सोमवार, १ जुलै, २०१३

मुलांसाठी मोफत बस, पर्यावरणासाठी फायद्याची

मुलांसाठी मोफत बस, पर्यावरणासाठी फायद्याची

लंडन येथील मोफत बस योजनेमुळे घटले अपघाताचे प्रमाण

वाहतुकीची समस्या या जगातील कोणत्याही शहराची समस्या आहे. त्यासाठी विविध उपाय करण्यात येत असतात. काही धोरणे राबवली जातात. मात्र त्यांचा झालेला परिणाम फारच कमी वेळा शास्त्रीय पद्धतीने तपासला जातो. असाच एक शास्त्रीय अभ्यास इंग्लंड येथील लंडन शहरात राबवलेल्या 12 ते 17 या वयोगटातील मुलांसाठी मोफत बसप्रवास योजनेचा करण्यात आला आहे. या योजनेमुळे अपघातामध्ये घट होऊन पर्यावरणासाठी उपयुक्त ठरल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. त्याचे निष्कर्ष जर्नल ऑफ इपिडेमिओलॉजी ऍण्ड कम्युनिटी हेल्थ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

 शाळा आणि ऑफिसेस यांचे वेळापत्रक जवळजवळ सारखेच असल्याने एकाचवेळी वाहने रस्त्यावर येतात. पर्यायाने सर्वाना वाहतूकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. त्यावर लंडन येथे लहान मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांसाठी मोफत बस योजना राबवण्यात येते. लंडनमध्ये 2005 या वर्षी 12 ते 16 वयोगटाच्या मुलांसाठी मोफत बस प्रवासाची योजना सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये 2006 मध्ये 17 वर्षाच्या मुलांचाही समावेश करण्यात आला. यातून लहान प्रवासासाठी बस, सायकल किंवा चालत जाण्याच्या सवयीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या योजनेच्या सफलतेचा विश्लेषणात्मक अभ्यास संशोधक फिल इडवर्ड आणि सहकाऱ्यांनी केला आहे. त्यांनी लंडन स्थानिक प्रवास सर्वेक्षण आणि मागणीचे सर्वेक्षण यांच्या योजनेपूर्वी 2001 ते 2004 आणि योजनेनंतर 2005 ते 2009 या कालावधीतील प्रवासाची माहिती जमा केली. त्याच सोबत प्रवासात होणारे छोटे मोठे अपघात आणि जखमा यांच्या विषयीची माहिती ट्रॅफिक आणि शहरातील हॉस्पीटलमधून गोळा केली.

निष्कर्ष ः
-लहान प्रवासासाठी मुलांना बस वापरण्याच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली. आधी त्याचे प्रमाण फक्त दोन टक्के होते. ते वाढून 5 टक्के झाले.
- लहान प्रवासासाठी चालण्याच्या प्रमाणात फारशी वाढ झाल्याचे दिसले नाही. मात्र सायकलच्या वापरात घट झाल्याचे स्पष्ट दिसून आले.
- पौगंडावस्थेतील मुलांमध्ये या आधी बसचा प्रवास फारसा लोकप्रिय नव्हता. त्यामध्ये वाढ झाली.
- 2005 पुर्वीच्या कालावधीत पौंगडावस्थेतील मुलांच्या अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. योजनेच्या सुरवातीला 17 वर्षे वयाच्या मुलांचा या योजनेमध्ये समावेश नसल्याचे अपघाताचे प्रमाण अधिकच असल्याचे दिसून येते.
- प्रौढ व्यक्तीच्या कारच्या प्रवासाच्या फेऱ्यामध्येही घट झाल्याचे दिसून आले. सरासरी कारच्या प्रवासाचे अंतर कमी झाले.
- या योजनेमुळे वृद्धाच्या प्रवास करण्याच्या संख्येत कोणतीही घट दिसून आली नाही.
- या योजनेचा एकच तोटा दिसून आला तो म्हणजे मुलांच्या कमी अंतरासाठी चालणे कमी झाले. तसेच सायकल वापराचे प्रमाण कमी झाले. मात्र पर्यावरणावरील परिणामाचा विचार करता कारच्या फेऱ्या खुपच कमी झाल्याचे दिसून येते. या मुलांना लागलेल्या बसच्या सवयीमुळे प्रौढ व्यक्तीपैकी अनेक लोकही बस प्रवासाकडे वळल्याचे दिसून येते.

जर्नल संदर्भ ः
Phil Edwards, Rebecca Steinbach, Judith Green, Mark Petticrew, Anna Goodman, Alasdair Jones, Helen Roberts, Charlotte Kelly, John Nellthorp, Paul Wilkinson. Health impacts of free bus travel for young people: evaluation of a natural experiment in London. J Epidemiol Community Health, 2013 DOI: 10.1136/jech-2012-202156

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा