वनस्पतीच्या वाढीसाठी महत्त्वाचे गुणधर्म ओळखण्यात यश
स्वित्झर्लंड येथील 90 वनस्पतींचा झाला एकत्रित वाढीचा अभ्यास
काही वनस्पती या अन्य वनस्पतीच्या तुलनेत अधिक यशस्वी होतात. काही वनस्पतींची वाढ कमी असून अत्यंत दुर्मिळ या सदरामध्ये त्यांची गणना होते. तर काही वनस्पती अत्यंत वेगाने वाढून अन्य वनस्पती आणि सजीवासाठी धोकादायक ठरतात.संशोधकांनी, पर्यावरणतज्ज्ञांनी या बाबीसाठी बियांचे त्वरीत अंकूरण, वेगवान वाढ, स्पर्धाक्षम वाढीमुळे अशा विविध गुणधर्माना कारणीभूत ठरवले आहे. मात्र स्वित्झर्लंडमधील बेर्न विद्यापीठातील संशोधकांनी वनस्पतीच्या एकत्रित वाढीसाठी आणि नवीन जागी वाढ होण्यासाठी पर्यावरणातील आणि प्रजातीतील महत्त्वाचे गुणधर्म ओळखले आहेत. त्यांच्या मते, पहिल्या टप्प्यात अंकूरण आणि अंकुरणानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात वनस्पतींची कीडींना, रोगांना प्रतिकारक करण्याची क्षमता हा महत्त्वाचा गुणधर्म ठरतो. हे संशोधन प्रोसिंडीग्ज ऑफ दी नॅशनल ऍकडमी ऑफ सायन्सेस मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
हे असे का होत असावे
काही वनस्पती अत्यंत कमी प्रमाणात उगवतात, काहींची वाढ वेगाने होते, काही वनस्पती कीडरोगांना किंवा त्यांच्यावर जगणाऱ्या सजिवांना रोखतात या साऱ्या गोष्टीसाठी काही मुलभूत गुणधर्म कारणीभूत असतात. त्याविषयी संशोधकांमध्ये मतभेद आहे. नेमके कोणते मुलभूत घटक किंवा गुणधर्म वनस्पतींना वाढीसाठी उपयुक्त ठरतात, यांचा अभ्यास बेर्न येथील वनस्पतीशास्त्र संस्था आणि कॉन्स्टान्झ विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.
- संशोधकांनी 90 पेक्षा अधिक स्थानिक आणि परदेशी जातीच्या वनस्पतीच्या लागवडीचा एक एकत्रित प्रकल्प राबविला होता. त्यामध्ये वनस्पतीच्या विविध जातींची विविध घनतेमध्ये 16 गवताळ प्रदेशात लागवड करण्यात आली.
- मातीमध्ये कमी प्रमाणात बदल करत बियाणांचे कमी जास्त प्रमाण ठेवले. त्यानंतरच्या वनस्पतीच्या वाढीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले.
- त्यानंतर प्रत्येक वनस्पतीच्या बियाणांचा दर आणि अंकुरणाचा दर, वाढीचा दर, स्पर्धात्मक क्षमता आणि किडीरोगासाठीची प्रतिकारकता यांचा अभ्यास करण्यासाठी हरितगृहामध्ये काही चाचण्या घेण्यात आल्या.
असे आहेत संशोधनाचे निष्कर्ष
संशोधनाच्या निष्कर्षाबाबत माहिती देताना संशोधक मार्कस फिशर यांनी सांगितले, की वनस्पतीवर जगणाऱ्या किटक आणि अन्य वनस्पतींशी होणारी स्पर्धा हे वनस्पतीच्या वाढीसाठी फारच कमी प्रमाणात मोजण्यात आलेले घटक आहेत. हरितगृहातील आणि प्रक्षेत्रावरील वनस्पतीच्या वाढीच्या निष्कर्षांचे एकत्रित करत त्यांचे महत्त्वाचे गुणधर्म ओळखण्यात आले आहेत. त्यात किटकापासून योग्य प्रमाणात संरक्षण करू शकणाऱ्या वनस्पती यशस्वी ठरल्याचे दिसून येते.
- प्रयोगाच्या सुरवातीला अधिक बिया देण्याची क्षमता असलेल्या वनस्पतींची गवताळ प्रदेशात वेगाने वाढल्या. अधिक बिया रुजल्याने यशाचे प्रमाणही अधिक होते. पुढे अधिक अभ्यास करताना या घटकाचे महत्त्व बदलले.
- ऍन केम्पेल म्हणाले, की वनस्पती- वनस्पती किंवा वनस्पती- वनस्पतीवर जगणारे सजीव यांच्यातील अंतर्गत संबंध हा मुख्य गुणधर्म म्हणून पुढे आला. प्रदीर्घ काळाचा विचार केला असता कीटकापासून स्वतःचा बचाव करू शकणाऱ्या वनस्पती अधिक यशस्वी ठरल्या.
- वाढीसाठी अयोग्य वातावरणात वनस्पतींची वाढ होण्यासाठी काही जैविक बदल होण्याची गरज असते. हा पहिला टप्पा आहे. एकदा वनस्पतींच्या बिया रुजल्या की त्यांना भविष्या त्यांच्यावर होणाऱ्या कीटकांच्या, रोगांच्या किंवा अन्य स्पर्धकांच्या हल्ल्याला तोंड देण्याची तयारी करावी लागते. हा वनस्पतीच्या वाढीचा दुसरा टप्पा अधिक महत्त्वाचा आहे.
या संशोधनाचे फायदे
- भविष्यात हानीकारक ठरू शकणाऱ्या वनस्पतींची लवकर ओळख पटविणे शक्य होईल.
- पीक म्हणून एखादी वनस्पती लागवडीसाठी घेताना काही चाळण्या लावण्याची आवश्यकता असून, अशा चाळण्या निर्माण करणे या संशोधनामुळे शक्य होईल.
- वाढीसाठी आवश्यक गुणधर्मांची ओळख पटल्याने नामशेष होणाऱ्या वनस्पतींच्या वाढीसाठी प्रयत्न करता येतील.
जर्नल संदर्भ ः
A. Kempel, T. Chrobock, M. Fischer, R. P. Rohr, M. van Kleunen. Determinants of plant establishment success in a multispecies introduction experiment with native and alien species. Proceedings of the National Academy of Sciences, 2013; DOI: 10.1073/pnas.1300481110
--------------------------------------
फोटो ः प्रयोगामध्ये विविध वनस्पतीच्या वाढीच्या गुणधर्माचा अभ्यास करण्यात आला. (स्रोत ः ऍन केम्पेल)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा