सोमवार, १ जुलै, २०१३

मानवी कॉर्नियातील नव्या थराची पटली ओळख

मानवी कॉर्नियातील नव्या थराची पटली ओळख

अनेक डोळ्यांच्या आजाराविषयी स्पष्टता शक्य

माणसांच्या डोळ्यातील कॉर्निया या घटकामध्ये एक नवा थर असल्याचे नॉटिंगहॅम विद्यापीठातील संशोधक हरमिंदर दुवा यांना आढळून आलेले आहे. डोळ्याच्या कॉर्नियामध्ये एक 15 मायक्रॉन जाडीचा एक थर असून त्याला त्यांनी दुवाच लेयर असे म्हटले आहे. या संशोधनामुळे डोळ्यांच्या शस्त्रक्रिया अधिक सोप्या आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे. हे संशोधन ऍपॅथलमोलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

माणसातील डोळ्यांच्या समोरील भागामध्ये असलेल्या कॉर्नियामध्ये पाच थर असल्याचे मानले जात होते. त्यात दुवा यांच्या संशोधनामुळे आणखी एका थराची भर पडलेली आहे. दुवा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डोळ्यांच्या कॉर्निया या भागामध्ये हवा भरून संयुक्त सुक्ष्मदर्शकाखाली प्रत्येक थर वेगळा करून पाहिले आहे. संशोधक हरमिंदर दुवा यांच्या मतानुसार,  या नव्या थराच्या ओळखीनंतर कॉर्निया पुनर्रोपणांच्या शस्त्रक्रियेमध्ये सुधारणा करणे शक्य होणार आहे. सध्याच्या वैद्यकानुसार जाणवत असलेल्या त्रुटी कमी करणे शक्य होणार आहे.

मानवी कॉर्निया व दुवा थराविषयी अधिक माहिती ः
-  मानवी कॉर्निया हे डोळ्यासमोर असलेले पारदर्शक संरक्षक भिंग असते. त्यामधून प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो. कॉर्नियाची एकूण जाडी 550मायक्रॉन किंवा 0.5 मिलीमीटर इतकी असते.
- कॉर्नियामध्ये पाच थर असल्याचे मानले जाते.सुरवातीपासून कॉर्नियल इपिथेलियम, बॉऊमनस लेअर, कॉर्नियल स्ट्रोमा, डेस्केमेटस मेम्ब्रेन आणि कॉर्नियल इन्डोथेलियम असे थर आहेत.
- दुवा यांनी शोधलेला थर हा कॉर्नियल स्ट्रोमा आणि डेस्केमेटस मेम्ब्रेन यांच्यामध्ये आहे. या थराची जाडी 15 मायक्रॉन आहे. हा थर कठीण आणि ताकदवान असून दीड ते दोन बार दाब सहन करू शकतो.
- कॉर्नियल हायड्रॉप हा कॉर्नियाचा आजार याच थरामध्ये होत असल्याचे संशोधक मानत आहेत. या आजारामध्ये अश्रू किंवा पाण्याचे प्रमाण या थरामध्ये वाढते. त्यामुळे डोळ्यामध्ये चरा पडून पाणी साठते.
- डोळ्यांच्या अन्य रोगाविषयी अधिक माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यावर नव्या पद्धतीने संशोधन करावे लागणार आहे.
----------------------------------------------
जर्नल संदर्भ ः
Harminder S. Dua et al. 2013. Human Corneal Anatomy Redefined: A Novel Pre-Descemet’s Layer (Dua’s Layer). Ophthalmology, in press; doi: 10.1016/j.ophtha.2013.01.018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा