सोमवार, २२ जुलै, २०१३

अतितीव्र वातावरणात जगण्याच्या गुरूकिल्लीचा शोध पक्ष्यांच्या जनुकांत

अतितीव्र वातावरणात जगण्याच्या गुरूकिल्लीचा शोध पक्ष्यांच्या जनुकांत

अतितीव्र वातावरणात राहणाऱ्या ग्राऊंट टिट पक्ष्यांचा जनुकिय अभ्यासातून उलगडली अनेक रहस्ये

जगातील सर्वात चिवट किंवा तीव्र पर्यावरणात राहणारा पक्षी म्हणून तिबेट येथील बर्फाच्छादीत पर्वतीय प्रदेशात आढळणारा ग्राऊंड टिट (Parus humilis) हा पक्षी ओळखला जातो. या आकाराने लहान पण चिवट अशा पक्ष्यांचा जनुकिय अभ्यास ग्रिफिथ विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. या पक्ष्यांच्या चिवटपणामागील जनुकिय रहस्यांचा शोध घेण्यात संशोधकांना यश आले आहे. हे संशोधन नेचर कम्युनिकेशन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

ग्रिफिथ विद्यापीठातील डेव्हीड लॅबेर्ट आणि डॉ. शंकर सुब्रमनियम यांनी ग्राऊंड टिट या पक्ष्यांचा अभ्यास केला आहे. डॉ. शंकर सुब्रमनियम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी ऑक्सीजनमध्ये, अत्यूच्च उंचीवरील रहिवासासाठी या पक्ष्यांनी उत्क्रांतीदरम्यान बदल करून घेतले आहेत. मात्र या जनुकिय बदलाविषयी माहिती उपलब्ध नव्हती. आमच्या अभ्यासामध्ये ग्राऊंड टिट पक्ष्यांमधील जनुकिय सुधारणा ओळखण्यात आल्या आहेत.

काय आहेत या पक्ष्याची वैशिष्ट्ये
- ग्राऊंड टिट हे पक्षी 3300 ते 5400 मीटर उंचीवरील झाडामध्ये राहतात. तिबेटीयन पर्वताळ प्रदेशतील गवताळ भागामध्ये त्यांचा रहिवास असतो.
- हे पक्षी अंडी घालण्यासाठी मातीमध्ये खड्डे किंवा बिळे करून घरटी बनवितात.
-  मातकट किंवा फिकट तपकिरी रंगाचा हा पक्षी त्याच्या लांब आणि सरळ चोच, लांब पाय, अन्य टिटपक्ष्यापेक्षा शरीराचा मोठा आकार यामुळे पक्ष्यामध्ये वेगळा ओळखता येतो.

जनुकिय अभ्यासातील महत्त्वाच्या बाबी
- जनुकिय संशोधनातून मिळालेल्या माहितीनुसार,  आजवर या पक्ष्याला कावळ्याच्या जातीमध्ये मोजला जात असे. त्यामुळे सर्वात लहान कावळा असे म्हटले जाई, मात्र त्यापेक्षा सर्वात मोठा टिट पक्षी म्हणून त्याची ओळख रास्त ठरणार आहे. अन्य टिट पक्ष्यांपासून साधारणपणे 7.7 आणि 9.9 दशलक्ष वर्षापूर्वी ग्राऊंड टिट वेगळा होत गेला आहे.
- अतितीव्र वातावरणामध्ये रहिवासाच्या दृष्टीने या पक्ष्यांच्या शरीरात झालेल्या बदलांचे जनुकिय पातळीवरील उलगडा करण्यात आला आहे.
- तिबेटीय आणि ऍंडेज सारख्या पर्वतांच्या परिसरात वावरण्यासाठी हायपोक्सिया प्रतिक्रिया आणि हाडांची रचना तयार होण्यासाठी आवश्यक बदल जनुकांत झाले आहेत.
-  अतिथंडीमध्ये तग धरण्यासाठी मेदाम्लांच्या चयापचयासाठी कारणीभूत असलेल्या जनुक अधिक कार्यरत होत असल्याचे दिसून आले.
- त्यासोबत या वातावऱणासाठी सुसह्य बदलासाठी काही जनुक नष्ट झाले असून त्यामुळेही विषाणू आणि जिवाणूंविरोधी प्रतिकारकता विकसित झाली आहे.
- या भागामध्ये गंधांचे प्रमाण कमी असल्याने गंध मिळविण्याची क्षमता कमी झाली आहे.

संशोधनाचे फायदे
- काही जनुकांच्या नष्ट होण्यामुळे किंवा अकार्यक्षम होण्यामुळे अतितीव्र वातावरणामध्ये जगणे सुसह्य होते. या पक्ष्यांच्या जवळच्या कुळातील व कमी उंचीवर आढळणाऱ्या पक्ष्यांच्या जनुकांचा अभ्यास केल्यास तुलनात्मक फायदे मिळवणे शक्य आहे.
- काही पाळीव पक्ष्यांशी या पक्ष्यांचे काही प्रमाणात जनुकिय साम्य असून, अतितीव्र वातावरणामध्ये हे पक्षी तग धरण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरू शकते.

महाराष्ट्रातील टोपीवाला...
महाराष्ट्रातही टिट पक्ष्यांची एक प्रजाती हिमालयातून साधारणतः मॉन्सुनच्या कालावधीमध्ये स्थलांतर करून येते. तिला येथे टोपीवाला या नावाने ओळखले जात असल्याचे पक्षी तज्ज्ञ महेश गायकवाड यांनी सांगितले.


जर्नल संदर्भ ः
Yanhua Qu, Hongwei Zhao, Naijian Han, Guangyu Zhou, Gang Song, Bin Gao, Shilin Tian, Jinbo Zhang, Ruiying Zhang, Xuehong Meng, Yuan Zhang, Yong Zhang, Xiaojia Zhu, Wenjuan Wang, David Lambert, Per G. P. Ericson, Sankar Subramanian, Carol Yeung, Hongmei Zhu, Zhi Jiang, Ruiqiang Li, Fumin Lei. Ground tit genome reveals avian adaptation to living at high altitudes in the Tibetan plateau. Nature Communications, 2013; 4 DOI: 10.1038/ncomms3071

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा