सोमवार, २२ जुलै, २०१३

रडण्याची भाषा उलगडणारे साधन विकसित

रडण्याची भाषा उलगडणारे साधन विकसित

नवजात बालकांच्या रडण्याचे विश्लेषण करणे होणार सोपे,
मेंदू आधारीत विकाराचा अंदाज येणार लवकर

अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठ आणि रोड्स आयसलॅंड येथील महिला व बालरूग्ण हॉस्पीटल येथील संशोधकांनी नवजात बालकांच्या रडण्याचे विश्लेषण करण्यासाठी नवे साधन विकसित केले आहे. या साधनामुळे मेंदूविषयक विकाराचा अंदाज लवकर मिळणार असून, बालकांच्या आरोग्याबाबत किंवा त्यांच्या वाढीबाबतच्या समस्यावर उपचार करणे सुलभ होणार आहे. हे संशोधन जर्नल ऑफ स्पीच, लॅंग्वेज ऍण्ड हिअरींग रिसर्च मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

लहान बालकांसाठी केवळ रडणे हीच भाषा असते. भूक लागली, काही त्रास झाला किंवा कोणतीही बाब सांगण्यासाठी बालके रडतात. या रडण्यामध्ये अत्यंत सूक्ष्म असा फरक असतो. मानवी कानांना हा फरक बऱ्याच वेळा लक्षात येतोच, असे नाही. त्यामुळे बाळाचे प्रत्येक रडणे त्यांच्या मात्यापित्याला काळजीत टाकत असते. तसेच बालक जे काही रडण्यातून सांगू पाहत आहे, ते समजू न शकल्यास आरोग्याबाबत समस्या वाढून त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होऊ शकतो.
त्यामुळे बालकांच्या रडण्याचे योग्य प्रकारे विश्लेषण करण्यासाठी ब्राऊन विद्यापीठातील संशोधकांनी प्रयत्न सुरू केले. त्यांनी संगणकाधारीत रडण्याच्या आवाजाचे विश्लेषण करणारे साधन तयार केले आहे. या बाबत माहिती देताना ब्राऊन विद्यापीठातील मानसशास्त्र आणि मानवी वर्तन विषयक संशोधक स्टिफन शेइनकॉफ यांनी सांगितले, की प्रसुतीच्या वेळी झालेली अंतर्गत इजा यामुळे बालकाच्या मेंदूमध्ये काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. जन्मानंतरचे बाळाचे रडण्याचे विश्लेषण करणे शक्य झाल्यास मेंदू आणि चेतापेशींशी संबंधित गुंतागुंतीचा त्वरीत वेध घेणे शक्य होईल. जन्मानंतरच्या रडण्यामधील अत्यंत सूक्ष्म असे बदल टिपून त्याचे विश्लेषण करण्यासाठी गेली दोन वर्षे प्रयत्न करण्यात आले आहे.
--------------------
असे काम करते हे साधन
पहिला टप्पा ः- जन्मानंतरचे बालकांचे रडणे रेकॉर्ड केले जाते. या रेकॉर्डचे 12.5 मिलीसेंकदाच्या तुकड्यामध्ये (फ्रेम्स) विभाजन केले जाते. या प्रत्येक तुकड्याचे वारंवारीता. आवाज, आवाजाची प्रत अशा अनेक गुणधर्माच्या कसोट्या लावल्या जातात.
दुसरा टप्पा ः- पहिल्या टप्प्यातील माहितीच्या आधारे दुसऱ्या टप्प्यामध्ये आवश्यक ते आवाजाचे नमुने वगळून अन्य भागावर लक्ष केंद्रित केले जाते. रडण्यातील अडथळ्याबाबत किंवा मध्ये थांबण्याबाबत विचार केला जातो. या आवाजातील वेळ मोजला जातो. आवाजाची पातळी आणि एकूण वेळेसाठी आवाजाच्या पातळीमध्ये होणारे बदल यांचा अन्य बदलासोबत मेळ घालत त्याचा सरासरी काढली जाते.
तिसरा टप्पा ः बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेल्या 80 विविध घटकांसाठी आवाजाचे विश्लेषण केले जाते. प्रत्येक घटक आरोग्याशी जोडून ताडून पाहण्यात येतो.
-----------------------
कोट ः
बाळाचे रडणे जाणून घेऊन त्या आवाजाचे विश्लेषण आणि त्याचा आरोग्याशी असलेला संबंध जाणून घेण्यासाठी उपयुक्त साधन विकसित करण्यावर आमचा भर होता. रडण्याच्या आवाजाचे सिग्नल आपल्याला जे काही सांगू पाहत आहेत, त्यांना ओळखणारे साधन तयार केले आहे.

-हार्वे सिल्व्हरमॅन, प्राध्यापक व संचालक, मानव- यंत्र पद्धती अभियांत्रिकी प्रयोगशाळा, ब्राऊन विद्यापीठ.
-----------------------
मेंदूशी संबंधीत विकाराचा अंदाज येणार लवकर
 शेइनकॉफ हे विकृती निर्माण होण्याच्या प्रक्रियेवर विशेष अभ्यास करत आहे. बालकांमध्ये निर्माण होणाऱ्या ऑटिझमसारख्या विकृतीचा अंदाज घेण्यासाठी या साधनाचा वापर करीत आहेत. ते म्हणाले, की ऑटीझम विकृती असलेल्या प्रौढामध्ये आवाज हा वेगळा किंवा सामान्य नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बालकांचा आवाजावरून या विकृतीची ओळख पटविणे शक्य होईल. अर्थात हे अवघड असले तरी अशक्य नाही.
-----------------------
इथे रडण्याचाही होतो अभ्यास
- गेल्या अनेक वर्षापासून लिस्टर हे बालकांच्या रडण्याचा अभ्यास करत आहे. लिस्टर यांनी या आधी बालकांच्या रडण्यावर कुपोषण, औषधांचे व अन्य धोक्यांचे होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला आहे. असे अनेक संशोधन पेपर त्यांनी प्रकाशित केले आहेत. आवाजाचे विश्लेषण करणारे साधन निर्मितीसाठी हा अनुभव कामी आला
- लिस्टर यांनी सांगितले, की 1960 मध्ये या संशोधनाची मुळे रूजली आहेत. क्राय ड्यू चॅट सिंड्रोम ( मांजराचे रडणे) ही विकृती जनुकिय कारणामुळे येते. ज्या बालकांचे रडणे अतिदीर्घ व उच्च स्वरात असते, त्यामुळे कोणत्याही यंत्राशिवाय हे वेगळेपण लक्षात येते.
- रडणे ही मेंदूशी जोडलेली एक खिडकी असल्याची कल्पना करण्यात आली. जर बालकाच्या मेंदूमध्ये काही गुंतागुंत असेल, तर आवाजावर नियंत्रण ठेवण्यामध्ये अत्यंत सूक्ष्म असे बदल होणे अपेक्षित असते. आवाजाच्या पातळीमध्ये व अन्य घटकामध्ये बदल हे थोडक्यात आरोग्याशी जोडलेले असतात.

जर्नल संदर्भ ः
B. Reggiannini, X. Li, H. F. Silverman, S. J. Sheinkopf, B. M. Lester. A Flexible Analysis Tool for the Quantitative Acoustic Assessment of Infant Cry. Journal of Speech, Language, and Hearing Research, 2013; DOI: 10.1044/1092-4388(2013/11-0298)

फोटोओळ ः नवजात बालक रडण्यातून अनेक गोष्टी सांगत असते, मात्र आता विकसित झालेल्या साधनामुळे या रडण्यातून आरोग्याविषयीही माहिती मिळू शकेल. (स्रोत ः माईक कोहिया, ब्राऊन विद्यापीठ)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा