सोमवार, २२ जुलै, २०१३

मत्स्यपालनासह टोमॅटो शेती ठरू शकते फायदेशीर

मत्स्यपालनासह टोमॅटो शेती ठरू शकते फायदेशीर

शाश्वत, कार्यक्षम पाणी वापराची जर्मनीतील संशोधकांनी बसवली साखळी

जर्मनीतील संशोधकांनी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान आणि मत्स्यशेती यांचा मेळ घालत एकत्रित प्रकल्प उभारला आहे. हरितगृहामध्ये टोमॅटोसोबतच तिलापिया माशांची वाढ करत एकमेकांना पुरक पाण्याचा वापर करण्याची पद्धती विकसित केली आहे. त्यामुळे कमीत कमी पाण्यामध्ये टोमॅटोची शेती आणि मत्स्यपालन करणे शक्य होते. मत्स्यपालनासाठी वापरलेल्या पाण्यावर जिवाणूंची प्रक्रिया करत नायट्रेटयुक्त पाणी मिळवले जाते. हे नायट्रेटयुक्त पाणी टोमॅटोसाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानातून उपयोगात आणले जाते. त्यामुळे पिकांची चांगली वाढ होण्यास मदत होते. शेतीसोबतच मत्स्यउत्पादनातून अधिक उत्पन्नही मिळते.

टोमॅटोचे हरितगृह आणि मत्स्यपालन या दोन्ही बाबी शेतकऱ्यांसाठी नव्या नाहीत. मात्र जर्मनीमध्ये या दोन्ही घटकांची सांगड घालून शाश्वत पद्धतीने पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याचे तंत्र अवलंबले आहे. या पद्धतीमुळे दोन्ही घटकातून अधिक  उत्पादन मिळवणे शक्य आहे. जर्मनीतील इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर इकॉलॉजी ऍण्ड इनलॅंड फिशरीज येथील जीवशास्त्रज्ञ हेन्ड्रिक मोनसीस यांनी पाण्याच्या टाक्या टोमॅटोच्या हरितगृहामध्ये ठेवल्या असून त्यामध्ये तिलापिया माशांची वाढ केली जाते. प्रत्येक टाकीमध्ये योग्य प्रमाणात मासे ठेवण्यात येतात. मासे आणि टोमॅटो या दोहोसाठी योग्य ठरेल असे तापमान (27 अंश सेल्सिअसपर्यंत) ठेवले जाते. माशांचे खताचे पाणी पिकासाठी वापरले जाते.

टोमॅटोची लागवड
टोमॅटोची लागवड मातीऐवजी मिनरल वूल या माध्यमात केली आहे. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या वापरामुळे टोमॅटोच्या पिकासाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे सोपे जाते. तसेच माशांची विष्ठा व खतयुक्त पाणी योग्य प्रक्रियेनंतर पिकांना पुरवणे सोपे जाते. या पाण्यातून पिकांना नत्र उपलब्ध होते. उत्पादनामध्ये वाढ मिळते.
-----------------------

कार्यक्षम आणि शाश्वत पाणी वापराची साखळी
- मासे ज्या पाण्यात वाढतात, तिथे अमोनियाचे प्रमाण वाढते. अतिप्रमाणात अमोनिया झाल्यास तिलापिया माशांसाठी ते विषारी ठरते. मात्र या पाण्यात विरघळलेला अमोनिया हे पिकासाठी खत असते. या पाण्यातून अमोनियायुक्त पाणी वेगळे केले जाते.  ही प्रक्रिया हरितगृहामध्ये स्वयंचलितपणे केली जाते.
- हे घाण पाणी पांढऱ्या प्लॅस्टीकच्या पाईप्समधून पुढे नेले जाते. पहिल्या टप्प्यामध्ये त्यातील माशांचे टाकाऊ पदार्थ गाळून वेगळे करतात. यासाठी पाण्याच्या टाकीमध्ये छोटे प्लॅस्टिकचे सच्छिद्र घटक तरंगते ठेवलेले असतात. त्यामध्ये नायट्रोसोमोनस आणि नायट्रोबॅक्टर या जिवाणूंचा समावेश असतो. हे जिवाणू या पाण्यातील घटकापासून अमोनियम नायट्रेट आणि नायट्रेट बनवितात. हे खत आहे.
- हे खतयुक्त पाणी टोमॅटो पिकांच्या कुंड्यामध्ये नळ्याद्वारे नेले जाते. पाण्यातील नत्र पिकाद्वारे शोषले जाते. उर्वरीत पाणी पिकाच्या पानाद्वारे हवेत सोडले जाते. हवेतील बाष्प (पाणी) हरितगृहात अडवून त्याला थंड केले जाते. त्यासाठी शीतकरण सापळे बसवले आहेत. हे पाणी पुन्हा मिळवून माशांच्या टाक्यात सोडले जाते. अशा प्रकारे शाश्वत मासे आणि टोमॅटो पिकांची साखळी पूर्ण होते.
- पिकांना शुद्ध पाण्याची गरज नसते. माशांना आवश्यक शुद्ध पाणी पिकाद्वारे पुरवले जाते.
- पारंपरिक मत्स्यपालन आणि पिकासाठी लागणाऱ्या पाण्याच्या तुलनेत या पद्धतीत प्रति दिन केवळ 10 टक्के पाणी लागत असल्याचे वेर्नेर क्लाओज यांनी सांगितले.
- या हरिसगृहासाठी लागणारी ऊर्जा सौर ऊर्जेद्वारे मिळवली जाते.

-----------------------------------------------------------------------
असे होतात फायदे
- टोमॅटो आणि मत्स्यपालन एकत्रित असल्याने व्यवस्थापनाच्या खर्चात मोठी बचत होते.
- या दोन्ही बाबी एकमेंकाना पुरक असल्याने टोमॅटोच्या व माशांच्या उत्पादनामध्ये वाढ मिळते.
- नत्रयुक्त खतावरील खर्चामध्ये बचत.
- मत्स्य पालनासाठी पारंपरिक मत्स्यपालनाच्या तुलनेत केवळ 10 टक्के पाणी लागते.
- या दोन्ही घटकांच्या उत्पादन प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या टाकाऊ घटकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आहे. कर्बउत्सर्जन कमी असल्याने पर्यावरणासाठी फायदेशीर.
---------------------
फोटोओळी ः बर्लिन येथील केंद्रातील माशांच्या टाकी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा