घेण्यात मुले पुढे राहत असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन सायकॉलॉजीकल सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मुलांनी विविध प्रकारच्या भाज्या खाव्यात यासाठी पालक जिवाचे रान करत असतात. मुलांच्या पानामध्ये वाढलेली बाजी तो कशाप्रकारे संपवेल, याकडेही त्यांचे लक्ष असते. मुलांच्या वाढीसाठी आवश्यक ते पोषक घटक मिळण्यासाठी परिपूर्ण आहाराची आवश्यकता असते. मानसशास्त्रामध्ये झालेल्या नवीन अभ्यासानुसार, संकल्पनात्मक माहितीच्या फ्रेमवर्कमधून अन्नामध्ये विविधता असणे कसे फायदेशीर आहे आणि फ्रेमवर्कमध्ये प्रत्येक घटकासाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्याने मुलांना निवड करणे सोपे असल्याचे दिसून आले आहे.
स्टॅफोर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ साराह ग्रीप्सहोवर आणि एलन मार्कमन यांनी लहान मुले पोषकतेच्या संकल्पना समजू शकतात, अशा गृहितकाच्या आधारे संशोधनास व अभ्यासास सुरवात केली. अन्नद्रव्याच्या पोषकतेविषयी संकल्पनात्मक माहिती समोर असल्यास शाळेत जाण्याआधीच्या वयाच्या मुलांना महत्व समजणे सोपे जाते. जसेजसे वय वाढत जाते, तसे हे महत्व समजणे अवघड होत असल्याचे दिसून आले आहे. या बाबत माहिती देताना संशोधकांनी सांगितले, की लहान वयाच्या मुलांमध्ये कुतूहल मोठ्या प्रमामात असते. त्यांना अधिक बाबी जाणून घेण्यात रस असतो. मात्र त्यांच्यासाठी पोषकतेची माहिती अधिक सोपी करून सांगण्याची आवश्यकता असते. ही माहिती सोपी करण्यासाठी आम्ही पाच गोष्टींची पुस्तके तयार केली. यामध्ये विविध पोषकतेच्या कल्पना आमि जैविक क्रियाविषयीच्या माहितीचा गोष्टीरुपात अंतर्भाव केला.

गोष्टीरूपातून संकल्पना होतात स्पष्ट
या पुस्तकांचा वापर जेवणाच्या सुट्टीमध्ये तीन महिन्यासाठी काही नर्सरी व प्ले ग्रुप च्या मुलांमध्ये करण्यात आला. काही नर्सरी आणि प्ले ग्रुपच्या मुलामध्ये मुद्दाम यांचा वापर केला नाही. त्यानंतर या मुलांना अन्नद्रव्याविषयी प्रश्न विचारण्यात आले. ज्या मुलांना गोष्टीरुपात माहिती मिळाली होती, त्यांनी अन्नद्रव्याविषयीच्या व जैविक क्रियाविषयीच्या संकल्पना अधिक स्पष्ट असल्याचे दिसून आले. त्यातही काही क्रियाविषयी या गोष्टीच्या पुस्तकातही माहिती नसताना या मुलांना आपल्या कुतूहलातून क्रियाविषयी माहिती मिळविण्याचे दिसून आले. पचनाच्या क्रिया, अन्नाच्या तुकड्यामधील रुपातर आणि त्यातील पोषक घटकांचे शरीराकडे रक्ताच्या माध्यमातून होणारे वहन यांविषयी अधिक स्पष्टता असल्याचे दिसून आले.

अभ्यासाचे निष्कर्ष ः
- या मुलांना भाज्या व पोषक घटक खाण्यासाठी सांगण्याचीही गरज पडत नसल्याचे दिसून आले. या मुलामध्ये ्न्य मुलांच्या तुलनेत भाज्या व पोषक घटक खाण्याचे प्रमाण दुप्पट असल्याचे दिसून आले.
- पारंपरिक शिकवण्याच्या पद्धतीपेक्षा या संकल्पनात्मक अभ्यास प्रकल्पात मुलांना आरोग्यपूर्ण खाण्यामध्ये अधिक आनंद वाटतो. ते नवीन नवीन पदार्थाची चव घेण्यासाठी प्रयत्न करतात. ज्या भाज्या आधी आवडीच्या नाहीत म्हणून टाळल्या जात, त्यांचा ही खाण्यामध्ये अंतर्भाव झाल्याचे दिसून आले.
- सध्या केवळ मधल्या सुट्टीमधील वेळेमध्ये राबविलेल्या या प्रकल्पाचे परिणामांची दीर्घता तपासण्यासाठी अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता ग्रीपसहोवर आणि मार्कमन यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की भविष्यामध्ये संकल्पनात्मक पाथलीवरील अभ्यासक्रम साहित्य हे पारंपरिक वर्तनविषयक पोषकता घटकांशी एकत्रित करून वापरल्यास आरोग्यपूर्ण खाण्याच्या तंत्राशी जोडले जाईल, यात शंका नाही. पोषणविषयक कल्पना त्यांच्या वर्तनाचा एक अविभाज्य भाग होऊन गेल्याने भाज्या खात नाही, म्हणून मुलांवर ओरडत बसावे लागणार नाही.

जर्नल संदर्भ ः
S. J. Gripshover, E. M. Markman. Teaching Young Children a Theory of Nutrition: Conceptual Change and the Potential for Increased Vegetable Consumption. Psychological Science, 2013; DOI: 10.1177/0956797612474827

सोमवार, १ जुलै, २०१३

अक्षरातील गोष्ट जाईल आपोआप चित्र रुपात

अक्षरातील गोष्ट जाईल आपोआप चित्र रुपात

ऍमेझॉन स्युडिओ ने स्टोरीटेलर हे नवे उत्पादन आणले बाजारात

लहानपणी आपल्याला आपली आजी रात्री झोपताना गोष्टी सांगायची, तिच्या गोष्टीतील व्यक्तीरेखा आपल्या कल्पनेने मनात उभ्या राहायच्या. मात्र आता ऍमेझॉन स्टुडिओ या कंपनीने स्टोरीटेलर हे नवे उपकरण तयार केले आहे, ज्यामध्ये एखादी गोष्ट अपलोड करायची, त्याला योग्य पार्श्वभूमी व व्यक्तीरेखा  निवडायची, आणि आपल्या समोर त्या गोष्टीचा स्टोरी बोर्ड तयार होईल. एखाद्या कार्टूनप्रमाणे एकामागोमाग एक चित्रे स्क्रिप्टप्रमाणे येत जातील. लहान मुलांना शिकविण्यासाठी किंवा कार्ट्रूनच्या निर्मितीसाठी विविध गोष्टी आता प्रत्येक शिक्षक किंवा पालक सहजतेने रचू शकतील. चित्रांच्या स्वरुपात अभ्यास समोर आल्याने मुलेही ते आनंदाने शिकतील. थोड्याशा सरावाने मुलेही याचा वापर करू शकतील.

या बद्दल माहिती देताना ऍमेझॉनचे संचालक रॉय प्रिस यांनी सांगितले, की एखाद्या गोष्टीचा स्टोरीबोर्ड बनविण्यासाठी डिजिटल बॅकलॉट, त्यावर काम करणारे तंत्रज्ञ, प्रत्यक्ष व्यक्तीरेखाचे रेखाटन करणारे कलाकार, सुसज्ज असा विभाग आणि या साऱ्यांचे नियंत्रण करणारे निर्देशक किंवा इडिटर यांची आवश्यकता असते. मात्र ऍमेझॉन स्टुडिओमध्ये केवळ आपली गोष्ट अपलोड करायची, त्यातील व्यक्तीरेखांनुसार पात्रे निवडायची, गोष्ट ज्या ठिकाणी घडते त्या परिसराची निवड करायची की झाला स्टोरी बोर्ड तयार. थोड्याशा सरावाने या गोष्टी अधिक आकर्षक बनविता येतील, यात शंका नाही.

यामध्ये ग्रीन लीट हे मुळ व्हर्जन असून विनोदी गोष्टीसाठी अल्फा हाऊस, बीटाज व्हर्जन आहेत. तर लहान मुलांसाठी ऍनाबोटस, क्रिएटिव्ह गॅलॅक्सी आमि टंबलिफ असा मालिका तयार केल्या आहेत.

अभ्यासासाठी ठरेल फायद्याचे
- स्टोरी बोर्ड तयार करण्याच्या वेळ, खर्च या मध्ये बचत होणार आहे.
- मुलांना अभ्यासातील अनेक विषय चित्ररुपाने अत्यंत सोपे करून सांगता येतील.
- रोजच्या वर्तणूकीविषयीच्या गोष्टीही बनविता येतील.
- कृषि विस्तारामध्ये लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोचविण्यासाठी चित्र रुपातील गोष्टी फायदेशीर ठरतील.


अतिनील किरणामुळे वाढते स्ट्रॉबेरीचा साठवण क्षमता

अतिनील किरणामुळे वाढते स्ट्रॉबेरीचा साठवण क्षमता
एलइडी दिव्यामधून मिळवले अतिनील किरणांचे पूर्ण स्पेक्ट्रम

स्ट्रॉबेरीची फळे ही नाजूक असून थोडासा जरी मार बसला तरी त्यामध्ये बुरशींचा वाढ वेगाने होते. त्यामुळे त्यांचा साठवण कालावधी कमी आहे. स्ट्रॉबेरी आणि अन्य बेरी वर्गीय फळांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी अमेरिकी कृषी विभागाने अतिनील किरणाचा वापर केला आहे. स्ट्रॉबेरीमध्ये वाढणाऱ्या रॉट या बुरशींच्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी हे तंत्र उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. थंड वातावरणामध्ये साठवण आणि अधिक आर्द्रतेमध्ये अतिनील किरणाचा वापर केलेल्या स्ट्रॉबेरी अधिक काळपर्यंत साठवता येतात.

सुर्य प्रकाशातील अतिनील किरणाप्रमाणेच एलईडी दिव्यांच्या वापरातून ही किरणे मिळवता येतात. या आधी पारंपारिक अतिनील किरणाचा वापर केल्यास फळे वाळत असत. मात्र कमी प्रमाणातील अतिनील किरणाचा अधिक काळासाठी वापर अमेरिकी कृषी विभागाच्या बेल्टसव्हीले येथील संशोधकांनी केला आहे. त्यांनी केलेल्या प्रयोगामध्ये अतिनील किरणाचा वापर साठवण कालावधी वाढविण्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचे  दिसून आले आहे. या प्रयोगाचे निष्कर्ष लेसर्स ऍण्ड इलेक्ट्रोऑप्टीक्स या विषयावरील परिषदेमध्ये सादर करण्यात आले.
या निष्कर्षामुळे उत्साहीत होत संशोधकांच्या गटाने या तंत्रज्ञानाचा व्यासायिक रेफ्रिजरेटरमध्ये समावेश करण्यासाठी काम सुरू केले आहे. अतिनील किरणांच्या एलइडी दिव्याचा वापर रेफ्रिजरेटरमध्ये केल्यास अन्नपदार्थाचा साठवण कालावधी वाढणार आहे. वाया जाणाऱ्या अन्न पदार्थाचे प्रमाण कमी ठेवणे शक्य होणार असल्याचे एसइटीआय संस्थेचे अध्यक्ष रेमिस गास्का यांनी सांगितले.

असे आहे हे तंत्रज्ञान
- अतिनील किरणाचे पुर्ण स्पेक्ट्रम तयार करण्यासाठी एसइटीआय संस्थेमध्ये विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.या पुर्ण स्पेक्ट्रममध्ये युव्हीए ते युव्हीसी या तरंगलांबीचा प्रकाश असून त्यातील कोणताही वापरण्याची लवचिकता या एलइडी दिव्यांच्या वापरामुळे दिसून येते.
- कमी तापमानामध्ये ही उपकरणे चांगल्या प्रकारे काम करू शकतात.
- तसेच रेफ्रिजरेटरच्या लहान जागेमध्ये बसू शकत असल्याचे संशोधक स्टिव्हन ब्रिट्झ यांनी सांगितले.

असे झाले प्रयोग
बाजारातून आणलेली निम्मी ताजी स्ट्रॉबेरी  नेहमीच्या रेफ्रिजरेटरमध्ये आणि निम्मी अतिनील किरणांनी युक्त कप्प्यामध्ये ठेवली. त्यातून अतिनील किरणांमुळे स्ट्रॉबेरीची साठवण कालावधी दुप्पटीइतका वाढल्याचे दिसून आले. अंधाऱ्या कप्प्याच्या तुलनेमध्ये नऊ दिवस स्ट्रॉबेरी चांगली राहिली. त्यांचे वजन, त्यातील पाण्याचे प्रमाण, अंतर्गत रसायनाचे प्रमाण, दृष्य इजा आणि बुरशींची वाढ या बाबी तपासण्यात आल्या.

फोटोओळ ः युव्ही - बी प्रक्रियेमुळे फळावरील बुरशीची वाढ रोखली जाते. त्यामुळे फळांचा साठवण कालावधी वाढतो.

अस्पर्श मातीमधील जिवाणू करतील संवेदकाचे काम

अस्पर्श मातीमधील जिवाणू करतील संवेदकाचे काम

मातीच्या थरावर मशागत व बदलत्या वातावरणाचे परिणाम ओळखण्यासाठी करतील मदत

अनेक वर्षापासून पडीक राहिलेल्या मातीमध्ये अनेक सुक्ष्म जीव-जीवाणू सुप्तावस्थेत असतात. या सजीवांना अनुकूल वातावरण मिळताच त्यांच्यामध्ये हालचीली सुरू होतात. वाळवंटामध्येही जैविक मृदा थर असल्याचे दिसून आले आहेत. या बाबत अमेरिकी ऊर्जा विभागाच्या लॉरेन्स बर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये मातीच्या वरच्या थराचा मुलद्रव्यीय पातळीवर अभ्यास करण्यात आला.  या थरामध्ये आढळलेल्या जिवाणूच्या कोरड्या आणि ओलसर वातावरणामध्ये प्रतिक्रियाचे विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासामुळे शेतीमध्ये करण्यात येणाऱ्या मशागतीचे, बदलत्या वातावरणाचे मातीतील सूक्ष्म जीवांवर होणारे परिणाम कळण्यास मदत होणार आहे. हे संशोधन इंटरनॅशनल सोसायटी फॉर मायक्रोबिअल इकॉलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
रूक्ष, नापीक तसेच अर्धओसाड वाळवंटाचे पृथ्वीवरील प्रमाण सुमारे चाळीस टक्के आहे. या वाळवंटामध्ये मानवी हस्तक्षेप न झालेल्या वाळंवटी मातीतील थरामध्ये जिवंत सुक्ष्म जीवांचा एक थर असून हे जिवाणू प्रकाश संश्लेषणापासून विविध प्रक्रियेमध्ये भाग घेत असतात. हे जिवाणू वातावरण प्रतिकुल असताना सुप्तावस्थेमध्ये तग धरून राहतात. मात्र अनुकुल वातावरण मिळताच ते त्वरीत कार्यरत होतात. या साऱ्या प्रक्रियेचा अभ्यास बर्कले प्रयोगशाळेतील संशोधकांचा गटाने केले आहे. या गटाने सायनोबॅक्टेरिअम मायक्रोलस व्हॅजिनॅटस (cyanobacterium Microcoleus vaginatus) या जिवाणूंच्या गटावर लक्ष केंद्रित केले. त्या बाबत माहिती देताना संशोधिका ऐंद्रिला मुखोपाध्याय यांनी सांगितले, की मातीच्या अस्पर्श थरातील नमुन्याचे मुलद्र्व्यीय विश्लेषण करण्याची नवी पद्धती सापडली आहे. या पद्धतीद्वारे सायनोबॅक्टेरिअम गटाच्या जिवाणूंच्या ओल्या आणि कोरड्या वाळवंटातील प्रतिक्रिया किंवा हालचालीचे मोजमाप करणे शक्य झाले आहे. या पद्धतीमुळे जनुकिय यंत्रणेच्या मोठ्या भागाचे सुप्तावस्था आणि जागृतावस्था यांचा अभ्यास करता आला. तसेच मातीच्या आरोग्यपुर्ण जैविक थराविषयी अधिक माहिती मिळू शकली आहे.

मायक्रोलस व्हॅजिनॅटस या जिवाणूंविषयी अधिक माहिती
- हे जिवाणू मातीमध्ये वसाहत करणारे पर्यावरणातील सुरवातीचे जीव आहेत.
- हे जिवाणू कर्बाचे स्थिरीकरण करत माती एकत्रित बांधून ठेवतात. वाऱ्यामुळे होणारी मातीची धुप कमी होण्यास मदत होते.
- या जिवाणूंच्या गटाविषयी नॉर्टन यांनी सांगितले, की जागतिक पातळीवर ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा वाळवंटी ठिकाणी आणि आर्टिक प्रदेशामध्येही हे जिवाणू आढळून येतात.

असा झाला अभ्यास
-ऍरिझोना राज्य विद्यापीठातील संशोधकांसह इतह शेजारच्या थंड वाळवंटी प्रदेशातील मातीचे वरच्या थराचे नमुने गोळा केले आहेत. या नमुन्याच्या ठिकाणी ओलसरपणा आणि कोरडेपणा यांच्यासोबतच दिवस रात्रीसारखे वातावरण तयार करण्यात आले.
- जिवाणूंच्या पूर्ण जनुकिय विश्लेषण आणि जैवरासायनिक मोजमाप या अभ्यासारम्यान केले.
- मुखोपाध्याय यांनी सांगितले, की कोरड्या ठिकाणी ओलसरपणा निर्माण होताच केवळ तीन मिनिटामध्ये जिवाणूंच्या पेशींच्या अंतर्गत हालचाली सुरू होत असल्याचे दिसून आले. एक तासमध्ये प्रकाश संश्लेषण सुरू होते, त्यासाठी कार्बन डाय- ऑक्साईड घ्यायला सुरवात होते.  या कालावधीमध्ये काही विशिष्ट जनुकांच्या कार्यामध्ये वाढ होते, किंवा घट होते.
- तीन दिवसाच्या ओलसरपणानंतर कोरडे होत जाताना पुन्हा अभ्यास करण्यात आला. मातीतील पाण्याचे प्रमाण कमी होत जाताना जिवाणूंमध्ये होत असलेल्या प्रक्रिया नेमक्या कोरड्या वातावरणातून ओलेपणाकडे जातानाच्या विरूद्ध होत्या. तसेच त्याच्या प्रतिक्रिया जमिनीमध्ये होत असलेल्या बदल आणि तापमानातील बदलासाठी संवेदनशील असल्याचे दिसून आले.

काय होतील फायदे
- वातावरणातील बदलांचा आणि जमिनीतील बदलांविषयी अंदाज वर्तवण्यासाठी मातीच्या वरच्या थराचील हे जिवाणू उपयुक्त ठरू शकत असल्याचे संशोधकांचे मत आहे.
- हे जिवाणूं संवेदक म्हणून मातीच्या किंवा जमिनीच्या वापरासंदर्भात धोरण ठरविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. - जमिनीमध्ये जैविकथर निर्मितीसाठी अभ्यासाचे निष्कर्ष फायदेशीर ठरू शकतात.

जर्नल संदर्भ ः
Lara Rajeev, Ulisses Nunes da Rocha, Niels Klitgord, Eric G Luning, Julian Fortney, Seth D Axen, Patrick M Shih, Nicholas J Bouskill, Benjamin P Bowen, Cheryl A Kerfeld, Ferran Garcia-Pichel, Eoin L Brodie, Trent R Northen, Aindrila Mukhopadhyay. Dynamic cyanobacterial response to hydration and dehydration in a desert biological soil crust. The ISME Journal, 2013; DOI: 10.1038/ismej.2013.83

कर्करोगाच्या पेशीच्या तग धरण्याच्या प्रक्रियेचा झाला अभ्यास

कर्करोगाच्या पेशीच्या तग धरण्याच्या प्रक्रियेचा झाला अभ्यास

अमेरिकेतील नॉत्रेदॅम विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने कर्करोगाच्या पेशींच्या मृत्यू टाळण्याच्या प्रक्रियेविषयी अभ्यास केला आहे. कर्करोगाच्या पेशी अनियंत्रितपणे वाढत असताना त्यांच्यातील मृत्यूचा दर कमी असतो. त्यासाठी काही पोषक विकरे कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. या विकरांच्या कार्यक्षमता रोखण्यात यश आल्यास त्याचा फायदा कर्करोगाची वाढ रोखण्यासाठी करता येऊ शकतो. तसेच अन्य केमोथेरपीसारख्या पद्धतीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी करता येऊ शकेल. हे संशोधन कॅन्सर रिसर्च या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

एका अवयवापासून दुसऱ्या अवयवापर्यंत कर्करोगाच्या पेशींचा प्रसार होत असतो. पेशींचा मृत्यू होण्याची प्रक्रिया (त्याला ऍनोईकिस anoikis असे म्हटले जाते.) रोखली जाते. त्याविषयी माहिती देताना नॉत्रे दॅम विद्यापीठातील कर्करोग जीवशास्त्र विषयातील संशोधक झाचरी टी. शाफेर यांनी सांगितले, की कर्करोगाच्या पेशी ऍनोईकिस प्रक्रियेतून तग धरतात. पेशीबाह्य घटक वेगळे होण्याची क्रिया सर्वसाधारणपणे घडते.या वेगळ्या झालेल्या पेशी तग धरून राहण्यामागील यंत्रणा कशी कार्य करते, याविषयी अधिक माहिती उपलब्ध नव्हती. सामान्यपणे अलग झालेल्या पेशींच्या तग धरण्यासाठी पोषक विकरांचे कार्याची मदत होते.  ही विकरे पेशींतील ऑक्सिडेटिव्ह ताण समतोल करण्यासोबतच अन्न पदार्थातील पोषक घटकांसारखे कार्य करतात.

या संशोधनामध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींच्या तग धरण्याच्या प्रक्रियेत पोषक विकरांच्या मुख्य भूमिका विषद करण्यात आली आहे. काही पोषक विकराची कार्यक्षमता कमी झाल्याने ट्युमर निर्मिती घटते. त्यामुळे विकरांना लक्ष्य करण्याची प्रक्रिया काही उपचारपद्धतीमध्ये वापर करता येईल.

जर्नल संदर्भ ः
C. A. Davison, S. M. Durbin, M. R. Thau, V. R. Zellmer, S. E. Chapman, J. Diener, C. Wathen, W. M. Leevy, Z. T. Schafer. Antioxidant Enzymes Mediate Survival of Breast Cancer Cells Deprived of Extracellular Matrix. Cancer Research, 2013; 73 (12): 3704 DOI: 10.1158/0008-5472.CAN-12-2482

मधूमेही रुग्णांसाठी एक चांगली बातमी


मधूमेही रुग्णांसाठी एक चांगली बातमी आहे. कृत्रीम स्वादूपिंड हे उपकरण विकसित करण्यात येत असून रोजच्या इन्सुलीनच्या इंजेक्शनच्या वेदनेपासून सुटका होणार आहे. हे उपकरण सातत्याने रक्तातील शर्करेवर लक्ष ठेवून स्वयंचलितपणे गरजेनुसार इन्सुलीनचा पुरवठा करणार आहे.
या पद्धतीमध्ये हा इन्सुलीन पंप शर्करेचे प्रमाण कमी झाल्यानंतर बंद होतो. या साठी तीन महिन्यापासून 247 रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. सध्या अशा प्रकारचा एक पंप मिन्नेपोलिस येथील एका कंपनीमार्फत तयार करण्यात आला असून युरोपमध्ये विकला जातो. शरीरातील स्वादुपिंडाची नक्कल करत सातत्याने इन्सुलीनची पातळी योग्य तितकी ठेवण्याचा प्रयत्न करतो. ही कृत्रिम स्वादुपिंड तयार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल असल्याचे संशोधक डॉ. रिचर्ड बेरगेनस्टाल यांनी सांगितले.

मधूमेह टाइप 1 ः या प्रकारच्या लोकांचा अभ्यास करण्यात आला आहे. या प्रकारच्या मधूमेहाचे निदान लहानपणी होते. त्यांचे शरीरात इन्सुलीन तयार होत नाही. 26 दशलक्ष अमेरिकनापैकी पाच टक्के लोकांना या प्रकारचा मधूमेह आहे.  लहान मुलामध्ये मधूमेह असल्यास पालकांच्या दृष्टीने रात्रदिवस काळजीचा विषय असतो.
मधूमेह टाइप 2 ः सामान्य प्रकारचा मधूमेह असून, त्याचा संबंध स्थौल्याशी आहे. सध्या या दोन्ही प्रकारच्या मधूमेहींना इन्सुलीन सातत्याने घ्यावे लागते. त्यासाठी इंजेक्शनचा वापर केला जातो. काही लोकांना दिवसातून अनेक वेळा इन्सुलीन घ्यावे लागते. या मध्ये रुग्णाला सातत्याने रक्तातील शर्केरवर लक्ष ठेवावे लागते. तसेच इन्सुलीनचे प्रमाण अधिक झाल्यास रात्रीमध्ये शर्करेची पातळी एकदम कमी होऊ शकते. रूग्ण कोमामध्ये जाण्याची शक्यता असते. काहीवेळा मृत्यूही ओढवू शकतो.
असा झाला अभ्यास

- या अभ्यासामध्ये रूग्णांना रक्तातील शर्करेवर लक्ष ठेवण्यासाठी संवेदक बसवले होते. त्यापैकी अर्ध्या लोकांना नेहमीची इन्सुलीन पंप आणि अन्य लोकांना नव्या प्रकारच्या पंपाचा वापर केला होता. तीन महिन्यानंतर या रूग्णांमधील कमी साखर होण्याचे प्रमाण घटले होते. तसेच आत्यंतिक कमी शर्करा होण्याची एकही घटना घडली नाही. नेहमीचा पंप वापरणाऱ्या गटामध्ये अशा चार घटना घडल्या.
- सिएटल येथील वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. इर्ल हिरश म्हणाले की, स्वयंनिर्भर तज्ज्ञ असेच या पंपाचे वर्णन करावे लागेल.
- त्यानंतर पुढचा टप्पा होता, शर्करा कमी झाल्यानंतर पंप बंद होण्याचा. त्यातही हा पंप यशस्वी ठरला. त्यामुळे कृत्रिम स्वादुपिंड तयार करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले पाहिजे, असे मत दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. ऍन पीटर्स यांनी मांडले.


स्पिअर्स मलिस वय 34 यांची साखर आढवड्यातून आठ ते दहा वेळा कमी होत असे, त्यामुळे रात्री जाग येम्यासाठी अक्षरशः गजर लावून उठून खात्री करावी लागे. शर्करेचे प्रमाम तपसाण्याच्या या कामामुळे रात्रीची झोप चांगल्या प्रकार होत नसे. त्यांना या प्रयोगादरम्यान लावण्यात आलेल्या पंपाचा फायदा झाला. शर्करा कमी झाल्यानंतर आपोआप इन्सुलीनचा वापर थांबवण्यात आला. रात्रीची झोप चांगल्या प्रकारे मिळू शकली.

खाद्यातील बदलांने घडवली माणसांतील उत्क्रांती

खाद्यातील बदलांने घडवली माणसांतील उत्क्रांती

माणसांच्या पुर्वजांनी सी3 फळे आणि झाडाऐवजी सी4 गवतांचा खाद्यात केला समावेश

अनेक माकडवंशीय प्राणी झाडाची पाने व फळे खात असतात. मात्र सहसा गवते खात नाहीत. मात्र माणसांनी गवते खायला प्रारंभ कधी पासून केला, या विषयी उतह विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन केले आहे. साधारणपणे 3.5 दशलक्ष वर्षापूर्वी माणसांच्या आहारामध्ये गवते खायला सुरवात केली आणि त्यानंतर आधुनिक खाद्यातील धान्य, गवते, मांस आणि दुग्धयुक्त पदार्थ यांचा आहारामध्ये समावेश होत गेला. या गवत खाण्यांच्या प्रक्रियेचा त्यांच्या दोन पायावर उभे राहण्याशी आणि मेंदूच्या वाढीशी संबंध जोडण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला आहे. म्हणजेच थोडक्यात सी4 प्रकारची गवते खाल्यापासून मानवांची उत्क्रांती वेगाने झाल्याचे संशोधन सांगते. या विषयी चार संशोधने प्रोसिंडिग्स ऑफ नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस या संशोधनपत्रिकेच्या जूनच्या अंकामध्ये प्रकाशित झाली आहेत.

खाद्यावरून संस्कृती कळते, अशी एक म्हण आहे. त्यात माणसांच्या व माकडांच्या पुर्वजांच्या खाद्याविषयी उतह विद्यापीठातील 24 संशोधकांच्या गटाने संशोधन केले आहे. त्यांनी आफ्रिकेतील 4 दशलक्ष वर्षापासून ते 10 हजार वर्षापूर्वीपर्यंतच्या माणसे आणि बबून माकडांच्या कवट्यांमध्ये असलेल्या दातावरील इनामलचे कार्बन आयसोटोपचा चार वेगवगेळ्या पद्धतीने अभ्यास केला. या अभ्यासामध्ये माणसांच्या आणि त्यांच्या पूर्वजाचा गेल्या चार दशलक्ष वर्षाचा आहारविषयक इतिहास उलगडण्यात आला आहे. त्या बाबत माहिती देताना उतह विद्यापीठातील भूरसायन तज्ज्ञ थुरे सेरलिंग यांनी सांगितले, की सर्वाधिक कालावधीमध्ये सस्तन प्राणी हे पाने व फळे यांच्या आहारावर अवलंबून राहीला आहे. साधारणतः 3.5 दशलक्ष वर्षापूर्वी त्यांना नव्या आहाराच्या शक्यता धुंडाळायला सुरवात केली. त्या आधी सुमारे 10 दशलक्ष वर्षापूर्वी चरणाऱ्या प्राण्यांनी उष्णकटींबधीय गवते व लव्हाळे यांचा वापर सुरू केला होता.  या कालावधीमध्ये सवाना जंगलाचा विस्तार होत होता. त्यातूनच मानवाच्या पूर्वजांनी आपल्या आहारात बदल घडवून आणले. ही उत्क्रांतीतील महत्त्वाची घटना आहे. अद्याप माकडे ही पुर्वीच्या आहारावर अवलंबून असल्याचे दिसून येते.

पूर्व आफ्रिकेतील गवताळ जंगलेही 6 ते 7 दशलक्ष वर्षापूर्वीपर्यंत पसरत गेली. तरिही मानवी पूर्वजांनी त्यांचा आहारात समावेश करण्यासाठी अधिक काळ लावला.
- आयसोटो पद्धतीने गवत, लव्हाळे यांचे नक्की कोणते भाग ह मानव खात होता, तसेच कोणत्या टप्प्यापासून गवतावर जगणाऱ्या कीटकांचा किंवा प्राण्यांच्या मांसाचा खाद्यामध्ये वापर सुरू झाला, या विषयी नक्की सांगता येत नाही.
- या दोन्ही गोष्टीचे सरळ पुरावे 2.5 दशलक्ष वर्षापु्रवी पासून दिसून येतात. त्यातही पाच लक्ष वर्षापासून शिकारीचे ठळक पुरावे दिसून येतात.
- अर्थात या माणसांच्या खाद्याविषयी नेमकेपणाने सांगता येत नाही. ते पुर्णपणे गवत खाणारे होते की मांसाहारी होते, या विषयी शंका राहतातच.

उत्क्रांतीमध्ये आहाराचे महत्त्व का य़
- अभ्यासात आहाराच्या बदलाचे नक्की कोणकोणते बदल घडून आले असावेत, या विषयी सांगताना दक्षिण फ्लोरिडा विद्यापीठातील भूशास्त्रज्ञ जोनाथन बॅन म्हणाले, की माणसांच्या वंशजांनी जेव्हापासून गवते खाण्यास सुरवात केली, तेव्हापासून त्यांचा अधिवासही बदलला. आधी ते घनदाट जंगलामध्ये अन्य माकडांसारखे राहत असत. गवताळ प्रदेशात राहण्यासाठी आवश्यक त्या बाबींचा अंगीकार माणसांच्या पूर्वजांना करावा लागला.

- संशोधक मॅट स्पॉनहायमेर यांनी सांगितले, की उत्क्रांतीमध्ये खाद्यातील बदल ही घटना महत्त्वाची आहे. हे बदल माणसांच्या मेंदूच्या आकारात वाढ आणि चार पायाऐवजी दोन पायावर उभा राहण्याशी जोडून पाहिले जातात.  चार दशलक्ष वर्षापूर्वी या घटना घडल्या. त्यानंतरच्या कालावधीमध्ये मानवी मेंदूच्या आकारात अन्य माकडवंशीय प्राण्यांच्या तुलनेत वाढ होत गेली. त्यातून आपली प्रजाती होमो ही साधारणपणे 2 दशलक्ष वर्षापूर्वी उत्क्रांत झाली. (माणसांची मुळ प्रजात होमो सेपियन 2 लक्ष वर्षापूर्वी उत्क्रांत झाली. )
- पंधरा वर्षापूर्वी अभ्यासाला सुरवात होतेवेळी माणसांच्या खाद्यसवयींविषयी वेगळ्या कल्पना होत्या. त्या वेळी माणसांचे हे वंशज मुख्यत्त्वे करून पाने आणि फळे खात असल्याचे मानले जात होते. मात्र उत्क्रांतीतील गवते आणि लव्हाळे यांचा खाद्यसवयीत समावेश हे मोठ्या आकाराच्या मेंदू आणि बुद्धीमत्तेविषयी वेगळाच प्रकाश टाकतात.

अभ्यासाच्या दिशा
होमिनीनच्या अकरा प्रजातीच्या 173 दात नमुन्यांचे कार्बन आयसोटोप विश्लेषण केले गेले.
- साधारणतः सहा दशलक्ष वर्षापूर्वी होमिनीन हे त्यांच्या अन्य पुर्वजापासून आणि समकालीन नातेवाईकांपासून (माकडे) वेगळे होत गेले. या आधीही काही संशोधनामध्ये दाताचे नमुने तपासले होते. मात्र नव्या अभ्यासामध्ये आठ होमिनीन प्रजातीच्या 91 जणांच्या 104 दातांचे नमुन्याचे विश्लेषण केले.
- पु्र्व आफ्रिकेतील संग्रहालयातील नमुन्यांसह प्रत्यक्ष क्षेत्रावर दोन गट संशोधन करत होते.
- प्राणी वनस्पती खातात, त्यांच्या प्रकाशसंश्लेषणाच्या पद्धतीवरून सी3, सी4 किंवा कॅम असे तीन भाग पडतात. जे प्राणी सी4 किंवा कॅम प्रकारची (उष्ण कटींबधीय गवते, त्यांच्या बिया, पाने, मुळे किंवा कंद ) गवते खातात, त्याच्यामध्ये कार्बन 13 चे प्रमाण अधिक असते.
- सी3 वनस्पतीमध्ये झाडे, झुडपे आणि त्यांची फळे, पाने, भाज्या, शीतकाळामध्ये उगवणारी गवते याबरोबर टिमोथी, अल्फाअल्फा, गहू, ओट, बार्ली, तांदूळ आणि सोयबीन यांचा समावेश होतो.

आजच्या आहाराशी तुलना
आजच्या आहारात सी3 आहार उत्तर युरोपमध्ये केला जातो. मक्यावर आधारीत अधिक उत्पादने (सी 4 आहार) मध्य अमेरिकेमध्ये केला जातो. जर कोणी मासे अधिक प्रमाणात खात असेल, तर माशांनी खालेल्या शेवाळामध्ये कार्बोनेट पाण्यातून आलेले असते. त्याचे लक्षण सी4 सारखे दिसून येते. तर सी3 गवतावर जगणाऱ्या ससा, उंदीरवर्गीय प्राणी किंवा या प्राण्यांचे मांस खाण्यात येत असेल, तर  सी3 आणि सी4 सारखी लक्षणे दिसून येतील.

असे आहेत खाद्यसवयीचे टप्पे
- 4.4 दशलक्ष वर्षापूर्वी-  इथोपियातील मानवाचा वंशज अर्डी (Ardipithecus ramidus ) हा सी3 गवते व फळांवर जगत होता.
-  4.2 ते 4 दशलक्ष वर्षापूर्वी केनियन भागातील मानवी वंशज Australopithecus anamensis हे आजच्या चिंपाझीप्रमाणे 90 टक्के पाने व फळे खात असत.
- 3.4 दशलक्ष वर्षापूर्वी ईशान्य इथोपियातील अवॅश खोऱ्यातील Australopithecus afarensis हे एकूण आहाराच्या 22 टक्के सी 4 गवते आणि लव्हाळे खात असल्याचे दिसून येते. त्यातही प्रत्येकांच्या खाण्यातील प्रमाणात 0 ते 69 टक्के इतकी विविधता आढळली.
- 3.4 दशलक्ष वर्षापूर्वी तुर्कानामध्ये मानवी वंशज Kenyanthropus platyops यांच्या खाण्यामध्ये सी3 झाडे आणि सी4 गवते ( 40 टक्के) यांची विविधता दिसून येते. तेही प्रमाण प्रत्येकी 5 ते 65 टक्क्यांपर्यत बदलते आहे.
- 2.7 ते 2.1 दशलक्ष वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेत hominins Australopithecus africanusआणि Paranthropus robustus यांच्या खाण्यामध्ये झाडे आणि झुडपांसोबतच गवते आणि चरणाऱ्या प्राण्याचे मांस अंतर्भूत असावे. A. africanus च्या आहारात सरासरी 50 टक्के सी 4 गवते असून त्यांच्यामध्येही शुन्य ते 80 टक्के इतकी विविधता आढळली.  तर P. robustus च्या आहारात सरासरी 30 टक्के सी4 गवते असून विविधता 20 ते 50 टक्क्यांपर्यत आढळली.
- 2 ते 1.7 दशलक्ष वर्षापूर्वी तुर्काना प्रांतामध्ये माणसांचा जवळचा वंशज होमोच्या खाद्यामध्ये 35 टक्के गवते आणि गवतांवर चरणाऱ्या प्राण्यांचा समावेश होता. दुसऱ्या वंशजामध्ये होमिनीन Paranthropus boisei हा 75 टक्के गवत खात होता. 2011 मध्ये झालेल्या अभ्यासानुसार, हा वंशज पुर्णपणे शाकाहारी दिसून येतो. तर होमोच्या आहारात मांस आणि गवतावर जगणाऱ्या कीटकांचा समावेश आहे.
- 1.4 दशलक्ष वर्षापूर्वी तुर्कानामध्ये होमो च्या खाद्यामध्ये गवताचे प्रमाण 55 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून येते. - साधारणतः दहा हजार वर्षापूर्वी तुर्काना येथील होमो सेपियनच्या दातामध्ये आढळलेल्या आहारात सी3 झाडे आणि आणि सी4 वनस्पती यांचे प्रमाण 50 -50 टक्के दिसून येते. ते उत्तर अमेरिकेतील आधुनिक माणसांप्रमाणे असल्याचे स्पष्ट होते.

सी4 गवते खाणारा एकमेव तग धरलेला प्राणी ः माणूस
- सेरलिंग यांच्या दुसऱ्या अभ्यासानुसार, मानवी पूर्वज आहारासाठी जेव्हा गवताकडे वळले तेव्हा माकडांचा सर्व जाती सी3 झाडांना आहारासाठी चिकटून राहिल्या. अपवाद फक्त केनियन बबून जातीच्या दोन माकडांचा. त्यांनी गवताचा खाद्यामध्ये समावेश केला.  
- 4 ते 2.5 दशलक्ष वर्षाच्या कालावधीमध्ये Theropithecus brumpti ही प्रजाती 65 टक्के गवते खात होती, तर बबून माकडे झाडे आणि झुडपे खात होती. त्यानंतर 2 दशलक्ष वर्षापूर्वी Theropithecus oswaldi च्या खाद्यात हेच प्रमाण 75 टक्के होते, तर एक दशलक्ष वर्षापूर्वी ते प्रमाण 100 टक्के झाले. या दोन्ही प्रजाती तग धरून राहिल्या. आताची आधुनिक Theropithecus gelada बबून जातीची माकडे इथोपियातील उंच जंगलामध्ये सी 3 झाडे आणि शीतकालीन गवते खात राहिली असल्याचे सेरलिंग यांनी स्पष्ट केले.

जर्नल संदर्भ ः
1) Thure E. Cerling, Fredrick Kyalo Manthi, Emma N. Mbua, Louise N. Leakey, Meave G. Leakey, Richard E. Leakey, Francis H. Brown, Frederick E. Grine, John A. Hart, Prince Kaleme, Hélène Roche, Kevin T. Uno, and Bernard A. Wood. Stable isotope-based diet reconstructions of Turkana Basin hominins. PNAS, June 3, 2013 DOI: 10.1073/pnas.1222568110
2) Jonathan G. Wynn, Matt Sponheimer, William H. Kimbel, Zeresenay Alemseged, Kaye Reed, Zelalem K. Bedaso, and Jessica N. Wilson. Diet of Australopithecus afarensis from the Pliocene Hadar Formation, Ethiopia. PNAS, 2013 DOI: 10.1073/pnas.1222559110
Matt Sponheimer, Zeresenay Alemseged, Thure E. Cerling, Frederick E. Grine, William H. Kimbel, Meave G. Leakey, Julia A. Lee-Thorp, Fredrick Kyalo Manthi, Kaye E. Reed, Bernard A. Wood, and Jonathan G. Wynn. Isotopic evidence of early hominin diets. PNAS, 2013 DOI: 10.1073/pnas.1222579110
3) Thure E. Cerling, Kendra L. Chritz, Nina G. Jablonski, Meave G. Leakey, and Fredrick Kyalo Manthi. Diet of Theropithecus from 4 to 1 Ma in Kenya. PNAS, 2013 DOI: 10.1073/pnas.1222571110

जैवइंधन निर्मितीचा मार्ग जातोय मुंग्यांच्या बुरशी शेतीतून

जैवइंधन निर्मितीचा मार्ग जातोय मुंग्यांच्या बुरशी शेतीतून

बायोमास विघटनासाठी वारूळांतील बुरशी आणि जिवाणू ठरतील उपयुक्त

पाने कुरतडणाऱ्या मुंग्यांच्या वसाहतीमधील बुरशींच्या शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध विकरांचा जैवइंधनाच्या निर्मितीमध्ये उपयोग होऊ शकत असल्याचे विस्कन्सिन मॅडीसन विद्यापीठात झालेल्या संशोधनातून समोर आले आहे. पाने कुरडणाऱ्या मुंग्याच्या वारूळामध्ये हिरव्या पानाच्या तुकड्यावर विविध प्रकारच्या जिवाणूंची वाढ केली जाते. थोडक्यात बुरशी आणि जिवाणूंची ही शेती मुंग्यासाठी खाद्य आणि ऊर्जेची पुर्तता करते. मात्र या जिवाणू आणि बुरशींमध्ये जैव इंधन निर्मितीच्या अनेक शक्यता असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. हे संशोधन जर्नल ऍप्लाईड ऍण्ड एन्व्हायर्नमेंटल मायक्रोबायोलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

माणूस शेती करतो, त्याच प्रमाणे पाने कुरडणाऱ्या मुंग्या ताज्या हिरव्या पानाच्या साह्याने बुरशींची शेती करतात. या बुरशींच्या शेतीमध्ये वाढवल्या जाणाऱ्या बुरशींचा अभ्यास विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठातील जिवाणूशास्त्र विभागातील संशोधकांनी केला आहे. त्या बाबत माहिती देताना संशोधक फ्रॅंक ऍलवर्ड यांनी सांगितले, की मुंग्याच्या वारूळामध्ये वाढवल्या जाणाऱ्या बुरशींच्या पुर्ण जिवाणू समुदायाविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न या संशोधनामध्ये करण्यात आला. मुंग्या विविध प्रकारच्या वनस्पतीच्या पानांचा वापर बुरशींच्या वाढीसाठी करतात. त्या बायोमासपासून मुंग्यासाठी ऊर्जा निर्माण केली जाते.

जनुकिय विश्लेषणाद्वारे नव्या विकरांची पटविली ओळख
अन्न नसलेल्या वनस्पतीपासून जैवइंधन बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये सेल्युलोजचे विघटन हा महत्त्वाचा मुद्दा असतो. सेल्युलोजचे विघटन होऊन जैवइंदन निर्मिती शक्य होते. मुंग्या बुरशी शेतीमध्ये आढळलेली सर्व विकरांचे (एन्झाईम्स) ही आपल्याला ज्ञात असलेल्या विकराशी साम्य आहे. मात्र तरीही ते पुर्णपणे वेगळी असून ती प्रथमच वेगळी ओळखण्यात आलेली आहेत.
- या संशोधनासाठी अमेरिकी ऊर्जा विभागाच्या संयुक्त जिनोम इन्स्टिट्यूट आणि रोचे उपयोजित शास्त्र विभागाच्या जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्पातील माहीतीच्या साठ्याचा वापर करण्यात आला. या माहितीच्या साठ्याद्वारे बुरशी आणि जिवाणूंच्या कार्यपद्धतीची अचूक ओळख पटविण्यात आली.
- पाने कुरडणाऱ्या मुंग्याच्या बुऱशीच्या शेतीतील Leucoagaricus gongylophorous या बुरशींच्या जनुकिय माहितीचे सुसंगतवार रचना तयार करण्यात आली आहे.
- या अभ्यासातून बायोमासचे विघटन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकराची संपुर्ण माहिती मिळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या नव्या विकरांची ओळख पटल्यामुळे त्यांचे विविध तंत्रज्ञानविषयक उपयोग समोर येत आहेत. बायोमासचे विघटन हा आजच्या जैवइंधन निर्मिती उद्योगासाठी महत्त्वाचे असून या विकरांचा संभाव्य एकत्रीकरण आणि उपयुक्तता याविषयी अधिक माहिती मिळाली आहे.

सहजीवी संबंध बुरशी आणि मुंगीचे
- पाने कुरडणाऱ्या मुंग्या Atta cephalotes या L. gongylophorous या बुरशींचा स्वतःच्या खाद्यनिर्मितीसाठी वापर करतात.
- हे जिवाणू विविध मेद. अमिनो आम्ले आणि अन्य पोषक घटक तयार करत मुंग्यासाठी अन्न तयार करतात. या अन्न निर्मितीसाठी त्यांना शर्करेची गरज पडते. ती मुंग्यांनी त्यांच्यासाठी आणलेल्या हिरव्या पानामधून पुर्ण होते. पानामध्ये असलेल्या लांब सेल्युलोजच्या मुलद्रव्याचे विघटन केले जाते. या विघटनासाठी विकरांचा वापर केला जातो.
- L. gongylophorous या जिवाणूचे जनुकिय विश्लेषण केल्यानंतर, ही बुरशी सेल्युलोजच्या विघटनामध्ये महत्त्वाची भुमिका निभावत असल्याचे दिसून आले आहे. अर्थात ही बुरशी एकटेच काम करते, असे नाही तर या बुरशींच्या शेतीतील अन्य जिवाणूंची मदत त्यांना होते. अन्य जिवाणूंची विविधता बुरशींच्या उत्पादकतेत वाढ करत असल्याचे दिसून आले आहे.
त्या बाबत माहिती देताना संशोधक गॅरेट सुआन यांनी सांगितले, की बुरशी आणि जिवाणूंच्या कामातील फोड या संशोधनाद्वारे करण्याचा प्रयत्न केला आहे. नत्र आणि अन्य पोषक घटक मिळविण्यासाठी जिवाणूं बुरशींना मदत करतात. ऊर्जेने परिपुर्ण अशा सेल्युलोज घटकांचे विघटन करतात. सेल्युलोजचे विघटन हा इथेनॉल निर्मितीसाठी महत्त्वाचे असून त्यात या संशोधनामुळे नवीन बुरशी आणि जिवाणूंचा अंतर्भाव करता येणार आहे.

अद्याप अधिक संशोधन आवश्यक
- मुंग्याच्या बुरशीचीं शेती ही गुंतागुंतीची असून त्यात सौदर्य आणि आव्हानाने परिपुर्ण आहे. संशोधनाच्या दरम्यान या बुरशींच्या शेतीभोवती आढळणाऱ्या तपकिरी रंगाच्या किटकांची नेमकी या शेतीतील नेमकी भुमिका शोधण्यात येत आहे.
- या प्रकारची बुरशींची शेती प्रयोगशाळेमध्ये तयार करणे अवघड आहे. त्यामुळे ही पुर्ण पद्धती प्रयोगशाळेमध्ये नियंत्रीत, शाश्वत आणि उत्पादक रितीने तयार करण्यामध्ये आव्हान भरलेले आहे. मात्र या पद्धतीने सातत्यपुर्ण इंथेनॉलचे उत्पादन करणे शक्य आहे.
- या नैसर्गिक शेतीची नक्कल  बायोमासच्या विघटनासाठी उपयुक्त ठरू शकते. सध्या मिळालेली विकरे ही जुन्या विकरांच्या मिश्रणामध्ये वापरून त्याच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. अर्थात हि प्रक्रिया थोडीशी वेळखाऊ आहे.

जर्नल संदर्भ ः
F. O. Aylward, K. E. Burnum-Johnson, S. G. Tringe, C. Teiling, D. M. Tremmel, J. A. Moeller, J. J. Scott, K. W. Barry, P. D. Piehowski, C. D. Nicora, S. A. Malfatti, M. E. Monroe, S. O. Purvine, L. A. Goodwin, R. D. Smith, G. M. Weinstock, N. M. Gerardo, G. Suen, M. S. Lipton, C. R. Currie. Leucoagaricus gongylophorus Produces Diverse Enzymes for the Degradation of Recalcitrant Plant Polymers in Leaf-Cutter Ant Fungus Gardens. Applied and Environmental Microbiology, 2013; 79 (12): 3770 DOI: 10.1128/AEM.03833-12

फोटोओळी ः
पाने कुरडणाऱ्या मुंग्या (Atta cephalotes) त्यांच्या बुरशींच्या शेतीमध्ये कार्यरत असताना. या शेतीच्या वरपासून खालीपर्यंत प्रत्येक भागामध्ये बायोमास विघटनाच्या विविध टप्पे दिसून येतात. ( स्रोत ः कारा गिबसन)

पाण्याच्या कमतरतेचा टोमॅटो पिकावर होणारा परिणाम तपासला

पाण्याच्या कमतरतेचा टोमॅटो पिकावर होणारा परिणाम तपासला

ताण सहनशील जाती विकसनासाठी होणार फायदा
पाण्याच्या कमतरतेत टोमॅटो पिकामध्ये जनुक होते कार्यरत

पाण्याच्या कमरतरतेचा टोमॅटो पिकावर व फळांच्या दर्जावर होणारा परिणाम चीन येथील झियांगसु विद्यापीठ व हांगझोऊ विद्यापीठ येथील संशोधकांनी तपासला आहे. पाण्याचा ताण पडल्यानंतर टोमॅटोचे रोपे एक जनुक अधिक कार्यक्षम बनत असल्याचे दिसून आले आहे. StAPX ( Solanum lycopersicum thylakoid ascorbate peroxidase gene ) या जनुकाचा वापर करून पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जाती विकसित करणे शक्य होणार आहे.

दुष्काळामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर पिकामध्ये विविध आयनाचे (रिऍक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज ROS) असमतोल तयार होत असतात. या आधी झालेल्या काही संशोधनामध्ये आरओएस हे हायड्रोजन पेरॉक्सॉईडचे प्रमाण कमी होत असल्याचे मांडण्यात आले होते.   तसेच काही संशोधनामध्ये पाण्याचा ताण निर्माण झाल्यानंतर एपीएक्स जनुके अधिक कार्यरत होत असल्याचे दिसून आले होते. त्यावर अधिक अभ्यास करताना चीन येथील संशोधक डब्लू. एच. सुन, लिऊ आणि वांग यांनी पाण्याचा ताण निर्माण झाल्यावर टोमॅटोच्या पाने आणि फळातील विविध घटकांवर होणारे परिणाम तपासले आहेत. मातीतील ओलाव्याचे प्रमाण कमी असताना टोमॅटोमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड मिळविण्याची क्षमता तयार होत असल्याचे दिसून आले आहे.

असे झाले प्रयोग
जनुकिय सुधारीत टी2-2 आणि टी2- 4  या लाईनमधील टोमॅटोच्या बिया आणि जंगली टोमॅटोच्या बिया यांची ओल्या फिल्टरपेपर वर 25 अंश सेल्सिअस तापमानाला उगवण करून घेतली. ही उगवलेल्या बिया निर्जंतुकीकरण केलेल्या गादी वाफ्यार हरिगृहामध्ये करण्यात आली. दोन आठवड्यानंतर तीन विभागात त्यांना मातीतील पाण्याचे प्रमाण 70 +- 5 टक्के पाणी, 60 आणि 50 टक्के असे ठेवण्यात आले.
- ही पाणी देण्याची पद्धती शेवटचे फळ धरेपर्यंत दिली गेली.
- पाणी ठिबक सिंचनाने दिले असून दिवसातून दोन वेळा मातीतील पाण्याचे प्रमाण मोजण्यात आले.
-पानामध्ये एपीएक्स , हायड्रोजन पेरॉक्साईडचे प्रमाणे, निव्वळ प्रकाश संश्लेषणाचा दर यांचे प्रमाण मोजले.
- फळाचे उत्पादन, पोषक घटकांचा दर्जा मोजण्यात आला.

निष्कर्ष ः
- एपीएक्स या जनुकांचे हायड्रोजन पेरॉक्साईड मिळविण्याची क्षमता ही पाण्याचा ताण असताना निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच जनुकिय सुधारीत टोमॅटोचे उत्पादन ही जंगली टोमॅटोपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.

पाण्याच्या शुद्धीकरणासाठी संकरीत माती

पाण्याच्या शुद्धीकरणासाठी संकरीत माती
पाण्यामध्ये विविध जड धातूंचे प्रदुषण वाढत असून त्याचे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. हे जड धातू पाण्यातून दूर करण्यासाठी (केओलिनाईट क्ले) माती आणि पपईंच्या बियांची पावडर उपयुक्त ठरत असल्याचे संशोधन एसीएस सस्टेनेबल केमिस्ट्री ऍंण्ड इंजिनिअरींग मध्ये प्रकाशित झाले आहे.  हे संशोधन जर्मनी आणि नायजेरीया येथील संशोधकांनी संयुक्तरित्या केले आहे.

पाण्यामध्ये विविध प्रकारच्या जड धातूचे प्रदुषण वाढत्या औद्योगिकरणामुळे वाढत आहे. अशा प्रदुषित पाण्याची शुद्धता करण्यासाठी प्रगत देशामध्ये अनेक महागड्या पद्धती वापरल्या जातात.मात्र विकसनशील देशामध्ये या पद्धतींचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातो. संशोधख इम्यॅन्युअल उन्युबोनाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्यामधील पारे, शिसे, कॅडमिअम या सारखे जड धातू दूर करण्यासाठी
चिकणमाती व पपईंच्या बियांचा वापर करण्याची पद्धत शोधून काढली आहे. हे दोन्ही घटक वेगवेगळे वापरूनही पुर्वी पाण्याचे शुद्धीकरण केले जात असे. मात्र संशोधकांनी या दोन्ही घटकांचे एकत्रीकरण करत अधिक सक्षम अशी पाणी शुद्धीकरणाची पद्धती तयार केली आहे. या एकत्रीत मातीला संशोधकांना संकरीत माती असे नाव दिले आहे.

मधमाशांच्या वसाहतीतील जनुकिय विविधतेमुळे वसाहती तग धरण्याचे प्रमाण वाढते

मधमाशांच्या वसाहतीतील जनुकिय विविधतेमुळे
वसाहती तग धरण्याचे प्रमाण वाढते
अमेरिकेतील संशोधन

मधमाशीच्या एका वसाहतीमध्ये जनुकिय विविधता असलेल्या अधिक नराशी मिलन झाल्यास त्या वसाहतीचे आरोग्य चांगले राहून वसाहत तग धरण्याचे प्रमाण अधिक असल्याचे उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठ, मेरीलॅंड विद्यापीठ,  आणि अमेरिकी कृषी विभाग यांनी संयुक्त रित्या केलेल्या संशोधनात दिसून आले आहे. जनुकिय विविध्यता हा मधमाशीच्या वसाहती वाचविण्यामध्ये मोलाची भुमिका निभावते. राणी माशीला मिलनासाठी कमी निवड उपलब्ध असलेल्या वसाहती कमी प्रमाणात तग धरत असल्याचे दिसून आले आहे.
मधमाश्याच्या वसाहती नष्ट होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या वसाहती वाचविण्यासाठी विविध प्रकारे मधमाशी आणि त्यांच्या सामाजिक व्यहवारावर संशोधन करण्यात येत आहे. त्याच मालिकेमध्ये मधमाश्यांच्या जनुकिय विविधतेचे वसाहतीवर होणारे परिणाम आणि त्यांच्या तग धरण्याच्या क्षमतेवरील परिणामांचा अभ्यास कॅरोलिना राज्य विद्यापीठ, मेरीलॅंड विद्यापीठ,  आणि अमेरिकी कृषी विभागाद्वारे करण्यात आला. त्याविषयी माहिती देताना उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठातील कीटक शास्त्र विभागाचे संशोधक डॉ. डेव्हिड तार्पी यांनी सांगितले, की नियंत्रित वातावरणामध्ये जनुकिय विविधतेचा परिणाम  प्रजातीच्या तग धरण्याच्या क्षमतेवर होत असल्याचे ज्ञात होते. मात्र बाह्य परिसरामध्ये त्याचा पडताळा घेणे आवश्यक होते. बाह्य वातावरणामध्ये वसाहतीच्या नष्ट होण्यामागे या कारणांचे किती प्रमाण आहे, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न या संशोधनातून केला आहे.

असा झाला अभ्यास
- तार्पी यांनी पूर्व अमेरिकेतील व्यासायिक पद्धतीने पाळल्या जाणाऱ्या एपिस मेलिफेरा या प्रजातीच्या 80 वसाहतीतून जनुकिय विविधतेचे नमुने गोळा केले. त्यातील राणीमाशीशी मिलन करणाऱ्या नरांच्या जनुकिय विविधतेवर लक्ष केंद्रित केले.
- ज्या वसाहतीमध्ये राणी माशी अधिक नराशी मिलन करणे शक्य होते, तिथे अधिक जनुकिय विविधता आढळली.
- दहा महिन्याच्या कालावधीमध्ये प्रती महिना या वसाहतीच्या आरोग्याचा मागोवा घेण्यात आला.

प्रयोगाचे निष्कर्ष ः
- ज्या वसाहतीची राणी माशी किमान सातपट अधिक नराशी मिलन करते, त्या वसाहती 2.86 पट अधिक तग धरत असल्याचे दहा महिन्याच्या कालावधीमध्ये दिसून आले. अशा 48 टक्के वसाहती या कालावधीच्या शेवटच्या टप्प्यानंतर जिवंत असल्याचे दिसून आले.
- ज्या वसाहतीमध्ये जनुकिय विविधता कमी होती, अशा केवळ 17 टक्के तग धरून राहू शकल्या.
- अर्थात 48 टक्के तग धरण्याची क्षमता जनुकिय विविधतेमुळे अशली तरी एकूण मधमाशीच्या वसाहती नष्ट होण्याच्या प्रक्रियेसाठी धोक्याचा इशारा ठरणार आहे. तर जनुकिय विविधता कमी असलेल्या वसाहतीमध्ये 17 टक्के दर असल्याने त्यातल्या त्यात जनुकिय विविधता वाढल्यास वसाहती वाचण्याचे प्रमाण थोड्या प्रमाणात वाढू शकते.
जर्नल संदर्भ ः
David R. Tarpy, Dennis vanEngelsdorp, Jeffrey S. Pettis. Genetic diversity affects colony survivorship in commercial honey bee colonies. Naturwissenschaften, 2013; DOI: 10.1007/s00114-013-1065-y

आलेख किंवा ग्राफिक ः
वसाहती वाचण्याचे प्रमाण वसाहतीतील जनुकिय विविधतेवर अवलंबून

मिलनामध्ये निवडीस कमी वाव- राणी माशीचे सात पेक्षा कमी नराशी मिलन--वसाहतीचे तग धरण्याचे प्रमाण 2 (17 टक्के)-- वसाहती नष्ट होण्याचे प्रमाण 9 (83 टक्के)
मिलनामध्ये निवडीस अधिक वाव- राणी माशीचे सात पेक्षा अधिक नराशी मिलन--वसाहतीचे तग धरण्याचे प्रमाण 32 (48 टक्के)-- वसाहती नष्ट होण्याचे प्रमाण 35(54 टक्के)

----