सोमवार, २२ जुलै, २०१३

वनस्पतीच्या अतिधोक्याच्या संदेशामुळे अळ्या होतात आकर्षित

वनस्पतीच्या अतिधोक्याच्या संदेशामुळे अळ्या होतात आकर्षित

वनस्पती देत असलेल्या आमंत्रणामुळे अळींच्या शत्रूंसोबतच अळ्यांनाही कळते शाश्वत अन्नाचे ठिकाण

वनस्पतीवर अळींचा हल्ला झाल्यानंतर अळींच्या शत्रूंना आमंत्रित करण्यासाठी एक प्रकारचा गंध (संदेश) वनस्पती सोडतात. वास्तविक हा संदेश वनस्पतीवर हल्ला करणाऱ्या किडींच्या शत्रूंसाठी ( वास्पसाठी ) असला तरी अळ्याही त्यामुळे अधिक प्रमाणात आकर्षित होत असल्याचे मका या पिकावर स्वित्झर्लंड येथे झालेल्या संशोधनात दिसून आले आहे. हे संशोधन फ्रंटिअर्स इन प्लांट सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
स्वित्झर्लंड देशामध्ये मका पिकावर स्पोडोप्टेरा लिट्टोरॅलीस या पतंगाच्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अळीने पाने कुरतडल्यानंतर वनस्पती हायड्रोकार्बन ( हवेत पसरणारे सेंद्रिय घटक ) सोडतात. या घटकाचा वास हा ताज्या कापलेल्या गवताप्रमाणे असतो. या वासामुळे वास्पसारख्या किडीवर अंडी घालणाऱ्या मित्रकीटक आकर्षित होतात. एका अर्थाने शत्रूच्या शत्रूला आमंत्रण दिले जाते. त्याचवेळी या वासामुळे अन्य पाने कुरडणाऱ्या अन्य किडी दूर राहतात.  या बाबत माहिती देताना स्वित्झर्लंड येथील न्युचाटेल विद्यापीठातील रासायनिक पर्यावरणातील मुलभूत आणि उपयोजित संशोधन प्रयोगशाळेतील संशोधक टेड तुर्लिंग यांनी सांगितले, की ज्या वनस्पती सहजातियांचा वावर आहे, अशा वनस्पतींचा वापर प्रौढ पतंग आणि फुलपाखरे करण्याचे टाळतात. त्यामुळे त्यांच्या सहजातियांनी घातलेल्या अंड्याचे, त्यातून निघालेल्या अळ्यांचे पालनपोषण चांगल्या प्रकारे होते. तसेच अन्य किटकभक्षकांपासूनचा धोकाही कमी होतो. मात्र, आमच्या संशोधनामध्ये स्पोडोप्टेका लिट्टोरॅलीस या प्रजातीच्या अळ्या मका पिकांच्या या वासाकडे अधिक प्रमाणात आकर्षित होत असल्याचे दिसून आले आहे.

अधिक संशोधन
प्रयोगशाळेमध्ये या वासाची नक्कल कृत्रीम रसायनांच्या साह्याने केली असता, असेच निष्कर्ष मिळाले. पुढील प्रयोगामध्ये स्पोडोप्टेका लिट्टोरॅलीसच्या अळ्यांना कोणत्या प्रकारचे गंध आवडतात, याचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी अळ्यांना चार नळ्या एका मध्य भांड्याशी जोडलेल्या उपकरणात (त्याला इंग्रजीत ऑलफॅक्टोमीटर असे म्हणतात.) ठेवण्यात आले. या प्रत्येक नळीतून हवेच्या साह्याने वेगळा वास प्रवाहित करण्यात आला. त्यातील त्यांच्या स्वजातियांनी आक्रमण केलेल्या मका पिकांच्या वासाकडे दुपटीपेक्षा अधिक अळ्या आकर्षित झाल्या. त्यातही ज्या मक्यावर नुकताच किंवा ताजा हल्ला झालेला आहे, अशा मका पिकाकडे त्यांचा ओढा अधिक होता.

असे का होत असावे
- आधीच प्रादुर्भाव असलेल्या वनस्पतीकडे आकर्षित होण्यामध्ये या अळ्यांचा काय फायदा असेल, या बाबत विश्लेषण करताना संशोधक तुरलिंग म्हणाले की, जेव्हा अळी पानावर खाली पडते, तेव्हा तिला अन्य किटकभक्षी व तसेच मातीतील रोगकारक बुरशींपासून धोका असतो. उपासमारीची भिती असते. त्यामुले जमिनीवर पडलेली अळी जवळच्या किंवा आधीपासून खात असलेल्या वनस्पतीकडेच धाव घेते.
-  हा एक मुद्दा असून, दुसऱ्या प्रयोगात हायड्रोकार्बनच्या तीव्र गंधामध्ये अळ्या अधिक हालचाल करत असून कमी खात असल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी ताज्या हल्ल्याच्या ठिकाणी असलेली कमी स्पर्धा आणि अन्य किटकभक्षकांपासून कमी धोक्यामुळे त्याची निवड करत असाव्यात.
- या वासामुळे अन्न असल्याची खात्रीमुळेही काही प्रमाणात असलेली स्पर्धा मान्य करत या अळ्या आकर्षित होत असाव्यात.
- प्रौढ पतंग हे अधिक अंतर जाऊ शकत असल्याने थोडा अधिक धोका स्विकारत अन्न शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते ज्या मका पिकावर अळ्या आहेत, त्यांना टाळत असल्याचे दिसून आले आहे.

जर्नल संदर्भ ः
Georg E. von Mérey, Nathalie Veyrat, Marco D'Alessandro, Ted C. J. Turlings. Herbivore-induced maize leaf volatiles affect attraction and feeding behavior of Spodoptera littoralis caterpillars. Frontiers in Plant Science, 2013; 4 DOI: 10.3389/fpls.2013.00209
--------------------------------------------------------
फोटो ः अळीच्या वर्तनाचा मागोवा घेण्यासाठी वापरण्यात आलेले उपकरण (ऑलफॅक्टोमीटर )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा